बहार १ ला - हितगुज

कवी ’गिरीश’ यांचा ग्रामीण जीवनावरील काव्यसंग्रह.


हितगुज
वर्षऋतूच्या सरी थाम्बुनी गढूळलेलें पाणी-
खळखळ वाहत होतें आता शुभ्र स्फटिकावाणी.
त्या पाण्याच्या तुषारमाळा घालुनि वेली कांही-
आनन्दानें पुलकित झाल्या रानीं ठायीं ठायीं.
शिवारांतलीं हिरवीं ताटें डोलुनि वार्‍यासड‍र्गे -
शरदागमनीं सळसळ करिती अपुल्या अड्‍गाविभड्‍गे.
हिरवाळीचे बान्ध थाटले शेताच्या बाजूंनी.
रानफुलांचे तुरे तयांतुन बघती डोकावूनी.
ओढयाकांठीं कुठे उतरणीवरती अम्बेओळ-
पाय पसरुनी अडवित होती जलवन्तीचा घोळ.
नवीन थण्डी नुकती कोठे फिरुं लागली रानीं;
शरऋतूचे ओठ हालले मन्द जळीं लहरींनीं.
पूर्व दिशेला तीन शोभले डोड्‍गर निळसर छान;
दोन बाजूंला दोन आणखी मधला होता सान.
सुन्दर त्यांच्या पोशाखानें मोहून जाती डोळे;
शिखरांवरुनी चमकत येती किरण रवीचे कवळे.
पुढें पसरलें लाम्ब उतरतें माळरान हें थोर,
काळे पिवळे तापस गोटे तपार्थ बसले घोर.
कोठे कोठे सुन्दर होत्या काळ्या फत्तरखाणी;
नजर ठेरेना असलें होतें निळसर त्याचें पाणी.
उन्चसखलता आली कोठे कोठे उन्चवटयांनी,
खुरटया गवतामधून भरलें रान कुठे कांटयांनी.
माळापासुन खाली खाली काळवटीचीं रानें-
दोनबाजूंना दूर पसरली फुलूनिया बहरानें.
मधल्या डोड्‍गरखोर्‍यामधुनी ओहळ निघुनी एक-
वाहत वाहत आला खाली गाणीं गात अनेक.
ओघळींतुनी ओहळ खालीं माळावरती आला,
जळविस्तारें मार्ग खोदुनी आतां रुन्द जहाला
डोड्‍गरओढा वरुन खाली जलद खळाळत वाहे,
खडकांमधुनी गोटयांमधुनी एकसुरानें बाहे.
मधेंच कोठें पाण्यामध्यें शोभे खडकी बेट;
शुभ्र तुर्‍याचे त्याच्याभवती वस्ती आले देठ.
शेवाळोनी जळांत गेले बाजुस फत्तर कांही;
गळां घातलीं होती लेणीं रानपाचुचीं वा हीं ?
मधेच मार्गीं आ वासोनी काळ्या कड्‍गोर्‍यांची-
ठाण माण्डुनी दरड बैसली होती दोडगरींची.
दरडीवरच्या कड्‍गोर्‍यावर पाणी नाचत आलें .
तिथुन आपटे दोंपुरुषांवर खाली फेसळलेलें.
प्रवाह कांही मन्द बाजुचे खोबणींतुनीं खाली-
खडकावरुनी पाझरतांत भवती भिजवण झाली.
प्रपात बनला सुन्दर तेथें, डोह साचला खाली,
फाटुन वाहे शरदृतूचें पाणी कितिक पखाली.
दोन बाजुंना डगरीं होत्या मुरमाडाच्या उन्च,
खोल तळांतुन झुळझुळलें जळ, खेळत मुरडूनीच.
नागमोडीचें वळन घेउनी पाऊलवाटा खाली
डगरीवरुनी गेल्या होत्या तळांत पाण्याजवळी.
वेळू आणिक अम्भेरीच्या हाच शिवेचा ओढा-
खाली जाउन वळला होता कृष्णाबाजूस थोडा.
दक्षिण डगरीवती होती मिनली अम्बेराई,
शीतळ छाया अन्तर्भागीं तिची दाटुनी राही.
अम्वेराईजवळी होतें शिवार हिरवेंगार;
नाचत होती पिकें तयावर जणु अभिमानें फार.
मधेंच होता माळा तिष्ठत पायांवरती चार;
मोटेजवळी पाचटलेलें शोभे छप्पर फार.
उत्तर-डगरीवरती होतें पडीक हिरवें रान;
पलीकडे त्या, मळा केळिचा लावी कोणी छान.
शेतवाडिची हिरवळ पसरे दूर दूर त्याभोतीं,
हसर्‍या वदनीं त्यांच्या होते नाचत पाचूमोतीं.
वरती आलीं कुठे उसाचीं तरवारीचीं पातीं;
हिरव्या रुन्दट पानीं शोभे हळदीवरची कान्ती.
कुठे बाजरी कोठे अरगड फुलोर्‍यांत तों आली,
भुइमुग- बान्धावरती लवल्या फळभाज्यांच्या वेली.
मध्यावरती विहिरी होत्या तुडुम्बलेल्या दोन,
भिजलीं शेतें मोटेखाली दिवसां पाटांतून.
तिथेच जवळी दाट थाटली विविध तरुंची राई,
सान बगीचा योजकतेची दावी नव चतुराई.
धावेजवळी नीटनेटका, शीतळ छायेखाली-
कुणि कौलारु सुन्दर सोपा धनी तेथला घाली.
गोठयामधुनी गुरेंवासरें खातीं हिरवा चारा,
नवी हुषारी देई त्यांना थण्ड रानचा वारा.
गडीमाणसें मोट चालतां आनन्दानें गाती,
पक्षी त्यांना साथ आपुली मंजुळ गानीं देती.
थण्डीमधल्या सांजरातच्या गोष्टी झाल्या खाक-
आणि बाजुला उरली होती शेकोटीची राख.
सुटली होती समोर गाडी, टेकुनि जूं भूमीला;
किंवा होतें उद्योगानें वाकविलें लक्ष्मीला?
धन्य, धन्य तो धनी जयाच्या, लोळति पाया पाशीं-
अतुल्य असल्या स्वर्गसुखाच्या, नवलाईच्या राशी !
रड्‍ग लागला उधळायाला आकाशांतुन कोणी,
पूर्व दिशेनें त्यास गाइली प्रेमभरानें गाणीं.
कणाकणांतुन गायनलहरी घुमल्या त्याच्या गोड,
थरथरलें जळ शरदृतूचें; फुलले सुंदर मोड.
पहाटवारा, त्यांत गारठा वाहे रानांतून,
हळूच जाई वनराणींना प्रेमें स्पर्श करुन.
पडली होती आज गुलाबी थण्डी रानोरानीं,
दहिवर होतें टपकत खाली तरुवर पानोपानीं.
रविरायानें त्यांत उधळलें वरुन आता चूर्ण,
तरुराजींची किनार नाजुक पिवळी शोभे पूर्ण.
पिवळ्या किरणांमध्यें किंवा विणुनी हिरवा पोत,
प्रियेस शालू गर्भरेशमी आणी धरणीकान्त;
आणि नेसली वसुन्धरा तो आनन्दानें दिव्य,
तरी आगळी शोभा तिजला आली होती भव्य !
वारा होता फुलवित कोणा आलिड्‍गनदानानें,
भुड्‍गे मज्जुळ गुज्जन करुनी रमले मधुपानानें.
मराठमोळा लतिकावेली लाजुनि लवल्या खालीं,
माना मुरडुन वळल्या कांहीं, लपवायातें लाली.
डोळे मोडून कौतुकलेल्या बान्धाजवली कोणी-
पहात होत्या अजून इकडे ऐकून गुज्जनवाणी.
शरदानें तर जलदेवींचे चुम्बन घेउन गोड,
लज्जालहरी मधुर उठविल्या युक्तीनें बिनतोड !
सात्विक शृड्‍गाराच्या लीला वठल्या पानीं पानीं,
वाटे मोहक विश्व उदेलें आनन्दाचे रानीं !
अशाच आनन्दानें भरुनी हॄदयीं आज मुरार-
बान्धावरुनी, पहा, चालला प्रफुल्लतेनें फार !
झोकनोक तर पाहुन घ्यावा चालीची ती ऐट !
नजरेमधली मोहक जादू आणि हासरे ओठ !
रुबाब वदनीं लालबुंद या ! विशाळ भाळी फेटा !
वार्‍यावरती सुटला शमला ! रड्‍ग मजेचा मोठा !
सरळ नासिका, ओठ कोवळे, डोळे पाणीदार,
मिस्त्रुड कोठे नुकती फुटली ! भुवया वक्राकार !
मांसल गर्दन, पेलदार ही छाती, बाहु लाभ्ब,
चिवटपणाला केवळ होते पोलादाचे खाभ्ब.
कठिण पोटर्‍या, बान्धा नाजूक, मूर्त जरा शेलाटी;
काटकतेला वंशतरुची परन्तु केवळ काठी.
नवी गुलाबी आंत दण्डकी, वरती पैरण छान;
मल्मलींतुनी खुलून दिसला आंतिल सुन्दर वाण.
सुबक साखळी, बुदाम आणिक चुबका घागरियाचा-
शुभ्र रुपेरी शोभत होता रुन्दट छातीवरचा.
ऐटबाज हें ध्रोतर कसलें किनारिचें कमरेला,
मराठशाही जोडा पायीं शोभा देई त्याला.
ऐन बाविशी पुरी उलटली अजुनी त्याला नसली,
थोराडाला तालिमबाजी तरिही खुलुनी दिसली.
गांवामधल्या घरीं न आली मुळीच त्याला नीज,
भल्या पहाटे म्हणून उठला मुरार होता आज.
जोरजोडिचे हात कराया देवळांत तो गेला,
परि लागेना चित्त म्हणूनी परत घराला आला.
स्नानानंतर करुनि न्यहारी लगबन पैरण घाली,
गूढ मनीचें मनीं ठेवुनी स्वारी आज निघाली.
सूर्य कासराभर वर आला! मुरार आला रानीं,
उचंम्बळे मन आंतुन, लागे, उडूं पाखरावाणी.
शरदृतूचे शृड्‍गाराचे त्यांत पाहुनी खेळ,
आज सोडिला खराच त्याच्या पुरा मनानें ताळ.
किल्लयावरती किल्ले बान्धुनि मनोराज्य जें केलें,
चित्त तयानें रड्‍गुनि वर वर पुढें तरड्‍गत गेलें.
निश्चित होतें परन्तु त्यानें आज ठरविलें  कांही,
आणि कराया तेंच चालला मळयाकडे लवलाही.
गरगर होती फिरत लोचनें पिकावरुनी रानीं,
त्यांत बहरलें आंतुन मानस आशामय कुसुमांनी !
चालुनि आतां झपाझपा तो आला मोटेजवळी,
आणि सुभान्या गडयास देई हाकेची आरोळी.
उत्तर आलें मुळी न ; घुमला राईमाजीं नाद,
तोंच खिलारीजोडीचा ये डरकाळीचा शब्द.
गाय हभ्बरे, शेपुट हलवी उत्सुकतेने पाडा,
मुरार गेला जवळ, होउनी हाकेसरशी वेडा.
पाठीवरती थाप टाकली त्याने गोन्जारुनी,
प्रत्युत्तर ही दिलें तयांनीं पुनरपि हुभ्बारुनी.
अधीर झालीं गुरेंवासरें, अधीर झाला तोही;
नवीन जादू त्यांत मनाला आंतुन कांही मोही !
विचार करुनी जरा मनाशीं, गुरें सोडिलीं त्यानें;
घेउन चाले तीं पाण्यावर, सरळ पुढे मार्गाने.
हसुनि मनाशीं पुढें चालला, भान राहिलें नाही,
ओढ लागुनी गुरें चाललीं मागुनि मार्गोनी ही.
मनांत होतें रड्‍गत त्याच्या सुन्दर कांहीं चित्र,
आनदाने भरली त्याची दुनिया आज पवित्र.
कल्पनेंत तों दिसूं लागलें समोर त्याला कोणी !
मोहनमन्त्रें भारुनि चाले दृष्टि पुढें लागोनी.
वाटे-- ‘घेउनि विळा, कसूनी सुन्दर हिरवी साडी,
पिकांत राहुनि उभी कुमारी कोणी कणसें मोडी !’
पुन्हा वाटलें - ‘रुपसुन्दरा मराठमोळा बाला
गोफण घेउन राखित होती आज पित्याचा माळा !’
तोंच लोपुनि दृश्य, निराळें दिसलें कीं नयनाला -
‘डोकीवरती घडा घेउनी चाले ती पाण्याला !’
डोळे फाडुनि पुन्हा पुन्हा तो समोर पाहूं लागे,
आणि पाहुनी सुना सृष्टीचा फलक, मनीं तो भागे !
हिरवाळीवर, रविकिरणांवर आणि ढगांवर काढी
मन: शक्तिने सुन्दर चित्रें तिचीं, आतं जी ओढी.
वेळू- अभ्भेरिच्या शिवेचा ओढा जवळी आला,
मनांत चाले तरि तो आपुल्या रड्‍गवीत चित्राला.
भान न त्याला गुरें- वासरें जरी राहिलीं मागे,
झरझर आला डगरीवरती ओढ लागुनी वेगें
उभे ठाकुनी, क्षणैक त्याने जरा पाहिलें खाली,
मानाजीची सगुणा त्याला दिसली पाण्याजवळी !
सुस्थिर तिष्ठुनि मुरार हृदयीं चित्र साठवूं लागे,
नकळे त्याला-- ‘रमलो, निजलों किंवा आहों जागे !’
दोंडोळ्यांची दुर्बिण होती नीट लागली खाली,
तिथे जिवाची मैत्रिण बघुनी, हसे जरासा गालीं !
धबधब खाली फेसळलेली ओतत होती धार,
किंवा ओती कुणी फुलांचे वा मोत्यांचे हार;
तिथेच खडकांमधुनी बारिक एक जिव्हाळा आला,
पान लावुनी धडा तिन त्याखाली होता धरिला.
वाकुनि खालीं पाठमोरि ती रमली होती त्यांत,
भरतां भरतां घडा तिला ही गाई मड्‍गल गीत.
किंवा मनिंच्या हितगूजाला निर्झर उत्तर देई,
म्हणुनी रमली एकमनाने गायनरड्‍गी ती ही ?
कीं आठवलें गान कुणाचें ऐकुनि त्यांतिल गाणें ?
कीं शेलाटी मूर्त सावळी दिसली आंत, न जाणें.
जरा ओणवी असून, इकडे वळली होती पाठ,
डोईपदराआड शोभली घन केशांची गांठ !
हिरव्या पानीं रानफुलें ती गुफुन खोवी त्यांत,
पदराखाली अस्फुट दिसली येतां उलटा वात?
नीटस बान्धा, प्रमाणसुन्दर, ठेवण रेखिव भारी,
कणखर गात्रें साड्‍गत होती ‘रान्रहाणी न्यारी !’
रमली ज्यावर, तोच जिवाचा जिवलग वरुनी पाही,
जाणिव नव्हती कुमारिकेच्या तरुण मनास मुळीं ही.
चित्र साठतां असें अन्तरीं मुरार किंचित हासे,
गंमत थोडी जरा करावी मनांत योजी ऐसें.
ढेकुळ मोठें उचलुन हाती, जळांत फेकी खाली,
आणि बाजुला लपून राही, मजेंत हासुनि गालीं !
पाणी उसळे आवाजाने दचके सगुणा फार;
गाड्‍गरुन ती व्याकुळतेने तशीच ओरडणार -
तों बाजूने खिलारजोडी खाली धावत आली,
ओळखितां ती, भीती जाउन आनन्दित ती झाली !
‘-मुरा ! मुरा !’ ती कांपत ऐसें दोनवेळ हाकारी;
खो खो हांसत खाली आली मुरारची तों स्वारी !
‘किति पन्‍ भ्याल्यें मुरार ! अस्ली थट्टा लइ वड्‍गाळ !’
शब्दासड्‍गे नजर हासरी फेकी ती लडिवाळ !

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-12-29T19:34:34.7970000