बहार ११ वा - सहभावनेचें तारायन्त्र

कवी ’गिरीश’ यांचा ग्रामीण जीवनावरील काव्यसंग्रह.


बहार ११ वा - सहभावनेचें तारायन्त्र
देवदेव जों करावयाला जाय शिलोजी दूर
मास लोटल पुरा तयाला; नुकता जाय मुरार !
दारिद्रयाने हतबल केलें सगुला आणि मुलांना,
कहर कहाली सुकवूं लागे गोड अनाथ फुलांना.
दु:ख सागरीं तिच्या मनाची हेलावूनी वेळा,
चिन्ताश्रूंनी पदर जाहला ओला वेळोवेळां..
केव्हा देउन भाकर नुसती, केव्हा नुसतें पीठ,
भूक भागवी बाळांची, ती सती मनाची धीट.
एक दिनीं मग दारिद्रयाने केली पुरती मात,
केरुवरती खल रोगाने घोर टाकिला हात !
कसा धरावा तग पोटाने केवळ मिळतां पीठ,
तीव्र आतपीं केवळ, कैसें फूल फुलावें नीट.
दूध ठरेना पोटीं,औषध लवहि मिळालें नाही,
माण्डीवरती तडफड आतां दीन मुलाची चाले,
व्याकुळतेने हृदय सगूचें भाजुन आंत निघाले.
तोंच लावुनी मातृमुखावर अखेरची तो दृष्टी,
सोडुनि गेला बाळ, त्यागुनी ही मायावी सृष्टी !
कुणास ठावें, किंवा घेउन आईचें गार्‍हाणें,
देवाजीला साड्‍गायाला केलें त्यानें जाणें !
हिरु बिज्लगला मुग्धपणें तिज ! कुरवाळी ती हातीं,
मुग्ध आसवें कांही दिन मग गळलीं दिवसारातीं !
वृत्त समजलें आणि शिलोजी आला टाकोटाक,
परिस्थितीने होय मनाची त्याच्या फाकाफाक.
मानाजीसम परि बोलून प्रेमळतेची वाणी,
धीर सतीला देउन, चित्तीं गूण तिचे वाखाणी.
उरल्यासुरलेल्याची लावुन पुरती विल्हेवाट,
हिरुसगूंना घेउन धरि तो मग वेळूची वाट.
मायपित्यांसम भवती होती प्रेमळ आता माया,
परि सगूच्या वदनी पसरे खिन्नत्वाची छाया.
शिलुकाकांनी साड्‍गसाड्‍गुनी सान्तविलें मन भारी,
परि न शान्तली मुरारसाठी वृत्ति तिची झुरणारी.
कधी शिलोजीसड्‍गें येउन अम्बराइच्या रानीं,
गुड्‍गत बैसे खिन्नमनें ती कमण्डलूच्या गानी.
बसली होती सायड्‍काळीं दरडीवर ती आज,
विवळत होता ओढा, काढुन दु:खाचा आवाज.
सरकत होती आकाशावर चित्रें भरभर कांही,
मन:पटावर गतकालाचीं परि अपुलीं ती पाही.
ऐकुन वाणी कमण्डलुची अस्थिर मन तों झालें,
आणि लोचनीं एकाएकीं अश्रु दाटुन आले.
टपकत होते बिन्दु, शिलोजी तों न्यायाला आला,
मनीं दचकला ! परि घेउन तिज तो वेळूस निघाला.
विचार आले अनेक चित्तीं माजुनिया काहूर,
सगुच्या वदनी मधुनच पाहे, वाटुनि तो हुर्हुर.
बघतां बघतां मानाजीची दिसूं लागली मूर्ती,
आणि लोपली साड्‍गुन त्याला कर्तव्याची पूर्ती.
न कळे यांतिल अस्थिर चित्ता सगुणेच्या परि कांही,
चूर आपुल्या आन्तर दु:खीं गेले लवलाहील.
दिवस लोटले एकामागुन एक भराभर कांही,
परि अस्थिरता तिच्या मनाची लवही शमली नाही.
एकच आलें पत्र तयावर कळली नाही वार्ता,
हुरहुर दाटुन, हृदयीं आता होय सती दु:खार्ता.
गृहदेव्हार्‍यामधे भावाचे नुसतां प्रिय अधिदेव,
कशी रुचावीं सुखें, वियोगुन जातां  हृदिंची ठेव !
तशांत होउन केरुची स्मृति, जाळुन हॄदया जाई,
संसाराच्या बागेंतिल ही होरपळे मग जाई.
गोड शब्द या मायपित्यांचे प्रेमळ, गेले वाया,
जिवझुरणीनें व्याकुळलेली सुकूं लागली काया.
केव्हा रात्रीं झोंप न यावी; तारवटोनी डोळे--
कल्पनेंतुनी, चित्रें बघतां, हृदय आंतुनी पोळे.
चैन पडेना, एकच लागे मुरारजीचा ध्यास,
द्चकुं लागे मन अन्धारीं, होउन भेसुर भास !
एके रात्रीं स्वप्न तरळलें डोळयांपुढती स्पष्ट,
प्रीतीसाठी अघोर दिसला तो करितांना कष्ट.
अन्नावांचुनि तों सुकलेली दिसूं लागली काया,
अजुन विनवणी दीन तयाची ये न कुणा ऐकाया.
तो गमलें की, राबत असतां कोठे ऐन दुपारीं,
कोणी मालक पाठीवरती निष्ठुर फटके मारी.
रक्त ओकुनी त्यांतच, वाटे,  पडला येउन झीट,
आणि पडे तो किती वेळचा देवाघरचा कीट !
प्राण होउनी व्याकुळ नन्तर,  वाटे, गेला सदनी,
आली होती प्रेतकळा तों भेसुर त्याच्या वदनीं.
अन्थरुणाला खिळलेला मग दिसला त्याचा देह,
स्नेहांवाचून भयाण दिसलें ,वाटे त्याला गेह !
आणि तयाने प्रिय नांवाची घॆउनिया जपमाळ,
टकळी होती एकसारखी चालविली बहुकाळ.
अखेर होऊन घसा कोरडा निश्चळ पडला वाटे,
आणि भराभर अश्रु लोटले सरसर डोळयांवाटे.
दचकुन बसली अन्थरुणावर उठुन सगू अन्धारीं,
तरी अजूनी नाचत होतीं भवती चित्रें सारीं.
अस्थिर झालें मन कळवळुनी, नेत्रीं साठुन पाणी,
किती वेळ ती पहात बसली गुड्‍गत वेडयावाणी.
तळमळ होउनि तीव्र, लागलें कालवायला पोटीं,
प्रेमें करुणा हृदयीची ये उचम्बळोनी ओठीं.
फुटुन तांबडें , तोंच कोम्बडा परडयांतुन आरवला,
शिलुकाकांचा अभड्‍ग मज्जुळ कानांवरती पडला !
हृदयामधलें दु:ख आपुलें साड्‍गायातें  आज,
धीट मनाच्या निष्ठुरतेने तिने सोडिली लाज.
आवरुनी मन, उठली वेगें डोळां आणुनि पाणी,
शिलोजिची तों कानांवरती पडली प्रेमळ वाणी.
‘सगू, कशानं डोळं भरलं? काय जिवाला जालं?
येडे पोरी, अजुन जिवाला.........का मन कोटं भ्यालं !’
फुटुन उमाळा तों हृदयींचा, तळमळ मनिंची सारी,
केली त्याला कथन सगूने, हृदया पिळवटणारी.
आणि पतीला भेटायाचा बसली धरुनी ऐका,
शिलोजिचें मन पाझरुनी क्षण बोले ‘मड्‍ग जावं का?
थाम्ब सगू पन्‍ ! पतर घालुनि अपुल्या त्या भिवबाला,
सम्दी वार्ता पुसुन साड्‍गतों चार दिसांनी तुजला !’
परि मानवलें हें न सगूला, पडला घोर विचार,
तोंच दुपारीं मुम्बईहुनी ये निकडीची तार.
जीव चरकला मग चिन्तेने, निश्चय झाला ठाम,
आण ठरविले शिलुकाकांनी सोडायाचें धाम.
शान्त विचारीं परी जरासे मागुन होता चूर,
पुटपुटले मग ते अपुल्याशीं लागुनिया हुर्हुर,
‘खरंच येडा बिमार पडला ! देइल ओखद कोन?
करील तळमळ, आन जिवाच जवळी न्हाइत होन?
हिरु -सगूला घेउन जावं भेटायाला सड्‍ग ...........!
पन्‍ केरुचं इचारलं तर..... !’ तोंच पालटे रड्‍ग !
सगुणेला हें साड्‍गुन त्याने पुढें टाकिलें कोडें,
अश्रु येउन, तिचें कचरलें क्षणभर मानस थोडें.
परि हळवें मन घट्ट करुनी, ‘हिरुस आजीपाशीं -
ठेवुनि जावूं ! ’ बोले, आणिक गाळी ती जळराशी !
आर्त मनाने सगू निघाली चुम्बुन रडवे ओठ,
आवेगाने फुटे हिरुच्या अश्रुजळाचा कोट !
जीव टाड्‍गला मागे, मानस खाई पुढती ओढ,
संयमुनी मन परी निघाली घेउनि पापा गोड.
दीनपणाने राहुन दारीं, धरि आजीचा हात,
रडव्या नेत्रीं देत हुन्दके राहे बाळ पहात.
धडधड गाडी उधळत गेली अम्बेरांईतुन,
तळपत होतें डोक्यावरती प्रखर अजूनी ऊन.
द्याया आशीर्वाद सतीला माहेराची वाणी -
कमण्डलूच्या जळीं बोलली मड्‍गल अपुलीं गाणीं !

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-12-29T20:52:34.4200000