बहार ३ रा - शुभमंगल

कवी ’गिरीश’ यांचा ग्रामीण जीवनावरील काव्यसंग्रह.


सूर्य लोपला सायड्‍काळी अम्बेराईआड,
काळवण्डलें शिवारांतलें हिरवें पिवळें झाड.
किंवा झाली मनीं वियोगें उदास वसुधाराणी,
काढुनि टाकी अड्‍गावरलीं पिवळी सुन्दर लेणीं?
चुकून कोठे मेघ साड्‍जचा रड्‍गुनि थोडा गालीं,
क्षणविभवाने मिरवत चाले ऐटिंत बघुनी खाली.
तोच पातला तिमिर मागुनी हळू चोरटया पायीं;
टाळायाला हाय ! तयाला परन्तु आलें नाही !
रड्‍ग लागले विटावयाला एकामागून एक,
अस्तक्षितिजीं मात्र राहिली लाली दिव्य सुरेख.
टाकुनि खाली जुनें काम्बळें थकुन अड्‍गणामाजीं
पडला होता नजर लावुनी नभी जरा मानाजी.
सुस्कार्‍यांवर सुस्कार्‍याचे सुटले उष्ण श्वास,
ढगांकडे तो पाहत होता लागुनि कांही ध्यास.
किती वेळची येऊन बसली सगू तया शेजारीं,
तरी अजूनि खिळली होती वरती दृष्टी भारी.
तोंच जाहलें काय कळेना, भरुन आले डोळे,
दोन तयांतुन गळले बिन्दू, गाल जाहले ओले !
अता सगूला धीर निघेना, गळां घालुनी हात,
घाबरुन ती प्रश्न विचारी, थरकांपुनि हृदयांत-
‘बाबा ! बाबा! काय असं ह्यें ! सकाळपुन्‍ ह्यें काय?
झपाटलं तर कुनीं भुतानं कुटं तुमाला नाय !
डोळ्यांतुन कां पानी आलं? जिवा लागलं काय?
ग्वाड कशानं वाटत न्हाई? साड्‍गा, धरित्यें पाय !
चुकलं माजं काय? जिवाला कस्ला तुमच्या ध्वार ?
पायां पडतें उमळून पोटी बाबा ! तुमची प्वार !’ -
शब्द ऐकूनी मानाजीने धरिलें तिज पोटाशीं,
अश्रुबिन्दुंनी न्हाणी तिजला, घेउन बाहुंपाशीं.
हळूच बोले- ‘चुकलं न्हाई तुजं काय बी पोरी,
स्मितीं जाली मला मागली मालकिणीची भारी !
झपाटलं ग तिनं येउनी रातीचं सपनांत;
‘लगीन आता करा सगूंच’ साड्‍गुन गेली मात!
द्येवालाबी कौल लावुनी इच्यारलं म्यां त्येंच,
कौल द्येउनी द्येव बोलला साड्‍गुनश्येनी ह्येंच.
नहान होतिस्‍ सगू, तवापुन्‍  वर्स गेली सोळा,
अता आमची थकली काटी, झाला चोळामोळा !
पडलो व्होतों टेकुनश्यानी, तोंच वाटलं आली -
तुजी पिर्तिची आई, आनिक त्येंच साड्‍गुनी गेली !
तवा वाटलं आजवरी म्यां तुला परानावानी -
जपून, आता करनं आलं भागचा येगळवानी.
दुकलेल्या या म्हातार्‍याची व्हतिस सगू, तू काटी,
दैवाच्या या भेटी, कां मड्ग करनं आटाआटी !
औन्दा पिवळी तुला करावी ह्यो पग्‍ मन्‍ चा हेत;
साड्‍ग सगू तुज आवडला का केलेला ह्यो बेत !’
बोलुनि इतुकें टकमक पाहे मुखाकडे मानाजी,
सगुच्या डोळां पाणी आलें, दिसली नाही राजी.
परन्तु पुसतां मानाजीनें पुन्हा एकदा तेंच,
अवघडलेल्या तिच्या मनाला पडला पुरता पेच.
शालिनतेने परी बोलली - ‘बाबा साड्‍गूं काय ?
तुमची विच्छा तसं वागनं मला चाड्‍गलं हाय !
काय कटाळा माजा आला?’ इतकें  बोलुन थाम्बे,
मुसूमुसू ती रडूं लागली, पदर झणीं ओथम्बे !
‘तसं न्हवं ग पोरी !’ -ऐसें बोलत मुख कुरवाळी,
गोष्टींनी तिज समजावोनी बाप आंसवें गाळी.
पुन्हा बोलला हासुन किउचत ‘दैवाची तूं प्वार !
भाग्यासाठीं तुज्या सोयरा पगीतला म्यां थ्वार !
टवकारोनी कान जरासे वरती सगुणा पाहे,
वाटे, मनिंची आशा नयनीं एकवटोनी राहे.
उत्सुकली ती ऐकायाला नांव कुळाचें थोर,
हवेमधे तों मूर्त तरड्‍गे मुरारचीच समोर !
हासुन बोले पिता- ‘सोयरा ऐकलास का कोन ?
पाटिल अम्भेरिचा रावबा, मुरार त्येचा होन !’
अर्धेमुर्धे शब्द ऐकुनी सगुणा हसुनी लाजे,
शतभूषांनी येइ न ऐसा वदनी रड्‍ग विराजे.
त्यांतच दिसली मानाजीला होकाराची वाणी,
सगुणा दिसली तेव्हां नयनां लावण्याची खाणी.
बोल बोलतां पिता जाहला मनामधे गम्भीर,
आशा मनिंची निरशतांना सुटूं लागला धीर.
पुटपुटळा तो - ‘लई पोरगा ब्येस ! करावं काय?
कसं जुळावं ? कसं गरीबा लाभतील त्ये पाय  !
पाटिल पदरीं कसलं ध्येती ? कसा जिव्हाला व्हावा?
सोयरीक ही लई नशिबाची ! कसा घालवूं रावा?
दैव आमुचं मोटं खट्‍ ह्यें !’ - पुन: पुन्हा हें बोले,
बोल बोलतां पुन्हा एकदा डोळे झाले ओले.
चतुर सगूने मधेंच कांही तिसरे बोल वदावे,
त्याच विचारीं मानाजीने गुड्‍गत मनीं पडावे;
असें चाललें, तोंच सगूने भाकरतुकडा खाया
झणीं उठविलें मानाजीला; तोहि निघाला जाया.
शरद्‍ऋतूचा बहर निमाला जराजरासा रानीं,
थण्डीमधली माळेराखण पडूं लागली कानीं.
‘हा !हा ! हा! हा! बहिर्‍या !’ बहिर्‍या !’ शब्द कांपरे आले,
भिड्‍ग भिड्‍ग गोफणगोटा जातां भुर्कन पक्षि उडाले.
‘मी मी ’ असली थण्डी म्हणतां फुटले सारे ओठ,
गाण्यासड्‍गें तरी चालली धावेवरती मोटं.
गहू, हरभरा , शाळू , खपला आता बहरा आले,
शेतकर्‍याचे डोळे त्यावर फिरतां पूर्ण निवाले.
भावी स्वप्रें दिसूं लागली त्यासं मनोरम गोड,
आणि लागली दीन जिवांना दिवसारातीं ओढ.
निराश होउनि कितीकदा तरि मनामधे मानाजी,
त्या दिवसाचे विचार होता सर्व विसरला आजी.
कधितरि त्याला - रोज सगूला - मुरार भेटे रानीं,
सगुणा बोले केव्हा लाजुन, केव्हा होउन मानी.
मानाजीही दोघांमध्यें काय बोलणें चाले -
ऐकाया तें, काम सोडूनी कधि न जागचा हाले.
निराश होउन, मानाजीन पुढे सोडला नाद;
वाटे त्याला थोर घराणीं कसली घेती दाद !
दिपवाळीच्या पाडव्यास जो मुरार भेटे त्याला,
त्यावर आला भेटायाला तुळशीच्या लग्राला.
वधुवरांची लग्रबोलणी सुरु जहाली आता,
मानाजीच्या मनांत उपजे कधी कधी ही चिन्ता.
परी आज तो हाकित होता आनन्दाने मोट,
गोफण मारायाल तिकडे सगुचें फिरलें बोट.
पाट फोडुनी, गडी पिकांना पाजित होते पाणी,
स्वैर लकेर्‍या मारित उठली मानाजीचीं गाणी.
घुमले त्याचे राईमधुनी वार्‍यामधुनी नाद,
झगमग- किरणांवरती फिरले पक्षी घालित साद !
न कळे, झालें कसें ! रावबा आणि शिलोजी आले -
आज सोबत्यांसड्‍गे आणिक शेती पाहुन धाले.
मोट सोडूनी मानाजीने पुढे घेतली धाव,
सन्मानाया आनन्दाने वदला, - ‘यावं राच !
पायधुळ ही आज कुनिकडं ? चुकला जनु की वाट ?
पुनीत जाली माजी शेती, पडतां तुमची गांट !’
‘तिन व्हायला पुनीत आम्ही--’ पाटिल बोलूं लागे -
‘असं पाव्हनं घेउन सड्‍ग आलों तुमच्या जागे ! ’
मानाजीने नेलें त्यांना घरांत हातीं धरुनी,
गुळपाण्याने स्वागत केलें, बसावया अन्थरुनी.
चमकुन चित्तीं, घरांत आली सगुणा सोडुन माळा,
दारफटींतुन पहात राहे मराठमोळा बाला.
थोर जनांचे आज लागले कसे घराल पाय,
मित्र शिलोजी प्रस्तावीं हें साड्‍गे, झालें काय.
आणि शेवटीं पाटिल घाली स्वयें मुरारापायीं -
आज सगूला प्रथम मागणी, मानाजीच्या पायीं.
धडधडणारें काळिज इकडे झालें आता शान्त:
मानाजीला क्षणभर वाटे, ‘आहे का ही भ्रान्त?’
असो ! बोलणें पुष्कळ झालें; मानाजीने अपुली -
गरिबी आणिक विनयशीलता आता पुढती केली.
कसें जाहलें काय सांगणें? सौदा ठरला छान,
बसल्या घडिला सगुचें झालें तिथेच साखरपान.
मात्र आणखी पुन्हा एकदा मानाजीच्या डोळां,
पाणी येउन, जीव तयाचा व्याकुळ झाला भोळा !
पुढील मासीं विवाह मड्‍गल झाला अम्भेरीत,
वधूवरांची मनें बुडालीं दिव्यं प्रेमाब्धीत.
दहा गांवचे अमुप वर्‍हाडी लग्रा धावत गेले,
पाटिलबावांनींही त्याचें मानमरातब केले.
सगुला आपुलें घर वाटावें खरेंखुरें माहेर,
असाच केला शिलुकाकांनी वधूवरां आहेर.
मानाजीने ‘अम्बेराईवरी’ सोडिलें पाणी,
‘चोळिबाड्‍गडी’ अशी सगूला दिली बोलुनी वाणी
असा सोहळा झाला नाही म्हणती कृष्णाकाठी,
सार्थक झालें त्याचें, जें जें केलें सगुणेसाठी.
मुरार- सगुणा नान्दुं लागली घरांत आनन्दाने,
प्रेमळ मानाजीने त्यांना गौरविलें कुतुकाने.
शेतीभाती चालू झाली पहिल्यापरि जोमाने,
कमण्डलुचा ओढा त्यांना रिझवी अपुल्या गानें.

N/A

References : N/A
Last Updated : December 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP