बहार १३ वा - स्वार्थत्याग

कवी ’गिरीश’ यांचा ग्रामीण जीवनावरील काव्यसंग्रह.


बहार १३ वा - स्वार्थत्याग
खपल्या सगुणा आणि सेविका रुग्णालयिच्या फार,
हळू हळू मग पडूं लागला मुरारजीस उतार.
उल्साहाच्या सगुच्या शब्दें जीवन त्याला आलें,
सेवा घेतां प्रीतिकराची मानस त्याचें धालें.
अनुतापाची परन्तु जेव्हा तळमळ लागे हृदया,
नव्या जिण्याच्या गोष्टी सांगुन शान्तवि त्याला सदया.
विरड्‍गुळा द्यायास जिवाला केव्हा प्रीतिभराने.
बोलत बैसे मुरार तिजशीं निर्मळ एकदिलाने.
मात्र विचारी कधी मुलांची जेव्हा हालहवाल,
घ‍ट्ट करुनी मन ती साड्‍गे ‘हैतीं समदिं खुशाल ! ’
आणि बाजुला जाउन अपुलीं करुण आसवें ढाळी,
आणि बोलतां कधीं तयाशीं विषय तेवढा टाळी !
हेतु मनीं की पतिस पडावा त्याने पूर्णाराम,
आणि न खातां हाय, निरामय निज गांठावें ग्राम.
परि तद्‍हृदयीं वात्सल्याला उधाण जेव्हा आलें,
मन संयमुनी, कल्पित लीला कथुन तिने शान्तविलें.
दुर्दैवाची लीला भरतें कधी कधी तिज आणी,
आणि बाजुला जाउन गाळी डोळयांतुन ती पाणी !
मुरारजीने कधी पुसावें - ‘डोळं कां सगु लाला !’
तोंच साड्‍गती कपोलकल्पित गोष्ट हासरे गाल.
परि सगुणेच्या जिवास नाहीं कधि द्यायाचा त्रास,
या सुविवारें  मुरारजीने संयमिलेंच जिवास.
प्रफुल्ल पाहुन प्रीतिरसाने भरलेल्या मुखकमला,
जीवनगुज्जारवीं तयाचा भृड्‍ग यापरी रमला.
कौतुक वाटे रुग्णालयिंच्या परसुखरत देवीना,
शिलोजिच्या नवमधुर स्वप्नें दिसलीं मग नयनांना.
उतार पडतां मुरार साड्‍गे सगुला सर्व कहाणी,
हृदय द्रवलें तिचें, सांठलें त्याच्या नयनीं पाणी.
भरांत येऊन साड्‍गत असतां जेव्हा गहिवर दाटे,
सगुणा खाली बघुन आसवें गाळी डोळयांवाटे.
पडला होता खाटेवरती असाच एके रातीं,
बसली होती सगुणा चेपित पाय तयाचे हातीं;
पेड्‍गत होते श्रवत शिलोजी त्याची करुण कहाणी,
साड्‍गूं लागे तों अभिमानें मुरा विधीची करणी-
‘सगुने ! माजं चितर पगितलस्‍ समदं आजवरी तूं,
कथा जिवाची तुला साड्‍गतों पन्‍ नुरवाया किन्तू.
सगू, उदळला पैका ! पापं सम्दीं मागं केली;
पन्‍ परनारीवर्ती न्हाई नदर कदी ह्यी गेली !
पिर्त जिवाची तूच येकली तुज्या जिवाची आन,
तुला बुडवली म्हनुनश्येनी तळमळतो ह्यो प्रान.
सगू, अस्तुरी तूच जिवाची तूच जिवाची देवी,
म्हनून्‍ वांचलों , जोड लाभली लइ भाग्याची दैवीं.
आई म्हन्‍ ली खरं खरं त्यें सगू जिवाला वाटे,
तू दैवाची !’ तोंच लोचनीं पुनरपि पाणी दाटे !
परन्तु धरुनी नव आशा, तो उत्साहाने बोले,
‘पुस पूस त्ये सगू अदूगर डोळे अपुले बोले.
नग रहानं हतं, नरक ह्यो, किडे मानसं त्येंत,
नग नग ही मुमई , जाऊं परतुन अम्भेरीतं.
मानाजी पग्‍ थोर ! मोडुनी शिपत्‍ हासलों त्येला,
चूकच झाली ! कोप तरी ह्यो देवाजीनं केला.
परतुन जाऊं, अम्भेरीच्या राबूं रानामन्दीं,
गरीबींत मड्‍ग करुं दैवाची अपुल्या तेजीमन्दी.
भाकर खाऊं गरीबींतली घेउन पोरं सड्‍गं,
आम्बराइच्या रानीं राबूं, काय कमी मड्‍ग सांग?
डोळां पानी कां म्हुन्‍ आता ? पूस पूस त्यें बाई,
राबायाला आपुल्या रानीं कमीपना ह्यो न्हाई !
आम्बराइचं मालक कोणी असतिल त्यांना सेवूं,
टाकुन मागं पैका, अपुली राई कदितरि घेवूं.
पगीतल्यापुन, नरकाचं ह्यें रुपच, सगुने, मुमई,
अपमानाचं जिणं मनाला ततलं वाटत न्हाई.
खातिल पोरंबाळ तुकडा आन रानचा वारा,
भरती येइल खरी खरी ग सगुने, मड्‍ग सौसारा.
घेउनश्यानी अम्बेराई, छत्री मानाजीची
बान्धुन, पुजूं रोज; व्हइल ग किर्पा देवाजीची.
सगू, वाटलं ‘मरन्‍’ , तवा ह्ये व्होतं साड्‍गायाचं,
रडगानं ह्यें अता कशाला ? आता दिसं भाग्याचं !’
भावी सुन्दर या स्वप्नाने सगुचें मन आसावें,
नेत्र चमकले आणि हासली ती प्रीतीच्या भावें.
त्या भावाचें अमृत पिउनी पडला तोही शान्त,
वारा बाहिर गीत गाउनी रमला त्यांत नितान्त.
सगुची सेवा फळास आली, कृपा विधीने केली,
रुग्णालयिंचा वास सम्पला, वेळ जायची आली.
मुरास आता आली होती फिरावयाची शक्ति,
काय न देइल मिळवुन जीवा सत्प्रेमाची भक्ति ?
एक दिनीं मग करुन तयारी तीं गांवास निघालीं,
कृतज्ञतेने निरोप घॆतां करुण आंसवें गळलीं.
प्रवासजीवन केलें सगुने निजसेवेने गोड,
गहिवरुनी तो मनीं वदे - ‘ह्यी लइ भाग्याची जोड !’
एकदोनदा वदला तो  मग ‘सगू, जरा पड आता !
घॆ इस्त्रान्ती; थकलिस भारी !’ ‘नग!’ वदे परि कान्ता.
वदे एकदा- ‘प्रवास जाला सड्‍गं सुखकर भारी,
आता सड्‍गं असंच जाउं आपुन या सौसारी !’
सगुणा हसली आणि मिटूनी डोळे, विनवी देवा;
मुरास पाहे डोळेभर मग; कुणा न वाटॆ हेवा ?
यापरि बोलत बोलत गोष्टी संसाराच्या गोड,
रहिमतपुरच्या थाम्ब्यावर तीं आली लागुन ओढ.
पहाट खुलली पूर्वाकाशीं अम्भेरीच्या मागे,
‘अजिंक्यतारा ’ इकडुन पाहे न्याहाळुन अनुरागें.
सुखकर वाहे वडलिम्बांतुन नववासन्तिक वारा,
गवती शुष्क प्रदेश डोले माळावरला सारा.
काळीं रानें नवतेजाने तकाकली भवताली,
पडल्या झडल्या कुणीं बान्धल्या रानीं आता ताली.
नाड्‍गरलेली पडलीं होतीं रानीं डिखळें काळीं,
कुठे चमकलीं त्यावर किरणी नव, कोळ्यांची जाळी.
पालवले वड, अम्बेमोहर खचुन दाटाला पानीं,
स्वैर भरारुन रमले पोपट शब्दीं,कोयळ गानीं.
बूच- लिम्ब-वड..पिम्पर्णीतुन वळण घेउनी वाट -
चढणीवरती सरली, दावुन सर्पाकृतिचा घाट.
भोवतालचे ताम्बुस निळसर डोड्‍गर दुरावरुनी,
प्रफुल्लतेने पाहत होते माना उन्च करुनी.
आनन्दाने मुरार उत्तरे प्रसन्नतेने खाली,
मायभूमिची माती घेउन लावि अगोदर भालीं !
खिलारजोडी जोडुन कोणी तयार गाडी ठेवी,
शिलोजिच्या या योजकतेची स्तुती करावी केवी ?
मुरा-शिलोजी - सगुणा बसलीं, बसला गाडीवान,
घुड्‍गुर वाजे खुळखुळ : त्याने भरे वेळुंचे रान !
एकाएकी परी सगूच्या कालव होई पोटीं,
करुण विचारीं हृदयीं झाली. कांही खळबळ मोठी !
भावि सुखाच्या स्वप्नी रड्‍गुन बोले तोंच मुरारी -
‘पगंत असतिल्‍ वाट, न्हाइ का सगुने पोरं दारीं ?’
उत्तर कसलें- तों हम्बरडा हृदय फोडुनि आला !
काय कथावें  कैसा जाळी पुत्रशोक हृदयाला ?
शोकावेगें खान्द्यावर ती टाकुन त्याच्या मान -
स्फुन्दस्फुन्दुनी रडली ! गेला मुरार भाम्बावून !
शिलोजिंनी मग कथिलें सारें, ओसरल्यावर पूर,
दु:खावेगें मनांत उठलें मुरारच्या काहूर !
‘करन्यासाठीं बरं मला, तूं दूख झाकलंस्‍ घोर !
सगुने...!’ बोलुन इतुकें स्फुन्दे तोहि; नावरे जोर.
शिलोजिंनी मग सत्न्वन केलें धरुनी त्यांना पोटीं,
निजासवांनी न्हाणुन वदले शब्द प्रेमळ ओठीं.
तोंच थाम्बले बैल प्यावया कमण्डलूचें पाणी,
‘नवं जिणं ह्यें ? ’कमण्डलूची बोले स्वागत-वाणी.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-12-29T20:54:34.5430000