मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ६६ वा| श्लोक ४१ ते ४३ अध्याय ६६ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४३ अध्याय ६६ वा - श्लोक ४१ ते ४३ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ४१ ते ४३ Translation - भाषांतर चक्रं च विष्णोस्तदनुप्रविष्टं वाराणसीं साट्टसभालयापणाम् ।सगोपुराट्टालकगोष्ठसंकुलां सकोशहस्त्यश्वरथान्नशालाम् ॥४१॥विष्णुचक्र सहस्रार । भग्न करूनि कृत्याङ्गार । त्याच्या पाठीं लागे क्रूर । काशीपुर प्रवेशलें ॥२९०॥प्रलयज्वाळांची महामारी । भरली वारानसीमाझारी । मारुतिपुच्छें जयापरी । केली बोहरी लंकेची ॥९१॥हाट बाजार धडधडां जाळती । प्राणभयें लोक पळती । पुरी प्रज्वळली सभोंवती । आक्रन्दती पुरवासी ॥९२॥प्रतिपण्यस्थें सभास्थानें । राजमुद्रांचीं शासनें । धडधडां जळती चक्राग्नीनें । शङ्खस्फुरणें जन करिती ॥९३॥नाना पदार्थ प्रतिदुकानीं । घृतें तैलें चर्मभाजनीं । मधु ऐक्षवरसश्रेणी । जळती धडकोनि पण्यस्थ ॥९४॥अग्नियंत्राचे द्रव्यसांठे । स्पर्शमात्रें कडकडाटें । गगना उसळूनि जाती नेटें । प्रळय वाटे प्रान्तस्था ॥९५॥गोधूम साळी जव जोंधळे । माष मुद्ग मसुरा राळे । खल्व चणक सर्षप काळे । तिळ तण्डुल श्यामक ॥९६॥नानाविधा द्विदलराशि । नृपोपभोग्या वरान्नासी । कुलित्थ कोद्रव अढक अतसी । करडी अंबाडी पौष्करिका ॥९७॥इत्यादि धान्याचे पर्वत । धडधडां जळोनि भस्मीभूत । मुखीं मृत्तिका निक्षेपित । वार्धुषगण भोंवताला ॥९८॥राजभ्योग्यादि महार्हवसनें । जनपदभोग्यें गौण सामान्यें । कृमिजें कोशेये रोमजें तार्णें । राजतें सौवर्णें हत होती ॥९९॥शिंपी सोनार चर्मकार । नाना धातूंचे भाण्डकार । हयगजवृषादिपल्याणकार । शरचापकार जळताती ॥३००॥माल्यकार रंगकार । परिमळद्रव्यक्रयी अपार । भिषक नापित नृत्यकार । अवघे बाजार जळताती ॥१॥हेमरजतताम्रनाणीं । विकिती वेव्हारे सोवाणी । तेथ प्रज्वळतां चक्राग्नि । धातु द्रवोनि रस वाहती ॥२॥एक पळोनि बाहेर जाती । एक जेथील तेथें जळती । पळतां पथ ते न लाहती । आहुति होती चक्रानळा ॥३॥एक एकासाठीं रडती । तेही अग्निमुखीं पडती । पडतां क्षण एक तडफडती । मग सोडिती प्राणांतें ॥४॥स्त्री माहेरा काली गेली । आमुची शान्ति पावकें केली । मही धन संपत्ति जे पुरिली । तुम्हीं ते कथिली पाहिजे ॥३०५॥ऐसें भोंवतालियां लोकां । जळतां एक मारिती हाका । एक म्हणती मुलां बायकां । करितां शोका शान्तविजे ॥६॥एक म्हणती प्रळयांतून । शान्तवावया वांचेल कोण । अंतीं करा हरिहरस्मरण । कांहीं सोडवण जीवाची ॥७॥ज्वाळा धडकत लागल्या गगनीं । तप्तताम्रमय तापली धरणी । सळसळां कढों लागलें पाणी । जळचर श्रेणीसमवेत ॥८॥तों पुरगर्भीं भरले ज्वाळ । तेणें फुटोनि उडती उफळ । जैसे यंत्रगर्भींचे गोळ । वज्रकल्लोळसम पडती ॥९॥अट्टाळिया दामोदरें । श्रीमंतसदनें राजमंदिरें । भस्म केलीं मुकुंदास्त्रें । चमत्कारें निमिषार्धें ॥३१०॥पशुगोठणें अश्वशाळा । कुंजरशाळा रहंवरशाळा । खेचरक्रमेळरासभशाळा । जाळिल्या सकळा सुदर्शनें ॥११॥अजाअविकांचिया कोंडणी । पाकशाळा पाचकश्रेणी । कोश मांदुसा भरल्या रत्नीं । सुवर्णनाणीं अपरिमितें ॥१२॥चक्राग्नीच्या कडकडाटें । रत्नें फुटती तडतडाटें । हेम द्रवोनि वाहे पाटें । झालें उफराटें जन म्हणतीं ॥१३॥भणगें भिकारी याचक । गनक जोशी ग्रामयाजक । वैयाकरणी नैयायिक । वेदपाठक हुत झाले ॥१४॥सुदक्षिण नृप नव्हे गाढव । प्रयोगें क्षोभविला वाडव । आपणांसहित आमुचे जीव । होमिले सर्व पूर्णाहुतीं ॥३१५॥सांख्य मीमांसक वेदान्ती । धर्मशास्त्रज्ञ दशग्रंथी । वाजपेयी श्रौतस्मार्ती । पडिले आहुती चक्राचे ॥१६॥यति वनस्थ ब्रह्मचारी । आगमी कौळिक वामाचारी । कादिहादिदीक्षाधारीं । महाअभिचारीं प्रवीण जे ॥१७॥साबरी आसुरी पंचाक्षरी । जारणमारणप्रयोगकारी । नानापाखंडी वेषधारीं । कर्कश अघोरीं हुत झाले ॥१८॥राजनियोगी ग्रामलेखक । जळतां वदनें करिती शंख । वेतन बुडालियाचें दुःख । स्मरतां पावक त्यां कवळी ॥१९॥ मूषक बिडालें श्वान जंबुक । गो सरड सर्प वृश्चिक । सामान्य जंतुयोनि अनेक । चक्रपावका हुत झाले ॥३२०॥पूर्वी जैसा खाण्डववनीं । कृष्णार्जुनांच्या अभयेंकरूनी । पावकें भक्षिले समस्त प्राणी । तद्वत करणी हे झाली ॥२१॥मुंगी मत्कुण मूषक माशी । न सुटत पडलीं पावकग्रासीं । गगनगर्भीं उडतां पक्षी । पडती हुताशीं आहळुनी ॥२२॥श्रोते आशंका करिती येथ । यति वेदान्ती व्रती वनस्थ । चक्रें जाळिले हे किमर्थ । तरी तो वृत्तान्त अवधरा ॥२३॥धान्यासरिसे रगडिती किडे । ऐसें बोलती लोक वेडे । गुंततां धान्यभक्षणचाडे । मरणा वरपडे ते होती ॥२४॥महापातकियाचा संग । धरितां तत्तुल्य तो अव्यंग । संसर्गजनितपापप्रसंग । दे फळभोगसमसाम्य ॥३२५॥राजा प्रवर्तला अभिचारा । ऐसिया ऐकतांचि विचारा । त्यागूनि गेले काशीपुरा । चक्राङ्गारा न जळती ते ॥२६॥कुकर्म कळतां पळती त्वरित । ते तद्दोषें न होती लिप्त । धनसदनादिममताव्याप्त । ते संतप्त तत्पापें ॥२७॥असंप्रज्ञात समाधिस्थ । निर्विकल्पदशा प्राप्त । ते सर्वदा स्वरूपस्थ । शारीर स्वार्थ नेणती ते ॥२८॥जितां मरतां आत्मस्थिति । ज्यांची न मोदे कल्पान्तीं । चक्राग्नि जाळितां तयांप्रति । न वटे खंती अणुमात्र ॥२९॥हरिरूप केवळ योगीश्वर । हरितेजोमय हरीचें चक्र । समरसें होती ते तन्मात्र । जळतां शरीरभय कोणा ॥३३०॥पूर्वींच नाहीं देहभान । असंप्रज्ञातसमाधिवान । त्यांसी जाळितां सुदर्शन । कवळी पूर्ण आत्मत्वें ॥३१॥असो ऐसी वाराणसी । पदली सुदर्शनाच्या ग्रासीं । पुढें कथा वर्तली कैसी । तें नृपासी शुक सांगे ॥३२॥दग्ध्वा वाराणसीं सर्वां विष्णोश्चक्रं सुदर्शनम् । भूयः पार्श्वमुपातिष्ठत्कृष्णस्याक्लिष्टकर्मणः ॥४२॥पुराणपुरुष जो कां कृष्ण । अक्लिष्टकर्मा तो श्रीकृष्णु । त्याचें चक्र सुदर्शन । काशी जाळून परतलें ॥३३॥सर्व जाळीली वाराणसीं । तेव्हां वनस्थ यति तापसी । वांचलें ऐसें म्हणावयासी । सामर्थ्य कोणासी असेना ॥३४॥एवं कथिला दल्प विस्तार । संपूर्ण जाळिलें काशीपुर । सर्वज्ञ जाणती श्रोते चतुर । नलगे परिहार यदर्थीं ॥३३५॥पूर्ण जाळूनि वाराणसी । चक्र पातलें द्वारकेसी । श्रीकृष्णाचे पार्श्वदेशीं । दक्षिणेसी स्थिर झालें ॥३६॥श्रीकृष्णाचें जें जें कर्म । दुष्ट भंगूनि स्थापी धर्म । अक्लिष्टकर्मा ऐसें नाम । जाणोनि वर्म मुनि म्हणती ॥३७॥प्राकृत म्हणती हिंसापर । म्हणोनि श्रीशुक योगीश्वर । या कर्माचा महिमा सधर । वर्णी सादर तो परिसा ॥३८॥य एनं श्रावयेन्मर्त्य उत्तमश्लोकविक्रमम् । समाहितो वा शृणुयात्सर्वपापैः प्रमुच्यते ॥४३॥शुक म्हणे गा परीक्षिति । उत्तम श्लोकाची विक्रमख्याति । श्रवण करवील जो वक्ता सुमति । प्राण्याप्रति एकादिया ॥३९॥अथवा सप्रेमभावें करून । एकाग्र इंद्रियां नियमून । समाहित करूनि अंतःकरण । करील श्रवण श्रद्धाळु ॥३४०॥एवं कथिलें जैसें तूतें । इतिहासाचे श्रोते वक्ते । ते या श्रवणें सर्व पापांतें । भस्म करिती क्षणमात्रें ॥४१॥महापातकें उपपातकें । ज्ञाताज्ञातें सांसर्गिकें । नैमित्तिकें उपहासकें । आर्द्रें शुष्कें जळताती ॥४२॥अखिल पातकां भस्म करिती । विशेष लाहती श्रीकृष्णभक्ति । इतिहास श्रवणाचिये ख्याति । प्रियतम श्रीपति त्यां मानी ॥४३॥इहामुत्रार्थ जो फलभोगी । जो मर्त्यधर्मी मनुष्यवर्गी । तो हा इतिहास श्रवणप्रसंगीं । मिळे श्रीरंगीं नियमात्मा ॥४४॥हें कृष्णाचें उज्बल यश । श्रवण करिती शुद्धमानस । ते ते होती नित्य निर्दोष । अमृतत्वासी पावती ॥३४५॥इतुकी श्रीमद्भागवतीं । दशमस्कंधीं श्रीशुकोक्ति । ऐकूनि निवाला परीक्षिति । निर्दोष चित्तीं होत्साता ॥४६॥एथवरी एकादशनीषट्क । कथिलें श्रोतयां निष्टंक । यावरी परीक्षिती सुटंक । रामप्रताप पुसेल ॥४७॥ये कथेचिया श्रवणा । श्रोतीं देऊनियां अवधाना । श्रवणमात्रें कैवल्यसदना । माजी चिद्घना अनुभविजे ॥४८॥इतुकी कथा प्रतिष्ठानीं । एकनाथाचे साम्राज्यसदनीं । चिदानंदें स्वानंदश्रवणीं । कृपा वरदानीं सांठविली ॥४९॥स्वानंदकृपारसाचा ओघ । गोविन्दह्रदीं भरला साङ्ग । तत्पादोदकप्रवाहगाङ्ग । रिघालें अव्यंग दयार्णवीं ॥३५०॥ऐसा दयार्णव आपूर्यमाण । विग्रहधारी अग्रवर्ण । एकनाथाचे लक्षूनि चरण । वसतिस्थान पिपीलिका ॥५१॥तेथें अध्याय हा षट्षष्ठि । श्रीधरस्वामीची पदवीदृष्टी । पाहोनि केली जे चावटी । ते टीका मराठी हरिवरदा ॥५२॥इच्या श्रवणें पठनें स्मरणें । दुर्गम भवाब्धि निस्तरणें । ऐसें वरदोन नारायणें । श्रोत्यांकारणें दिधलेंसे ॥५३॥एथ धरिती जे विश्वास । ते पावती कैवल्यास । अविश्वास माथां दोष । वाराणसीदहणाचा ॥३५४॥इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्णवानुचरविरचितायां पौण्ड्रककाशीराजवधाभिचार कृत्याभंगसर्त्विक्सुदक्षिणकाशीपुरीदहनं नाम षट्षष्टितमोऽध्यायः ॥६६॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४३॥ टीका ओव्या ॥३५४॥ एवं संख्या ॥३९७॥ ( सहासष्टावा अध्याय मिळून ओवीसंख्या ३१,११८ ) सहासष्टावा अध्याय समाप्त. N/A References : N/A Last Updated : May 11, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP