शहाजीची सुटका

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.


शहाजीची सुटका
चौक १ ला
शिवाजीचे बुद्धीचातुर्य । तसेच औदार्य । आणि शौर्य त्रिगुणाने त्याने सर्व जगतास । दिपवुनि केले चकित लोकास । कीर्तीचा डंका भारत खंडास ॥
शिवाजीने आदिलशहास । चकविले त्यास । डाव निखालस । उलटला त्याचे अंगावर खास । काटशह दिला आदिलशहास । अचूक शिवबाची युक्ती समयास ॥
कल्याण खजिना लूटला । ऐकून वार्तेला । शहा खवळला । शहाजी पाजी असे बोलत । खलिता खरडला त्याच रांगात । राग कां, हीत करी जगतांत ॥
बंदोबस्त करा पुत्राचा । नाहीतर् त्याचा घात घेण्याचा । हूकुम सोडितो आम्ही सैन्यास । प्रांत उध्वस्त सर्व करण्यास । पश्चाताप होईल मग तुम्हास ॥

चाल १ : हे पत्र शहाचे जहरी । शहाजीचे टोचले अंतरी । शहाजी होता अधिकारी । शहा नुस्ता नामधारी । धाडिले पत्र दरबारी । ऐकत नाही सुत वैखरी ॥ खटपट केली आजवरी । निष्फळ जाहली सारी । धाडुनी फौज त्यावरी । करा परिपक्व सत्वरी ॥
चाल २ : दरबारि होते शहाजीचे भारि वजन, विजापुरी नव्हते हालत त्याविनापात्र, शहाजीचा पाहुन दरारा कापती यवन, द:खनी शहाजी दिल्लीस शहाजहान, वर्चस्व शहाजीचे करी यवन अपमान, यवनात नसाव हिंदू असे बोलून, शहाजीची फूस शिवबास असे सांगून, शहाजीचा करु लागले द्वेष ते खान, ऐकुनी शब्द हे शहा गेला खवळून, इतक्यात दूत पातला पत्र घेऊन ॥
चाल : आगीत तेल ओतता जाते भडकून । पायाची आग मस्तकी पत्र वाचून । आताच्या आता शहाजीस आणा पकडून शहाजीस आधी पकडता स्वत: शरण येईल हात जोडून ॥

चौक २ रा
तय्यार झाला पकडण्या मुस्तफखान । मदतीस खानाच्या बाजी गेला धाऊन । घरभेदा करितो वाटोळे समय पाहुन । सेवक होता शहाजीचा, कलिजा हृदयाचा । काळ परि झाला करणी वरतून ॥ तय्यार झाला देण्यास शहाजी पकडून । पोशीला सर्प शहाजीने दूध पाजून । उलट तो सर्प तो जाणे काय यजमान । नावाने होता जरी बाजी, ठरला परि पाजी, स्वामी घातकी देश दुश्मन ॥

चाल : १ एके दिवशी बाजी शहाजीला । घेऊन आला गृहाला ॥ देऊनी थाप हो त्याला । भोजना यावे करण्याला ॥ अंतरी कपटी हेतूला । पकडणें शहाजी राजाला ॥
चाल : २ पकडुनि करिन मी खूष यवनराजाला । मिळवीन विपुल मग द्रव्य आणि मानाला । पकडूनी मग टोचून बोले शहाजीला । लाज ना वाटे देण्यास फूस लेकाली खातांना यवनराजाचे तुम्ही अन्नाला । हा बेटा मात्र उलटून धनी पकडला । लोका सांगे ज्ञान आपण पाषाण झाला । शिवाजीस फूस कां होती कळले नाही त्याला । कळणार कसे या देशद्रोही कुत्र्याला ।

चा. मो. : पकडूनी शहाजीराजास । आणिले त्यास । विजापूरास । करुन दाखल आदिलशहास । ठोकीला मुजरा यवन राजास । आणिला म्हणे सिंह शहाजीस ॥

चौक ३ रा
शृंखला-युक्त शहाजीला । पाहून राजाला हर्ष जाहला । बोलू लागला त्यास टोचून । तूच लेकाला फूस लावून । टाकणार यवन राज्य उलथून ॥
कटाव १ - आदिलशहा म्हणे शहाजीस, तुझ्या किर्तीस काळीमा खास, लावतो त्यांस, यवन राज्यांस, देतो बहु त्रास तुझ्या पुत्रास, आणि वठणीस, सुटका खास, ना तरी जावे लागेल मृत्यु पंथास ॥ ऐकुनी शहाचे बोल, शहाजी लाल, झाला तत्काळ. परी अनुकुल, नाही हा काल, असे जाणोनीम ऐकत नाही मत पुत्र दिले सांगोनी ॥
ऐकुनी शहा खवळला, कोंडा म्हणे याला याच वेळेला खाऊन माजला, माझे अन्नाला, पुत्र वठणीला, आण तर तुला, आशा जगण्याला, ना तरी करिन कोठी बंद अजिबात सर्व बाजून ॥

चाल १ :
करुनिया विचार चित्तात । शहाजीने धाडिले वृत्त ॥ शिवबास मनिचा हेतू कळविलासकल वृत्तांत ॥ शाहाच्या नजर बंदीत । तुजमुळे आहे कैदेत । जर असशी खरा मनपुत्र । सोडीच यातुनि मात्र ॥

चाल - चांद रोहिणी सवे कराया क्रीडा उत्तरे गगनात, किंवा शंकर पार्वती बैसे हिममय आरसे महालात । तैसे होते सईबाईस शिवाजि आपल्या महालांत । सुख दु:खाच्या गोष्टी राज्यातील बोलत ऐकमेकांत । तोच पावला दूत होऊनी पत्र टाकले हातात । क्षणभर विव्हळ होऊनी म्हणती काय करु मी हे तात । संकटमय आयुष्य जयाचे त्याला सुख लाभेल कसे । रात्रं दिन देशाची चिंता लागुन ज्याला राहातसे ॥ चंद्रावरती एकाएकी मेघ येऊनी विरस करी । विषण्ण झाला तसा शिवाजी पत्र वाचुनि खरोखरी ॥

चाल मो. :-
जाहले दु:ख वाचुन तात वृत्तांत । वाटले शहाला शरण जावे चित्तांत । गेल्यास शरण, होईल स्वराज्य अंत । काय करावे याचा निश्चय सुचेना उपाय आले शिवराय खरें पेचात ॥

चौक ४ :
सईबाई चतुर धोरणी होती महालात । विचारांचे उठता काहुर त्यांचे डोक्यात । वाटले तीला विचारावी सल्ला मसलत । टाकलाच प्रश्न तात्काळ, काय सुचवाल, म्हणे पत्नीस या प्रसंगात ॥
बायका आम्ही सांगावे काय हो यात । आम्हास राजकारण नाही समजत । परि पाहुन शिवरायाचा आग्रह बहुत । सईबाई होती पटाईत सल्ला देण्यात । काट्याने काटा हे उचित । ऐकुनी वाटले समाधान इतक्यात । शक्कल सुचली तात्काल नामी खरी, परी सत्वरी । पाठवुनी पत्र आणली आमलात ॥
समजोनी मित्र स्वस्त्रीला । शिवबाने घेतला सल्ला । निर्बुद्ध वाटे स्त्री ज्याला । त्याने पहावा हाच दाखला ॥ स्वातंत्र्य योग्य न स्त्रीला । वाटते असे ज्या कोणाला । अवलोकुनी शिवचरित्राला त्याने पहावा हाच दाखला ।

चाल :- १
शहा विजापुरि हाति शहाजी म्हणूनी होता गर्वात गर्व नाही परि करित कुणाचा घात विहित हे जगतात । येईल आंता शरण शिवाजी ऐसे मांडे खाण्यात । दूत पातला पत्र घेऊनी । दिल्लीपती दरबारात, पाहुनि खलिता शिवराजाचा मोह जाहला चित्तात । यावेळी जर मदत केलि तर दु:ख येईल, न हातात पोक्त करुनि हा विचार, लिहीला खलिता त्याने, तो त्यात ।

चाल :- २
सोडून द्यावे शहाजीस पत्र देखत ना तरी असा तय्यार आम्हाशी गाठ, वाचु असे बादशहाचे पत्र चकित वासले तोंड शहाचे तेथल्या तेथे विरघळून जातो, ढेकूळ पडता पाण्यात तसा शहा गेला विरघळून दरबारात, त्याचेच दात घातले त्याचे घशात, मोकळें केले शहाजीस पत्र देखत ।

चाल मो. - नभिसूर्य येता सरसरा । चांद घाबरा । होतो पांढरा । शरण येतसे सूर्यराजास । तसा सुलतान शहा शिवबास ।
आला घेऊनी किल्ले मलखास ॥

चौक ५ वा
होताच मुक्त शहाजीला । पाहूनी शिवबाला । प्रेमभर आला । चांद पाहून भरति सिंधूस । वत्स पाहून पान्हा धेनूस ।
तसे भरते शहाजीस ॥ भेटुन म्हणे शिवबास । माझ्या वैर्‍यास बाजी अधमा । ठार केले तरिच वंशास । येऊनि सार्थक केले जन्मास । कलंक ना तरी माझ्या नांवास ॥ शहाजीचे शब्द ऐकून शिवाजी खवळून । सांगे निक्षून । ठार जर करिन तुमच्या वैर्‍यास स्वर्ग दावीन बाजी अधमास तरीच दावीन वदन तुम्हास ॥

चाल : -१
यवनास काळ जो आला । बाजीचे भय काय त्याला ॥ जणु सिंधू फार खवळला । क्रोधाने लाल शिव झाला ॥ कि सिंह उसळूनि आला ॥ सह्याद्रि सिंह कोपला ॥
चाल - घेऊनि सैन्य शिवराज मुधोळा आला । चढविला अचानक बाजीवरतीं हल्ला । पाहुनी शिवाजी, बाजी मनी चरकला । सैतान जणू हा पुढे येऊन ठाकला जणु मेघ येती एकाकी नभो मंडळा । सुरवात झाली युद्धास खणखणाट झाला तलवारी ढाली दोघांच्या चमकु लागल्या । गगनात बिजलीचा कडकडाट जणू झाला । शिवाजीने करुनिया हल्ला शत्रु कापला । घेतला सूड जनकाचा पुरा त्या काळा । नि:पात देशद्रोह्याचा करुनि टाकला । घातला सडा रक्ताचा शत्रू ना उरला ॥
कटाव १ परिकुठे आहे तो बाजी, म्हणे शिवाजी हरामखोंर पाजी, ज्याने शहाजी, पकडुनी माजी, केली दुष्कीर्ती, करुनीया ठार धाडतो त्याला मी वरती ॥ इतक्यात बाजी, नजरेंस पडला तो त्यास, द्वंद्वयुद्धास, एकमेकास ठार करण्यास, झाली सुरवात, बशिवाने तोच उडविले शीर गगनांत ॥
चाल मो. लावुनि त्याचेच रक्ताचा टिळा विजयाचा । तात सूडाचा । लाऊन शहाजीस केले वंदन । म्हणे शत्रुचे केले कंदन । धन्य ते माता पिता नंदन ॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-09T18:54:24.6830000