अध्याय ७१ वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


श्रीशुक उवाच - इत्युदीरितमाकर्ण्य देवर्षेरुद्धवोऽब्रवीत् । सभ्यानां मतमाज्ञाय कृष्णस्य च महामतिः ॥१॥

अमात्यांमाजि वरिष्ठमान । प्रज्ञा बृहस्पती समान । ऐसा उद्धव मुख्य प्रधान । सम्मानूनियां श्रीकृष्णें ॥१०॥
दूतमुखें नृपांची विनती । धर्भयज्ञार्थ नारदोक्ती । त्यांमाजि करणीय जे निश्चिती । उद्धवाप्रति पुसतां पैं ॥११॥
इतुकें हरीचें उदीरित । ऐकोनि उद्धव बुद्धिमंत । जाणता झाला त्रिविध मत । इत्थंभूत तें ऐका ॥१२॥
नारदमतें पाण्डवसदना । राजसूयार्थ कीजे गमना । उद्धवें अवगमूनि ऐसें मना । स्वपक्षवासना अवगमिली ॥१३॥
तंव सभास्थानीं यादववीर । देदीप्य वीरश्रीभास्कर । त्या सर्वांचें अभ्यंतर । मागधसंहार आधीं कीजे ॥१४॥
श्रीकृष्णाचें मनोगत । एकतंत्रें उभय कार्यार्थ । साधूनि रक्षिजे शरणागत । पुण्यपुरुषार्थ हा मुख्य ॥१५॥
महासुमति उद्धव मंत्री । प्रभूचें वचन ऐकोनि श्रोत्रीं । इत्यर्थ वदता झाला वक्त्रीं । तो सत्पात्रीं परिसिजे ॥१६॥

उद्धव उवाच - यदुक्तमृषिणा देव साचिव्यं यक्षतस्त्वया । कार्य पैतृष्वस्रेयस्य रक्षा च शरणैषिणाम् ॥२॥

सर्वां बुद्धीचें द्योतन । करी जो स्वप्रकाशें पूर्ण । त्या कृष्णातें मुख्य प्रधान । देव म्हणून संबोधी ॥१७॥
अगा देवा द्योतमाना । जें बोलिला मुनींचा राणा । तेंचि मुख्य कर्तव्य जाणा । मंत्रविवरणांमाजि घडे ॥१८॥
आपुले पितृभगिनीचा तनय । सुहृदां मान्य कुरुकुळधुर्य । तेणें मखेन्द्र राजसूय । अभीष्ट कार्य मनीं धरिलें ॥१९॥
साचिव्यं म्हणिजे साहाह्य त्याचें । तुवां जाऊनि कीजे साचें । तेणें प्रसंगें शरणागतांचें । रक्षण नृपांचें करणें ही ॥२०॥
आधीं मखेन्द्र संपादून । मग नृपांचें कीजे रक्षण । ऐसें नोहे मम भाषण । एक कारण दोहींचें ॥२१॥
राजसूयार्थ इंद्रप्रस्था । आधीं जावें जी समर्था । तेणें प्रसंगें शरणागता । संरक्षूनि सुख द्यावें ॥२२॥
दोन्ही कार्यार्थ एकतंत्रें । संपादती माझेनि मंत्रें । कैसें म्हणाल तरी तें श्रोत्रें । अरविन्दनेत्रें परिसावें ॥२३॥
आठां श्लोकीं निरूपण । करील उद्धव मुख्य प्रधान । श्रोतीं होऊनि सावधान । तें व्याख्यान परिसावें ॥२४॥

यष्टव्यं राजसूयेन दिक्चक्रजयिना विभो । अतो जरासुतजय उभयार्थो मतो मम ॥३॥

उद्धव म्हणे जनार्दना । तेणें यजावें राजसूययज्ञा । जेणें दिक्चक्रप्रदक्षिणा । करूनि नृपगणा जिंकावें ॥२५॥
जेणें कीजे दिक्चक्रविजय । तेणेंचि करावा राजसूय । तस्मात जिंकितां मागधराय । द्विधा कार्य साधतसे ॥२६॥
न करितां मागधपराभव । दिग्बिजयाचा असंभव । दिग्विजयाविण धर्मराव । मखेन्द्रगौरव केंवि लाहे ॥२७॥
यालागि आधीं जरासुत । संहारिजे दिग्विजयार्थ । मागधमरणें भूप समस्त । होती मुक्त अनायासें ॥२८॥
राजयांचा कैपक्ष केला । पाण्डवयज्ञ सिद्धी गेला । एक जरासंध आधीं वधिला । म्हणिजे साधला उभयार्थ ॥२९॥
ऐसें मम मन मनसिज जनका । मंत्र विवरूनि कीजे निका । यदुकुळहृच्छल्यकंटका । उन्मोचन तद्योगें ॥३०॥

अस्माकं च महानर्थो ह्येतेनैव भविष्यति । यशश्च तव गोविंद राजो बद्धान्विमुञ्चतः ॥४॥

नृपांचें बंधविमोचन । करितां जो तूं श्रीभगवान । त्रिजगीं तें तव यश पावन । होय संपूर्ण उज्ज्वलित ॥३१॥
जेणें प्रसंगें श्रीवैकुंठा । आम्हां यादवांचा हृच्छल्यकांटा । भंगेल ऐसा कार्यार्थ मोठा । येणेंचि क्रमें होईल पैं ॥३२॥
सतरा वेळ भंगिला रणीं । तथापि न शिणे अंतःकरणीं । यदुकुळातें निर्मूळकरणीं । दीर्घप्रयत्नीं पडिलासे ॥३३॥
युधिष्ठिराचा यज्ञ मुख्य । दिग्विजयें तो अशक्य । आमुचा हृच्छल्यकंटक । मागध मुख्य निर्द्रळिजे ॥३४॥
ऐसी ऐकूनि उद्धववाणी । उत्सुक यादववीरांच्या श्रेणी । म्हणती मागध येच क्षणीं । समरांगणीं संहारू ॥३५॥
सर्वीं सादर ऐकूनि मंत्र । थरथलें यदुवीरांचें चक्र । म्हणती मागध कोण पामर । कायसा विचार तद्विषयीं ॥३६॥
अमर जिंकिले भौमासुरें । भौम भंगिला तो यदुवीरें । पार्यातहरणाच्या अवसरें । शक्र निर्जरांसह दमिला ॥३७॥
उषा भाळली जैं अनिरुद्धा । तैं बाणाच्या करितां वधा । तदर्थ शंकर आला युद्धा । तोही मुग्धासम केला ॥३८॥
तया कृष्णाची सक्रोध भृकुटी । साहों शके सकळ सृष्टी । ऐसा योद्धा कोण जगजेठी । भाविती पोटीं यदुभार ॥३९॥
भगवान् शरणागतवत्सल । कैंपक्षील नृपांचें कुळ । तरी संहारूं मागध खळ । न भरत पळ समरंगीं ॥४०॥
ऐसा वीररसाचा यावा । हृदयीं जाणवला उद्धवा । मग तो म्हणे वासुदेवा । मंत्र अवघा अवधारीं ॥४१॥
तुंबळ वीररसाचा सिंधु । क्षोमला देखूनिया अगाधु । उद्धव सचिवांमाजि प्रबुदुद्धु । रहस्य प्रसिद्ध प्रकाशी ॥४२॥

स वै दुर्विषहो राजा नागायुतसमो बले । बलिनामपि चान्येषां भीमं समबलं विना ॥५॥

भो भगवंता ऐकें वचन । जरासंधाचें रहस्यकथन । जेणें उपायें पावे मरण । तें गुह्य संपूर्ण मी कथितों ॥४३॥
दहा सहस्र गजांचें बळ । अंगीं वाहे जो एकला प्रबळ । तोही जरासंधातें केवळ । दमूं न शके समरंगीं ॥४४॥
भूमंडळींचे बळिष्ठ राजे । अयुतगजबळाचिये वोजे । जेणें जिंकिलें प्रतापतेजें । अविकें अजें शार्दूळवत् ॥४५॥
भूमंडळींच्या प्रबळ पार्थिवां । दुःखें न साहवे ज्याचा यावा । चंडकौशिकवरगौरवा । तव अजिंक्य भूचक्रा ॥४६॥
म्हणाळ बळिष्ठ महारथी । तयांपुढे मागध किती । तरी अयुतमत्तगजांची शक्ती । वर विजयोक्ति मुनिप्रणीत ॥४७॥
नागायुतबळिष्ठ नर । भूमंडळीं असती वीर । तथापि मागधेंसी समर । करावयातें असमर्थ ॥४८॥
तयाचा मृत्यु ज्याचेनि हातें । तें गुह्य विंदित आहे मातें । हें मी कथितों ऐका निरुतें । मग मंत्रातें मान्य करा ॥४९॥
तयासि समबळ भीम एक । भीमचि तयाचा मुख्य अंतक । ऐसा निर्द्दिष्ट ब्रह्मलेख । मुनि कौशिक वदलासे ॥५०॥
भीमाहूनि अनेक बळी । ज‍र्‍ही मिळाले एके काळीं । तर्‍ही मागध रणमंडळीं । कोण्हे काळीं त्यां न मरे ॥५१॥
तस्मात भीमचि अंतक त्याचा । ऐसी चंडकौशिकवाचा । यामाजि सूक्ष्म विचार साचा । मम मंत्राचा इत्यर्थ हा ॥५२॥
म्हणाल सूक्ष्मविचार काय । तरी भीमार्जुनेंसींही कुरुवर्य । समरीं करितां मागधजय । प्रताप होय निष्फळ तो ॥५३॥
मागध नागायुतबळिष्ठ । सेना प्रतापी वरिष्ठ धृष्ट । उभय सामर्थ्यें गरिष्ठ । न पवे कष्ट समरंगीं ॥५४॥
अस्त्रविद्येचा उदन्वानु । दृढ धैर्याचा रत्नसानु । प्रळयतेजाचा हुताशनु । वीरश्रीसंपन्न विरविजयी ॥५५॥
ऐसा मागध सर्वांपरी । बळिष्ठे दमिजे उपायकुसरी । तो उपायही ऐका श्रोत्रीं । मम वैखरी निवेदितां ॥५६॥

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP