बहार १४ वा - नवें जिणें

कवी ’गिरीश’ यांचा ग्रामीण जीवनावरील काव्यसंग्रह.


ध्वनि गाडीचा पडतां हिरुच्या आतुरलेल्या कानीं,
धावुन त्याने मिठी मारिली सगुला दोहातानी.
चुम्बुन त्याला, तिने दाविलें कराड्‍गुलीने कांही.
तोंच मुराला हिरु लाजुनी, हासत खाली पाही !
मान फिरविली; परि तो हासत जाई त्याच्याजवळी,
चुम्बुन त्याला, मुरार वत्सल निजहृदयाशीं कवळी.
गहिंवर येउन जरी दाटले नयनीं अश्रू वेगें,
तरी मुराने संयमिलें मन निजवात्सल्यावेगें.
गुल्‍ गुल गोष्टी हिरु मुराशीं बोलाया तों लागे,
आणि साभिनय विक्रम अपुले सर्व पित्याला साड्‍गे.
येतिल असले दिवस पुन्हा, हें सगुस वाटलें नाही,
म्हणुन कौतुकें दृश्य मनोरम हें ती पाहत राही !
येऊन आता मुरारजीला दिवस लोटले आठ,
वदनीं त्याच्या तेज आपुलें वठवी कृष्णाकांठ.
कमण्डलूचा गोड निरोगी नवा लागतां वारा,
फुलकित झाला देह तयाचा नव आनन्दें सारा.
नवशक्तिच्या पोटीं धरिला नवाड्‍कुराने जोम,
मुरार निन्दी शहररहाणी आणि तियेचें स्तोम.
हृदयीं झाला अधिक प्रेमळ; परी जयांनी त्याला -
वागविलें अधमत्वें त्यांना जाइ न भेटायाल.
ज्या विभवाने अम्भेरीमधि केला होता वास,
त्याच वैभवें परतुन जाया त्याने धरिली आस.
प्रेमळ घरचीं सर्व माणसें आणिक अम्बेराई,
याविण कांही श्रमी जिवाला आवडलें मग नाही.
मूल न पोटीं, म्हणुन शिलोजी आणि तयाची कान्ता -
पुरीं लोभलीं त्यांच्यावरती, लागुन वेडी ममता !
गप्पा- गोष्टी करित अड्‍गणीं अशी एकदा सारीं,
बसलीं होतीं जमुन रात्रिची चन्द्रसुधेमाझारीं.
आम्बराइचें तोंच बोलणें हळुच काढिले त्याने,
आणि वदे ‘ हीं बरसातीनं भिजतिल आता रानें !
तजवीजीला नगं म्होरल्या लागाया का होवं ?
गेनबासनी पुसायला पन्‍ आपुन्‍ आता जावं.
आम्बराइवर जीव अडकला आता माझा सर्वे.
शिपत मोडली ! काम न हातीं दुसरं कसलं धर्वे
तोंच शिलोजी सरकुन पुढती हासत त्याला बोले,
‘मुरा, उताइळ होवूं नगं, ह्ये हैती तकडं डोळे.
पोरापुन्‍ तू भारी मज्‍ ला , सगू वि माजी पोर,
आला हकडं, मैतर माजा गेला म्हनुनी थोर !
मानाजीची किरत्‍ वदावी कुनीं ? किती ती मोठी !’
डोळे पुसले शिलोजिंनी मग, कालव होता पोटीं !
‘शबूद गेला माजा ! माज्या धर्मासाठी सारं
आजवरी ह्यें केलं ! न्हाई गेलों कोना हार.
आम्बराइ मी तुला अता ही मिळवुन बक्षिस देतों.’
‘नगं , करा ही किरपा मजवर ! ’ मुरार बोले हें तों.
‘किरपा केली लइ लइ मजवर मानाजींनी मागं,
आन बोलल, तवा किती मीं धरला त्येंचा राग !
पन्‍ त्यें झालं खरं ! नशिब्‍ ह्यें फुटलं माज्या हातीं !
ऐती मिळकत मड्‍जे, काका, अता वाटते माती !
खपूनश्येनी रानीं, गाळुन मी निडळाचा घाम,
शेतामन्दी राबुन म्होरं करिन पगा आराम
सगुना माजी येइल सड्‍गं; टाकुन मागं पैका,
आम्बराइच्या रिणांतनं मी सुटन: एवडं ऐका !’
‘मुरा तुला पन्‍ ही घ्यायाला हर्कत कसली बोल,
परका मज्‍ तू कदिबी न्हाइस; पिर्ती माजी खोल.’
‘सम्‍ दं खरं ह्यें पन्‍ ही ऐती मिळकत काका दोड,
इचार भलंत येउन आन बि लागत न्हाई गोड !
कुनी भरोसा द्यावा फुडला; नियत कुनीं साड्‍गावी,
अता वाटतं गरीबिची म्यां पिर्ती येक धरावी !’
‘पन ह्यो माजा तुला- सगूला देतों खाऊ म्हनुनी.
बसुन सुखानं खा कायमचा वडलांचा ह्यो गनुनी.’
‘नगं नगं ही किरपा मजवर करा याफुडं, काका,
पिर्तीवर्ती ओतिल माज्या विख दुसर्‍याचा पैका !’
परोपरींनी साडिगतलें पण ऐकेनाच मुरार,
निश्चय पाहुनि समाधानले मनीं शिलोजी फार.
गोष्ट मनांतिल गुपित आपुल्या, साड्‍गायाला वेळ-
हीच पाहुनि योग्य, बोलले काय खेळाला खेळ.
‘मुरा ऐक तर , आम्बेराई न्हाइ कुणाची आता,
न्हाइ गेनबा मालक; हाये धनी तियेचा सवता.’
‘कोन पगू त्यो साड्‍ग बर ? त्यो कोन सगू तू साड्‍ग ! ’
विस्मित सारे पाहुं लागले काहि न लागुन थाड्‍ग !
तोंच हासुनी गोड, शिलोजी वदले हलवुन मान -
‘हिरु आपला मालक तीचा ! भगवन्ताचं देनं !
कसा जाहला मालक त्यो बी नगं इचारुं कांही,
अम्बेराई ही पोरांनो परक्याची मुळिं न्हाई !’
स्तिमित जाहले किती वेळ तों सगुना आणि मुरारी,
भिजलीं नेत्रें पाहुनि लीला दैवाची ही सारी !
आकाशांतुन वर्षत होतें सुखद चान्दणें भंवती,
प्रतिवस्तुला चराचरांतिल आली होती नवती.
झुळझुळ वारा वाहुन आता जरा गारठा आला,
निजले प्राणी, डोड्‍गर, झाडें; शान्ति मिळे सर्वाला.
मात्र विचारीं नवीन कांही मुरार झाला गुड्‍ग,
पुष्पावरती एकच गानीं रमला जणुं कीं भृड्‍ग,
‘चला निजूं ! लइ वाडुळ बसलों ! चान्द किती वर आला !’
वदतां काका, उठुनी सगळे गेले झॊपायाला.
परि येईना झोप मुराला; मागिल काळ समोर -
दिसुन, शहारुन अड्‍ग जाउनी भीति वाटली घोर !
उपकाराचें जड हें ओझें जीवा वाटुनि फार,
कृतज्ञता - आश्चर्य भीतिंनी होय मनीं बेजार !
सगुस वदे मग: ‘ही दैवाची करनी उलटी न्यारी,
कोन कुणाचा कसा रिणी पग्‍ दैवाच्या बाजारीं.
कसं करावं , उपकारांचं जोखड जालं भारी !
चौबाजुंनी पुरता गेलों उपकाराच्या हारीं;
आपुन सारं येक, खरं ह्ये; तरि पन्‍ खपुनी रानी;
पैसं फेडूं सम‍द हिरुचं निडळाच्या घामांनी !’
हुकार त्याला दिला सगूने, तोहि जाहला शान्त,
शान्तिरुपिणी सृष्टी रमली ध्यानीं पूर्ण निवान्त !
कळे पुढे की शिलुकाकांनी पुज्‍ जी वेचुन सगळी
आम्बेराई, आपुलकीने केवळ, केली अपुली.
आणि सर्व हें मानाजीच्या मैत्रीसाठी केलें,
वचन पाळिलें पूर्णत्वाने मानाजीस दिलेलें !
तेव्हा आला मुरारजीचा प्रेमें भरुनी ऊर,
आणि तयाच्य़ा नयनीं वाहे कृतज्ञतेचा पूर.
‘अशीं मानसं मला लाभलीं , ही दैवाची खैर !’
बोलुन इतुकें सर्व विसरला तो दैवाशीं वैर.
चार घरांचीं चार माणसें झालीं प्रेमें एक,
परस्परां सुख द्याया करिती स्वार्थत्याग अनेक.
आपुलकीच्या घरीं नांदते प्रेमें निर्मळ शान्ती,
सुख पाहुन हें शिलुकाकांच्या समाधान हो स्वान्तीं.
पाहुन आग्रह पुढे मुराचा, वेळू सोडुन तेही-
रहावयाला प्रेमें गेले आम्बराईच्या गेहीं.
जीवन झालें सुरु तेथलें निर्मळ आनन्दाचें,
उल्हासाचें मुरा घालवी जीवन शेतकर्‍याचें.
‘वनवासीं चौदा वर्स सरलीं आता बैस !
रामराज्य कर हतं !’ बोलले शिलुकाकाहि मुरास.
गेली वर्षे दोन; मुराने पिकें काढिलीं छान,
स्वयें खपूनी मग रड्‍गाला सर्व आणिलें रान.
पहिला पैका आला, सारी विकल्यावरती खोती,
मुरास वाटे तेव्हा पडले हातीं माणिकमोतीम.
सांठवुनी ते आणि घालुनी करुण आसवें त्यांत,
मानाजीची छत्री त्याने बान्धविली शेतांत.
रोज सकाळी सायड्‍काळीं जातां येतां तीचे -
दर्शन घेउन काम चालवी मुरार मग शेतीचेवं.
केव्हा तरि काढुन शिलोजी दिअवसामाजी वेळ,
बसती तेथे, हिरुसड्‍गतीं खेळत कांही खेळ !
आणि सगुच्या हुर्हुर हॄदयीं जेव्हा स्मृतिंनीं दाटॆ
जाउन बैसे ती ही , गाळित अश्रू डोळ्यांवाटॆ !
थण्डी जाऊन, आता ऊष्मा वाढूं लागे थोडा,
शिशिरामधला खळखळणारा बारिक झाला ओढा.
परि थण्डीतिल चराचराची लोपुन भीषण छाया,
पानोपानीं मोहक विलसे नव वासन्तिक माया.
कुठे कोवळे पल्लव फुटले, कोठे मोहर आला,
वार्‍यामधुनी सुगन्ध लागे रानीं दरवळण्याला.
सुन्दर मज्‍ जुळ पक्षिरवांनी भरली अम्बेराई,
तींत कुहूचे कोकिळ गायन ताररवाने गाई.
पिकें काढुनी शेतकर्‍यांनी रानी रचुन बुचाडें,
खळीं घातलीं धान्य मळाया मोगण आणिक माडें.
पाणथळांतुन अजुन उसाची होतीं परि जित्रापें,
हिरवट पानें पिवळीं झालीं मात्र उन्हाच्या तापें.
चालु झालीं कुठे गुर्‍हाळें, अगाप कोठे सरलीं,
वैपुल्याच्या आनन्दाने राई-रानें भरलीं.
मोडुन आता मानाजीचें छ्प्पर पाचटलेलें,
कौलारु घर चौसोप्याचें नवें मुराने केलें.
बाजुस एका बैल बान्धले आणि वांसरे- गाई,
रानवैभवीं खुलूं लागली त्याची अम्बेराई.
दुसर्‍या बाजुस सेवक त्याचा राहे कुणि केदारी,
पत्नी त्याची होय मज्‍ जुळा सगुची मैत्रिण भारी.
उठुन पहाटे शिलुकाकांनी नित्य अभड्‍ग म्हणावे,
गोड सुरावर कधि मज्‍ जुने जात्यावरती गावें.
सगुणा उठुनी, गुराखालचें काढुनि, कामें पाही.
मुरार घेउन केदारीला कामावरती जाई;
पैरण साधी, खादीधोतर शोभति त्याला फार,
डौल मागला गेला तरि ही वदनीं कान्ति अपार.
कधी न्यहारी खाउन जाई, कधि तो परतुन येई,
केव्हा जेवण त्याचें सगुणा शेतावरती नेई.
आज कराया गुर्‍हाळघर तो आणि ऊस पाजाया,
गेला रानीं दूर गडयांसह, जाय हिरु हि पाहाया.
टळली वेळा न्याहारीची , आटपुनी तरि काम,
सगू शिदोरी घॆउनि लगबग निघे सोडुनी धाम.
सोबतिला घेऊन मज्‍ जुळा चालूं लागे वाट,
अपूर्व विलसे मधुर भोवती नव वासन्तिक थाट.
वाट सरावी झरझर म्हणुनी उत्सुकुनी स्वमनांत,
मज्‍ जुळेस तों सगुणा बोले हासुन हळुच पहात -
‘गानं म्हन्‍ त्यें तुजं मज्‍ जुळे ! म्हन्‍ त्यें बाई गोड,
वकूत्‍ न्यारिचा- बिगी बिगी-त्यें ! जिवा लागली वोढ !’
लाजे अपुल्याशींच मज्‍ जुळा; सगुला परि आतुर-
पाहुनिया, ती काढी अपुले गोड रानटी सूर-


न्याहारीचें गाणें
"न्यारिचा वकुत होईल  मैतरणी बिगिबिगि चाल !
नाड्‍गुरसुटीच्य आंत    पोचाया होवं ततं.
सोडितिल हात बैलाला  धुण्डील नदर कोनाला !
नदरे न पडन्‍ मी जरी,
जाईल मर्जि ग तरी,
उरिं रुतंल माज्या सुरी,
नग नगं गमावूं येळ   मैतरणी बिगिबिगि चाल !
लइ वाडुळ जुपि झाल्याली  असत्याल समदिं शिणल्यालीं !
शिण जाइल न्यारि करुन  अन्‍ साड्‍ग कुना देखुन ?
त्यें खुलें त्वाण्ड घामानं  भरघोस हि कण्‍ साहुन.
पाहिलं जरी रोज मीं,
तरि हौस न होई कमी,
फिरफिरुन पगायास मी,
व्होतसे मनिं उतायीळ  मैतरणी बिगिबिगी चाल !"
अचल पापण्या,डोळे सुस्थिर, टपोर, पाणीदार,
आणि गाल यांवरी पसरली हसरी जादु अपार !
ऐकत होती सुस्वर गाणॆं सगुणा मन लावुन,
अन्तीं नजरा मिळतां, हसल्या दोघी लव लाजून.
गाणें सरतां शान्ति दुणावे भरुनी रानीं सूर,
आणि सगूच्या हृदया लागे गोड पुन्हा हुर्हुर.
‘भरघोसहि कण्‍ साहुन’ ऐसें वदनीं घोळत कांही,
मैत्रिणीस ती वदे ‘ मज्जुळे, बिगिबिगि चल्‍ बाई !’
हसे मज्‍ जुळा डोळे मोडुन आणि सगू ही लाजे,
खुलले लोचन सगुचे, निर्मळ अनुरागाच्या साजें.
तों बैलाला ताररवाने कुणिं म्हटलेले गाणें,
ऐकुन, थबकुन, मन्द पावलीं चाले ती अभिमानें.
दृष्टभेट तों होउन दोघें मनीं आपुल्या धालीं,
घाम मुराच्या कितितीर होता डवडवलेला भालीं !
डोक्यावरती ऊन चाललें होतें तावत फार,
अर्ध्या धावेवरती होती मात्र सावली गार.
मोट सोडली आणि दाविलें गुरांस त्याने पाणी,
केदारीला येण्याला दे हाक तयाची वाणी .
जमले सारे धावेवर ते बसले अम्ब्याखाली,
तोंच शिदोरी सोडाअयाला सगुणा पुढती आली.
हिरु बैसला साड्‍गती मग, मुरार पुरवी कोड,
प्रीतिकराची चटणीभाकर लागे न कुणा गोड ?
मग आवडातें गाणें तिजला म्हणावया तो साड्‍गे,
लाजत हासत नकार देई तीही लाडिक रागें.
परन्तु केला आग्रह त्याने आणि मज्‍ जुने फार,
तेव्हा गाई सगू, माधुरी भरली जींत अपार -
प्रीतीचें गाणें
पिरतिची किर ऽऽऽ त्‍ सम्‍ द्याहुनी लइ न्यारी  ॥धृ०॥
ही पिरंत जडलि रामाला,
शीतेसाटी येडा पर्भु जाला,
मग पुसे झाडांपाखरांला--
‘कुनि दावा पिरत्‍ माजि प्यारी’
हिनं झपाटलं दुर्पदीला,
भावासाटी जिव तळ्‍ मळ्‍ ला,
बोट कापतां त्यें बान्धायाला -
भन्‍ पैठन फाडि जरतारी !
हिचं लागीर जनिला झालं !
हिनं नाम्याला येडं केलं !
हिनं तुक्याचं मन भारलं !
या वेडांत रमलीं नरनारी !
अशि झळम्बि कितिकां बिज्‍ ली,
कितिकांची जीवजोत इझ्‍ ली,
परि ज्यावर मती हिचि रिझ्‍ ली
त्यानं साधील्या मुक्ती चारी !
घास तोण्डचा तोण्डीं राहे आणि हातचा हातीं,
लव हि लवलीं अचल मुराचीं दोडोळयांचीं पातीं.
मोहनमन्त्रे भारुन गेला तो प्रीतीच्या गानीं,
गात्रें त्याचीं रमलीं केवळ सौन्दर्याच्या पानीं.
हिरु एकदा मुराकडे, मग सगूकडे हळु पाहे,
घटियन्त्राचा  लम्बक अथवा जणुं आन्दोलत राहे.
हवेंतुनी मग गानरसाचे वाहत गेले पूर,
पीक उसाचें आनन्दाने डोलुनि झालें चूर.
सड्‍गीताचे सूर उमटले मुरारच्या हृदयांत,
अम्बेराईतून मिळाली सुरेल त्याला साथ.
आणि कमण्डलु शेजारुनी वाहुन झुळझुळवाणें,
ऐकवि मड्‍गल गोड आपुलें प्रीतिशान्तिचें गाणें !

N/A

References : N/A
Last Updated : December 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP