अध्याय ८० वा - श्लोक ३६ ते ४०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
प्रविष्टानां महारण्यमपर्तौ सुमहद्द्विज । वातवर्षमभूत्तीव्रं निष्ठुरांः स्तनयित्नवः ॥३६॥
गुरुदास्य न घडे जिये ठायीं । तेथ शिष्यासी साफल्य नाहीं । यालागि कुटुंबीं श्रोत्रिय पाहीं । गुरुत्वविषयीं श्रुति कथिती ॥९६॥
कुटुंबवत्सल श्रोत्रियश्रेष्ठ । विरक्त विद्वांस ब्रह्मनिष्ठ । ऐसियाचें दास्य यथेष्ट । करितां अभीष्ट फळ देतें ॥९७॥
यावज्जन्म सेविला गुरु । सेवाविषयीं शिष्य कातरु । भूमी तयाचा मानी भारु । भवसागरु दुस्तर त्या ॥९८॥
प्रतिष्ठा भोगूनि गुरुसन्निधि । बैसे संवादी संसदीं । दास्यविषयीं वंचकबुद्धि । तो दुर्बुद्धि कुटिळात्मा ॥९९॥
प्रज्ञाबळें शिकला ज्ञान । परि तें निर्वीर्य अवघें जाण । अंतीं पावे अधःपतन । सेवेवांचून फळ न पवे ॥५००॥
सदय सद्गुरु येकांतवासी । सेवा नसंगेचि शिष्यासी । परंतु लागें कुटुंबासी । शिष्यें तेंवि अनुसरिजे ॥१॥
गुरुपत्नी कां दासदासी । नियोजिती नीचसेवेसी । अवंचकभावें तियेविषीं । शिष्यें दिननिशीं प्रवर्तिजे ॥२॥
गुरुपोष्याची आज्ञा शिरसा । धरूनि सेवनीं कीजे धिंवसा । सद्गुरु सामर्थ्यदानी ऐसा । निश्चय मानसामाजि कीजे ॥३॥
असो आम्ही तिये काळीं । गुरुपत्नेची आज्ञा मौळी । वंदूनि रिघालों विंध्याचळीं । महाअरण्यामाजिवडे ॥४॥
महारण्य परम घोर । तेथ निघालों इंधनपर । शुष्ककाष्ठें अतिकठोर । ग्रथिले भार पृथगत्वें ॥५०५॥
गुरुगृहीच्या श्रवणस्वार्थें । हांव भरूनि काष्ठें बहुतें । भारे बांधूनि मस्तकावरुते । घेतां अघटित वर्तले ॥६॥
वर्षाऋतु संपूर्ण गेला । शरत्काळही अतिक्रमला । हेमंतकाळींचा वृत्तांत कथिला । सखया तुज स्मरतो कीं ॥७॥
भारे घेऊनि मस्तकावरी । आम्हां निघतां वनाबाहेरी । आकाशमेघ मुसळाधारी । प्रळयापरी वर्षला ॥८॥
पूर्वेकडून मेहुडी चढती । त्यामाजी विजाही कडकडती । उत्तरेची मारुतगती । झडझडाटी प्रवर्तली ॥९॥
थेंबटे पडती अतिठोसर । जळमय जालें सर्वांवर । मेघ गर्जती क्रूर कठोर । दचके अंतर चकवोनी ॥५१०॥
वर्षवातापासूनि रक्षी । ऐशी निबिडता नलभे वृक्षीं । अंधकार पदला चक्षी । गेले पक्षी नीडाश्रया ॥११॥
सूर्यश्चास्तंगतस्तत्र तमसा चावृता दिशः । निम्नं कूलं जलमयं न प्राज्ञायत किञ्चन ॥३७॥
घनाच्छादित न भसे नभ । अस्त पावला चंडप्रभ । तमिस्रेचा तिमिरक्षोभ । वलय काकुभ आवरिलें ॥१२॥
करिकरनिकराकार धारा । पडतां नीरें भरली धरा । जळें आच्छादिलें तरुवरा । प्रवाह पुढारा नावगमे ॥१३॥
गमे मांडिला प्रळयकाळ । एकार्णवासारिखें जळ । न लक्षे तटाक पुलिन कूळ । निम्न उथळ न कळेचि ॥१४॥
गुल्फ पोटर्या गुडघे कटी । नाभी हृदय कां हनुवटी । भग्न होतां जळसंकटीं । न सुचे गोठी निर्गमनीं ॥५१५॥
वयं भृशं तत्र महानिलाम्बुभिर्निहन्यमाना मुहुरम्बुसम्प्लवे ।
दिशोऽविदन्तोऽय परस्परं वने गृहीतहस्ताः परिबभ्रिमातुराः ॥३८॥
हेमंतींचा वात झटके । त्यामाजि जळोपळांचे सटके । विद्युल्लतांचे प्रचंड कडके । लोटती भडके सलिलाचे ॥१६॥
जळें लोपली समग्र मही । मागें पुढें न दिसे कांहीं । आम्ही अत्यंत दुःखित पाहीं । तिये ठायीं जलवातें ॥१७॥
प्रळयकाळींचा एकार्णव । तत्तुल्य गमला आम्हां तो ठाव । शीतें सकंप शरीर सर्व । निमग्न अवयव जळगर्भीं ॥१८॥
थरथरां कांपती शरीरें । खटखटा वाजती दातारें । शिरीं प्रचंड भिजले भारे । दिशा न स्मरे कोणीकडे ॥१९॥
परस्परें हात धरणी । एकमेकांतें सावरूनी । चाह्री प्रहर साहिलें पाणी । भारे घेऊनि जळप्रळयीं ॥५२०॥
परस्परें धरूनि हस्त । जळप्रळयातुर तनु अस्वस्थ । गुरुस्मरणें मन करूनि स्वस्थ । जालों समर्थ तत्सहनीं ॥२१॥
चार्ही प्रहर अकाळजळीं । तैसेचि भारे धरूनि मौळीं । निवान्त राहिलों तिये स्थळीं । गुरु ते काळीं कळवळिला ॥२२॥
एतद्विदित्वा उदिते रवौ सान्दीपिनिर्गुरुः । अन्वेषमाणो नः शिष्यानाचार्योऽपश्यदातुरान् ॥३९॥
सदना न येतां देखोनि आम्हां । करुणा आली ब्राह्मणोत्तमा । म्हणे पावली लेंकुरें श्रमा । अति दुर्गमा वरपडलीं ॥२३॥
आमुची अवस्था जाणोनि मनीं । उदय पावलिया दिनमणी । कृपाळू गुरुवर संदीपिनी । अन्वेषणीं प्रवर्तला ॥२४॥
आमुची अवस्था जाकळी मना । सदय आचार्यांचा राणा । आम्हां शिष्यांची गवेषणा । करित अरण्याप्रति आला ॥५२५॥
देखोनि आम्हांतें सक्लेश । जालें द्रवभूत मानस । कृपेनें कळवळूनि विशेष । वदला अशेंष तें ऐका ॥२६॥
अहो हे पुत्रका यूयमस्मदर्थेऽतिदुःखितः । आत्मा वै प्राणिनां प्रेष्ठस्तमनादृत्य मत्पराः ॥४०।
अहो ऐसिया खेदेंकरून । म्हणे पुत्रहो तुम्ही धन्य । मदर्थ करूनि देहार्पण । दुःख दारुण पावलां ॥२७॥
आत्मा प्रियतम प्राणिमात्रा । कोण्ही नुबगे आत्मगात्रा । तो देह समान यवसपात्रा । करूनि मत्पर जालेती ॥२८॥
आजिचे क्लेश भोगिले तुम्हीं । त्याहूनि सक्लेश जालों पैं मी । सच्छिष्य वसती जे मम सद्मीं । तिहीं या नियमीं वर्तावें ॥२९॥
N/A
References : N/A
Last Updated : June 06, 2017
TOP