अध्याय ६६ वा - श्लोक १६ ते २०

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


शूलैर्गदाभिः परिघैः शक्त्यृष्टिप्रासतोमरैः । असिभिः पट्टिशैर्बाणैः प्राहरन्नरयो हरिम् ॥१६॥

एके रथीं पंकजपाणि । काशीपति पौण्ड्रक दोन्ही । सेना पंच अक्षौहिणी । हरीतें वेष्टूनि अरि भिडती ॥३॥
एक हृदयीं खोंचिती शूळ । गदाघातें भेदिती मौळ । परिघप्रहारें वक्षःस्थळ । परिघकुशळ हाणूं पाहती ॥४॥
एक शक्ति हाणिती निकरें । एक ऋष्टिनामकें शस्त्र । एक भेदिती प्रासप्रहारें । एक तोमरें मेळविती ॥१०५॥
एक ते खड्गखेटकपाणी । कृष्णा पाचारिती रणीं । एक धनुर्धर विंधिती बाणीं । समराङ्गणीं अरिवर्ग ॥६॥
एक ते पठ्ठे बिरुदाइत । पादचारी प्रतापवंत । अश्वसारथियांचा घात । अकस्मात करूं पाहती ॥७॥
जे काम महारथी अतिरथी । बिरुदें बडिवारें मिरविती । अस्त्रें शस्त्रें ते प्रेरिती । मंत्रशक्ति प्रकटूनी ॥८॥
मेघ वर्षती प्रबळधारीं । तेणें झांकोळे जेंवि गिरि । तेंवि वीरांच्या शस्त्रमारीं । न दिसे हरिरथकेतु ॥९॥
चहूंकडूनि शस्त्रास्त्रमार । होतां देखोनि शार्ङ्गधर । शिञ्जिनी वाहूनि सत्वर । टणत्कारिलें कोदण्ड ॥११०॥
बाणीं भंगूनि शस्त्रास्त्रघना । पौण्ड्रककाशीराजाच्या सेना । मर्दिता झाला तें कुरुरत्ना । सदस्यगणासह परिसें ॥११॥

कृष्णस्तु तत्प्रौंड्रककाशिराजयोर्बलं गजस्यंदनवाजिपत्तिमत् ।
गदासिचक्रेषुभिरार्द्रयद्भृशं यथा युगांते हुतभुक्पृथक्प्रजाः ॥१७॥

दिव्यायुधें प्ररूनि हरि । उभय सेना मारिल्या समरीं । जैसा प्रजांतें पृथगाकारीं । पावक संहरी प्रळयान्तीं ॥१२॥
धनुर्विद्याप्रवीण योद्धे । मार्गणीं संहारिले क्षणार्धें । भंवते प्रेरितीं शस्त्रें विविधें । चक्रायुधें ते वधिलें ॥१३॥
गज भंगिलें गदाप्रहारीं । अश्वसादी नंदकधारीं । रथी मारिले तीक्ष्णशरीं । केलें चक्रचुरीं पदाति ॥१४॥
शार्ङ्गनिर्मुक्तबाणवृष्टि । होतां सकंप हर परमेष्ठी । म्हणती प्रळय पावली सृष्टि । कूर्में पृष्ठी कांपविली ॥१५॥
थरारिला ब्रह्माण्डगोळ । अमर मानिती प्रळयकाळ । संहाररुद्राचा नेत्रानळ । गमे प्रज्वळला जनदहना ॥१६॥
ऐसिये शरवृष्टीतळवटीं । उभय कटकां केली आटी । तया रणरंगाची गोठी । शुक वाक्पुटीं वाखाणी ॥१७॥

आयोधनं तद्रथवाजिकुंजरद्विपत्खरोष्ट्रैररिणाऽवखंडितैः ।
बभौ चितं मोदवहं मनस्विनामाक्रीडनं भूतपतेरिवोल्बणम् ॥१८॥

वीरश्रीरंग बाणला आंगीं । तेणें रणरंगीं शार्ङ्गी । चतुरंगिणी भंगूनि वेगीं । केले भूभागीं प्रतनिचय ॥१८॥
संग्रामभूमीचें मंडळ । आयोधन नामें बोलती कुशळ । तें तें काळीं प्रेतबहळ । जालें गोपाळकरचक्रें ॥१९॥
चक्रप्रहारें चतुरंगिणी । गजरथखरोष्ट्र विखंडूनी । पदिले तत्प्रेतीं ते धरणी । व्याप्त होऊनि विराजली ॥१२०॥
क्रमेळ पदाति अश्वसादी । चक्रें खंडित अवयवसंधी । पडिले त्यांचीं मांसें गीधीं । खंडिजेताती उत्साहें ॥२१॥
मनस्वी जे वीरश्रीवंत । ते ते स्थानीं आनन्दभरित । शस्त्रास्त्र यानें हय रथ गज । परमपुरुषार्थ वरिताती ॥२२॥
सायुज्यमुक्तीसहित चारी । जेहीं नोवर्‍या वरिल्या समरीं । ते ते कृष्णचक्राच्या प्रहारीं । उत्साहगजरीं विराजती ॥२३॥
येर पामरें पडिलीं क्षिती । आईबाधनकामिनींतें स्मरती । प्रपंचयोगें आक्रंदती । तोंडीं माती पडिल्याही ॥२४॥
अवयव जाले खंडविखंड । तथापि वांचवावया पिण्ड । करिती केवीलवाणें तोण्ड । ग्लानि उदण्ड भाकूनि ॥१२५॥
म्हणती नेणती बाईल घरीं । टाकूनि कोठें पातलों समरीं । येथें पडलिया चक्रप्रहारीं । प्रियतम अंतुरी अन्तरली ॥२६॥
एक म्हणती लेंकुरें तान्हीं । भोळी बापुडी कामिनी । अक्षम त्यांचे संगोपनीं । जाली विघडणी मज त्यांची ॥२७॥
एक म्हणती ठेविलें धन । त्याचें कोणा न केलें कथन । माझे समरीं गेलिया प्राण । सांगेल कोण स्त्रीपुत्रां ॥२८॥
एक स्मरती रिणायितां । पाशीं गुंतूनि राहिल्या अर्था । आठवूनि हृदयांमाजी खतां । प्राण तत्त्वता विसर्जिती ॥२९॥
एक म्हणती वृत्तीसाठीं । व्यवहारीं शत्रूंचीं मुखवटीं । स्तंभिलीं ते मज मेलिया पाठीं । जेवितीं ताटीं दूधभात ॥१३०॥
पुरुषार्थसाधक रणप्रवीण । वीरश्रीवल्लभ मनस्विमान्य । उभयलोकीं धन्य धन्य । जितां मरतां म्हणविती जे ॥३१॥
नरदेह केवळ हे रणमही । चक्रायुधाच्या चिन्तनघाईं । पडिल्या कैवल्य जोडिलें तिहीं । प्रपंचप्रवाहीं भवभणगें ॥३२॥
असो ऐसें तें आयोधन । जें कां समरमहीचें स्थान । भूतपतीचें क्रीडासदन । तेंवि उल्बण विराजलें ॥३३॥
कोण म्हणाल भूतपति । भूतग्रासक जो कल्पान्तीं । प्रलयरुद्र ज्यातें म्हणती । श्मशानक्षितीमाजि वसता ॥३४॥
भूतग्रासें आनन्दपूर्ण । त्याचें जैसें क्रीडाभुवन । तयासारिखें समरस्थान । शोभायमान विराजलें ॥१३५॥
असो उभय सेनेची कथा । पुढें पौण्ड्रका कृष्णनाथा । समरीं भाषण झालें मिथा । तें कुरुनाथा अवधारीं ॥३६॥

अथाऽऽह पौण्ड्रकं शौरिर्भो भो पौंड्रक यद्भवान् । दूतवाक्येन मामाह तान्यस्त्राण्युत्सृजामि ते ॥१९॥

सैन्य मारूनियां समस्त । सम्मुख पौण्ड्रकाचा रथ । एक्या रथेंसी कृष्णनाथ । देखूनि वदत तयाप्रति ॥३७॥
उभय सेना भंगलियावरी । भो भो पौण्ड्रका म्हणे हरि । दूत धाडूनि द्वारकापुरीं । मज ज्या उत्तरीं वदलासी ॥३८॥
तियें हीं ममायुधें तुजप्रति । मी निक्षेपितों समरक्षिती । त्यांच्या लाभें निजविश्रान्ती । भोगीं पुरती भवनाशें ॥३९॥

त्याजयिष्येऽभिधानं मे यत्त्वयाज्ञ मृषा धृतम् । व्रजामि शरणं ते‍ऽद्य यदि नेच्छामि संयुगम् ॥२०॥

आणि माझें नाम त्वां वृथा धरिलें । तें मी टाकवीन ऐसें कथिलें । तेंचि येथूनि सत्य झालें । जें दुसरें खंडलें अभिधान ॥१४०॥
जरी तुज न देववे मजसीं रण । तरी मज सत्वर येईं शरण । ऐसें ऐकोनि तुझें वचन । आलों तीक्ष्ण वेगेंसी ॥४१॥
तुजसीं समर न करवे मातें । तरी आजि शरण येईन तूतें । ऐसें बोलोनि रुक्मिणीकान्तें । शर शार्ङ्गातें सज्जिला ॥४२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 11, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP