रुक्मिणैवमधिक्षिप्तो राजभिष्चोपहासितः । क्रुद्धः परिघमुद्यम्य जघ्ने तं नृम्णसंसदि ॥३६॥

विदर्भें ऐसा संकर्षण । गोरक्षदोषें हिणावून । गोरक्षचर्या परम न्यून । आंगीं लावून निखंदिला ॥२४॥
आणि उपहासें सभास्थानीं । कालिङ्गादि भूपाळगणीं । हेलना करितां संकर्षणीं । काळकोपाग्नी प्रज्वळला ॥३२५॥
जैं सृष्टीचा प्रळयकाळ । तैं रुद्राचा नेत्रनळ । प्रकटूनि जाळी ब्रह्माण्डगोळ । त्याहून प्रबळ बळराम ॥२६॥
नेत्र आरक्त खदिराङ्गार । ऊर्ध्व दशनीं रगडूनि अधर । परिघ पडताळूनि सत्वर । केला प्रहार रुक्मीतें ॥२७॥
आम्हां गोरक्षकांची क्रीडा । पणेंसहित घेईं मूढा । म्हणोनि परिघप्रहार गाढा । माथां रोकडा ओपियला ॥२८॥
सभास्थानीं परिघघातीं । विदर्भभूप पाडिला क्षिती । मुखामध्यें भरली माती । भडके वाहती रुधिराचे ॥२९॥
हाहाकार सभास्थानीं । कालिङ्गप्रमुखां झाली पळणी । एकीं धरिलीं तृणें दशनीं । कितिएक धरणी प्रेतवत् ॥३३०॥
राया कुरुकुळगगनचंद्रा । आवेश न धरे बळसमुद्रा । ऐकें तयाची प्रतापमुद्रा । प्रळयरुद्रापडिपाडें ॥३१॥

कलिंगराजं तरसा गृहीत्वा दशमे पदे । दंतानपातयत्क्रुद्धो योऽहसद्विवृतैर्द्विजैः ॥३७॥

मंगळसभामध्यवर्ती । रुक्मी झोडूनि पाडिला क्षिती । अपर राजे प्रतापमूर्ती । पळती दिगंतीं प्राणभयें ॥३२॥
पदविन्यास क्रमिले नव । दशमे पदीं कालिङ्गराव । धरूनि हृदयीं दिधला पाव । मग केला अभाव दशनांचा ॥३३॥
सभास्थानीं हेलनायुक्त । कालिङ्ग हांसिला विचकूनि दांत । ते बळरामें हाणौनि लाथ । पाडिले समस्त चौकीचे ॥३४॥
लत्ताप्रहारें पाडिले दशन । रुधिर प्रवाहे मुखामधून । कालिङ्ग तळमळी जैसा मीन । पावतां पतन उष्ण पुलिनीं ॥३३५॥
राजे जे जे नामाविलें । शस्त्रास्त्रेंसीं सज्ज झाले । परिघें बळरामें ठोकिले । तें तूं वहिलें अवधारीं ॥३६॥

अन्ये निर्भिन्नबाहूरुशिरसो रुधिरोक्षिताः । राजानो दुद्रुवुर्भीता बलेन परिधार्दिताः ॥३८॥

कालिङ्गाचे पाडिले दांत । कितिएकांचे मोडिले हात । लागतां कठोर परिघघात । बाहु चूर्णित अस्थीसीं ॥३७॥
मोडल्या एकांच्या मांडिया । गुडघे घोंटी पोटरिया । कटी एकांच्या भंगलिया । कुक्षि वक्षें कंठ शिरें ॥३८॥
उभ्या रक्तें नाहले वीर । शस्त्रास्त्रांचे पडिले विसर । एक पळाले सत्वर । पलायन शूरधीरांचें ॥३९॥
बळभद्राच्या परिघमार । कोणी सांवरूं न शके वीर । एक म्हणती आम्ही किंकर । न कीजे निकर क्रीडेचा ॥३४०॥
सेवकीं राजे परिघक्षतीं । वळखूनि घातले रथीं । आपुलाल्या नगरा नेती । जाली समाप्ति सोहळिया ॥४१॥
रुक्मिणीचिया स्वयंवरीं । बळराम कळला असतां समरीं । पुढती द्यूतसभागारीं । कां पां नृपवरीं तो छळिला ॥४२॥
केलें तैसें पावलें फळ । रुक्मि वधिला विदर्भपाळ । आपुलाल्या नगरा सकळ । गेले भूपाळ भग्नाङ्गीं ॥४३॥
एकीं ओढूनि बांधिलें शिर । एकीं गळां घातले कर । यष्टिकापीठीं देऊनि भार । एकां संचार पदभग्नां ॥४४॥
लोकविद्विष्ट सौहार्द केलें । त्याचें तैसेंचि फळही घडलें । तस्माच्छास्त्रें निषेधिलें । तें आचरिलें न पाहिजे ॥३४५॥
रुक्मि मेला विदर्भपति । वनिता पुत्र प्रधान रुदती । यानें सज्जूनि वातगति । द्वारके निघती बाळकृष्ण ॥४६॥
सोहळ्यामाजी झालें विघ्न । मृत्युपंचकीं होतें लग्न । एक म्हणती कुलाचरण । दैवविधान विसरले ॥४७॥
एक म्हणती होणार न टळे । लाभ विजय जैसा सुवेळे । हानि मृत्यु काळवेळे । आपुल्या फळे फळदानीं ॥४८॥
द्यूतक्रीडेचें करूनि मिष । दैवें केला बुद्धिभ्रंश । निमित्त देऊनि बळरामास । काळें भूपास ग्रासिलें ॥५९॥
तिये समयीं जनार्दन । कोण्हा कांहीं न वदे । धरूनि ठेला महामौन । काय म्हणून तें ऐका ॥३५०॥

निहते रुक्मिणी श्याले नाब्रवीत्साध्वसाधु वा । रुक्मिणीबलयो राजन्स्नेहभंगभयाद्धरिः ॥३९॥

सखा मेहुणा रुक्मि मेला । असतां कृष्ण न बोले बोला । हृदयीं पूर्ण विचार केला । म्हणोनि राहिला मौनस्थ ॥५१॥
मागें सरों जातां आड । पुढें होतां विहीर अवघड । दोहीं प्रकारें सांकड । न मोडे भीड दोघांचीही ॥५२॥
मेहुण्यासाठीं मानितां विषम । बळरामाचें भंगेल प्रेम । रुक्मि निंदक म्हणतां अधम । भीमकी विराम पावेल ॥५३॥
भीमकीबळरामाचें मन । दुखवेल म्हणोनि धरिलें मौन । तैसाचिं न वदे पैं प्रद्युम्न । वनिताजननीरामभिडे ॥५४॥
दोहींकडे भंगेल स्नेहे । यालागीं कांहीं बोलतां न ये । यानें सज्जूनियां लवलाहें । द्वारावतिये चालिले ॥३५५॥
रति रेवती रुक्मवती । रुक्मिणी सहित बैसल्या रथीं । नवी नोवरी रोचना सती । बैसे स्वपतिसह यानीं ॥५६॥
दिव्य रहंवर रत्नखचित । लोलपताकाकलशयुक्त । अनिरुद्ध आरूढे रोचनेसहित । वोहर मिरवत यदुभारीं ॥५७॥
उद्धव अक्रूर चारुदेष्ण । साम्बप्रमुख कृष्णनंदन । द्वारके चालिले तें व्याख्यान । ऐकें संपूर्ण कुरुवर्या ॥५८॥

ततोऽनिरुद्धं सह सूर्यया वरं रथं समारोप्य ययुः कुशस्थलीम् ।
रामादयो भोजकटाद्दशार्हाः सिद्धाखिलार्था मधुसूदनाश्रयाः ॥४०॥

नवी नोवरी रोचना सती । अनिरुद्धेंसीं दिव्य रथीं । वाहूनि कुशस्थाळी प्रति । तदनंतरें चालिले ॥५९॥
रामप्रमुख यादवभार । वृष्णि अंधक दाशार्ह कुकुर । भोजकटपुरीहूनि सत्वर । सहपरिवार निघाले ॥३६०॥
धराभार उतरावया । जे अवतरले अमरकार्या । धर्म स्थापूनि दुरात्मया । वधावया उद्युक्त ॥६१॥
ते येथ साधले सकळार्थ । सिद्धी गेलें विवाहकृत्य । रुक्मिप्रमुख राजे दृप्त । खेळतां द्यूत निर्दाळिले ॥६२॥
दुर्मदांचे गळाले मद । राजे पळाले होवोनि विमद । कृष्णाश्रयें यादववृंद । करिती आनंद विजयाचा ॥६३॥
मधुदैत्याचें सूदन - । कर्ता म्हणोनि मधुसूदन । त्याच्या आश्रयें सुपर्वाण । ते येथ यदुगण हरि पाळी ॥६४॥
ऐसे यादव आह्लादभरित । वधूवरेंसीं विराजित । रामकृष्णप्रमुख समस्त । क्रमिती पंथ द्वारकेचा ॥३६५॥
ठोकिल्या प्रस्थानकुञ्जरभेरी । वीर बळघले असिवारीं । गज रथ तुरंग पायभारीं । सेना साजिरी शोभतसे ॥६६॥
अग्रभागीं प्रद्युम्न वीर । पार्ष्णिरक्षकें उद्धवाक्रूर । साम्ब जाम्बवतीचा कुमर । दक्षिणपार्श्वीं प्रतापी ॥६७॥
वामभागीं चारुदेष्ण - । प्रमुख रुक्मिणीचे नंदन । मध्यभागीं रामकृष्ण । सेना सज्जून चालिले ॥६८॥
रेवतीरुक्मिणीप्रमुखा नारी । रति रुक्मवती सह रहवरीं । अनिरुद्ध रोचना नव नोवरी । रथीं साजिरीं विराजती ॥६९॥
यूथ पताका पृथक् पृथक् । गरुडध्वज आणि तालाङ्क । रथनेमींचा गर्जे घोष । गजर विशेष वाद्यांचा ॥३७०॥
लंघूनि प्रणता तापीतट । भृगुक्षेत्रीं नर्मदाघाट । उतरूनि गुर्जरदेशानिकट । आले सुभट जयगजरें ॥७१॥
दर्शना येती माण्डलिक । सामंत महीपति अनेक । अर्पूनि उपायनें सम्यक । नीच सेवक म्हणविती ॥७२॥
वार्तिक धाडिले आहुकराया । सेना पातली आनर्तविषयां । रेवताचळीं राहूनियां । रात्र क्रमिली ते ठायीं ॥७३॥
पुढें पातलें द्वारकापुरा । आला श्वफल्क सामोरा । वसुदेवाच्या समस्त कुमरा । यादवभारासमवेत ॥७४॥
परस्परें झाल्या भेटी । नगरीं प्रवेशतां जगजेठी । बळि सांडूनि उठाउठी । कनकमुष्टि वांटिलिया ॥३७५॥
रोचना अनिरुद्ध वधूवरें । नृपा भेटी नेलीं गजरें । उग्रसेनें स्पर्शोनि करें । कनकाम्बरें गौरविलीं ॥७६॥
रामकृष्णीं वंदिला राजा । वसुदेव पिता देवक आजा । अपरां ज्येष्ठां वृष्णिभोजां । नम्र मस्तकीं जोहारिलें ॥७७॥
सवेग नृपाची घेऊनि आज्ञा । मग प्रवेशले आत्मभुवना । यानें सेवकीं नेलीं स्थानां । कवचां वसनां विसर्जिलें ॥७८॥
लक्ष्मीपूजन गृहप्रवेश । विप्र करिती मंत्रघोष । अन्नीं वसनीं समस्तांस । केला संतोष यदुवर्यें ॥७९॥
सर्वत्र विस्तारली मात । रामहस्तें विदर्भघात । रोचना वरूनि विजयवंत । वोहरें सहित हरि आला ॥३८०॥
पादाक्रान्त भूभुजगण । यादवांसीं समराङ्गण । करावया आंगवण । भूतळीं आन वीर नसे ॥८१॥
मागध पराभविला समरीं । काळयवन जाळिला विवरीं । द्यूतक्रीडेच्या अवसरीं । विदर्भ रामें निर्दाळिला ॥८२॥
सामान्यांची कायसी कथा । ब्रह्माण्डविभव द्वारकानाथा । शत्रु उधवूं न शकती माथा । कीर्ति दिगन्तामाजिवडी ॥८३॥
विभवमंडितद्वारकापुरीं । यदुकुळेंसीं नांदतां हरि । अमरावती न पवे सरी । सह निर्जरीं शक्रेंसीं ॥८४॥
इतुकें परीक्षितीचिये श्रवणीं । कृष्णचरित्र बादरायणि । निरूपितां तो अंतःकरणीं । प्रश्नालागूनि उद्युक्त ॥३८५॥
रोचनेचें पाणिग्रहण । केलें असतां स्मरनंदन । उषा पर्णी काय म्हणोन । तें कारण पुसों पाहे ॥८६॥
पुढिले अध्यायीं ते कथा । राजा पुसेल अरणीसुता । तेथ सावध होवोनि श्रोतां । निजपरमार्था साधावें ॥८७॥
श्रीमद्भागवत निर्वाणसत्र । व्यासें उभविलें हें स्वतंत्र । श्रोतीं होइजे कैवल्यपात्र । श्रवणमात्र करूनियां ॥८८॥
अठरा सहस्र गणित याचें । हृदयंगम परमहंसाचें । संवादसुख मुनिनृपांचें । यश कृष्णाचें अवहंतें ॥८९॥
त्यांतील दशम स्कंध हा जाणा । वरिली अनिरुद्धें रोचना । द्वेष्टा रुक्मि मुकला प्राणा । अध्यायगणना एकषष्टि ॥३९०॥
श्रीमन्निर्गुण प्रतिष्ठानीं । चिन्मयसाम्राज्यैश्वर्यसदनीं । एकनाथ कैवल्यदानी । भद्रासनीं भ्रमहंता ॥९१॥
चिदानंदाचें शासन । तेणें स्वानंदभरित जन । गोविंदकृपेचा अंमृतघन । दयार्णव भरून जग निववी ॥९२॥
येथील मुख्य हेंचि रहस्य । श्रवणीं न करावें वैरस्य । इतुकेनि सिद्धि करिती दास्य । स्वसामरस्य चित्स्वरूपीं ॥९३॥
इति श्रीमद्भागवते महापुराणेऽष्टादशसाहस्र्यां पारमहंस्यां संहितायां दशमस्कंधे श्रीशुकपरीक्षित्संवादे हरिवरदाटीकायां दयार्नवानुचरविरचितायां श्रीकृष्णसंततिपुत्रपौत्रादिविवाहकथनं नामैकषष्टितमोऽध्यायः ।
श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ श्लोक ॥४१॥ ओवी - संख्या ॥३९३॥ एवं संख्या ॥४३४॥ ( एकसष्टावा अध्या मिळून ओवी संख्या २९२४७ )

अध्याय एकसष्टावा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP