महात्मा गांधीचा पोवाडा
इतिहासाचे साधन म्हणून पोवाड्यांचे महत्व विशेष आहे. पोवाडे हे गीत-नाट्यरूप असल्यामुळे त्यात मनोरंजन व प्रचार यांचा मेळ घातला जातो.
चौक १ ला
ठेवुनी हात स्वातंत्र्य देवि पदकमला । स्वातंत्र्य-प्रतिज्ञा करुनि नित्य कार्याला । कसुनिया कास देशार्थ फकिर जो झाला । जयाचा देव सखा बनला ॥
(चाल : धन्य धन्य धन्य छ्त्रपती)
ज्यांचि कीर्ति गाजे जगतांत । भरतखंडांत । साधुसंतांत । गांधि जाहले पूर्ण विख्यात । वंद्य जे झाले सकळ लोकांत । महात्मा म्हणुनि त्यास म्हणतात ॥
पाहुनी हाल दीनांचे । कळवळे सांचें । हृदय गांधीचे । हिंदुचे दु:ख दूर करण्यांत । हाल सोशिले अफिका खंडात । महात्मा म्हणुनि त्यास म्हणतात ॥
तन मन धन अर्पुनी । लंगोटि लावोनि । फकिर होवोनी । देश - स्वातंत्र्य एक चित्तांत । ध्यास लागला दिनरात । महात्मा म्हणुनि त्यास. ॥
परस्त्रीस माता समजोनी । विलास सोडोनी । इंद्रियदमनी मिळवुनी विजय जाहले ख्यात । ऐन तारुण्यबहर कालांत महात्मा म्हणुनी. ॥
चाल १ :-
समजोनि बहिण स्वस्त्रीला । मारिली लाथ सौख्याला अवघड विश्वामित्राला । तो विषयपोश तोडिला ॥
दोन तपे ब्रम्हचर्याला । पाळुनी विरक्त जाहला ॥
वैराग्य असे जगताला । पाहुनी अचंबा वाटला ॥
चाल २:-
वैराग्य लाभलें श्रीरामासम ज्याला । रामासम वाटे गांधि शांतिचा पुतळा । एकपत्नि वचनि एकवाणी या त्रिगुणाला ।
पाहुनि त्रिगुण गांधिजीपाशी जगताला । श्रीराम जणू कलियुगी वाटे अवतरला । नेसुनी वल्कलें राम निघाले वनाला ।
नेसुनि खादी गांधिजी गेले आफ्रिकेला । त्याने सीतादेवी याने कस्तुरबाई जोडीला । मारुनी लाथ राज्याला राम नीघाला ।
सोडोनी पाणि वैभवावरी हा गेला । वनवास चौदा वर्षांचा त्याने भोगिला । आफ्रिका त्रास यानें चौदा वर्षे सोशिला । वानर साह्य त्याला सत्याग्रहि वश याला । त्यानें लंकापति यानें लंडनपति हलवीला ।
चाल मोडते - हिंदूचे हाल पाहोनि । गेले धावोनि । सत्याग्रह करुनि । केले रक्षण आफ्रिका खंडांत । गर्व गोर्यांचा जिरविल । त्यांत । महात्मा म्हणुनि त्यास म्हणतात ॥
चौक २ रा - रौलेट बिलाचा वरवंटा । सत्याग्रह सोटा । दाबूनी मोठा । गांधिनी दूर पळवलें त्यांस । जागृत केलें हिंदुस्थानास । बनविले सहनशील लोकांस ॥
हरताळ सर्वं देशांत । पडला कडकडित । चळवळ जोरांत । पाहुनी क्रुद्ध झालें सरकार । दिल्ली शहरात केला गोळिबार । तिकडे गांधिजे गेले सत्वर ॥
चाल १ ली :- गांधिजी तेथे जातात । पकडिलें त्यांस इतक्यात ॥
खळबळ झाली लोकांत । रौलेटबील निषेधार्थ ॥
भिती पडली सरकारात । सोडिलें गांधि मुम्बईत । सरकार पडलें पेचांत । पाहुनी सत्याग्रह शस्त्र । शांतता, भंग सदरांत ।
गोळीबार पुन्हां दिल्लींत ॥
चाल ४ थी : - स्वामी श्रद्धानंद दिल्लींत । चालले होते शिस्तीत गोळीबार झाला इतक्यांत ॥
स्वामीचा घात । करण्याचा हेतु हृदयांत । स्वामिचा सवाल गुरख्यास । कारण काय गोलिबारास । ऐकुनि सवाल म्हणे त्यास । आले रागास । छेद देंगें तुमकू म्हणे त्यांस ॥ जी ।
छातीचा करुनि कोट । दावूनि धैर्य अलोट । मै खडा सामने ताठ । म्हणे मुझें काट । आला गोरा तेथे इतक्यांत ॥ जी ॥
रोखिल्या हुकुमावांचून । बंदुका त्यांनी दडपून । शिपायाच्या गळल्या हातून । गोरा पाहून । अशि फजिती केली धैर्यान ॥ जी ॥
चाल बदल :- गांधिनी साह्य करुनिया महायुद्धांत । इंग्रजा दिला मिळवून विजय हो त्यांत । पाजुनी दूध पोशिला सर्प गृहात ।
तो सर्प जसा घे प्राण । तसें शिरकाण । करुनि देशाचि केलि धूळधाण ॥ जी ॥
कटाव ३ रा :- जालियनवाला बागेचे । केलें रक्ताचे । अंगण साचें । कत्तलिचा असा नाही दाखला । कलंक हा इंग्रजी राज्याला ।
सांगतो ऐका प्रसंगाला । जालियनवाला बाग केला । पिंजरा लोकांन कोंडण्याला । वाघापरि ठार मारण्याला । वीस हजार लोक सभेला । विमान घारीपरि हो घिरट्याला । घालु लागले त्या समयाला ।हत्यारबंद शिपाई दाराला ।पाहून गर्भगळित लोक झाला। भिती आहे जिवाची प्रत्येकाला । भिंतीवरून चढुन जाउ लागला । जाऊ दिले नाही परी कोणाला । वाघ जणु पिंजर्यात सांपडला । तसा सारा लोक कोंडला गेला । गोळीबार त्यांनी सुरु केला । मुंग्यापरि लोक ठार झाला । इतक्यांमध्ये दारु गोळा संपला ।
नाहीतर आणखी कांही स्वर्गाला । पाठविण्याची इच्छा होती डायराला । कांही लोक लोळुन जमिनीला । वाचवूं पाहती प्राणाला । असें पाहुन हुकूम झाला । गुडघे टेकुन जमिनीला । ठार करा तुम्ही निजलेल्या ।प्रेतांचा ढीग तेथे झाला ।काय वर्णांवें प्रसंगाला । सांगा तुम्ही दादा? ॥
चाल मोडते -- जालियनवाला बागेंत केला गोळीबार । मुंग्यापरि करुनिया कैक लोकांना ठार । डोळ्याची धुंदी परि नाही उतरली पार । राव रंक सारे सरसकट । जाण्या फरफटत पोटानें सरपटत । लावी सरकार ॥ जी ।
उपकारफेड ज्यांनि केली करुनी अपकार । राक्षसी अशि डायर कृत्यें करणार । सरकार त्यास पेनशन देण्या तय्यार ।
पाहुनीं अमानुष छळा । गांधि खवळला । पुकार केला दुष्ट सरकार ॥ जी जी ॥
चौक ३ रा - एकोणीसशे वीस सालाला । आगष्ट पहिलीला । घात जवा झाला । कालानें नेले बाल टिळकास । मायभूमीच्या भाल तिलकांस । पुसुनी दुर्दैव तिच्या वाट्यास । मायभूमी ढाळीं अश्रुला । दास्य शृंखला । तोडणार गेला । म्हणजे मम दया माझ्या पुत्रासं । येती कां कोणा सदय हृदयास । तोंचे पातले गांधि समयास ॥ जी ॥
असहकार त्यांनी पुकारुन । देश हालवून । जागृति करुन । दु:ख मायभूचें कमी करण्यास । पारतंत्र्याचे पाश तोडण्यास तुरुंगवासाचा सोशिला त्रास ॥ जी ॥
कटाव २ : - असहकार कर्णा फुंकिला । त्याचा नाद देशभर झाला खडबडून जागृत केला । जणु सिंह खावया उठला । इंग्रजां बहिष्कार घाला । नका जाउ त्यांच्या कोर्टाला । सोडा त्यांच्या शाळा काँलेजाला । करुं नका त्यांचे नोकरीला । कौंसिली
बहिष्कार घाला । नका घेऊं त्यांच्या पदविला । नका घेऊ विदेशी माला सर्वांनी बहिष्कार घाला । शरण येण्याला ॥
चाल २ :- एक कोटी एका महिन्यांत फंड जमविला ।
खादिचा धंदा त्यांतूनि त्यानी सुरु केला ।
जिकडे बघावें तिकडें पाहून गांधि - टोपिवाला ।
क्रोधाग्नि नोकरशाहिचा त्यानें भडकला ।
मुस्कटदाबी कैक लोकांची केली त्या काला ।
गोर्याच्या पोटाला चिमटा खादीनें बसला ।
पकडिले त्यानें त्यावेळी म्हणूनी गांधीला ।
कांही वेळा ढगाच्या आड सूर्य जाहाला ।
जातांना ढग बाजूलासूर्य तळपला ।
काराग्रह एका वर्षात त्यांचा संपला ।
भगवान कृष्ण गोकुळी जसा जन्माला ।
इंग्रजांचा जेल पुरणार याच्या जन्माला ।
मोहनी त्यानें गोकुळां यानें भारताला ।
कृष्णाने सुदर्शनानें कंस वध केला ।
यांचे चरखा - चक्र मारितें मँचेस्टरवाला ।
लक्ष्मी सदा सेविते त्याचें चरणाला ।
धांवते लक्ष्मी या मार्गें नित्य कार्याला ।
अर्जुना गीता सांगूनी निर्भय केला ।
शिकवुनी अहिंसा यानें धीट देश केला ।
त्यानें कौरवा शींयुद्धार्थ अर्जुन सिद्ध केला ।
यानें हिंदी केला तय्यार कायदेभंगाला ।
चाल मोडते : - असहकार काळ संपला । चला हो चला कायदेभंगाला । मुंबईकर ज्यामध्यें ख्यात । ज्यानी केली इंग्रजावर मात । त्याचें वर्णन पुढील चौकांत ॥ जी ॥
चौक ४ था -- सायमन कमिशन नेमून । केला अपमान । घेतला लाठी मारुन लालाजीचा प्राण । पाहून जाहला जागृत देश-अभिमाने । स्वातंत्र्य ध्येय जाहीर । करण्यास धीर तरून तयार । करण्या बलिदान ।
कटाव ३ :- जसा कृष्ण भगवान गेला । शिष्टाई करण्याला दुर्योधनाला सामोपचारानें वळविण्याला । धर्माची हो बाजू मांडण्याला । हिताची गोष्ट सांगण्याला । दुर्योधन ऐका काय बोलला । माति जेवढी सुईच्या आग्राला । नाही देणार पांडवाला । पांच नांवांची गोष्ट कशाला । कपटानें घेऊन राज्याला । दुर्योधन मस्त फार झाला । दुरुत्तर भगवानाला बोलला । बुडत्याचा पाय खोलाला । गर्व जसा त्याचा हरण केला । थेट तसा प्रसंग झाला । ऐका तुम्ही दादा ॥
दुर्योधनापरमाण झाला । इंग्रज मातला । विचर नाही त्याला । सत्याची चाड नाही त्याला । कृष्णापरि शिष्ठाई करण्याला । गांधी गेले व्हाइसरायच्या भेटीला, गांधी म्हणे व्हायसर साहेबाला । एका वर्षाचा काळ सरला । सरकार काय देणार देण्याला । नेहरु रिपोर्ट मान्य का तुम्हांला । सरकारचा इचार काय झाला सायबान दिल उत्तराला । तयार नाहीं वचन मी देण्याला अजून नाहीं इचार पुरता झाला । सायबाच्या ऐकुन या बोला । गांधी गेले लाहोर काँग्रेसला झटक्यानं दादा ॥
स्वातंत्र्य पुकारां केला । गांधीनी लाहोरला तरूण हालविला । एकोणीसशें तीस आरंभला । जानेवारी सव्विस तारखेंला । स्वातंत्र्याचा जाहीरनामा वाचला जागृत सारा देश झाला । गांधी म्हणे कायदेभंगाला । सुरूं करणार याच काला । कायद्याची भीति लोकांला कोणी म्हणे थांबा या वेळेला । गांधि म्हणे भिऊ नका कायद्याला । भिऊ नका मुळिच कां संकटाला । वाघाचे बच्चे प्रसंगाला । भिऊनि पळता कां संकटाला । वाघ असुनी कां शेंळी बनला । आरसा इतिहासाचा डोळ्याला । दिसतो का नाही तुम्हाला । त्यांत पहा शूर पूर्वजाला । त्यांत पहा शिवाजी राजाला पारतंत्र्यात राहण्याला । लाज कशी नाही चित्ताला । काळिमा पूर्वज किर्तीला । हाती घ्या सत्याग्रह शस्त्राला सविनय कायदेभंगाला । तयार व्हा त्वरितचि कार्याला आज तुम्ही दादा ॥
मीठ कायदाभंग करण्याला । गांधि निघाले मार्च बाराला । सत्याग्रही ऐशी लोकाला । घेऊनि मदतीला । चालत गेले दांडीला ॥
लोटले लोक बघण्याला । उधळती फुलें पैशाला । धन नको लोक या काला । पाहिजे मजला असें सांगुन कायदा तोडला ॥
शस्त्रासि टक्कर देण्याला । शस्त्रहीन सिद्ध कसा झाला परदेश लोक लोटला युद्ध पहाण्याला । आश्चर्य वाटे जगताला ॥
कटाव २ - आदर गांधिविषयी वाढला । जगीं साधु म्हणुन गाजला । धर्मात्मा म्हणुन गाजला । राजकारणी म्हणून गाजला । रामदासापरि त्रिगुणानें गांधी चमकला । जी ।
सहनशीलपणा दुष्टाला । शरण येण्या लावतो त्याला । असा परसंग एकनाथाला । यवनाने मुद्दाम आणला एकनाथ गेले स्नानाला । यवन बसला त्यांचे वाटेला । एकनाथ परत चालला । पाहून आंघोळ केलेला । यवनानें विडा हो थुंकला । एकनाथ परत स्नानाला । स्नान करुन परत चालला । यवन विडा खाऊन रंगला । येतांचे पुन्हा लाल केला । असा एकशें आठ हो वेळेला । यवन त्याच्या आंगावर थुंकला । यवन त्यांना शरण मग आला । एकनाथ हार्णे यवनाला । एकशें आठ स्नान करण्याचे पुण्य दिले मजला ॥ जी ॥
चाल २ री एकनाथ , प्रल्हाद, तुकाराम या कसोटीला । उतरुन झाले जर विजयी त्या प्रसंगाला । सामुदायिक रीतीने तसे सोसू कष्टाला । सोसुनी हाल देशार्थ मिळवू विजयाला । उतरले सत्याग्रही सर्व या कसोटीला । करणार म्हणे गांधिजी मिठागरी हल्ला । करूं गोळीबार जर कराल मिठागरी हल्ला । प्राणाची पर्वा देशार्थ नाही हो ज्याला । तो भिईल काय सरकारी गोळीबाराला ।
सत्याग्रही कैक तय्यार हल्ला करण्याला । सरकारने असे पाहुनी पकडले गांधिला ॥ जी ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 09, 2018
TOP