अध्याय १० वा - श्लोक ३१ ते ३५

श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा


त्वं महान् प्रकृतिः सूक्ष्मा रजःसत्त्वतमोमयी । त्वमेव पुरुषोऽध्यक्षः सर्वक्षेत्रविकारवित् ॥३१॥

क्षेत्र म्हणिजे अष्टधा प्रकृति । क्षेत्रविकार ते सूक्ष्म विकृति । उभयज्ञाता तूं क्षेत्रपति । क्षेत्रज्ञ म्हणती यालागीं ॥५८॥
निमित्तउपादानादि कारणें । अंशें प्रकाशिसी पुरुषपणें । महदादि अखिल कार्यें जेणें । आसिलेपणें प्रकाशती ॥५९॥
रजःसत्त्वादिकीं त्रिगुणीं । सगर्भप्रकृति जे गुर्विणी । जीतें म्हणती गुणक्षोभिणी । ते ज्याचेनी व्यवहारे ॥३६०॥
म्हणसी क्षेत्रज्ञ मी हें खरें । परी क्षेत्र भरलें जें विकारें । तें मजहूनि व्यतिरिक्त दुसरें । तरी हें न सरे जगदीशा ॥६१॥
सूर्यें प्रकाशे मृगजळ । त्यासि स्वतंत्र कैसें स्थळ । सदसदात्मा केवळ । तूं गोपाळ अद्वितीय ॥६२॥
एथ आशंका ऐशी करिसी । जरी मी अभिन्न या विश्वेंशीं । तरी पदार्थज्ञानें मी हृषीकेशी । जाणिजे ऐशी व्यवस्था ॥६३॥
घटपटाचें होतां ज्ञान । कळलें ब्रह्मचि निर्गुण । तैं ब्रह्मवेत्ते सर्वजन । साध्यसाधन किमर्थ ॥६४॥
तरी किमर्थ शिष्यगुरु । कायसा योगाचा विचारु । ऐसें म्हणसी तो प्रकारु । ऐका साचारु जगदीशा ॥३६५॥

गृह्यमाणैस्त्वमग्राह्यो विकारैः प्राकृतैर्गुणैः । कोन्विहार्हति विज्ञातुं प्राक्सिद्धं गुणसंवृतः ॥३२॥

असत्प्रप्म्च दृश्य जाण । साच दाविजे विपरीतज्ञान । बुद्ध्यादिकें तें गृह्यमाण । तूं तिहींकरून अग्राह्य ॥६६॥
दृश्य प्रकाशिती डोळे । त्यांचें दृश्यत्व बुद्धीसी कळे । बुद्धीसी निश्चय ज्याचेनि बळें । तो कें आकळें तद्वारा ॥६७॥
सूर्य मृगजळीं बुडाला । सत्य मानिती जे या बोला । आत्मा ग्राह्य इंद्रियाला । हा गलबला त्यां योग्य ॥६८॥
घ्राणें गंधचि सेवावा । अन्य विषय त्या नाहीं ठावा । रसमात्रचि जाणे जिव्हा । आत्मा केव्हां तिसी कळे ॥६९॥
ऐसाचि करणसमुच्चय । त्यासि स्वविषयचि होय ज्ञेय । आत्मा अविषय अज्ञेय । दुरत्यय यालागीं ॥३७०॥
मनीं उठती ज्या कल्पना । त्यांचा निश्चय करी धिषणा । चित्त प्रवर्ते अनुसंधाना । धरी अभिमाना अहंकार ॥७१॥
अंतःकरणादि इंद्रियगणा । आत्मा अग्राह्य प्राकृतगुणां । आत्मप्रकाशें भवकल्पना । विपरीतज्ञाना अभिव्यक्ति ॥७२॥
असतें प्रपंचा साचपण । तरी तेंचि म्हणिजेतें ब्रह्मज्ञान । लटिक्या मानी साच करून । यालागीं ज्ञान विपरीत तें ॥७३॥
विपरीत ज्ञाना करी प्रकाश । तरी जीवचि म्हणसी हृषीकेश । जीवा पूर्वीं तूं परेश । स्वप्रकाश स्वतःसिद्ध ॥७४॥
देहत्रयाचें आवरण । पडोनि झाला परिच्छिन्न । प्राकृतगुणीं विषयाभिज्ञ । तो कें जन ब्रह्मवेत्ता ॥३७५॥
लटिके कल्पनेचिये पोटीं । लटक्या भासती अनंत सृष्टि । ते ज्ञाताज्ञानज्ञेयत्रिपुटी । प्रकृतिपोटीं गुणमय ॥७६॥
प्रकृति म्हणसी मजहूनि भिन्न । तरी तें अवास्तवमिथ्या भान । तत्प्रकाशक तूं चैतन्यघन । त्या तुज नमन पूर्णातें ॥७७॥
कां जाणावया अशक्य । जाणणें तितुकें त्रिगुणात्मक । विपरीत ज्ञान विषयोन्मुख । तूं विश्वात्मक निर्गुण ॥७८॥

तस्मै तुभ्यं भगवते वासुदेवाय वेधसे । आत्मद्योतगुणैश्र्छन्नमहिम्ने ब्रह्मणे नमः ॥३३॥

तो तूं प्रत्यक्ष श्रीभगवान । अचिंत्य ऐश्वर्य परिपूर्ण । त्या तुजकारणें आमुचें नमन । पूर्वोक्त एनःशमनार्थ ॥७९॥
वृष्णिकुळीं ज्याचा संभव । तो आनकदुंदुभि वसुदेव । तेथूनि अवतारप्रादुर्भाव । वासुदेव या हेतु ॥३८०॥
विधी स्रष्टा ये सृष्टीसी । तो त्वां सृजिला नाभिदेशीं म्हणोनि वेधा या नामासी । पात्र होसी श्रीकृष्णा ॥८१॥
म्हणसी मी हा वसुदेवसुत । नामरूपादि गुणवंत । ब्रह्म अपार गुणातीत । तो महिमा एथ मज कैंचा ॥८२॥
सूर्य प्रकाशूनि अभ्रपटळें । तेथ आच्छादला ऐसा कळे । तेंवि स्वमायायोगबळें । दाविसी लीले सगुणत्वा ॥८३॥
मायाप्रचुर गुणग्रामा । तूंचि द्योतक पुरुषोत्तमा । तिहीं झांकिली गमे महिमा । मुकुलितब्रह्मा तुज नमो ॥८४॥
म्हणसी मायाच्छादित ब्रह्म । विश्व ऐसें त्याचेंचि नाम । तरी विश्वामाजीं मी त्वत्सम । तुल्यभ्रम उभयांसी ॥३८५॥

यस्यावतारा ज्ञायन्ते शरीरेष्वशरीरिणः । तैस्तैरतुल्यातिशयैर्वीर्यैर्देहिष्वसंगतैः ॥३४॥

तरी विश्वाचें प्रकटी भान । त्रिगुणात्मक जें विपरीत ज्ञान । तया बोधा अधिष्ठान । जीवचैतन्य भ्रमाक्त ॥८६॥
मायानियंता तूं निर्गुण । ते केंवि झांकी तुझें ज्ञान । भक्तानुग्रहें होसी सगुण । स्वलीलापूर्ण ऐश्वर्यें ॥८७॥
जीव मायागुणीं भ्रांत । तूं मायानियंता गुणातीत । तुज जीवेशीं तुल्यता एथ । न घडे निश्चित परमात्मा ॥८८॥
गुण लेवूनि धरिसी सोंगें । परी तूं निर्गुणचि निजांगें । अचिंत्य ऐश्वर्य तुझें जागे । तें जगाजोगें कैं होय ॥८९॥
एकार्णवीं होऊनि मीनु । नौकेमाजीं घालूनि मनु । पुरे विधीचें निद्राभान । तोंवरी ज्ञान त्या कथिलें ॥३९०॥
तुजशीं समान मत्स्य इतर । किंवा धरूनि कमठशरीर । पृष्ठीं घेसी मंदरभार । तैं कूर्म इतर तुजतुल्य ॥९१॥
जो भूगोल घाली कांखे । ज्याच्या भयें ब्रह्मांड धाके । तो हिरण्याक्ष मारिला वराहवेखें । कीं डुकरें अनेकें तत्तुल्य ॥९२॥
कीं स्तंभीं प्रकटूनि सिंहवदन । हिरण्यकशिपूचें विदारण । करितां ब्रह्मांड कंपायमान । श्वापदासमान तो काई ॥९३॥
बलिच्छलनार्थ वामनवेष । भू मोजितां विक्रमावेश । नखें भेदूनि ब्रह्मांडकोश । केला प्रकाश ऐश्वर्या ॥९४॥
ऐसा अघटितघटनापटु । तो तूं काय खुजट बटु । क्षात्रकुळाचा भरिला घोंटू । तो तूं रागीट द्विजतुल्य ॥३९५॥
कीं सिंधु बांधोनी पाषाणीं । राक्षस मर्दी मनुष्यपणीं । येरां मनुष्यांसमान करणी । हे कैसेनी मानावी ॥९६॥
की पूतनास्तनशोषण । शकटतृणावर्तभंजन । मुखीं विश्वसंदर्शन । हें कोण करी तुजतुल्य ॥९७॥
ऐसे अनंत अवतार घेसी । असंभाव्य लीला करिसी । वीर्योत्कर्षें जाणों येसी । सम न होसी भवमग्ना ॥९८॥
देह धरूनि नटसी नट । तरी तूं विदेह कळसी स्पष्ट । तुझें ऐश्वर्य अचाट । तेणें प्रकट तूं होसी ॥९९॥
देह धरिसी सामान्यप्राय । परी असाम्य ऐश्वर्य अतिशय । तिहीं महिमा प्रकट होय । तो केंवि जाय झांकिला ॥४००॥
म्हणसी अनंतगुणें परिपूर्णें । काय निमित्त अवतार धरणें । तरी भक्तानुग्रहाकारणें । दुष्ट संहारणें तद्योगें ॥१॥

स भवान्सर्वलोकस्य भवाय विभवाय च । अवतीर्णोंऽशभागेन सांप्रतं पतिराशिषाम् ॥३५॥

तोचि तूं हा श्रीभगवान । रजतमाक्तां संसृतिदान । निष्कामभक्तां कैवल्यसदन । द्यावया पूर्ण कारुण्यें ॥२॥
अंशभाग म्हणजे कृत्स्नांशेंशीं । सांप्रत अवतार यादववंशीं । धरिला आहे ऋषीकेशी । फलद होसी कृतपुण्यां ॥३॥
महापुरुषांचे आशीर्वाद । वेदप्रणीत जे कां विशद । सकळकर्ता तूं गोविंद । म्हणती कोविद तत्पति ॥४॥
तो तूं आशिषांचा स्वामी । आजि भाग्यें देखिलासे आम्हीं । मौळ ठेवितां पादपद्मीं । हृदयसद्मीं निवालों ॥४०५॥

N/A

References : N/A
Last Updated : April 28, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP