अध्याय १० वा - श्लोक १६ ते १८
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
नित्यं क्षुत्क्षामदेहस्य दरिद्रस्यानकांक्षिणः । इंद्रियाण्यनुशुष्यन्ति हिंसाऽपि विनिवर्तते ॥१६॥
अन्नाविणें देह कृश । तेणें निर्बळ निःशेष । तैं विवेक उपजे विशेष । मग हिंसादोष नाचरे ॥२३॥
देहीं क्षुधेची जाचणी । सदैव अन्नाची चिंतवणी । त्या दरिद्र्याचे सर्वकरणीं । पडे बाळॊनि कोरडी ॥२४॥
इंद्रियें शुष्क होती सर्व । शक्ति क्षीण सर्वावयव । तेणें विवेक विवरी जीव । मोडे ठाव अनयाचा ॥२२५॥
अग्नि प्रज्वळतां पात्रातळीं । ते उष्णता प्रकटे शीतळ जळीं । तनुशोषणें इंद्रियीं सकळीं । विवेक उजळी सन्मार्ग ॥२६॥
आंगीं नसतां बळाचा लेश । न करी कोणाचाही द्वेष । हिंसा पळाली निःशेष । अहिंसेस सुखवसति ॥२७॥
अन्नवस्त्राची चिंता मोठी । म्हणूनि आर्जव धरिलें पोटीं । सांगें सर्वांसी सरळ गोठी । पडली तुटी कुटिलत्वा ॥२८॥
सर्व प्रकारें अकिंचन । म्हणोनि सर्वत्र निर्भयपण । व्हावया थोरांचें सन्निधान । सत्य भाषण अवलंबी ॥२९॥
पोट भरावयाचिये चाडें । स्तोत्र मंत्र वाचे पढे । तोचि त्यासी स्वाध्याय घडे । वृथा बडबडे उपशमु ॥२३०॥
स्नेह उपजावया जनीं । बोले समर्याद मित वाणी । बैसे जाऊनि पुराणीं । श्रीमंतजनीं द्रवाया ॥३१॥
तेणें श्रवणीं भक्ति घडे । सारासार विवेक निवडे । सज्जनांशीं सहवास पडे । दुष्कृत झडे तत्संगें ॥३२॥
कळों लागती साधुजन । यथाशक्ति घडे सेवन । तेणें द्रवोनि सज्जन । विवेकज्ञान बोधिती ॥३३॥
दरिद्रस्यैव युज्यन्ते साधवः समदर्शिनः । सद्भिः क्षिणोति तं तर्ष तत आराद्विशुद्ध्यति ॥१७॥
दारिद्र्यें सक्लेश देखोनि जन । स्वयें जाती तेथ सज्जन । कृपा करिती कळवळून । साधु दीनदयाळु ॥३४॥
ब्रह्मापासूनि काडीवरी । ज्यांची दृष्टि नोहे दुसरी । ते समदृष्टि संसारी । नर निर्जरीं दुर्लभ ॥२३५॥
ऐसे सदय होऊनि साधु । दरिद्रियांसि स्वयें वरदु । तिहीं कृपेनें करितां बोधु । दुःखकंदु उन्मळे ॥३६॥
साधु झालिया दयाळ । मग दुःखासि कैंचें स्थळ । सदा स्वानंदसुखकल्लोळ । उपडे मूळ भवाचें ॥३७॥
तमोगुणात्मक जें विषयभान । त्यासी प्रकाशी इंद्रियज्ञान । सत्य्मानूनि भ्रमे मन । तृष्णा जाण या नांव ॥३८॥
विषयलोभाची दुराशा । अहंममतेचा घालूनि फांसा । हातीं ओपी रागद्वेषा । मोह ऐसा पुंजाळे ॥३९॥
एवं भवाचें कारण । जे कां रजतम दोन्ही गुण । सत्संगें ते होती क्षीण । विशुद्ध ज्ञन मग लाभे ॥२४०॥
रजतमाचा होतां नाश । कैंचा ठाव प्रपंचास । समूळ तृष्णा होय फोस । वाणि सुखास मग काय ॥४१॥
संतीं बोधितां कृपावशें । भवबीज ते तृष्णा नासे । नित्यानित्यविवेकें दिसे । होय अनायासें चित्तशुद्धि ॥४२॥
एवं संतांचा प्रसाद । दरिद्रियांवरी होय विशद । ऐसें विवरी वेदविद । स्वयें नारद सर्वज्ञ ॥४३॥
म्हणाल देखोनि धनवंत । त्यांवरी प्रीति करितो संत । वृथा दरिद्रियांची मात । न घडे एकांत साधूशीं ॥४४॥
साधूनां समचित्तानां मुकुंदचरणैषिणाम् । उपेक्ष्यैः किं धनस्तंभैरसद्भिरसादाश्रयैः ॥१८॥
तरी ते कळिकाळाचे संत । जयांसी प्रिय वाटे असंत । स्वार्थलोभें लोलिंगत । जे धनवंत रंजविती ॥२४५॥
नाशवंताच्या लोभासाठीं । नटोनि संतपणाचे नटीं । लोकां नागविती हाटीं । खोट्या गोष्टी बोधूनि ॥४६॥
टाळ मृदंग चंग विणे । शिंगें दुंदुभि निशाणें । धनिकापुढें गाती गाणें । महंतपणें मिरवूनी ॥४७॥
मुखें निरूपिती वैराग्य । ज्ञान विकूनि इच्छिती भाग्य । ऐसें कलीचें अभाग्य । धनिकां योग्य ते साधु ॥४८॥
नांदते घरची केरसुणी । झाडूनि निर्मळ करी सदनीं । सांदीस पडे अपवित्रपणीं । यमजाचणी त्यां तैशी ॥४९॥
पोटीं भरूनियां विख । सडासंमार्जनीं पीयूख । तेंवि नामविक्रय करूनि मूर्ख । मागती भीक धनलोभें ॥२५०॥
चोर सांठवूनि घरीं । साधु भोंवडी बाजारीं । तैसे षड्रिपु अंतरीं । बाह्यात्कारीं साधुत्व ॥५१॥
माझारीं करूनि शौचकूप । बाहेर यज्ञशाळेचें रूप । तैसें साधुत्वामाजि पाप । ते निष्कृप दीनांसी ॥५२॥
शास्त्रें पढोनि ज्ञातेपणें । धनिकसदनीं होती सुणें । पुण्याथिले देखोनि नयनें । ज्ञानाभिमानें गुरगुरिती ॥५३॥
तेचि धनिकां योग्य साधु । धनापहरणीं उघडे भोंदु । धनलोभें ते केले अंधु । धनमदांधु आश्रयिती ॥५४॥
अंधें अंध नेतां पथीं । दोघां पतन महागर्तीं । तैशी त्यांची बोधव्युत्पत्ति । दोघे पडती अंधतमीं ॥२५५॥
आतां शुद्ध साधुजन । जे कृपेनें पाहती अनाथ दीन । अनाथबंधु हें अभिधान । त्यांलागूनी शोभतसे ॥५६॥
परांच्या तापें अंतर द्रवे । नवनीत ही ते उपमा न पवे । अग्नितपएं जें कढवावें । तैं त्या पावे द्रवत्व ॥५७॥
गेली चित्ताची हळहळ । म्हणोनि समचित्त शीतळ । भूतमात्रीं जे कृपाळ । दीनदयाळ जगदात्मे ॥५८॥
भगवद्भक्ति ते इच्छिती । येर सर्वत्र अनासक्ति । भगवच्चरणारविंदीं रति । विश्वीं रमती तत्प्रेमें ॥५९॥
भूतमात्रीं साधु सदय । तरी कां त्यजिती सधनालय । म्हणाल एथींचा अभिप्राय । कैसा काय तो ऐका ॥२६०॥
साधूसी सर्वही समान । परी धनदुर्मदां धनाभिमान । साधु देखोनि उदासीन । करिती हेलन मदांध ॥६१॥
गायक नाचक वाचक । लेखन पाठक तौर्यत्रिक । ऐसे विद्योपजीवी अनेक । त्यांसी धनिक प्रिय करिती ॥६२॥
परस्परें उपकारती । आश्रित होऊनि आराधिती । धनिक त्यांसि सन्मानिती । उपेक्षिती साधूतें ॥६३॥
ऐसे साधूचे उपेक्षाशीळ । धनमदांध कुटिल खळ । धनगर्वें जे मातले प्रबळ । अमळ समळ नेणती ॥६४॥
देहाभिमानें जे मातले । असत्पदार्थ आश्रयिले । स्वार्थ परमार्थ विसरले । मोहें कवळिले म्हणोनि ॥२६५॥
स्त्री पुत्र कां पश्वादिकीं । मांसमात्रचि ओळखी । पापपुण्याच्या विवेकीं । गोष्टी ठाउकी ज्यां नाहीं ॥६६॥
विसरोनि गेले जरामृत्य । झाले श्रीमदें उन्मत्त । असदाह्स्रयें झाले भ्रांत । तेणें न गणित कोणासीं ॥६७॥
शस्त्रास्त्रें वस्त्रें धन । दुर्गम दुर्ग दुर्धर सैन्य । येणें देहसंरक्षण । विश्वासोन मानिलें ॥६८॥
पुढें नरकयातना आहे । तेथें सुकृत होतें साहे । ऐसा विश्वास मन जैं वाहे । तैं भजों लाहे संतांतें ॥६९॥
या उमजाची अवघी राति । धनमदांध खळ दुर्मति । देहाभिमानें पडली भ्रांति । ते उपेक्षिती साधूंतें ॥२७०॥
पदरीं बांधोनि गारगोटी । कुबेरासी नाणी दृष्टीं । म्हणे लक्ष्मीसी करंटी । ते त्या गोष्टी मूर्खांची ॥७१॥
असद्वैभवाच्या मदें । उपेक्षिती साधुवृंदें । संत अक्षयी स्वानंदें । निर्जरपदें न गणिती ॥७२॥
देहतादात्म्यचि नेणती । ते कैं देहाची आसक्ति । धरूनि धनदुर्मदां भजती । हे व्युत्पत्ति कायशी ॥७३॥
अमृतपानें जो निवाला । तो कैं मृगजळा तान्हेला । कल्पतरूची छाया ज्याला । एरंडाला तो न मगे ॥७४॥
ऐसे अक्षय्य सभाग्य साधु । ते उपेक्षिती धनमदांधु । दरिद्री देखोनि करुणासिंधु । करिती बोधु स्वसुखाचा ॥२७५॥
अमानित्वादि सर्व गुणीं । साधु शोभती पूर्णपणीं । ते धनमदांधालागीं स्वप्नीं । तृष्णा धरूनि न भजती ॥७६॥
प्रारब्धयोगें देह चाले । अहंत्यागें मुक्त झाले । विश्वात्मकत्वें विचरले । धनिकां भजले हें न घडे ॥७७॥
चिंध्या नसती काय वाटे । जरी तनूसी शीतोष्ण वाटे । क्षुधानिवारणीं सफळित दाटे । लागलीं थाटें वृक्षाचीं ॥७८॥
विरक्तांची हरवया तृष्णा । नद्या नसती काय सुरसा । गुहा विरक्तां विश्रांतिवासा । हरिकुवासा संरक्षी ॥७९॥
ऐशी असतां सहज संपत्ति । पालनपटु कमलापति । धनदुर्मदां ज्ञानी भजती । हे व्युत्पत्ति न वदावी ॥२८०॥
धनमदाची पडतां भ्रांति । सत्पुरुषांची उपेक्षा करिती । तेणें तोंडीं पडिली माती । ते ते स्वहितीं नाडले ॥८१॥
तरी त्या धनमदाची भ्रांति झडे । आत्मस्वहितीं दृष्टि उघडे । सज्जनांशीं मैत्री पडे । प्रेमा जडे हरिचरणीं ॥८२॥
ज्या औषधीं इतुके गुण । तें एक हें दारिद्र्यांजन । करूनि धनमदनाशन । शुद्ध ज्ञान प्रकाशी ॥८३॥
असाध्य देखोनि रोगोत्पत्ति । विवरूनि दिव्य वनस्पति । तदुपचारीं वैद्य सुमति । करुणामूर्ति नारद ॥८४॥
गुह्यकांचा दुर्मदरोग । भंगावयाचा विवरूनि योग । दावी कोपोनि सन्मार्ग । तो प्रसंग अवधारा ॥२८५॥
N/A
References : N/A
Last Updated : April 28, 2017
TOP