मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ७१ वा| श्लोक ११ ते १५ अध्याय ७१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४६ अध्याय ७१ वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - इत्युद्धववचो राजसर्वतोभद्रमच्युतम् । देवर्षिर्यदुवृद्धाश्च कृष्णश्च प्रत्यपूजयन् ॥११॥शुक म्हणे गा कुरुवरपाळा । सर्वकल्याणफळीं सफळा । उद्धवें कथिली मंत्रमाळा । अक्षय सकळा सुखदात्री ॥९॥इतुकी उद्धवमंत्ररचना । ऐकोनि संतोष ब्रह्मनंदना । म्हणे भला रे भला दाशार्हगणा । माजि वरिष्ठ वक्ता तूं ॥११०॥यादवांमाजि वरिष्ठ वृद्ध । श्वफल्क देवक वसुदेव प्रसिद्ध । कुकुर माधव भोज अंध । साधुवादें गौरविती ॥११॥तैसाचि श्रीकृष्ण म्हणे भला । उद्धवा जो त्वां मंत्र कथिला । अभिमत आम्हां समस्तांला । आणि धर्ममखाला अनुकूळ ॥१२॥राजसूययज्ञ पावेल सिद्धी । शरणनृपांची रक्षणाविधी । मागध आमुचा मुख्य दंदी । भेमें त्रिशुद्धी निवटिलिया ॥१३॥ऐसा यदुवृद्धीं गौरविला । कृष्णें साधुवादें पूजिला । चकाराव्ययें सम्मानिला । अनिरुद्धादि अवर वीरीं ॥१४॥सर्वीं ऐकूनि मंत्ररहस्य । हृदयीं मानिला परम तोष । परमोल्लासें द्वारकाधीश । आज्ञा नृपास मागतसे ॥११५॥अथाऽदिशत्प्रयाणाय भगवान्देवकीसुत । भ्रृत्यान्दारुकजैत्रादीननुज्ञाप्य गुरून्विभुः ॥१२॥आहुकराजा उग्रसेन । तया सम्मुख रुक्मिणीरमण । आज्ञा प्रार्थी कर जोडून । यज्ञार्थ प्रयाण करावया ॥१६॥गुरु म्हणिजे वडील वृद्ध । देवकवसुदेवादि प्रबुद्ध । त्यांसि आज्ञा मागूनि सिद्ध । करवी सन्नद्ध चित्रचमू ॥१७॥उद्धवमंत्र ऐकिल्यावरी । गुरुवरांची आज्ञा हरी । घेऊनि भृत्यांतें पाचारी । दारुकजैत्रप्रमुखांतें ॥१८॥प्रयानसंकेतसूचक भृत्य । त्यांसि स्वमुखें प्रयाणकृत्य । सांगतां सैनिकांप्रति तें त्वरित । कथिती वृत्तांत दीर्घरवें ॥१९॥प्रभु समर्थ जो दैत्यारी । इंद्रप्रस्था करितो स्वारी । पुत्र कलत्र सहपरिवारीं । सिद्ध दळभारीं होइजे ॥१२०॥गज रथ तुरंग आणि पदाती । चमू चतुरंगिणी चंड निगुती । सन्नद्ध करा हे आज्ञा दूतीं । सैनिकांप्रति जाणविता ॥२१॥सवेग ठोकिल्या प्रस्थानभेरी । गुढारें बाणलीं रथकुंजरीं । अश्व पल्याणिले वीरीं । पदाति शरीरीं वेंठले ॥२२॥ऐकोनि प्रयाणभेरीगजर । सन्नद्ध करूनियां दळभार । सैनिकीं येऊनि यादवेश्वर । नमूनि एकाग्र तिष्ठती ॥२३॥सन्नद्ध देखूनि प्रबळ चमु । भग आज्ञापी पुरुषोत्तमु । समस्त बंधूंचा पूर्णकामु । करावयार्थ सवें न ॥२४॥निर्गमय्यावरोधान्स्वान्ससुतान्सपरिच्छदान् । संकर्षणमनुज्ञाप्य यदुराजं च शत्रुहन् ।सूतोपनीतं स्वरथमारुहद् गरुडध्वजम् ॥१३॥सात्यकिनामा सिंहकपवर । त्यासि आज्ञापी जगदीश्वर । पुढें चालों द्या अंतःपुर । सोपस्कर सन्नद्ध ॥१२५॥षोडश सहस्र अवरोधजन । दासी दास किङ्करगण । कुमरी हरिसंतान । परिवारून निघाले ॥२६॥प्रयाण करवूनि स्वान्तःपुरा । आज्ञा मागोनि रेवतीवरा । पुसोनि उग्रसेना नृपवरा । निघे सत्वर तेथूनि ॥२७॥शत्रुचक्रातें संहर्त्ता । यदुचक्राचा प्रतिपालिता । त्या उग्रसेनाची आज्ञा माथां । वंदूनि निघतां हरि झाला ॥२८॥शत्रुमथना परीक्षिति । राम द्वारकारक्षणाप्रति । संस्थापूनि रुक्मिणीपति । निघता झाला सेनेसीं ॥२९॥सभामंडपाबाहेर हरी । येतां दारुक विनति करी । स्वामी बैसावें रहंवरीं । रथ शस्त्रास्त्रीं सिद्ध असे ॥१३०॥गरुडध्वजा लखलखित । तुरंगचौकीं जुंपिला रथ । दारुकें समीप आणितां त्वरित । स्वरथीं भगवंत आरूढला ॥३१॥धरूनि सारथियाचा हस्त । रथीं वळघला कमलाकान्त । जेथें सेनेचा चतुष्पथ । पातला तेथ जगज्जेता ॥३२॥ऐकोनि रथनेमीचा गजर । सवेग वरिष्ठ सेनाधर । भंवतेमिनले अतिसत्वर । तोही प्रकार अवधार ॥३३॥ततो रथद्विपभटसादिनायकैः करालया परिवृत आत्मसेनया । मृदंगभेर्यानकशंखगोमुखैः प्रघोषघोषित्ककुभो निराक्रमत् ॥१४॥भंवते वरिष्ठ महारथी । अनेक विचित्र ध्वज शोभती । कित्तेक गजयानीं मिरविती । सन्निद्ध बद्ध शस्त्रास्त्रीं ॥३४॥गगनगामी अश्वरत्नें । रत्नखचितें वरी पल्याणें । स्वार झाले राउत राणे । सायुधत्राणें मंडित जे ॥१३५॥पदातिवीर महासुभट । शस्त्रास्त्रबद्ध अभ्यासनिष्ठ । एवं चतुरंगिणी उद्भट । चाले वैकुंठ वेष्टूनी ॥३६॥चतुरंगिणीचे यथूपति । वीरनायक जे जे होती । तिहीं वेष्टूनियां श्रीपती । भवंती चालतीं चक्रवत् ॥३७॥ऐसे सैनिक यथाविभागें । दक्षिणोत्तर पुढें मागें । नेमिले जैसे जे श्रीरंगें । ते तद्विभागें चालती ॥३८॥कराळ म्हणिजे भयंकर । प्रचंड सेनेचा महापूर । वेष्टित निघाला यदुवीर । अपर भास्कर भूनभींचा ॥३९॥घटिकायंत्रें मुहूर्तवेळा । सूचितां वाद्यांचा गजर झाला । पणव भेरी मृदंग काहळा । शंख गोमुख पटहादि ॥१४०॥हस्तर्क्षींचीं मेघगर्जनें । कीं हिमगिरि दणाणी गंगापतनें । तेंवि गंभीर दुंदुभिस्वनें । काष्ठामंडळ प्रघोषित ॥४१॥ऐस्या प्रचंड वाद्यगजरीं । मुहूर्तवेळेच्या अवसरीं । द्वारके बाहीर कैटभारी । निघता झाला शुभ शकुनें ॥४२॥गंधाक्षता कुसुमहार । मंगळमंडित विप्रभार । पुढें देखूनि नमस्कार । करिता झाला यदुवर्य ॥४३॥आशीर्वादांचिया श्रेणी । प्रयाणोचित सूक्तपठनीं । मंत्राक्षता वर्षतां मूर्ध्नीं । धरानिर्ज्जर जयघोषें ॥४४॥पूर्ण कनककलश माथां । चेटिकाश्रेणी सम्मुख येतां । सव्य घालूनि मन्मथजनिता । इंद्रप्रस्था चालियला ॥१४५॥सुपुत्र वनिता पुत्र कडे । प्रयाणी येतां देखूनि पुधें । शुभशकुनार्थ तियेतें कोडें । सव्य घालूनि चालती ॥४६॥कुसुमेंसहित माल्यकार । अर्पिती सुमनांचे संभार । पुश्पावतंस सुमनहार । जयजय करोनि निवेदिती ॥४७॥कावडीमाजि गोरसभरणी । पुधें भेटल्या बल्लवश्रेणी । माथां दधिदुग्धें घेऊनि । आल्या गौळणी सम्मुख ॥४८॥सवत्स धेनु दक्षिणभागीं । चास नकुळ शिखी वामांगीं । इत्यादि शुभशकुनप्रसंगीं । निघे शार्ङ्गी शक्रप्रथा ॥४९॥द्वारकेबाहीर जनार्दन । सेनामंडित निघतां पूर्ण । तंव तो अंतःपुर घेऊन । झाला युयुधान अनुयायी ॥१५०॥अष्ट पट्टमहिषी प्रवर । अवर सशत षोडश सहस्र । एवं अंतःपुर समग्र । कुमरीं कुमरां समवेत ॥५१॥पूर्वीं कृष्णाज्ञेप्रमाणें । पुढें अंतःपुर युयुधानें । नेलें होतें तें या क्षणें । केलें तेणें अनुयायी ॥५२॥श्लोकद्वयें तें निरूपण । परीक्षितीतें शुक भगवान । कथिता झाला तें व्याख्यान । सावधान अवधारा ॥५३॥नृवाजिकाञ्चनशिबिकाभिरच्युतं सहात्मजाः पतिमनु सुव्रता ययुः ।वरांबराभरणविलेपनस्रजः सुसंवृता नृभिरसिचर्मपाणिभिः ॥१५॥यानरूढ हरिकामिनी । कित्तेक मिरवती सुखासनीं । कित्तेक वरिष्ठा अश्वयानीं । काञ्चनशिबिकारूढ एकी ॥५४॥आत्मजांसहित यानारूढा । सपूर सूक्ष्म वसनीं गूढा । पतिव्रता नियमदृढा । परम सुघडा हरिरमणी ॥१५५॥इत्यादि मंदित नाना यानीं । अच्युतातें अनुलक्षूनी । पट्टमहिषी अनुगामिनी । तदनु श्रेणी अवरांच्या ॥५६॥वसनाभरणीं सालंकृता । मलयजकर्दम कुकुंमीं लिप्ता । पार्यातसुमनें ग्रथिलीं माथां । कंठीं हार विराजती ॥५७॥कृष्णरथाच्या पश्चाद्भागें । वनितायानें चालती वेगें । भंवते पुरुष खेटकें खङ्गें । धरूनि निजाङ्गें खोलती ॥५८॥वनितायानांभंवते नर । चालती खङ्गखेटकधर । वसनाभरणीं सालंकार । सुमनहार अवतंसीं ॥५९॥मस्तकीं सुरंग शिरोवेष्टनें । जानूपर्यंत अंगत्राणें । चरणकंचुकादि परिधानें । पादत्राणें दृढ चरणीं ॥१६०॥इत्यादि किंकरनराची घरटी । यानें चालती घडघडाटी । अपरा विविध यानीं चेटी । शुक वाक्पुटीं वाखाणी ॥६१॥ N/A References : N/A Last Updated : May 29, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP