मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री रामदासस्वामींचे साहित्य|
श्रीसमर्थकृत नवसमाविष्ट रचना

श्रीसमर्थकृत नवसमाविष्ट रचना

समर्थ रामदासांनी हिन्दी भाषेत रसाळ पदे लिहीली आहेत.



तेणें संशयो तूटती । पूर्व गुण पालटती ॥१॥
एक उपासना धरीं । भक्ति भावें त्यासी करीं ॥२॥
सर्व नश्वर जाणून । वृत्ति करीं उदासीन ॥३॥
सत्य वस्तू सारासार । याचा करावा विचार ॥४॥
त्यागूनियां अनर्गल । सदा असावें निर्मळ ॥५॥
ध्यानें आवरावें मन । आणि इंद्रिय - दमन ॥६॥
अखंड वाचें रामनाम । स्नान संध्या नित्य - कर्म ॥७॥
दास म्हणे सर्व गाव । जेथें भाव तेथें देव ॥८॥


शुद्ध सोनें आणि सुवास । जडित रत्नांचा प्रकाश ॥१॥
मग जाली तैशी परी । त्याची संख्या कोण करी ॥२॥
कल्पतरु राजांगणीं । त्यासी आहे चिंतामणी ॥३॥
रामदासी नवल गोष्टी । रम्य शारदेशीं भेटी ॥४॥


संन्यासाचें लक्षण । अवघें झालें कुलक्षण ॥१॥
जन कोणीच नावडे । पापी विकल्पें वावडे ॥२॥
अवा सवाची बडबडी । होऊं पाहे देशोधडी ॥३॥
प्राणी क्रोधें पिसाळलें । त्यास कोण म्हणे भलें ॥४॥
मना आलें तें करावें । बळेंचि अव्हाटीं भरावें ॥५॥
रामदास म्हणे खरें । ज्यांचें त्यासी वाटें बरें ॥६॥


संसार देखीला तरी पाहे सार । वायां येरझा पाडूं नको ॥१॥
पाडूं नको दुःखसागरीं आपणा । म्हणे नारायणा ओळखावें ॥२॥
ओळखावें वेगीं आपआपणाशी । संसारीं तुटशी दास म्हणे ॥३॥


रामदास्य आणि हें वायां जाईल ॥ ऐसें न घडेल कदाकाळीं ॥१॥
कदाकाळीं राम दासा उपेक्षीना ॥ राम उपासना ऐशी आहे ॥२॥
ऐशी आहे सार राघोबाची भक्ति ॥ विभक्तीची शक्ति जेथें नाहीं ॥३॥
जेथें नाहीं कांहीं वाउगें मायीक । रामउपासक दास म्हणे ॥४॥


धांव धांव नारायण । दावीं पाय मज दीना ॥१॥
जैसा जळावीण मीन । तळमळी रात्रंदिन ॥२॥
तैसा तुज हो वेगळां । वाट पाहें वेळोवेळां ॥३॥
आतां न करीं आळस । प्राण जाला कासावीस ॥४॥
दास म्हणे विठाबाई । माझी करुणा येऊं देईं ॥५॥


फुकाचे चरण दाखवितां । काय भिशी कृपावंता ॥१॥
काय म्यां तूज मागाया । वाट पुरवीं देवराया ॥२॥
पुढें देणें घेणें लागे । म्हणोनी दडतोसी मागें ॥३॥
नलगे संतती संपदा । दावीं तुझ्या त्या पादुका ॥४॥
काय होतोसी कृपण । दास म्हणे दावीं चरण ॥५॥


माझ्या दृष्टी जालें काय । कां गा दृष्टी पडेना पाय ॥१॥
आतां देवा कधीं येसी । मज दीनातें भेटी देसी ॥२॥
कैसें करूं नारायणा । माझें दुःख सांगूं कोणा ॥३॥
किती दिवस वाट पाहूं । आतां कोणा शरण जावूं ॥४॥
दास म्हणे वेगीं यावें । आम्हां दीनातें भेटावें ॥५॥


धांव धांव रुक्मिणीवरा । मज दीनाचें संकट हरा ॥१॥
माझे अन्याय जाले कोटी । शरण आलों घालीं पोटीं ॥२॥
तुजवीण सखे माय । त्रिभुवनीं कोण आहे ॥३॥
दास म्हणे धांव येईं । पाय दावुनी सुखी करीं ॥४॥

१०
तुजवीण माझा देवा । कोणें सांभाळ करावा ॥१॥
मजसारखा पातकी । पाहातां नाहीं तिहीं लोकीं ॥२॥
पदरीं पडलों खरा । कळेल तैसा सांभाळ करा ॥३॥
अंकित झालों मी भिकारी । आतां देवा तारीं मारीं ॥४॥
माझे अन्याय लक्षकोटी । दास म्हणे घालीं पोटीं ॥५॥

११
किती देवा चाळविसी । वाट पाहाया लाविसी ॥१॥
किती धीर धरूं माये । वेळोवेळां वाट पाहें ॥२॥
जैसा चातक जीवनीं । पिऊं पिऊं करी पाणी ॥३॥
तैसी लागलीसे आस । वाट पाहें रात्रंदिवस ॥४॥
जीवन पाजी तान्हयास । पुरवीं माये माझी आस ॥५॥
दास म्हणे वेगीं येईं । चंद्र चकोरातें दावीं ॥६॥

१२
मागें कैसें भक्त तारिले । माझें बळ काय झालें ॥१॥
काय अपराध माझे शिरीं । मज मोकलीलें हरी ॥२॥
शरण रिघालों मी तुज । कोठें राहिलीं पातकें ॥३॥
सांग सांग पंढरीनाथा । भांडावया आलों आतां ॥४॥

१३
देव गर्जती कोल्हाळ । देव भक्तांचा दयाळ ॥१॥
लाजविलें तें अनंता । मज पतीताकरितां ॥२॥
दास म्हणे मी लेकरूं । नको माते त्याग करूं ॥३॥

१४
आतां न करीं आळस । उणें येईल ब्रीदास ॥१॥
नको करूं कानकवाडे । वायां जातील पवाडे ॥२॥
काय उणें मज मशका । थोड्यासाठीं भिऊं नका ॥३॥
पण आपुला सिद्धी नेईं । आतां फार बोलूं काई ॥४॥
दास म्हणे तारीं दीन । जैसें असेल भूषण ॥५॥

१५
देव सर्व जेणें घातले बांदोडीं । त्याची मुरकुंडी रणांगणीं ॥१॥
ऐसा काळ आहे सर्वां गीळीताहे । विचारूनि पाहें आलया रे ॥२॥
इंद्रजीतनामें इंद्रासी जिंकीलें । त्याचें सीर नेलें गोलांगुळीं ॥३॥
देवां दैत्या वाळी बळी भूमंडळीं । तया येका काळीं मृत्य आला ॥४॥
देवासी पीडीलें तया जाळांधरें । तोडिलें शंकरें सीर त्याचें ॥५॥
करें भस्म करी नामें भस्मासुर । तयाचा संव्हार विष्णु करी ॥६॥
प्रल्हादाचा पिता चिरंजीव होता । नृसिंह्य मारिता त्यासी होये ॥७॥
वैरोचनाघरीं विष्णु जाला नारी । तया येमपुरी दाखविला ॥८॥
गजासुर गेला दुंदुंभी निमाला । प्रताप राहिला वैभवाचा ॥९॥
ऐसे थोर प्रतापी अपार । गेले कळीवर सांडुनीयां ॥१०॥
शरीर संपत्ती सर्व गेली अंतीं । सोसील्या विपत्ती येकयेकीं ॥११॥
म्हणोनि वैभवा कदा भुलों नये । क्षणा होये काये तें कळेना ॥१२॥
रामदास म्हणे स्वहित करणें । निर्धारें मरणें मागें पुढें ॥१३॥

१६
कर्माचिये वेळे ज्ञानी म्हणवावें । ज्ञान मोकलावें भक्तपणें ॥१॥
जाणावा तो लंड ज्ञानिया तर्मुंड । शक्तीवीण तोंड वाजवीतो ॥ध्रु.॥
स्वधर्माचे वेळे ज्ञानें झांकी डोळे । भोजनाचे वेळे सावधान ॥२॥
भक्तीचे समईं अद्वैत गोसावी । पोटस्तें पोसावीं कन्यापुत्रें ॥३॥
विधीचिये वेळे निस्पृह वैरागी । पुढें द्रव्यालागीं हिंडतसे ॥४॥
सर्व ब्रह्म ऐसा निश्चयो थावरी । मागें निंदा करी सज्जनाची ॥५॥
निरूपणीं त्याग जनासी सांगत । स्वयें लोलंगत तंबाखुचा ॥६॥
दास म्हणे मना नको काढूं वर्मे । प्राणी केलीं कर्में पावतील ॥७॥

१७
करा करा भजन स्वामी सद्गुरूचें । बापुड्या मनाचें काय चाले ॥१॥
दोन शत पांच मनबोध मी केला । तो कां व्यर्थ गेला अवघा चि ॥२॥
अवघा उगवा झाडा या मनाचा । छंद राघवाचा चित्तीं धरा ॥३॥
राघव राघव वचनीं बोलतां । व्यर्थ सीण करितां नेणोनीयां ॥४॥
दास म्हणें आतां गुरूसी शरण जावें । चमत्कार पाहावे निजघरचे ॥५॥

१८
नरा नरदेहा येऊन । येव्हडें करी रे तूं साधन ।
जाईं सद्गुरूसी शरण रे । पावसी मोक्ष ॥१॥
अन्य साधनें बहुतें । वृथा जाण रे निरुतें ।
येक्या सद्गुरुभजनापरतें । नाहीं सार ॥२॥
सार नाहीं रे दुसरें । वेद बोलिले निर्धारें ।
आणिक शास्त्रें हि अपारें । पुराणादिक ॥३॥
ऐसें जाणुनियां गुरुपाईं । अनन्य भावें शरण जाईं ।
जीवन्मुक्त होसी देहीं । दास म्हणे ॥४॥

१९
देव देवावरी देऊळ । देवळा वर्ता ब्रह्मगोळ ।
त्यापरतें शून्य मंडळ । परता देव ॥१॥
देव परता ना आरता । देव वर्ता ना खालता ।
देव निश्चळ पुरता । सर्वां ठाईं ॥२॥
देव अनंत अपार । देव निर्गुण निराकार ।
त्याचा शोधावा विचार । साधुपासीं ॥३॥
दास मौजेनें बोलिला । शोध शोधावा आपुला ।
व्यर्थ कासया गलबला । जन्मवरी ॥४॥

२०
मी जालें दासी । या गुरुरायाची । हो मी जालें. ॥ध्रु.॥
संसारसागर सांडुनि सारा । राहिन चरणापाशीं । हो मी. ॥१॥
चरण झाडिन आपुले केशीं । नाठवे प्रयाग काशी । हो मी. ॥२॥
रामदास म्हणे पूर्ण मी धाले । प्राशुनि ब्रह्मरसासी । हो मी. ॥३॥

२१
जानकीरमणा मनाच्या मोहना । जिवाच्या जीवना । आत्मारामा ॥१॥
शंकराच्या ध्येया निजबोधाच्या निलया । वेदाचिया गुह्या । आत्मारामा ॥२॥
सिद्धाचिया सिद्धा निजबोधाच्या बोधा । अनादि प्रसिद्धा । आत्मारामा ॥३॥
अयोध्येच्या राणा हनुमंटाचा स्वामी । प्रगट अंतर्यामीं । होय माझ्या ॥४॥
माझ्या सर्व भवालागीं नाश करीं । बुडतों सागरीं भवसिंधूच्या ॥५॥
त्रितापें तापलों बहुत जन्मीं शीणलों । बहुकाल अंतरलों स्वामी तुम्हां ॥६॥
विधीचिया घाया तळीं सांपडलों । वरपडा जालों सुखदुःखा ॥७॥
धांव आतां स्वामी तूं च माझा गुरु । तूं च माझा तारूं दास म्हणे ॥८॥

२२
बाप माझा ब्रह्मचारी । मातेपरी अवघ्या नारी ॥१॥
उपजतां बाळपणीं । गिळूं पाहे वासरमणी ॥२॥
अंगीं सिंदुराची उटी । जया सोन्याची कासोटी ॥३॥
रामकृपेची साउली । रामदासाची माउली ॥४॥

२३
अरे मनुष्यें काय द्यावें । एक रघुवीरा मागावें ॥१॥
उपमन्यें धांवा केला । क्षीरसिंधु त्या दिधला ॥२॥
धुरु शरण चक्रपाणी । अढळ शोभा तारांगणीं ॥३॥
राम म्हणतां वदनीं । गणिका बैसली विमानीं ॥४॥
बाळमित्र निष्कांचन । त्याचें दरिद्र विछिन्न ॥५॥
कुब्जा खंगली म्हातारी । केली लावण्यसुंदरी ॥६॥
शुकमिषें रामवाणी । म्हणतां पावन कुंटिणीं ॥७॥
शरणागत निशाचर । राज्य देऊनी अमर ॥८॥
होता बंधूनें गांजिला । तो सुग्रीव राजा केला ॥९॥
तया अंबऋषी कारणें । दहा जन्म येणें जाणें ॥१०॥
रामदासीं रामराव । निजपदीं दिधला ठाव ॥११॥

२४
म्हणे हें जाणावें आकाशासारिखें । मायाही ओळखे वायूऐसी ॥१॥
वायूऐसी माया चंचळ चपळ । ब्रह्म तें निश्चळ निराकार ॥२॥
निराकार ब्रह्म नाहीं आकारलें । रूप विस्तारिलें मायादेवी ॥३॥
मायादेवी जाली नांव आणि रूप । शुद्ध चित्स्वरूप वेगळेंचि ॥४॥
वेगळेंचि परि आहे सर्वां ठायीं । रिता ठाव नाहीं तयाविण ॥५॥
तयाविण ज्ञान तेंचि तें अज्ञान । नाहीं समाधान ब्रह्माविण ॥६॥
ब्रह्माविण भक्ति तेचि पैं अभक्ति । रामदासीं मुक्ति ब्रह्मज्ञान ॥७॥

२५
नमो जी अनंता तूंचि मातापिता । तुझी सर्व सत्ता तूंचि एक ॥१॥
तूंचि एक ऐसा निश्चय मानसीं । झालीया मुक्तीसी काय उणें ॥२॥
काय उणें मुक्ति जया तुझी भक्ति । संसारीं विरकि सर्वकाळ ॥३॥
सर्वकाळो जया श्रवणीं आवडी । साधका तांतडी तुझी देवा ॥४॥
तुझी देवा चाड त्यासि नाम गोड । पुरे सर्व कोड दास म्हणे ॥५॥

२६
पूर्ण समाधान होय निरूपणें । परि जाणपणें बुडविलें ॥१॥
बुडविलें देहातीत समाधान । देह - अभिमान वाढविला ॥२॥
वाढविला तर्क वायां निरूपणीं । जाणिवे पापिणी काय केलें ॥३॥
काय केलें ऐसें जाणत जाणतां । स्वरूपीं अहंता कामा न ये ॥४॥
कामा न ये देहबुद्धीचें जाणणें । दास निरूपणें सावधान ॥५॥

२७
कदाकाळीं राम दासा उपेक्षीना । राम उपासना ऐसी आहे ॥१॥
ऐसी आहे सार राघोबाची भक्ति । भक्तिची विभक्ति जेथें नाहीं ॥२॥
जेथें नाहीं कांहीं वाउगें मायिक । रामउपासक दास म्हणे ॥३॥

२८
जीवन्मुक्त प्राणी होऊनियां गेले । तेणें पंथें चाले तोचि धन्य ॥१॥
जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी । निःसंदेह मनीं सर्वकाळ ॥२॥
मिथ्या देहभान प्रारब्धअधीन । राखे पूर्णपण समाधानीं ॥३॥
आवडीनें करी कर्म उपासना । सर्व काळध्यानारूढ मन ॥४॥
पदार्थाची हाणी हाता नये कोणी ॥ जयाची करणी बोलाऐसी ॥५॥
धन्य पैं ते दास संसारीं उदास । तयां रामदास नमस्कारी ॥६॥

२९
निदान पाहाशी किती । दयाळा निदान पाहासी किती ॥
रामराया निदान. ॥ध्रु.॥
धांव धांव गा सीतापती । तुजवेगळी नाहीं गति ।
नाना शास्त्रें मौनावतीं । नाम तारक वेद बोलती ॥१॥
जळीं पाषाण तारिले जड । मी काय तुज त्याहुनि जड ।
आतां पुरवीं जीवींचे कोड । मनीं घेतला विषयीं मोड ॥२॥
तुझ्या भेटीचें आरत मोठें । मज न गमे कांहीं केल्या कोठें ।
तुजवांचोनि सर्वही खोटें । दीन बालक तुझें धाकुटें ॥३॥
वृत्ति जडली पायांपाशीं । जेवीं गुळाशीं गुंतली माशी ।
देहीं असोनि गुप्त कां होशी । दास उदास देहभावाशीं ॥४॥

३०
फरफरफरफर वोढिती कुंजर । धनुष्य आणिलें भूपें ॥
हरहरहरहर अति पण दुष्कर । सुंदर रघुपति रूपें ॥
वरवरवरवर रघुपति वोढित । दशमुख संतापे ।
करकरकरकर दार करारे । थरथरथरथर भू कंपे ॥१॥
रामे सजीलें वितंड । परम चंड ।
रामें उचिलिले त्र्यंबक । कौशिकऋषि पुलकांक ॥
रामें ओढिलें शिवधनु । सीतेचें तनुमनु ।
रामें भंगिले भवचाप । असुरां सुटला कंप ॥२॥
कडकडकडकड भग्न कडाडे । तडतडतडतड फुटे ॥
गडगडगडगड गगन कडाडी । धडधडधडधड धडक उठे ॥
भडभडभडभड रविरथ चुके । घडघडीत अव्हाटे ॥
खडखडखडखड खचित दिग्गज । चळितकुळाचळ कुटे ॥३॥
दुमदुमदुमदुमदुमित भुगोले । स्वर्ग मृत्यु पाताळे ।
धुमधुमधुमधुम धुकट कर्णीं । विधीस बैसलें टाळे ॥
हळहळहळहळ अतिकोल्हाळ हळ । हरसी पंचक बोले ॥
खळखळखळ उचंबळत । जळसिधूसी मोहो आंदोळे ॥४॥
धकधकधकधक धकीत धरणी । धराबधिर झाले नयन ॥
चकचकचकचक चकीत निशाचर । करविले दीर्घशयन ॥
थकथकथकथक थकीत सुरवर । वरुषती पुष्पें तसे ।
लखलखलखलख रत्नमालिका । जनवकालिक लग्न ॥५॥
जयजयजयजय जयति रघुराजवीरा गर्जती जयाकारें ।
धिमधिमधिम नृपदेवदुंदुभि । गगन गर्जलें गजरें ॥
तरतरतरतरमंगळतुरें विविध वाद्यें सुंदरें ।
समरसरसरस दासा मानसीं रामसीतां वधूवरें ॥६॥

३१
देवाची करणी ऐसी ही ॥ध्रु.॥
पाहा दशगुणें आवरणोदकीं । तारियेसी धरणी ॥१॥
सुरवरपन्नग निर्मुनियां जग । नांदवी लोक तिन्ही ॥२॥
अंडज जारज स्वेदन उद्भिज । निवडिलीया खाणी ॥३॥
रात्रीं सुधाकर तारा उगवती । दिवसा तो तरणी ॥४॥
सत्तासूत्रें वर्षत जळंधर । पीक पिके धरणीं ॥५॥
आपण तरी स्त्रिये निज निर्गुण । दासा हृदयभुवनीं ॥६॥

३२
हें काय तें काय । योग काय भोग काय ॥ध्रु.॥
बाहेर जटाभार काय । अंतरीं संसार काय ॥१॥
बाहेर काषाय दंड काय । आंत अवघें भंड काय ॥२॥
बाहेर सात्त्विक ध्यान काय । आंत मद्यपान काय ॥३॥
रामदास म्हणे पाहे । व्यर्थ भगल करून काय ॥४॥

३३
कल्याणधामा । रामा कल्याणधामा ॥ध्रु.॥
दुःखनिवारण नामक सुखाये । सुखमूर्ति गुणग्रामा । रामा. ॥१॥
दास उदास करी तव कृपा । अभिनव नामगरिमा । रामा. ॥२॥

३४
हे राघवा देईं तुझें भजन ॥ध्रु.॥
अनुताप त्यावरी भक्तियोग । मानिती हें सज्जन ॥१॥
कीर्तन करावें नामें उद्धरावें । अंतरीं लागो ध्यान ॥२॥
दास म्हणे मन आत्मनिवेदन । सगुण समाधान ॥३॥

३५
अणुपासुनि, जगदाकार  ठाणठकार रघुवीर ॥ध्रु.॥
रामाकार जाहली वृत्ति । दृश्या दृश्य न ये हाती ॥१॥
रामीं हरपलें जग । दास म्हणे कैंचें मग ॥२॥

३६
सकळ कळांचा हरि । भेटवा वो झडकरीं ।
तयावीण देहा उरी । नाहीं साजणी ॥१॥
डोलत डोलत चाले । श्रवणीं कुंडल हाले भेदीक वचन बोले । चित्तचोरटा ॥ध्रु.॥
चपळ नयनवाणीं । भेदिलें वो साजणी । पाहतां न पुरे धणी । या डोळ्यांची ॥२॥
ऐसा हरी लाघवी । मुनिजनां वेधु लावी । रामीरामदास कवि । साबडा म्हणे ॥३॥

३७
देव पावला रे देव पावला रे ॥ध्रु.॥
धांवा केला भक्तजनीं । आली देवाची धांवणी ॥१॥
देव घातले बांदोडीं । तेथे राम घाली उडी ॥२॥
रामीरामदासीं भेटी । जाली संसाराची तुटी ॥३॥

३८
कान्हो सांवळा हरि गोवर्धनोद्धारी । रक्षितसे नाना परीं ।
वेणू मंजुळ गे माय वृंदावनीं वो । तेणें नादें मन मोहितो आपण ॥ध्रु.॥
ऐकोनि मुरलीसी तल्लीन जालीं कैसीं । पशुपक्शी जाहली पिसीं ॥१॥
दासां सुख देतुसे तो हा गोपाळ येथें । आसनीं शयनीं कृष्ण भासे ॥२॥

३९
सांगावें कोणें कोणा । चिंता आपली आपणा ।
दुःखें या संसाराच्या शरण जावे नारायण ॥ध्रु.॥
आत्महित करीना जो । तरि तो आत्मघातकी ।
पुण्यमार्ग आचरेना । तरि तो पूर्ण पातकी ॥१॥
आपली वर्तणूक । मन आपुलें जाणें ।
पेरिलें उगवतें । लोक जाणती शाहाणे ॥२॥
सुखदुःख सर्व चिंता । आपली आपण करावी ।
दास म्हणे शोधुनियां । वाट सुखाची धरावी ॥३॥

४०
भेटी दे रे रामा भेटी दे रे ॥ध्रु.॥
प्रीति खोटी खंती मोठी । वाटते रे ॥१॥
विवेक येना विसरवेना । काय करावें रे ॥२॥
तुझिया वियोगें भुवनपाळा । दीनदयाळा दास हे रे ॥३॥

४१
काकडआरती करावी परमात्मया श्रीरघुपति ।
जिवीं जिवा वोवाळीन निजीं निज आत्मज्योति ॥१॥
त्रिगुणकांकडा द्वैतधृतें तिंबिला । उजळिली आत्मज्योती तेणें प्रकाश जाला ॥२॥
काजळी ना मैस अवघें तेज डळमळ ।
अवनी ना अंबर अवघें निर्घोट निश्चळ ॥३॥
उदय ना अस्त जेथें बोध प्रातःकाळीं ।
रामीं रामदास सहजीं सहज ओवाळी ॥४॥

४२
कार्यकर्ता तो झांकेना । वेध लावी विश्वजना ॥१॥
कार्यकर्ता कीर्तिवंत । त्यासी जाणती समस्त ॥२॥
दास म्हणे कुटुंबाचा । तोचि पुरुष देवाचा ॥३॥

४३
दुष्टांचा संहार धर्माची स्थापना । जानकीजीवना राघवासी ॥१॥
विबुधांचा राव आला सोडवणें । आम्हां तेणें गुणें जोडी आली ॥२॥
वैकुंठासी राम गेले विश्रांतीसे । जनांसी उपाये हनूमंत ॥३॥
हनुमंतीं राम आहे निश्चयेसी । रामींरामदासी ऐक्यभार ॥४॥

४४
निज सलगीचें जाणेना । पुढें कोणासी मानेना ॥१॥
आळसी निकामी माणुस । पुढे होत कासावेस ॥२॥
उगेंच नाचतें म्रगडे । कोण पुसतें तयातें ॥३॥
आधीं कष्टानें रगडावें । कार्य बहुतांचें करावें ॥४॥
बहुतां मिळों जाणे । त्यासी भानिती शाहाणे ॥५॥
आहे प्रगट उपाय । दास म्हणे सांगों काय ॥६॥

N/A

References : N/A
Last Updated : December 09, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP