राका कुंभार

संतांची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात.


राका कुंभार
राका कुंभार यांचा काळ अंदाजे इ. स. १५०० असा सांगितला जातो. हे परदेशी कुंभार. त्यांच्या पत्नीचे नाव ‘ बाका ’. त्यांना देऊबाई तथा ‘ बका ’ नावाची कन्या होती. सर्व कुंभार मंडळींत त्यांचा थोर वैष्णव म्हणून गौरव होत असे. ते पंढरपूरलाच राहत, त्यांना महीपती बोवा म्हणतात. ते परदेशी म्हणजे मूळचे गुजराथचे असावेत. त्यांचे २७ अभंग प्रस्तुत गाथेस संग्रहीत केले आहेत. वारकरी संतांच्या अभंगांची सर्व वैशिष्ट्ये त्यांच्या अभंगांत दिसून येतात. ते थोर भक्त होते. त्यांच्या प्रपंचात सौख्य, शांती नांदत होती. त्यांची लेक लावण्यवती व गुणांची खाणच होती. त्यांच्या घरी एक मांजरी होती. तिला सर्वांचाच अत्यंत जिव्हाळा होता. एकदा ती वेदना सहन करीत राकाच्या पायाशी अंग घासत, म्यॉव, म्यॉव करू लागली. नंतर ती माजघरात गेली आणि एका कच्च्या डेर्‍याचा आश्रय घेऊन गप्प बसली. तिला तीन सुंदर पिलं झाली. ती सतत आत बाहेर करी, पिलांना चाटत बसे. विश्वातलं सारं वात्सल्य जणू त्या डेर्‍यात साठवून राहिलं होतं. एकदा रात्री राकानं आवा ( भट्टी ) पेटवला. एका मडक्यात मांजरीची पिलं आहेत याचं भान राकाला राहिलं नाही. मांजरी रात्रभर घराभोवती घिरट्या घालून ओरडत होती. तिचा तो करणार्द्र आवाज हृदयाला भेदून जात होता. सकाळी राकाच्या ध्यानात आलं की काल सायंकाळी पेटविलेल्या आव्यातील डेर्‍यात मांजरीची पिलं होती. राकानं सद्गदित होऊन अपराधी मनानं विठ्ठलाचा धावा केला. राकानं एकेक डेरा बाजूला केला. तो काय, एका डेर्‍यातून मांजरीची पिलं म्यॉव, म्यॉव करीत बाहेर पडली. मांजरीही धावत आली. सर्वत्र आनंदी आनंद !
एकदा आत्यंतिक विरक्तीनं राकानं घरातलं सारं काही लोकांना देऊन टाकलं आणि तो, पत्नी आणि मुलगी रानावनात हिंडू लागले. लागडं गोळा करून ती विकून चरितार्थ चालवीत. एकदा राकाकन्या बंका व नामदेवकन्या यांचं नदीतीरी भांडण झालं. नामदेवकन्या कपडे धूत असता बंकाच्या अंगावर पाण्याचे शिंतोडे गेले, हे निमित्त. स्नान करून बसल्यावर कोण शिंतोडे गेले हे निमित्त. स्नान करून बसल्यावर कोण शिंतोडे उडवून घेईल ? ती तिच्यावर रागावली. ‘ जातीची कुंभार, पण काय सोवळं ? ’ हे शब्द बंकाला लागले. ‘ तुझे वडील स्वार्थी भक्ती करतात ’ हे तिचे शब्द तिला फारच लागले. राकाला हे समजले. त्यानं हे देवाला सांगितले. देव नामदेवांकडे वळले आणि म्हणाले, ‘ नामदेवा, तू श्रेष्ठ भक्त आहेस. पण खरं सांगू ? राकासारखा वैराग्य संपन्न भक्त या पृथ्वीतलावर नाही. ’ नामदेवांचा अहंकार मागळला. पण देवापाशी त्यांनी हट्ट धरला की मला याची प्रचीती हवी. देवानं नामदेवाला बरोबर घेतलं. दूर रानावनात गेले. एका अरण्यात राका, बाका, बंका लाकडं वेचीत होते. झाडं न तोडता वाळली लाकडं वेचू लागले. तोच त्यांना त्याखाली सोन्याचं कंकण दिसलं. तिघांनी त्या कंकणाला स्पर्शदेखील केला नाही. तेवढ्यात राका व बाकांच्या अंगाला दरदरून घाम सुटला, सात्विक भावानं अंग थरथरू लागलं. पंढरीनाथानं त्यांना दर्शन दिलं. नामदेवाची खात्री झाली की या भक्तांच्या जगात एकेका गुणानं मंडित असा थोर भक्त असतोच असतो. आपण आपल्या गुणानं उगाच अहंकारून जाऊ नये. राका साक्षात आव्यात भाजलेल्या डेर्‍यासारखा खणखणीत विरक्त होता, तो कच्चा नव्हता.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-03-08T10:32:29.3930000