कूर्मदास

संतांची चरित्रे नेहमीच प्रेरणादायी असतात.


कूर्मदास
पैठणला कूर्मदास नावाचा एक परम विठ्ठलभक्त राहत होता. तो जन्मतःच अपंग होता. त्याला दोन्ही हात आणि दोन्ही पाय नव्हते. त्याची स्मरणशक्ती इतकी तीव्र होती की घरात आणि आसपास म्हटले जाणारे श्लोक, अभंग, स्तोत्रं, कवनं, अटकं इत्यादी तोंडपाठ झाली होती. देवालयात कीर्तनं - प्रवचन ऐकायला तो गडबडा लोळत जाई. एकदा त्याला पंढरपूरीस जायची उत्कट इच्छा झाली. पाय नाहीत, जाणार कसा ? हात नाहीत, भजनात टाळ्या वाजवणार कसा ? पण परिस्थितीनं अडून बसणे त्याला ठाऊक नव्हते. तीवर मात करणे एवढेच त्याला ठाऊक. एका कीर्तनात पंढरीचं सुख आणि पंढरी माहात्म्य ऐकून त्याला पंढरीस जायची इच्छा आवरता आली नाही. दुसरे दिवशी तो पंढरीस गडबडा लोळत जायला निघाला. वाटेत वारकरी पांतस्थ भेटले. त्यांनी त्याची विचारपूस केली. पाणी व अन्न त्याला भरवले. तुला आमच्याबरोबर येण शक्य नाही, खूप उशीर होऊल, म्हणून आम्ही देवाला सांगू की तुम्ही येत आहात.
कूर्मदास आपल्या कूर्मगतीने वाटचाल करीत राहिले. ते आतल्या आत विठ्ठल भेटीस व्याकुळ झाले होते. इतक्यात त्यांना घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. ए अत्यंत तेजस्वी पुरुष खाली उतरला. त्यानं त्यांची चौकशी केली. ‘ एकादशीला सातच दिवस राहिलेत, आता वेळेत पंढरपूरला पोहोचणे शक्य नाही ’ असं सांगून कूर्मदास कळवळले. ‘ मला विठोबा खिस्ती म्हणतात. मी वाटेत व्यापर करीत करीत पंढरपूरला जाणार आहे, चला माझ्याबरोबर ’ तो तेजस्वी पुरुष त्यांना म्हणाला. दुसरे दिवशी त्या विठ्ठलभक्त वारकर्‍यांनी पांडुरंगास कूर्मदासाचा निरोप सांगितला. देव पंढरपूराहून लहुळास निघाले. देवांना वाटले सावतामाळी भेटला. त्यांनी पाटाचं पाणी प्राशन केलं. सावता तत्त्वज्ञान सांगू लागला, ‘ देव सर्व ब्रह्मांडात आहे. ’ याच वेळी ज्ञानदेव - नामदेव देवाचा पाठलाग करीत येत होते. देव म्हणाले, ‘ मी सर्वत्र आहे, तर या चोरांपासून लपवण्यासाठी तू मला तुझ्या पोटात ठेव. सावत्यानं विळ्यानं पोट चिरलं आणि देवाच्या लघुरूपास आत कोंडून ठेवलं. ज्ञानदेव - नामदेव शोकाकुल होऊन त्याला बोलू लागले. ते सावत्याची करूणा भाकू लागले. सावता म्हणाला, ‘ नामदेवा, देव तुम्हाला भेटायला उतावीळ आहेत. माझ्या पोटात जे आहे, तेच तुझ्या पोटात आहे, ज्यासाठी तू तळमळत आहेस ते परब्रह्म सर्वत्र आहे. माझ्या हृदयातलं गूज तुझ्या हृदयात संचरो हृदयाहृदय एक होवो. ’ तेवढ्यात भक्ताच्या हृदयातून देव बाहेर आले. ज्ञानदेव - नामदेवांनी भारल्या अंतःकरणाने त्यांचे दर्शन घेतले. ते ढसाढसा रडू लागले. नामदेव म्हणाले, ‘ देवा, तू खरंच सर्वव्यापी आहेस. ’ नामदेवांना झालेला बोध पाहून ज्ञानदेवांना आनंद झाला.  
इकडे कूर्मदास त्या तेजस्वी पुरुषाची वाट पाहत होता. त्याला कळून चुकलं की आता एकादशीचं दर्शन आपल्या भाळी लिहिलं नाही. तो कळवळला. स्फुंदून स्फुंदून रडू लागला. एवढ्यात दिव्य प्रकाशझोत पडला. एक ज्योत पुढं सरकत होती. त्या ज्योतीतून एक मूर्ती साकार झाली. कूर्मदासांनी ओळखलं, साक्षात पांडुरंगाची मूर्ती आहे ही. त्यांनी खरडत खरडत जाऊन देवाच्या पायांवर, समचरणांवर डोकं ठेवलं. तो उद्गारला, ‘ पांडुरंगा, तू स्वतःच आलास मला भेटायला. केवढं भाग्य माझ. पांडूरंगा, माझा विठोबा खिस्ती सुखरूप आहेना ? ’ देवानं सांगितलं, ‘ कूर्मदासा, तो खिस्ती म्हणजे मीच. गावोगावी जाऊन मी भक्तीचा व्यापार करीत असतो. ’
पोट फाडणं, देवानं आत जाऊन बसणं, पुन्हा प्रकट होऊन सर्वाना दर्शन देणं हे सारे चमत्कार वाटतात, पण त्यात एक तत्त्व भरून राहिलेलं असतं. ते म्हणजे देव भक्तांच्या अंतःकरणरूपी गाभार्‍यात असतो, तसा तो सर्वत्र, सर्वव्यापी असतो, तो भेदातीत असतो, आपल्यातच देवाला शोधायचं असतं, नव्हे, आपणच देवरूप व्हायचं असतं. सावतामाळी व कूर्मदास यांची ही चरित्रकथा हेच सांगते.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2017-03-08T10:31:34.5630000