संत सखू

संतांची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात.


संत सखू
संत सखू हे महाराष्टीयांच्या भोळ्या - भाबड्या नव्हे, तर सुजाण - श्रद्धाशील मनाला पडलेले एक मधुर स्वप्नच आहे. सखू प्रत्यक्षात होऊन गेली की नाही कोणास ठावूक. पण प्रत्यक्षात होऊन गेली असती तर महाराष्टीय लोकमानस तिनं जेवढं व्यापलं असतं, त्यापेक्षा कितीतरी पटींनी हे लोकमानस ती प्रत्यक्षात होऊन गेली नसतानाही व्यापलं आहे, हे कुणीच नाकारू शकणार नाही. प्रत्यक्षापेक्षा तिचे हे अस्तित्व अधिक सत्य, अधिक व्यापक आणि अधिक सार्थ आहे, गहन गूढ आहे. ती समाजमनाची एक मानसिक प्रक्रिया आहे. त्यामागे काही पिढ्यांच्या पारमार्थिकतेचे संचित उभे आहे. त्यामुळे संत सखू हे एक काल्पनिक चित्र नाही. अखिल मराठी मानस एकवटून गेलेलं ते एक जिवंत, चिरंजीवअसं मानस व्यक्तिमत्व आहे. राधा ही अखिल भारतीय लोकमानसातील आदिम प्रतिमा बनून गेली आहे. कृष्ण ही पुरूष तत्त्वाची, तर राधी ही रात्री तत्त्वाची आदिम प्रतिमा. त्यात पुरुष - स्त्री असा भेद नाही. राधा ही भारतीय स्त्री - पुरुषांच्या मनातील आदिम प्रतिमा आहे. तसाच श्रीकृष्ण. महाराष्ट्रीयांच्या मानस संपुटात अजूनही पूजिली जाणारी सखू, तिचं चरित्र हा महाराष्ट्रीयांच्या पारमार्थक मनाचा एक मनोज्ञ आविष्कार आहे. त्या चरित्राला Super reality चं परिमाण प्राप्त झालेलं आहे.
तिच्या चैत्रकथेत सारेकाही सामावलेलं आहे. त्यात जीवनवास्तव आहे, जीवनातील सुष्ट - दुष्ट प्रवृत्तींचा संघर्ष आहे, स्वार्थ परायण मनोवृत्तींचं दर्शन आहे, सुजाण मनोवृत्तीही कार्यसर झालेल्या आहेत. टोचणार्‍या काकवृत्ती आहेत, गोंजारणारे मायाळू हात आहेत. पुरूषप्रधान संस्क्रुतीचे चटके आहेत. समजावून घेणार्‍या बाया - बापड्या आहेत. या सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जीवनसंघर्षाचे सर्व चटके सोसून समर्पित झालेलं संज्ञाशील संतसखूचं मन या चरित्रकथेत भक्कमपणे उभं आहे. ही संतसखूची चरित्रगाथा म्हणजे महाराष्ट्रीय मनाचा एक मनोज्ञ अविष्कार आहे. किंबहुना महराष्ट्रीयांच्या पारमार्थिक मनाचा कालोवा करून उभं केलें संतसखू हे एक शिल्प आहे.
ज्या स्त्रिया भक्तिमार्गाला लागून आत्मोद्धारासाठी तळमळत राहिल्या त्या सर्वांच्या वाट्याला आप्तस्वकीयांकडून व समाजाकडून निंदा, नालस्ती व छळवाद या पलीकडे काहीच आले नाही. संतसखूला या सर्वातून जावे लागल्याचे चित्रण केले जाते. संतसखूनं मराठी माणसाची अशी काही पकड घेतली आहे की, तिच्यावरील चित्रपट असो वा नाटक असो. मराठी मन तिथं धावत जातं. कारण तिच्या रूपात त्याला आपल्यालाच पाहायला मिळतं. लोक प्रतिभेतून निर्माण झालेलं सखूचं भावचित्र लोकमानसाला लोभावणार यात नवल ते काय ? सत्त्व पाहायची व त्या सत्त्वाला उतरायची या लोक मानसाला सवयच लागलेली. शेवट हा ईशकृपेच्या वरदहस्तानं शांत, आनंदीच व्हायचा. संत सखूचं लोकमानसातील चरित्रचित्रण असंच साकारत गेलं.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-03-08T10:33:33.5800000