अध्याय ६६ वा - श्लोक १ ते ५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


नंदव्रजं गते रामे करूषाधिपतिर्नृप । वासुदेवोऽहमित्यज्ञो दूतं कृष्णाय प्राहिणोत् ॥१॥

राम गेलिया नंदव्रजा । मागें करूषदेशींचा राजा । वासुदेव मी ऐसिया वोजा । स्वकीयप्रजांमाजी म्हणवी ॥८॥
आपण प्राकृत जीव अल्पज्ञ । असतां म्हणवी मी भगवान । षड्गुणैश्वर्यें संपन्न । वाहे अभिमान मंदमति ॥९॥
द्वितीयपरार्धीं ब्रह्मयाचे । अट्ठाविसावे कलियुगीं साचें । जन्म होईल वासुदेवाचें । भविष्य मुनीचें जाणोनी ॥१०॥
द्वापारान्त कलियुगारंभ । ते संधींत पंकजनाभ । अवतरेल हा भविष्यगर्भ । जाणूनि दंभ रूढ करी ॥११॥
वासुदेव मी मूर्तिमंत । अवतरलों हें भूमंडळांत । प्रकट करूनि ऐसी मात । चिह्नें समस्त मिरवीतसे ॥१२॥
तंव येरीकडे मथुरापुरीं । देवकीवासुदेवांचिये उदरीं । स्वयें अवतरोनियां श्रीहरि । वाढला घरीं नंदाचे ॥१३॥
पूतनेपासूनि कंसावधि । लीलेकरूनि दैत्यां वधी । क्म्स कैपक्षी मागधी । सेना समुद्रीं निर्दळिली ॥१४॥
पुढें कालयवनाभेणें । जलधीमाजी करूनि पेणें । द्वारकादुर्गीं घालूनि ठाणें । केलीं कदनें दैत्यांचीं ॥१५॥
भूपतनया वरिल्या अष्ट । भौमसंगृहीता सहस्र द्व्यष्ट । तत्प्रसंगें वधिले दुष्ट । महापापिष्ठ खळ कुटिळ ॥१६॥
प्रकटप्रतापें द्वारकाभुवनीं । त्रिजगज्जेता यादवगणीं । शङ्खचक्राब्जगदापाणि । कारुषें कर्णीं ऐकूनियां ॥१७॥
म्हणे मी वासुदेव अवतरलों । ऐसा लोकीं विख्यात झालों । कृष्णप्रतापें आच्छादिलों । धिक्कारिलों तैं नृपवर्गीं ॥१८॥
ऐसा कारुष क्षोभे मनीं । विशेष जनवार्ता ऐकूनी । प्रकट वासुदेव द्वारकाभुवनीं । नोकिती वचनीं नृप ऐसें ॥१९॥
कारुष कृत्रिम वाहे चिह्नें । वासुदेव या वृथाभिधानें । लोकांमाजी करी वल्गने । ऐसीं वचनें नृप वदती ॥२०॥
ऐसें ऐकोनि कर्णोपकर्णीं । कारुषें क्षोभोनि अंतःकरणीं । दूत प्रेरिला द्वारकाभुवनीं । आज्ञापूनी तें ऐका ॥२१॥

त्वं वासुदेवो भगवानतीर्णो जगत्पतिः । इति प्रस्तोभितो बालैर्मेन आत्मानमच्युतम् ॥२॥

दूता आज्ञापी कारुष दुष्ट । जाऊनि कृष्णातें सांगें स्पष्ट । बाळकीं खेळवितां तुज यथेष्ट । केली वटवट शब्दांची ॥२२॥
तूंचि वासुदेव श्रीभगवान । जगन्नायक जगज्जीवन । अवतरलासि होवोनि सगुण । धर्मस्थापन करावया ॥२३॥
ऐसिया बाळांच्या क्ष्वेळित गोष्टी । सत्य मानूनि आपुल्या पोटीं । स्वयें अच्युत हे चावटी । वृथा दिक्पटीं मिरविसी ॥२४॥
प्राकृतें अल्पकें पामरें । स्तोभितां गौरविती लेंकुरें । तैं रंजविती राजोपचारें । तें केंवि खरें मानावें ॥२५॥

दूतं च प्राहिणोन्मंदः कृष्णायाव्यक्तवर्त्मने । द्वारकायां यथा बालो नृपो बालकृतोऽबुधः ॥३॥

अबुध केवळ तूं वृष्णिकुळजा । बाळीं खेळांत केलासि राजा । श्रवणीं धरूनि त्याचि गुजा । न धरीं फुंजा विष्णुत्वें ॥२६॥
घरोघरीं लेंकुराप्रति । इंद्रचंद्रत्वें गौरव देती । तैसा अबुधा अबुधीं नृपति । केलासि तो तूं दृढ न मनीं ॥२७॥
इत्यादि वचनें सांगोनि दूता । निरोप धाडिला कृष्णनाथा । ज्या कृष्णाच्या अव्यक्तपथा । नेणोनि पुरता मूर्खत्वें ॥२८॥
कृष्ण त्रिजगाचा गोंसावी । विधि हर अमरेन्द्र नेणती पदवी । अव्यक्तवर्मा ऐसिया नांवीं । ज्या कारणें संबोधिती ॥२९॥
असो सर्पाचें आयुष्य खुंटे । तैं तो लागे पानधीवाटे । मुंगियेसी पक्ष फुटे । कीं बस्त वेंठे वृककदना ॥३०॥
नेणोनियां श्रीकृष्णमहिमा । द्वेषावेश कारुषा अधमा । दूत धाडूनि पुरुषोत्तमा । मरणधर्मा वश्य झाला ॥३१॥
असो तो दूत द्वारकेप्रति । जाऊनि भेटला श्रीपती । कोण्ह्या प्रकारीं केली विनती । कुरुभूपति तें ऐक ॥३२॥

दूतस्तु द्वारकामेत्य सभायामास्थितं प्रभुम् । कृष्णं कमलपत्राक्षं राजसंदेशमब्रवीत् ॥४॥

द्वारकेप्रति जाऊनि दूत । सभास्थानीं श्रीकृष्णनाथ । बैसला असतां द्वास्थीं मात । कथिली यथोक्त दूताची ॥३३॥
मग प्रभूची घेऊनि आज्ञा । द्वास्थीं दूत सभास्थाना । आणिला तेणें वंदूनि चरणां । संदेशकथना आदरिलें ॥३४॥
कमलपत्रायताक्ष हरि । त्यातें दूत निवेदन करी । कारुष्यनृपाची वैखरी । ज्या ज्या परी वदली तें ॥३५॥
दूतें वंदूनि त्रैलोक्यजनका । कारुषसंदेश मम मुखें ऐका । मजवरी दूषण ठेवूं नका । संदेशहारका जाणोनी ॥३६॥
ऐकोनि दूताची विनवणी । सुप्रसन्न चक्रपाणि । शंका सांडूनि कारुषवाणी । आमुच्या कर्णी घालीं म्हणे ॥३७॥
यावरी दूत कारुषाचे । संदेश कथिता झाला वाचे । सावध सदस्य कुरुनृपाचे । जे परिसती तें ऐका ॥३८॥

वासुदेवोऽवतीर्णोऽहमेक एव न चापरः । भूतानामनुकंपार्थं त्वं तु मिथ्याऽभिधां त्यज ॥५॥

मी एक वासुदेव साचार । भूतकृपस्तवे अवतार । धरूनि झालोंसें साकार । कैंचा अपर मजहूनी ॥३९॥
मजहूनि वासुदेव त्रिजगीं दुसरा । नाहींच ऐसिया दृढ निर्धारा । जाणोनि मम नाम त्यजीं त्वरा । मिथ्या अहंकारा न धरूनी ॥४०॥
मिथ्या मम नाम वागविसी । कीं वांचावयाची आस धरिसी । दोहीं परी ममाज्ञेसी । सावध परियेसीं सात्वता ॥४१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP