पेशवाईच्या उत्तरार्धाचा पोवाडा

इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.

हा पोवाडा ज्या वहींत आहे ते एवही पुणें येथील एका शाईवाल्याजवळ सांपडली. वहींत आणखीहि एक ऐतिहासिक पोवाडा असून दोन चार लावण्याहि आहेत. एकीचे सेवटीं आनंदफंदीचा उल्लेख आहे. ह्या पोवाड्यांत कर्त्याचा उल्लेख कोठेंच नाहीं. पोवाडा अपुरा आहे. लिहिणारा अडाणी मराठा असावा असें लिखाणावरून वाटतें. मोडीप्रमाणें सर्वत्र इकार दीर्घ व उकार र्‍हस्व आहे. प्रत्येक अक्षरास ओळ निराळी काढिली आहे. पोवाड्यांत एके ठिकाणीं लिमये याजबद्दल निमये असें रूप आलें आहे. पोवाड्यांत बर्‍याच व्यक्तींचा निर्देश आला आहे. हा पोवाडा रा. शंकरराव शाळिग्राम यांस दाखविला. नवीन आहे म्हणून मांडीत आहे.
हा पवाडा समकालींन नि विश्वसनीय आहे. ह्याचें प्रमाण त्यांतच सूक्ष्म व अन्यत्र प्रमाण म्हटल्या जाणार्‍या पत्रांदिकांतून ज्यास आधार मिळतो असा आलेला वृत्तान्त हें दिसून येईल. ह्यांत कांहीं नवीनहि माहिती आलेली आहे. आतां ह्यांत एकदोन वैगुण्यें आहेत, तो अपुरा व त्रोटक म्हणजे मधलाच भाग नाहीं असा आहे ( पण चौकाचे आंकडे क्रमानें आहेत हें कसे ? ) तसेंच एकदोन विशेषणें असमर्थित असून एके ठिकाणीं उपमेयाचेंच वर्णन उपमा समजून आलें आहे. पोवाडा असा -

॥श्री॥ : नवखंड्या प्रसन्न :

भले नान फडनीस केली कीर्त सवाई : चव मुलखी धास्त त्रीलाके जानती शाही : ॥१॥
संपन्न सर्वगुनी ब्रहस्पती - प्रमान : कोमळ र्‍हदई जैसे भोळे सीव जाने ; पाहाता थोरपन मेरु दीस्तो लाहान : आर्जुन कर्न त्या तुले पराक्रम जान : चेतुरता पाहाता विशेस गुन सुज्ञान : कुठवर कीर्त वरनानी तर्‍ही मुखान : आद्भुत ज्ञान उपमा किती मुन द्यावी : प्रीथ्वीचे वजेन कीती म्हुन कोनी जोखावी : कीती खोल सप्त पाताळे मुन सागावी : संभुच्या तपाची गगना कैसी करावी : आद सेक्तीचा जप कीती म्हुन की वदावी : कीती वर्णू पराक्रम ह्म स्तु बोलावी ; नाना फडनीसच प्रमान तुमची पदवी : सत्त्वधीर कीर्त हारीचेद्रा तुले जाली ठावी : श्रीयाळ त्याहुनीया महिमाम आघवी : आतरी शात कोमळ कठुरपन नाही : येसस्वी सदा कल्पना सर्वा : ठायी : ॥१॥
नारायन आवतार संपले पाहा जैपामुन : तैपासुन सागतो व्रत ते घ्या आयेकुन : गरभी आसता श्रीमंत शेर्त ( शत्रु ) मर्दी(र्दू)म : चालविल राज नानानी हीमत धरुन : कैवरी छेत्रु ठेविले आपनाधन करुन : तीळतुले कोठे पडु दील्हे नाही नुन : धर्येवत नव खंडात गाजती क्रीत : नादती रहीत ( राहात ) खुसवतु सहेर पुन्यात : बसल्याच ठाई प्रताप करुन आद्भुत : मोगल हापसी फीरगी हेदर्‍यासहीत : खडन्या देती ठेवीले आनुन जर्बत : बसल्येच ठाई बाछाव आले चालत : केला मुलुख काबीज सांगरवलयाकित : येकछेत्री राज भगवा केली झेडा सेर्त : कुठवर वरनावी महिमा विष्णु - भगत : श्रीमत रावसाहेबाची फीरवीली द्वाही : छेपन देशामध्यें म्हासुर पडली आ(व)ई : ॥२॥
श्रीमत लाहानाचे थोर केले नानाने : सेवेसी सादर उभे कर जोडोनी : सद्भावे लक्षे लावुनी धन्याचे चेरनी : येकनीष्ट्ये सेवा केली चीतापासुनी : धरयेला नाही द्वैतभाव आंतकर्नी : चालवीले राजा पाहा नाव धन्याच करुनी : चोवीस वरसे नानानी कारभार केला ।
[ पुढें पानाच्या शेवटची ओळ तशेच सोडून पुढील अर्धें पानहि कोरेंच सोडिलें आहे. ]
नंतर माधव आवतार नीजधामा गेला : कसे रा(ज) पुढें चालेल मुन वीचार पडला : अनावे सवाई बाजीराव बे(त) ठरवीला : तव घडी रवाना केले परसरामभावुला : भंडार क्रीया भावुन दील्ही श्रीमंताला : पुन्याशी आनीले बाजीराव साहेबाला : खडुखडुचे मुकामी नाना गेले भेटीला : कूच दरकूच करून माघुन सींदा आला : मसलद केली नानानी मग ते समई : आज्ञा घेऊन सातार्‍यास गेले लवलाही : ॥३॥
नाना कावा करून गेले महाडाला : बरे पाहु कोन चालवील या राज्याला : नानाचे मागे व्रतांत कैसा जाला : सांगेतो स्वत चेतुर आना ध्यानाला : बाळोबा पागनीस भावुसंग मीळाला : ॥ मसलत करुन राजाचा फीतवा केला : जरीपटका मागु लागले बाबा हडक्यासी : परंचुर्‍या पभुन घेतली हीरुन मकलसी : नानाचे लोक होत लचे ? तस्ती केली त्यासी : जुने कारभारी होते केले दुर सार्‍या : स्व आंगें करु लागले भावु चवकसी : पुढ आसता आवलंबीले थोर कार्यासी : याचे न व दा न व जाचे सेवटासी : व्याघ्राची सर काये येती जंबुकासी : पंडीताची सर काये न ये मुरखासी न कळे मुढासी पुढें होईल कैस काई : आपले च ठकानी बसले होवुन बाछञाई : ॥४॥
सीद्याचे भेटीला बाजीराव धनी गेले : मग मागे बारा भाईनी कैसे केले : बाबाकडे जाउ म्हुन आपासी सागीतले : घालुन पालखीत तदं घडी पुन्यासी आनले : पाहा करु नये ते वीप्रीत कर्म केले : दील्ही वस्त्रे जबरदस्तीन तक्ती बसविले : घरोघर करु लागले कारभारासी : ॥ चवगदी बैसवील्या चौक्या सेहेर पुन्यासी : ॥ ठेवीले कारकोन ठाई नाक्यासी : ॥ झाडा घेती बाहीरुनसे हेरुन आल्या - गेल्यासी : ॥ फोडून पाहाती कुल तमाम लाखोट्यासी ॥ हे आल्पबुधीन आखेर पडतील का : ॥ कसी होईल बरोबरी त्यांची सद्योतासी : मोराची प्रीतीमा न ये लाडोरासी : ॥ च्यार दीवस मौजा केल्या होवुन सुक नासी : कुल कारभारी भावुचे ठाईठाई : पुन्यात कारभार करती बाराभाई : भले : ॥५॥
पागनीस परसरामभावु सीद्यासहीत : कुल तमाम पाहा नानावर फीरले होत : ॥ आच्याट बुध नानाची न कळे आतःकळसूत्री कावा केला बसुन माहाडातः सीद्याला पत्र पाठवीले लेहुन गुप्त : का परबुधीन घालीता कलप स्नेह्यात : ॥ पुर्वीचे वचन चीतांत करावे स्मरन : तुमचा आमचा येकलास पहील्यापसुन : मातले फीतोनी यासी बंधन : ॥ समजले दवलतराव पत्र आसे पाहुन : तदघडी बाळोबा पागनीसाला धरुन : ठेवले आटकत त्याहासी जप्ती करुन : तैसच आर्षेन धोडीबाला करुन : बाजीबा मोधी पुत्रासहीत जान : वगैरे सात आसाम्या तोर लाहान : पुन्यातील धरले किती ईचे सीवाई : सागतो नावनीसीचे ऐकुन घ्या सर्वही : ॥६॥
प्रथम वासुदेव कोतवाल केला जप्त : त्यामागे यकासरसे येकला धरीत : प(ब)हीरो रघुनाथ धरीला ऐका त्वरित : रमी कोडी दोघी कळवावातींनी सहीत : आन्याबा मेदळे नीमये चीतोपंत : सीवपंत मोडके राघोपंत थते : जयराम जोसी जुगी राखी सहीत धरला : केसो शामजी भान्या चेतुरभुज केला : आनेक बाळाजी वीष्णु सहश्रबुध्याला : त्याची राख लक्षुमी ठेविली कैयदला : माहादाजी काळे वीठलराव गोळ्याला : रामचेद्र पराजपे भीकाजीपंत आटकवला : मग धरला चीतो मोरेश्वर सीवनेरवाला : बाजी मोरेश्वर देवरुख्या पळुन गेला : गनपतराव करमरकर आना ध्यानाला : सदाशीव थते सदासीवपत जोसी वहीला : पानशा तोफखान्याचा धरुन ते समई : जनोबा सुभेदार दस्त केला लवलाही : ॥७॥
श्रीपतराव पटवर्धन आल्मखान : सटवाजी लाड येसाजी घाडगे पुर्न : वाड्यातील च्यार नाईक घ्या ऐकुन : हरी विष्णु सहश्रबुधे पाहा नीरखुन वीसाजीपंत वाडदेकराला धरुन : आबाजी बलाळ सहश्रबुधे जान : हारबाजी धायेगुडे हीरोजी पाटणकर मोरो बाहु बाबाजी ? आभ्याआकार : आन्याबा आभ्याकर आनीक दोन हुजरे : निसबत फडक्याची दोन खीस(म)तगार : धरील्या आसाम्या बावन येकतर : आनीक लाहान थोराचा नाही सुमार : जे ना(ना)कडे गेले ते ऐका सरदार : मानाजी फाकडे मल्हारराव पोवार : नीळकंठराव दीनकरपंत भडभडे चेतुर : बळवंतराव गोडबाले समजुन र्‍हदई : गोपाळराव राजपागे आसाम्या साही : ॥८॥
राहिला थोडा मजकूर कथा मागली : ( अपूर्ण )

N/A

References : N/A
Last Updated : March 26, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP