श्रीकृष्णपरमात्मने नमः ।
जयजय जगन्निलयजठरा । जयजय जगद्गोमयमाठरा । समष्टिव्यष्टिगतजाठरा । जगदाधारा गोविंदा ॥१॥
श्रीपदकंज प्रफुल्लार । आमोदपानें मनोमधुर । गुंजारवतां निरंतर । अन्य संचार विसरला ॥२॥
तेथील आमोदप्रबोधपानें । सांडवलिया विवर्तभानें । पदपंकजें गुंततां गानें । सुमनकाननें डोलवी ॥३॥
भ्रमर म्हणिजे भ्रमणशील । पदाब्जपरागीं तो निश्चळ । जेथींचा प्रबोधामोद बहळ । भवभ्रम केवळ परिहर्ता ॥४॥
सुमनस लोधले शतमखसुमनीं । मत्त होऊन सुकृतपानीं । रुंजी करिती स्वर्गकाननीं । न चुके भ्रमणीं अध ऊर्ध्व ॥५॥
तैसा नोहे श्रीपादमोद । सेवितां होय भ्रमापवाद । भोगिती अक्षय परमानंद । प्रपन्नवृंद पदलाभें ॥६॥
तया पदाब्जपरागपानें । सुमनकाननीं गुंजतां गानें । दशमस्कंधाच्या व्याख्यानें । निवती श्रवणें मुनिवृंद ॥७॥
तेथ षष्टितमाध्यायीं कथा । प्रेमसंरंभें श्रीकृष्णनाथा । क्षोभवूनि रुक्मिणीचित्ता । वचनामृता परिसावया ॥८॥
तंव ते रुक्मिणी चातुर्यखाणी । कृष्णीं विलसे अनन्यपणीं । तयेच्या उक्ति परिसूनि श्रवणीं । निवाला मनीं जगदात्मा ॥९॥
पूर्वीं एकोनषष्टाध्यायीं । सत्यभामेची चतुरायी । ऐकूनि वाटलें कृष्णहृदयीं । रुर्क्मिणी कांहीं वदवावी ॥१०॥
यास्तव रुक्मिणीकलहवार्ता । ऐकूनि निवाला कमलाभर्ता । इतुकी नृपासी सांगूनि कथा । बोले वक्ता शुकयोगी ॥११॥
एकषष्टाव्यामाजी राया । पट्टमहिषी अष्ट जाया । सशत षोडश सहस्र भार्या । सम यदुवर्य प्रियतम ज्या ॥१२॥
तया सर्वां ठायीं हरि । समान वर्ते कवणे परी । संततिसंपत्तिऐश्वर्यगजरीं । तें अवधारीं कुरुवर्या ॥१३॥
वृत्तिरूप ज्या कामिनी । समान न थरती चंचलपणीं । आत्मा अच्युत चिन्मात्र तरणि । निश्चळपणीं समसाम्य ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP