तस्मिन्नभ्युदये राजन्रुक्मिणी रामकेशवौ । पुरं भोजकटं जग्मुः सांबप्रद्युम्नकादयः ॥२६॥

लोकविरुद्धाचरण करितां । वरपडें होइजे विघ्नावर्ता । हें राहटीमाजी मन्मथजनिता । दावी तत्त्वता वर्तूनी ॥४९॥
रुक्मरथादि बन्धुगण । द्वारकाभुवना पाठवून । स्वपौत्रीचें कन्यादान । दौहित्रातें नेमिलें ॥२५०॥
तया विवाहोत्सवाच्या ठायीं । रामकेशव स्वसमुदायीं । सन्नद्ध बद्ध होवोनि पाहीं । जाते झाले भोजकटा ॥५१॥
रति रुक्मवती वरमाता । रेवती रुक्मिणी तयांसहिता । शिबिकायानीं उत्साहभरिता । जाती तत्वता लग्नासी ॥५२॥
जाम्बवतीचे साम्बप्रमुख । प्रद्युम्नादि रुक्मिणीतोक । सात्यकिउद्धवाक्रूरादिक । सेनानायक दळभारीं ॥५३॥
प्रविष्ट झाले भोजकटीं । सम्मुख रुक्मि पातला भेटी । विसरूनि मागल्या द्वेषगोष्टी । स्नेहसंतुष्टी आळिंगी ॥५४॥
करूनि सीमान्तपूजन । जानवशाचें दाविलें स्थान । शिबिरें देवोनि जनार्दन । तेथ ससैन्य उतरला ॥२५५॥
देवकप्रतिष्ठा दोहींकडे । सर्वत्रांसी वांटिले विडे । मंत्रघोष करिती तोंडें । विप्र वर्‍हाडें आले ते ॥५६॥
यादवीं वधूसी अर्पिलें फळ । विदर्भें वरासि धाडिलें मूळ । वाद्यें वाजती सुमंगळ । भेरी मांदळ पणवादि ॥५७॥
करूनि वराचें पूजन । वसनाभरणें समर्पून । समस्तांसी ताम्बूलदान । स्रक्चंदन परस्परें ॥५८॥
नोवरा वाहूनि अश्वावरी । विवाहमंडपा चालिले गजरीं । नृत्यगीतादि वाजंतरीं । घोष अंबरीं न समाये ॥५९॥
नाना कौतुकें दाविती पंथीं । कृत्रिम गजाश्व नर्तविती । अग्नियंत्रें विविधाकृति । प्रकट करिती कौशल्यें ॥२६०॥
कौतुकदर्शकां देऊनि त्याग । पुढें चालिले बळ श्रीरंग । तंव गायक नर्तकी नर्तक साङ्ग । भरिती रंग पदोपदीं ॥६१॥
एवं मंडपीं प्रवेशले । मदनें लक्ष्मीपूजन केलें । अनिरुद्धातें समर्चिलें । विदर्भभूपें मधुपर्कें ॥६२॥
उपाध्ये म्हणती सावधान । मध्यें अंतःपट धरून । वधूवरें उभीं केलीं पूर्ण । मंगलपठनें द्विज करिती ॥६३॥
लक्ष्मीनारायण चिंतिजे । कुलस्वामीचे चिन्तन कीजे । अतिसमय वर्ततां ओजें । सावध राहें हे सूचना ॥६४॥
दोहींकडे करवल्या नारी । अक्षता टाकिती ओहरावरी । जीवनें घटिका भरतां पुरी । तेचि अवसरीं ओंपुण्य ॥२६५॥
वधूवरें परस्परें माथां । अक्षता घालिती ओंपुण्याय होतां । मग बैसवूनियां तत्वतां । कंकण बांधिती द्विजवर्य ॥६६॥
कडिये घेवोनियां नोवरी । नोवरा नेवोनि बोहल्यावरी । अग्निप्रतिष्ठा करूनि विप्रीं । होम सारिला विध्युक्त ॥६७॥
करिती अक्षवणें सुवासिनी । वोहरांवरूनि ओंवाळणी । ओंवाळिती वर्‍हाडिणी । मंगळध्वनि वाद्यांचा ॥६८॥
ब्राह्मणांचें वेदपठन । बिरुदें पढती बंदिजन । परिमळद्रव्यें स्रक्चंदन । ताम्बूल तिलक सर्वांसी ॥६९॥
कनकरत्नें भूरि दक्षिणा । वांटिली सर्वत्र ब्राह्मणां । त्यागदानें बंदिजनां । विद्योपजीवियां तोषविलें ॥२७०॥
मग बैसोनि एक पंक्ति । भोजनें सारिलीं सुहृदीं आप्तीं । एवं सोहळा षोडश राती । केला निगुतीं वैदर्भें ॥७१॥
पृथक्पृथक् विधिविधानें । नित्य नूतन वस्त्राभरणें । वोहरावरमातांकारणें । संतुष्टमनें समर्पिलीं ॥७२॥
साडे ऐरणीपूजन । वंशपात्र करूनि दान । सवें नोवरिये घेऊन । आले यदुगन स्वशिबिरा ॥७३॥
आणिली स्वमंडपा वरात । लक्ष्मीपूजन इत्थंभूत । करूनि यादवीं वैदर्भनाथ । अहेरीं यथोचित गौरविला ॥७४॥
परस्परें लेणीं लुगडीं । अहेरीं तोषविले वर्‍हाडी । अमृतासमान लोटली घडी । सप्रेम गोडी वाढविली ॥२७५॥
लोकविरुद्धधर्माचरण । तें केलिया बाधी विघ्न । कैसें म्हणसी तें व्याख्यान । ऐकें येथून सांगतसें ॥७६॥

तस्मिन्निवृत्त उद्वाहे कालिंगप्रमुखा नृपाः । दृप्तास्ते रुक्मिणं प्रोचुर्बलमक्षैर्विनिर्जय ।
अनक्षज्ञो ह्ययं राजन्नपि तद्व्यसनं महत् ॥२७॥

विवाहसमारंभ संपला । उभयपक्षीं आनंद झाला । अकस्मात तो विघ्नघाला । उदया आला दुर्दैवें ॥७७॥
कालिङ्गप्रमुख दृप्त नृपति । विदर्भाचे पक्षपाती । केवळ दृष्टात्मे दुर्मति । ते रुक्मी बोधिती दुर्मंत्रें ॥७८॥
प्रभाते यादव सुमुहूर्तीं । नोवरी घेऊनि द्वारके जाती । यालागीं कांहीं विदर्भनृपति । रहस्ययुक्ति अवधारीं ॥७९॥
द्यूतकर्मीं अप्रवीण । द्यूतक्रीडेचें वाहे व्यसन । वृथाभिमानी संकर्षण । अनक्षज्ञ जिंकावा ॥२८०॥
तो हा बळभद्र विदर्भराया । प्रसंगें आला विवाहकार्या । द्यूतीं प्रतिज्ञा करूनियां । जिंकावया प्रवर्तिजे ॥८१॥
कौतुकें मांडूनि द्यूत खेळ । आम्ही प्रेक्षक बैसूं सकळ । अक्षविद्येनें जिंकूनि बळ । मागील सळ उमचावें ॥८२॥
द्यूतक्रीडेचा अभ्यास । नाहीं बलरामा निःशेष । अतज्ज्ञ असोनि तो हव्यास । अंगीं बहुवस वाहतसे ॥८३॥
ऐसा रुक्मी कालिङ्गप्रमुखीं । बोधितां ऐकूनि भरला तंवकीं । दुर्बुद्धि देऊनि काळमुखीं । होमिती ऐसें उमजेना ॥८४॥
कामुका पराङ्गनेची रति । दुर्मित्र जैसे योजोनि देती । परी शूळारोपण नरकावप्ति । हे विपत्ति त्या नुमजे ॥२८५॥
तैसाच कालिङ्गप्रमुखीं राया । रुक्मी दुर्मंत्र बोधूनियां । प्रवर्तविला द्यूतकार्या । तत्कृतचर्या अवधारीं ॥८६॥

इत्युक्त्वा बलमाहूय तेनाक्षै रुक्म्यदीव्यत । शतं सहस्रमयुतं रामस्तत्राऽऽददे पणम् ॥२८॥

राजे घेऊनि स्वपक्षपाती । रामकृष्णांतें प्रार्थूनि निगुते । द्यूतक्रीडेचिये आर्ती । क्षणैक समस्तीं बैसावें ॥८७॥
उद्धवप्रमुख बैसिजे तुम्हीं । बळरामेंसीं खेळूं आम्ही । क्षत्रिय द्यूतीं कां संग्रामीं । विमुख न होती आमंत्रितां ॥८८॥
ऐसें ऐकूनियां वचन । उत्साहभरित संकर्षण । प्रतिज्ञापूर्वक करूनि पण । म्हणे आपण सिद्ध असों ॥८९॥
उद्धव अक्रूर वदती बोला । म्हणती चिरकाळ जागर झाला । अंगीं उजगरा असे भरला । आजि या खेळा नादरिजे ॥२९०॥
प्रभाते जाणें द्वारकापुरा । आतां क्षणैक विश्रान्ति करा । घूर्मी दाटली असे नेत्रां । जडता गात्रा जाकळिते ॥९१॥
हें ऐकोनि रुक्मि म्हणे । तुम्हीं अवश्य निद्रा करणें । आम्हांसमवेत संकर्षणें । द्यूत खेळणें आवश्यक ॥९२॥
भविष्य जाणोनियां हरि । सहसा कोणातें न निवारी । आपण स्वमुखें निद्रा करी । क्रीडा एरीं अदरिली ॥९३॥
कालिङ्ग प्रमुख राजे सकळी । येऊनि बैसले सभामंडळीं । राम रुक्मी क्रीडाशाळी । द्यूतखेळीं प्रवर्तले ॥९४॥
रामें मांडिला शतनिष्कपण । विदर्भें नेला तो जिंकोन । पुढतीं सहस्र निष्क सुवर्ण । राम घेऊन क्रीडतसे ॥२९५॥
तोही रुक्मि जिंकूनि नेतां । अयुत निष्क झाला धरिता । तोही डाव रुक्मी हरितां । रेवतीकान्ता नृप हंसती ॥९६॥

तं तु रुक्म्यजयत्तत्र कालिंगः प्राहसद्बलम् । दंतान्संदर्शयन्नुच्चैर्नामृष्यत्तद्धालायुधः ॥२९॥

बळभद्रातें कालिङ्ग नृपति । दांत दावूनि हांसतां कुमति । उच्चस्वरें हास्य करिती । त्या अनुकरती अपरती ॥९७॥
तें न गणूनि हलायुध । विदर्भातें म्हणे सावध । आपणा म्हणविसी अक्षकोविद । तरी धर्मता शुद्ध पण जिंकें ॥९८॥

ततो लक्षं रुक्म्यगृण्हाद् ग्लहं तत्राजयद्बलः । जितवानहमित्याह रुक्मी कैतवमाश्रितः ॥३०॥

हें ऐकूनि रुक्मी म्हणे । लक्ष निष्क म्यां धरिले पणें । तुम्हीं धर्मता जिंकूनि नेणें । अक्ष ढाळणें झडकरी ॥९९॥
अक्ष ढाळूनि तत्क्षणें । पण जिंकिला संकर्षणें । कपटाश्रयें त्या विदर्भ म्हणे । म्यां जिंकिला पण आतां ॥३००॥
सर्व प्रेक्षक सभासद । साक्ष देती भूपाळवृंद । तुम्ही धर्मता अक्षकोविद । मिथ्या वाद करूं नका ॥१॥
ऐसा ऐकूनि कुटिल शब्द । क्रोधें बळराम झाला क्षुब्ध । आंगीं वीरश्रीचा मद । प्रळयीं क्षारोद ज्यापरी ॥२॥

N/A

References : N/A
Last Updated : May 10, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP