अध्याय ८० वा - श्लोक ३२ ते ३५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
नन्वर्थकोविदा ब्रह्मन् वर्णाश्रमवतामिह । ये मया गुरुणा वाचा तरंत्यंजो भवार्णवम् ॥३२॥
श्रीकृष्ण म्हणे भो ब्रह्मणा । वर्णाश्रम धर्माचरणा । करिती त्यामाजी श्रेष्ठ ते जाणा । जे गुरुचरणां अनुसरले ॥४७॥
मनुष्ययोनीमाजि येथ । त्यांतही आश्रमधर्मवंत । असोनि जेहीं सद्गुरुनाथ । मी संतत सेऊनियां ॥४८॥
माझिया गुरुवचन निर्धारें । अतव्द्यावृत्ति उपदेशमात्रें । सुखेवं निस्तरूनि भवजलसारें । तमसःपार पावती ॥४९॥
ज्ञानोपदेष्टा गुरु तो श्रेष्ठ । जन्मकर्मप्रद कनिष्ठ । ऐसें विवरूनि एकनिष्ठ । दास्यीं दृढिष्ट ते धन्य ॥४५०॥
वेदवेदार्थीं अतिप्रवीण । त्याचेंचि जन्म परम धन्य । त्याचेंचि सकळ कर्माचरण । जिहीं सद्गुरुचरण दृढ धरिले ॥५१॥
मूत्रद्वारें जन्मविते । लक्षचौर्यायसीमाजि पिते । किती जाले असती त्यांतें । असे कोणांते गुरुत्व पैं ॥५२॥
वर्णाश्रमकर्मनिष्ठे । मंत्रयंत्राचे उपदेष्टे । इहामुष्मिक फळें मिष्टें । बोधूनि कष्टें श्रमविती जे ॥५३॥
याहूनि तृतीय गुरु जो कां । अध्यात्मबोधें कैवल्यसुखा । वोपूनि निरसी अशेषदुःखा । तो निजसखा जे भजती ॥५४॥
जो भवसागरींचें तारों । भ्रांतालागीं कल्पतरू । शरणागता वज्रपंजरू । ऐसा उपकार जयाचा ॥४५५॥
तयाहूनि ब्रह्मांडमठीं । दुसरा श्रेष्ठ न दिसे दृष्टी । यालागीं ज्याचिये पादपीठीं । सुरवरकोटी नत होती ॥५६॥
यास्तव सद्गुरुभजनाहून । श्रेष्ठ धर्म नाहींच आन । परिहारेंसी श्रीभगवान । बोले वचन तें ऐका ॥५७॥
नाहमिज्याप्रजातिभ्यां तपसोपशमेन वा । तुष्येयं सर्वभूतात्मा गुरुशुश्रूषया यथा ॥३४॥
प्रजाति म्हणिजे प्रकृष्ट जन्म । उपनयनपूर्वक व्रतस्थ धर्म । वेदाध्ययनीं परिश्रम । परमनियम करणजय ॥५८॥
ब्रह्मचर्याश्रमीं जितुके । धर्म बोलिले आचरे तितुके । तेणें जगदात्मा मी न तोखें । जैसा तोषें गुरुदास्यें ॥५९॥
करू पुराणगाथापठण । करू कां सर्व शास्त्राध्ययन । निगमपारंगत हो कां पूर्ण । परि तें गौण अवघेंचि ॥४६०॥
दमो कां इन्द्रियकडकडाडें । करो कां व्रतें अतिदुर्घटें । शीतोष्णादि सहननिष्ठें । साहो संकटें तपाचीं ॥६१॥
फल दल मूल जलाशनें । पवनाशनें कीं अनशनें । मारुतजयें जपध्यानें । गुरुदास्य तुळन न पाविजे ॥६२॥
अथवा गृहस्तधर्माचरण । राजसूयांत यज्ञेंकरून । सांग अह्निक विधिविधान । गुरु सेवनासम न तुळे ॥६३॥
हो कां याहूनि वानप्रस्थ । अतिजारठ्यें तनु अस्वस्थ । तेथ ही बुद्धि करूनि स्वस्थ । आचरो प्रशस्त तपश्चर्या ॥६४॥
वात पर्जन्य शीतातप । साहूनि दुःसह करू कां तप । पहुदो स्त्री घेऊनि समीप । काम संकल्प नुदेजतां ॥४६५॥
परि ते सद्गुरुदास्यतुळणे । न तुळे ऐसें श्रीकृष्ण म्हणे । कीं हें दुःसह तनु शोषणे । गुरुशुश्रूषणें सम नव्हती ॥६६॥
याहूनि वरिष्ठ चतुर्थाश्रम । स्नानसंध्यादि चौगणे श्रम । भिक्षाशनी वृक्षधान । सदा अध्यात्म विवरी जो ॥६७॥
संकल्पाची पूर्णाहुती । करूनि वरिली पूर्णस्थिती । पावले निर्वाणवृत्ति । तेहि न तुळती गुरूभजनीं ॥६८॥
इत्यादि आश्रमधर्मसाधनी । भ्रंश पावती कर्माभिमानी । सद्गुरुसेवन साधना मूर्ध्नि । निराभिमानी वर मिरवे ॥६९॥
सर्वभूतात्मा मी जो गुरू । तोषें गुरूसेवनीं अतितरू । वदों जातां सविस्तरू । न पवे पार सेवेचा ॥४७०॥
गुरूदास्याची मज आवडी । गुरुभक्तांचे चरण झाडीं । गुरुसेवकांसदनीं प्रौढी । घेउनि कावडी जल वाहें ॥७१॥
गुरुभक्त जेव्हां मार्गें जाती । त्या मी अनुयायी सांगाती । त्याचे पदींची उधळे माती । पावन त्रिजगतीं धरीं माथां ॥७२॥
गुरुभक्ताचे सबाह्य भागीं । सर्वदां वोळंगें मी सर्वांगीं । गुरुभक्ताच्या दास्यालागीं । माझें त्रिजगीं अवतरणें ॥७३॥
एकुलतें पोटींचें बाळ । माता करी तत्सांभाळ । चिदसदायक अमंगळ । न म्हणूनि निर्मळ करी स्वयें ॥७४॥
थुंका श्लेष्मा वांति लाळ । सर्वदा चिवडी मूत्रमळ । कुत्सित सर्वांगीं वोघळ । परि अळुमाळ विसंबे ॥४७५॥
आपुला जीव त्यातळीं वरी । आथरूनियां रक्षण करी । न्यूनपूर्ण सर्वांपरी । त्याचे शरीरीं संपादी ॥७६॥
कीं तें निसर्गें अनन्यशरण । माउलीवीण न स्मरे आन । व्याघ्र सर्पअग्नि जीवन । माता म्हणूनि कवळीतसे ॥७७॥
देखे ते ते माता मानी । मातेवीण न स्मरे वाणी । मातृप्रेमें अंतःकरणीं । अनन्यशिराणी परस्परें ॥७८॥
तैसा सर्वात्मा मी हरी । सद्गुरुनौका भवसागरीं । जाणोनि अनन्य शुश्रूषा करी । बाळकांपरी मज प्रिय तो ॥७९॥
त्याचिये नीच सेवनीं न लजें । समविषमाचें न मनीं वोझें । विहिताविहित शुभाशुभा जें जें । तें मी सहजें संपादीं ॥४८०॥
गुरूसेवनें जो मज भजला । लक्ष्मीहून तो जिवलग मजला । तेणें सर्वात्मा मी त्यजिला । जेणें त्यजिला भाव दुजा ॥८१॥
जरी तूं म्हणसी द्विजोत्तमा । पितरांहूनिया जिवलग रमा । तरि मी सर्वगत सर्वात्मा । जन्मकर्माविरहित पैं ॥८२॥
मी भक्ताचे जठरीं जन्में । मी भक्ताचीं आंगवी कर्में । मी भक्ताचीं मिरवीं नामें । गुरुभक्तप्रेम नाचतसें ॥८३॥
गुरुभक्ताचा जो कां द्वेषी । त्याचा वैरी मी हृषीकेशी । सर्वदा वैरचाली त्यासीं । दुःखराशी त्या वोपीं ॥८४॥
गुरुभक्तातें जो सन्मानी । मी तयातें प्रियतम मानीं । मुगुटीं तुरंबीं सुमनाहूनि । भूशण करूनि सप्रेमें ॥४८५॥
गुरुशुश्रूषेकरूनि जैसा । मी पावतसें पूर्वसंतोषा । व्रतें यजनें प्रशमें तपसा । आल्हाद तैसा मी न पवें ॥८६॥
प्रेमोत्कर्षें द्विजाप्रति । ऐसें बोलूनियां श्रीपती । गुरुसदनेंची शुश्रूषा निगुति । स्मरवी चित्तीं पुसूनियां ॥८७॥
म्हणे आम्हांस कांहीं दिवस । दैवानुसार घडलें दास्य । तें आठवतें कीं तुम्हास । ऐसा द्विजास प्रश्न करी ॥८८॥
चिरकाळवरि दास्य केलें । प्रेमें अल्पचि तें मानिलें । त्यामाजि येके दिवशींच स्मरिलें । गुरुबंधुत्वें तें ऐका ॥८९॥
अपि नः स्मर्यते ब्रह्मन् वृत्तं निवसतां गुरौ । गुरुदारैश्चोदितानामिन्धनानयने क्वचित् ॥३५॥
गुरुबंधुत्व सप्रेम गोष्टी । करितां गुरुदास्य कथिलें ओष्ठीं । येर्हवीं उच्चारितां वाक्पुटीं । निर्वीर्य होय कृतविद्या ॥४९०॥
परस्परें गुरुसेवन । केलें तैंचें पूर्वस्मरण । गुरुगृहीं करितां शुश्रूषण । किम्चिद्भगवान तें स्मरवी ॥९१॥
श्रीकृष्ण म्हणे भो ब्राह्मणा । तुम्हां आम्हां गुरुसेवना । करूनि वसवितां गुरुच्या सदना । कृताचरणा न स्मरसी ॥९२॥
ते तुज आठवतें कीं नाहीं । तुम्हां आम्हां गुरूचे गेहीं । परिचर्यार्थ वसतां पाहीं । जें स्वदेहीं अनुष्ठिलें ॥९३॥
अपूर्व कोण्हे एके दिवशीं । गुरुपत्नीनें तुम्हां आम्हासी । प्रेरिलें इंधन आणावयासी । तें न स्मरसी कधीं तर्हीं ॥९४॥
इंधन आणणें काय कठिण । परंतु अघटित घडला क्षण । त्याचें स्वमुखें श्रीभगवान । करी व्याख्यान तें ऐका ॥४९५॥
N/A
References : N/A
Last Updated : June 06, 2017
TOP