अध्याय ६६ वा - आरंभ
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीकृष्णगोविन्दात्मने नमः ।
जें कां स्वगत भेदभान । प्रत्यगात्मत्वा अधिष्ठान । सर्वसाक्षित्वाचें वयुन । स्फुरे ज्याचेनि सन्मात्रें ॥१॥
त्या तुज नमो जी सन्मया । गोप्रवर्तका गोमयनिलया । श्रीगोविंदा गोगोप्तया । गोदोहका गोपाळा ॥२॥
तव पदपंकजध्यानयोगें । पांसष्टी अध्याय कथिले मागें । रविजा कर्षिली रेवतीरंगें । लीलाप्रसंगें गोपींच्या ॥३॥
तिये कथेचिया श्रवणीं । परीक्षिति अंतःकरणीं । प्रश्न विवरितां बादरायणि । जाणोनि कथनीं प्रवर्तला ॥४॥
म्हणाल कैसा कोण तो प्रश्न । करूं इच्छी नृपाचें मन । तरी व्रजीं क्रीडला संकर्षण । तंववरी श्रीकृष्ण काय करी ॥५॥
व्रजा गेलिया रेवतीकान्ता । द्वारकेमाजी श्रीकृष्ण असतां । तेथ वर्तली कैसी कथा । ते नृपनाथा प्रश्नेच्छा ॥६॥
हें जाणोनि शुक सर्वज्ञ । नृपें करावा आहेच प्रश्न । तया पूर्वींच तत्कथाकथन । करितां झाला तें ऐका ॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : May 11, 2017
TOP