सर्ग सातवा

` सामराज ' अथवा ` साम्राज्य ' या नांवाचा एक कविवामनाचा शिष्य असून आपणास ` साम्राज्य वामन ' म्हणवितो.


विचारें विप्राच्या हृदयगत, चोरून मजसी
रथें येक्या गेला; निपट न सिए बुद्धि सजसि. ।
विदर्भीं वीरांचें घनतर महामंडळ मिळे;
तयांसी युद्धाचा समय पडल्या कृष्ण न ढळे. ॥१॥
मनीं हे आशंका धरुन मुसली तेथुनि निघे,
सवे तें सेनेचे निबह सज घेऊन अवघे. ।
जसा येतां देखे अति निकट काळांतक हळी,
तयाच्या आतंके द्विजतिळक तेथें चळवळी. ॥२॥
द्विजाचा कृष्णाला हृदयगत भावार्थसमजे ।
म्हणे, “ आतां, स्वामी, त्वरित घरिंचा मार्ग धरिजे. ” ॥
अनुज्ञेनें त्याचे द्विजतिलक तेथून उठला. ।
भयें ष्रारामाच्या त्वरिततर तैसा निसतला, ॥३॥
कृतांताचे दाढेपासुन जंव दैवें द्विज सुटे, ।
पुरामध्यें कृष्णागमनभव कोलाहल उठे. ॥
तशामध्यें गेला नृपतितनयेच्या उपवना. ।
न्यहाळीतां तीतें क्षणभरि पडे संशय मना. ॥४॥
सुवर्णाचे वेदीवरि कनकवल्ली उगवली. ।
कशी एकाएकीं कवण चतुरेनें सुकविली ?
सरोव्याजें इंद्रींहुन सतत मुक्तागण गळे. ।
यथाकाळीं किंवा यदुतिललकपुषद्रुम फळे. ॥५॥
विदर्भाची कन्या, अति चतुर,लावण्यपुतळी. ।
वियोगें कृष्णाच्या निशिदिवस जे हे तळमळी; ॥
तसेची हे डावी अतिमृदुल बाहे फुरस्फुरी. ।
शुभाशंसी तैसी तदुपरि लवे नेत्रशफरी. ॥६॥
तों तीस नेत्रातिथि विप्र जाला, । किंवा तिचा प्राण फिरोन आला, ।
भावार्थ हा केवळ भीमकीचा; । आकर्षिला नंदन देवकीचा ॥७॥
प्रसन्न त्याचा मुखंचद्न देखे, । तत्काळ चिंतातम दूर फांके. ॥
कदापि हा हर्ष न माय पोटीं; । विराजतें किंचित हास्य बोंठीं. ॥८॥
तत्काळ तन्वी अति पुष्ट जाली; । चोळी तयेची उतटोन गेली. ॥
संतप्त अत्यंत निवेति गात्रें, । जालीं तयेचीं अनिमेष नेत्रें. ॥९॥
तान्हेजल्यासन्मुख तोय आलें, । बुभुक्षिता भोजन हें मिळालें, ॥
अंधास आकस्मिक दृष्टि आली, । मृतास संजीवनसिद्धि जाली, ॥१०॥
कीं होय चंद्रोदय हा चकोरा, । प्रसन्न वर्षागम येय मोरा, ॥
कीं बोळघे मेघ इदाघकाळीं, । मानी असें भीमकराजबाळी. ॥११॥
तत्काळ कृष्णार्पण देह केला. । तेचा अहंभाव गळोन गेला ॥
अत्यंत निर्वासन चित्त जालें । जेथील तेथें मन हें सुरालें ॥१२॥
निमग्न आनंदरसांत जाली. । सत्कार त्याचा विसरोन गेली. ॥
हे वेष्टिलीसे नृपकन्यकांनीं, । लागे तिचे विप्र ह्मणोनि कानीं. ॥१३॥
आला सखा सन्निध उद्धवाचा, । बोलों न जाणेच विरुद्ध वाचा ॥
जाला असे हा दिस सोनियाचा, । वृत्तांत आयीक बसोनि याचा. ॥१४॥
“ जो आजि आहे पति द्वारकेचा, । यासारखा आजि उदार कैंचा ?
हा वासनाचा हरि आजि भाऊ, । तूंहि शचीची तरि होय जाऊ ॥१५॥
अखंड आखंडळ ज्यास दापे, । कृतांत देखोन जयास कांपे, ॥
अडे जया शेष सहस्रजिव्हा । तेहें वदों मी द्विज काय यज्वा ! ॥१६॥
धरून मौनव्रत वेद चार्‍ही । फिरति शास्त्रांसमवेत दारीं ॥
गाती पवाडे अठरा पुराणें । घेती रती ज्याजनिमित्त रानें. ॥१७॥
हें सांख्य पातंजल पाहियेलें । समग्र वेदांत विचारियले ॥
आलोडिलीं वेदशिरोरहस्यें; । तत्प्राप्ति हे केवळ सामरस्यें. ॥१८॥
जें हें महादैवत दैवतांचें । असे तसें जीवित जीवितांचें; ॥
तें दैवयोगें तुज सांपडावें; । निधान तूझें पदरीं पडावें ॥१९॥
ते द्वारकेचे बहुलोक भोळे । ज्यांच्या घरांतील अपूर्व मोळे; ॥
वागीति ज्यांच्या अति संचरूना । घडे तयां कोठुन पंचसूना ॥२०॥
अपूर्व तो संगम गोमतीचा । जेथें न राहे मळ गोमतीचा. ॥
जाऊन तेथें सज नित्य न्हाती । हीरांकुरांच्या उजळीत वाती ॥२१॥
करीत सेवा तुळशीवनाच्या । वसेत बाळा अळशी मनाच्या ॥
करून संसारिक सर्व कामें । पढेत गोविंदसहस्रनामें ॥२२॥
त्या यादवांचेथिल बायका या । बसेत तूझे गुण आयकाया. ॥
तूं आजि सर्वांहुन धन्य, बाळे, । सनातन ब्रह्म मनांत खेळे. ॥२३॥
सांगों नये कां तुजला भले गे ? । छत्तीसही हे गुण लाभले गे. ॥
अपूर्व हे गोत्र घटीत आहे. । बोलों नये हें; उगलीच राहें. ॥२४॥
ढकल करून कैसें धाडिलें द्वारकेसी ?
नरहरिसहवासें मूकलों या जिवासी. ।
जपतपयजनें जे स्नानसंध्यादि कर्में
जळुन सकळ गेलीं या तुझ्या दौत्यधर्में. ॥२५॥
तां भीमकी मज अनुग्रह थोर केला.
श्रीकृष्णदर्शनमहोत्सव दावियेला; ।
येथून हे सकळ निस्पृहवृत्ति जाली;
बेडी प्रपंचमय सर्व तुटोनि गेली. ॥२६॥
श्रीरंग जो गरुडवाहन शेषशायी,
ब्रह्मादिकां अभयदानवरप्रदायी ॥
म्यां तों तदर्थ अयि यत्न नसेचि केला;
तूझ्या परंतु सुकृतें भगवंत आला. ॥२७॥
वृत्तांत हा सकळ तूज निवेदिलाहे
माझें प्रयौजन अतःपर काय आहे ?
आज्ञा मला त्वरित दे स्वगृहास जाया. ” ।
हें बोलतां वदतसे मग आदिमाया ॥२८॥
“ अत्यंत बापा श्रमलास भारी. । स्वकीय हे वांचविली कुमारी. ॥
जामात हा श्रीपति आणियेला । मदर्थ त्वां उत्कट यत्न केला ॥२९॥
न वर्णवे हा उपकार तूझा । तूं तत्वदर्शी गुरुराज माझा ॥
हे सार्थक क्लेश समस्त जाले. । मनोरथा अंकुर आजि आले. ॥३०॥
उत्तीर्ण आतां तुज काय होऊं ? । प्राणेशदात्या तुज काय देऊं ? ” ॥
बोलोन हे अंजळि जोडियेला; । प्रणाममात्रें द्विज बोळवीला ॥३१॥
जो दैवयोगें कृतकृत्य जाला । तो हा गृहासन्निध विप्र आला. ॥
विचित्र गेहस्थिति देखियेली. । गजांतलक्ष्मी सदनास आली. ॥३२॥
कोणीकडे वाट चुकोन आलों । स्वकीय वीथी विसरोन गेलों ?
किंवा असें जागृत कीं निजेलों ? । उगाच कां मी वचकों निघालों ? ॥३३॥
करून हे तर्क तटस्थ राहे. । चहूंकडे संशयरूप पाहे. ॥
तों ते गृहस्वामिणि देखियेली । जे हे गृहाबाहिर शीघ्र आली. ॥३४॥
विनीत अत्यंत, महा सुशीला, । प्रणाम येऊन पतीस केला. ॥
धरून हातीं सदनांत नेला । सुवर्णपीठावरि बैसविला. ॥३५॥
पदांबुजें क्षाळुन आदरानें । पुशीतसे जे वसनांचळानें. ॥
आचांत जो हा विमळा जळानें । संतोषविला व्यजनानिळानें. ॥३६॥
लेंकी सुना येउन भेटताती; । ते दासदासीजन दाटताती; ॥
स्त्रीपुत्रमित्रादि कुटुंब पाहे । तों सर्वही हें अनुकूळ आहे. ॥३७॥
मनामध्यें विस्मय थोर जाला. । उठोन जों होमगृहांत गेला, ॥
तों सर्व तेथें विपरीत देखे; । जेथील तेथें उगलाच थोके. ॥३८॥
सुवर्णाची वेदी, जडित अरणीयुग्म विलसे;
सुवर्णाचीं पात्रें दृषदुपल सौवर्णच दिसे. ।
सुवर्णाच्या जाल्या सकळहि पहा दर्भसमिधा.
म्हणे हे कृष्णाची सकळ करणी होय बहुधा. ॥३९॥
तदुपरि नृहरीचा शंख गंभीर वाजे.
गजबजिति वर्‍हाडी सर्व धाकेति राजे ।
पडति बहुत तेव्हां रुक्मिय़ाचे धसासे
अगणित शिशुपाळें टाकिजेती उसासे. ॥४०॥
त्रिभुवनपति दोघे रामकृष्णाख्य आले
नृपतिजवळि ऐसें दूत सांगों निघाले ।
अभिनव हृदयीं हा थोर आनंद जाला.
अभिमुख मग त्यांला सैन्य घेऊन गेला. ॥४१॥
तदुपरि हरिसेनेमाजि सेना मिळाली.
ह्मणउन मग तेव्हां दाटि होऊं निघाली. ।
कितियक मग तेथें भेटती एकमेकां;
बसति कितियकांला वेत्रयष्टी अनेकां. ॥४२॥
तदुपरि हरिपूजा हे यथायुक्त जाली.
प्रणति मग तयातें भूप साष्टांग घाली. ।
विनययुत उभा तो हात जोडून राहे.
विनउन नृहरीतें तो पुरामाजि वाहे. ॥४३॥
कळत कळत म्यां तों थोर अन्याय केला.
तदपि परम माझा हेतु तां पूरवीला. ।
सहज मज अनाथा नाथ तूं आजि होसी;
निजपदभजकांचा नित्य कैंवार घेसी. ॥४४॥
अलभ्य तूझा मज लाभ जाला. । पवित्र हा देश समस्त केला. ॥
यानंतरें या नगरांत यावें, । कृतार्थ, कृष्णा, मज तां करावें. ॥४५॥
त्यानंतरें सस्मित कृष्ण बोले, । “ मागील ही लोक समस्त आले; ॥
पुरांत संमर्द बहूत जाला, । होयील कोठें अवकाश यांला ? ॥४६॥
याकारणें निश्चय हा करावा, । अंबालयासन्निध ठाव द्यावा. ॥
आणीकही हा यक हेतु आहे, । पुरांमध्यें तो शिशुपाळ राहे. ॥४७॥
हे आमचे यादव तुंद मोठे; । ते चैद्य पूर्वींहुन लौद खोटे. ॥
वाढेल बोलें वरि बोल जेव्हां । लग्नापुढें येयिल विघ्न तेव्हां. ” ॥४८॥
भावार्थ याचा समजोन गेला. । राजा विदर्भेंद्र वदों निघाला. ॥
अवश्य अंबालय आदरावें, । परंतु मार्गें तरि याच जावें. ॥४९॥
स्थळीं स्थळीं सर्व उभ्या रहाती । पौरांगना, वाट तुझी पहाती. ॥
या कुंडिनाची रचना प्रसंगें । आलोकिजे किंचित दृक्तरंगें. ॥५०॥
विज्ञप्ति भूपें अनुरूप केली, । घडोन चित्तातिल गोष्टि आली. ॥
रामाकडे कृष्ण तथापि पाहे. । तोही तया सम्मत देत आहे. ॥५१॥
विज्ञापिलासे अति गोड बोली । आरूढ जाला हरि चौर डोली. ॥
अक्रूर सानंद रुमालवारी; । सभोंवते चालति वीर भारी. ॥५२॥
ते आतपत्रादिक राजचिन्हें । शोभेति तैसीं तगटीं निशाणें. ॥
वाजेति हत्तीवर ते दमामे । ज्याच्या स्वनें हा शिशुपाळ वामे. ॥५३॥
पुढें पुढें तो गजभार चाले, । त्याहून मागें रहवाळ आलें. ॥
सर्वांत अग्रेसर भूप जाला; । हा द्वारकाधीश पुरांत नेला. ॥५४॥
पहावया नागरलोक आले । आलोकनें नेत्र कृतार्थ जाले ॥
कित्तेक तेथें सतखे करीती । होती नमस्कार अनेक रीतीं. ॥५५॥
सुवर्णपुष्पें उडवीत कोण्ही । जोडीत निष्किंचन हात दोन्ही. ॥
दाटेत नानाविध राजवीथी, । आरातिकें घेऊन भक्त येती. ॥५६॥
क्षणेकसा कृष्ण तटस्थ राहे, । त्या कुंडिनाचे रचनेत पाहे, ॥
कटाक्ष विक्षेप करी हरी तो, । पौरांगनांचीं हृदयें हरी तो. ॥५७॥
पुरांत जेव्हां यदुनाथ आला । आनंद सर्वां वनितांस जाला. ॥
पहावया येति कितेक दारा । घरामधें हा न निघेच तारा. ॥५८॥
लागेत जातां बहु दार वेडें । परस्परें लोटिति बाहुदंडें. ॥
धरून सर्वत्र महाउपेक्षा । करीत कृष्णागमनप्रतीक्षा. ॥५९॥
येकीपुढें धांवुनि येकि जाती । येकीस येकी धरिताति हातीं. ॥
येकीस येकी ढकलून देती । येताति येकीवरि येकि दांतीं. ॥६०॥
धांवोन येती कितियेक न्हातां, । बाळांस कोणी स्तनपान देतां. ॥
उगाळितां चंदन येती कोण्ही, । अधींच कोणी उकलून वेणी. ॥६१॥
वाढावया ओदन नेतनेतां. । धांवेति कोण्ही जळ देतदेतां. ॥
उठेति कोण्ही उटि घेतघेतां । नेत्रांबुजीं अंजन लेतलेतां. ॥६२॥
संभ्रांत अत्यंत कितेक जाल्या, । भूषा विपर्यास करून आल्या. ।
घालून पायीं करकंकणांला । पादांगदीं शोभविती करांला. ॥६३॥
नाकीं बाळ्या, राखड्या कर्णदेशीं, । ताटंकातें गोंविती केशपाशीं, ॥
दंडीं कंठे, बाजुबंदांस कंठीं, । लेती, माजी हार, ताईत, पेटी. ॥६४॥
मुखकमळें उटुनि कुंकुमानें, । नयनयुगें भरिजेति चंदनानें, ॥
अधर सजविताति अंजनानें, । कृतविपरीतदशा निरंजनानें, ॥६५॥
पहावया कौतुक सर्व आल्या, । श्रीकृष्णरूपास भुलोन गेल्या, ॥
आंदोलती मन्मथसिंधुकूळें । उगीच होती श्लथ हे दुकूळें. ॥६६॥
घालून पायीं मणिनूपुरांला । चढेति बाळा निज गोपुरांला. ॥
मुखांबुजीं रोधिति ज्या झरोखे, । कटाक्षपाशीं हरि आजि रोख. ॥६७॥
माड्या, अटाळ्या आणि उंच भिंती । व्यापून कित्येक उभ्या रहाती. ।
प्रासाद नारीमय सर्व जाले, । अनेक संदेह पडों निघाले. ॥६८॥
देवांगना या उतरोन आल्या । विद्युल्लता कीं झळकों निघाल्या. ॥
भासेत किंवा स्मरवैजयंती, । प्रतिक्षणीं चंचळ रूप होती. ॥६९॥
चालेत हे छप्पन कोटि खासे । तयांमध्यें श्रीहरि मुख्य भासे. ॥
त्या तारकांला अति दिव्य आभा । तथापि चंद्रास विशेष शोभा. ॥७०॥
न्यहाळिती कृष्णपदारविंदा । म्हणोनि आलास वरा मुकुंदा. ॥
कित्येक घेती वनिता बलाया । लागेति कोण्हीं वचनें वदाया. ॥७१॥
“ हा देखिला यादवराव जीणें । जालें तिचें सार्थक आजि जीणें. ॥
नीराजिजे मन्मथकोटि जेथें । सौदर्यता वर्णन काय तेथें. ॥७२॥
करून बाई उघडीं कवाडें । हा पाहिजे कृष्ण बरा निवाडें. ॥
हा पाहिलाही पुरता पहावा । न पाहतां हा अनुताप हावा. ॥७३॥
पुढें तुह्मी व्हा, अति डोळसां गे । मागें फिरा जा अति साळसा, गे, ॥
जाला महा सौख्य सुकाळसा गे । उभा न राहेच अमाळसा गे ! ” ॥७४॥
म्हणेत “ हा या समयास आला । पूजाप्रसंगें मधुपर्क जाला. ॥
होणार हें काय असे कळेना । दुर्बुद्धि रुक्मी सहसा वळेना. ॥७५॥
दैवें मिळे हा यिज योग्य जोडा, । परंतु आहे अवकाश थोडा. ॥
हें आमचें पुण्य उभें रहावें, । दोघांजणां सत्वर ऐक्य व्हावें. ॥७६॥
हा कृष्ण काळा अति गौर बाळा । संयोग शोभेल अपूर्व यांला. ॥
रत्ना सुवर्णा जरि भेटि होते, । परस्परें कांति विशेष येते. ” ॥७७॥
इत्यादि संवाद करीत नारी । तटस्थ पाहेत पहा कुमारी. ॥
पुढें पुढें श्रीहरि चालियेला । प्रासाद वैदर्भिक देखियेला. ॥७८॥
चढेत कोण्ही, उतरेत कोण्ही, । पडेत वाटेत गळोन लेणीं, ॥
सिंजारवें व्याकुळ सौध जालें, । निर्जीवही जीवदशेस आले. ॥७९॥
असूर्यंपश्या ही त्वरित बहु धांवेति अबला,
अनभ्यासें मार्गीं स्खळण अति पावेति विकळा. ।
बसे त्यांची तेथें अविरत मनोवृत्ति अवघी,
जयांच्या दासांचें अनिश करिती दास्य चवघी. ॥८०॥
स्वरूपें कृष्णाच्या अविरत जिचें मानस रुधे,
तये वैदर्भीसी मग सहचर येउनि वदे. ।
महा रथ्यामार्गें अभिनव युवा जात असतां,
निजप्रासादाग्रीं चढति सकळा राजवनिता. ॥८१॥
कटाक्षांची छाया घनतर सये ज्यास पडली, ।
विधात्यानें ऐसी अभिनव असे मूर्ति घडली. ।
असे हा कोणाचा कवण मजला तत्व न कळे, ।
अये, ये भूलोकीं कवण तरुणीचें तप फळे. ॥८२॥
न बोले कांहींही मुकुलितमुखी, कुंदरदना, ।
चमत्कारें बाळा झडकरि उठे मंदगमना. ॥
निवारी सर्वांतें करकिसलयें वारिजमुखी ।
तयेची हे हांसे पदर वदनीं लाउन सखी. ॥८३॥
पहाया वैदर्भी मग उपरमाडीवरि चढे ।
अनायासें प्रत्युद्गगमन विधि किंवा तिस घडे. ॥
करें छत्रच्छाया करुनि, वदनीं चंद्रवदना ।
न्यहाळी कृष्णाचें मुखकमल सारंगनयना. ॥८४॥
जिवाचा सांगाती निजनगररथ्या प्रविशला, ।
तिला वाटे चिंतामणिच निधि किंवा गवसला. ॥
बलात्कारें बाळा करुन परती र्‍ही सहचरी, ।
कटाक्षप्रकॆहेपेंयदुपतिस नीराजन करी. ॥८५॥
मनामध्यें जीच्या प्रणयरस हेलावत असे, ।
मुखें बाळा कांहीं प्रकट करि हे बोलत नसे. ॥
अलभ्याच्या लाभें परम हरिखे नीरजमुखी ।
भयें या बंधूच्या हृदय परि यीचें धुकधुकी. ॥८६॥
समारंभें गेला मिरवत पुराबाहिर हरी,
न राहे पाहातां तदपि नृपमूर्धन्यकुमरी, ।
स्वरूपीं हा साक्षादनुभव महा होय जिजला,
अहो आला गेला म्हणुन म्हणणें काय तिजला. ॥८७॥
अहो खासा राहे यदुतिलक अंबापरिसरीं
अनुज्ञेनें सेनापति उतरती स्वस्वशिबिरीं. ।
विदर्भें सर्वांचें अतिशयित आतिथ्य करिजे
पदें श्रीकृष्णाचे दृढ परम हा भाव धरिजे. ॥८८॥
घालून सव्यें मग अंबिकेला । राजा विदर्भेंद्र घरास आला. ॥
सक्रोध रुक्मी तंव फार जाला । द्विजामध्यें वाक्य वदों निघाला. ॥८९॥
पुरोहित च्छांदस फार भोळे, । उगेच हातीं मिरवी कचोळें. ॥
प्रसंग याला सहसा कळेना । सांगीतलें यास कदा कळेना. ॥९०॥
पाचारिल्यावांचुन मूढ आले । हे गोवळी तों विचळोन गेले. ॥
आतां तुम्हीं तांतडी हे करावी । कन्या नृपाची उजवून घ्यावी. ॥९१॥
कृष्णाकडे झोंबति मायबापें । म्हणोन जालीं मज शल्यरूपें. ॥
दावा मसीं उत्कट साधियेला; । भुजंग हा केवळ आणियेला. ॥९२॥
जे जे पदार्थ उपयुक्त विवाहकर्मीं । ते आणवी त्वरित राजकुमार रुक्मी, ॥
जों ज्योतिषी त्वरित लग्नघडीस घाली । तों सन्मुख प्रलयसूचय शिंक जाली. ॥९३॥
येती मेळें वैदिकांपंडितांचे । होती तेथे वाद त्या तांत्रिकांचे. ॥
येतां जातां मंडपीं दाटि केली, । होती ज्यांच्या या वृथा घालमेली. ॥९४॥
म्हणेत कोण्ही मधुपर्क आणा. । म्हणेत कोण्ही नवरीस न्हाणा. ॥
म्हणेत कोण्ही वर सिद्ध जाला. । मागेत कोण्ही चवकास सेला. ॥९५॥
म्हणेत कोण्ही शुभलग्न पाहा. । म्हणेत कोण्ही उगलेच राहा. ॥
म्हणेत कोण्ही नवरी दिसेना, । कोण्हास कोण्ही मगहो पुसेना. ॥९६॥
आयीकतां व्याकुळ फार जाली । उठोन माडीवरि माय गेली. ॥
म्हणे तिला “ चाल; विलंब जाला; । आली असे सन्निध लग्नवेळा. ” ॥९७॥
प्रसुवचनाविलासें होतसे त्रास तैसा
अभिनव करिणीला अंकुशाघात जैसा. ।
तदुपरि जननीच्या ते गळां हात घाली,
अभिमत जनयित्री वाक्य बोलों निघाली. ॥९८॥
“ उगी राहें आतां बहुत वदतां ओष्ट सुकले,
नको बोलों कांहीं, अकथित मला ग्रंथ उकले. ॥
अवो, तूं दैवाची प्रिय, परम अर्धांग हरिचें,
तुझ्या हातां आलें सहज निजसाम्राज्य घरिंचें. ॥९९॥
बाळे, तुवां साहस योर केलें; । हें द्वारकादैवत आणियेलें. ॥
वैकुंठिचा नायक जो मुरारी । तो आठवा हा अवतारधारी.॥१००॥
तुम्हांस दोघांसर पाड आहे. । पूर्वींच हे गोष्टि कळोन राहे. ॥
येथें जयीं हा चुकता विधाता, । येती तयाच्या अपकीर्ति हातां. ॥१॥
सुदेव त्वां चोरुन पाठवीला, । मनोरथा घेउनि शीघ्र आला. ॥
आईक हे अंप्रिळ दृक्प्रसंगें । निधान लाधे तुज दैवयोगें. ॥२॥
माझ्या मनायोग्य घडोन आलें, । परंतु दुःखास्पद येक जालें. ॥
जाऊन तूं नांदसि सिंधुगर्भीं । मी येकली राहिन ये विदर्भीं ॥३॥
मागेल आतां मज कोण जेऊं । कोणास मी उत्तर आजि देऊं ? ॥
वाटेस माझी करिसील खंती, । तूं लागसी आजिपसून तंती. ॥४॥
कठीण आहे स्थिति सासुर्‍याची, । पडेमला गोष्टि तुझ्या जिवाची, ॥
तूझे गुणीं न्यून कदापि नाहीं, । तथापि पाहें सिकऊंच कांहीं. ॥५॥
घालाघाली घालिती नित्य सासा । टाकूं बाई नेदिती हा उसासा ॥
पोटागीची माय मी दूर जालें । लागे आतां नांदणें त्याजखालें. ॥६॥
प्राणेश्वराच्या अति मान्य माता । अलीकडे त्याहुन जाण आतां. ॥
तो सासरा साधु बहूत आहे । आज्ञेंत त्याचे उगलीच राहें. ॥७॥
असे तुझा दारुण जेष्ठ भावा । तूं काय त्याच्या करिसी स्वभावा ? ॥
राहों नको त्याजपुढें उभी गे, । तूं सर्वदा तद्वचनास भी गे. ॥८॥
करीत जा आदर त्या दिराचें । असोत जे माणुसही तिरांचे ॥
तेथें असे गे तुज कोण साहे ? । तूं बोल त्यांचे उगलेच साहें. ॥९॥
अखंड गोपीजनवल्लभाचे । ते आदरीजेत समग्र भाचे. ॥
ज्या लाडक्या लांब महाजिभांचा । तशाच त्या मानितजाय भाच्या. ॥११०॥
असेत तूझ्या नणदा अहेवा, । उगाच तूझा करितील हेवा. ॥
लागेत जेव्हां तुजसी रुसाया । तूं देत जा पाट पिढें बसाया. ॥११॥
असेत जे तूज बहूत जावा । विरोध त्यांसी न करीत जावा. ॥
त्वां आपलीं आवरिजेत मूलें । जे नित्य होती कलहास मूळें. ॥१२॥
तूं सर्व शृंगार करून रातीं । आधीं पतीचें मन घेय हातीं ॥
त्याच्या बर्‍यानें अवघीं बरीं हे । त्या वेगळीं शत्रु तुझीं खरीं हे. ॥१३॥
ते स्वामिसेवा तुजला घडावी. । त्याची तुला आवडि आवडावी. ॥
त्याच्या मनासी मन मेळवावें, । त्वां नित्य त्याचे मिळणीं मिळावें. ॥१४॥
असे जरी तो प्रतिकूल तूसी । तथापि राहें अनुकूल त्यासी. ॥
असेल गे पूर्विल पुण्यठेवा । तरीच हा वल्लभ वश्य व्हावा. ॥१५॥
घरामधें होतिल सुष्टदुष्टें । तथापि तूला अवघीं वरिष्टें. ॥
उगेच त्यांचे गुण नित्य घ्यावे । ते बोलतां जाब कदा न द्यावे. ॥१६॥
टाकून बाई अभिमान द्यावा. । संसार हा गोड करून घ्यावा. ॥
मुखास येति जरि शब्द मोठे । तूझ्या गुणांचें तरि मूळ तूटे. ॥१७॥
बोलोन जासी जरि वांकडेंसें, । पडेल तूझें तुज सांकडेसे. ॥
येका तुझ्या या तरि गोड बोलें । ते वश्य होती अवघींच कोल्हें. ॥१८॥
तूं हा अहंभाव अशेष सांडीं । पदोपदीं त्वां धरिजेत सांडी ॥
वाढेल वा ढंग उगाच जेव्हां । पुसेल तेथें तुज कोण तेव्हां ? ॥१९॥
त्वां आपला चालवितां घरोबा । धरूं नये किंचित मात्र लोभा. ॥
तसें अनासक्तपणें असावें । जळीं जसें पद्मदळें वसावें. ॥१२०॥
साक्षात सापत्न न दाखवावें । प्राणेश्वराचें मन वोळखावें. ॥
माझे तुझें हें ह्मणसील जेव्हां । परस्परें तूटि पडेल तेव्हां. ॥२१॥
हा सोयरा कवळ पांडवांचा । जो दाहकर्ता हरि खांडवाचा; ॥
कृष्णा सुभद्रेहुन आवडावी । मैत्री तिसीं हे तुजसी घडावी. ॥२२॥
संसार हा बुद्बुदरूप आहे. । तो स्वामि तूं ईश्वररूप पाहें. ॥
संसारकृत्यीं तुजला नवोढें. । त्या वल्लभावांचुन कोण वोढे. ॥२३॥
संसार हा यद्यापि सज्ज आहे, । तथापि सांगें गुज येक पाहें. ॥
मिळोन जातें मन दंपतीचें । तरीच घेती सुख संपतीचें. ॥२४॥
आहेसि तूं तों अतिसाहसी गे, । त्याचें कसें कैतव साहसी, गे. ॥
करी हरी आदर गौळणीचा । कशास त्वां त्या म्हणिजेति नीचा ? ॥२५॥
प्रगल्भता येथुन आदरावी, । हे लोकलज्जा हृदयीं धरावी. ॥
लोकापवादास बहूत भ्यावें । टाकून चित्तांतुन पाप द्यावें. ॥२६॥
असेस तूं सुंदर फार गोरी । पापास राहें परि पाठमोरी. ॥
स्वशीळ संरक्षिसि नित्य बाळे, । तरीच तूझा पति तूज भाळे. ॥२७॥
ज्या सासुरां वर्तति गे उधंटा । जनांत त्यांचा बहु होय तंटा. ॥
नांदेति ज्या गे सुलज्जा, विनीता, । सर्वांमुखीं त्या अति कीर्तिमंता ॥२८॥
सर्वांपुढें सत्वर त्वां उठावें. । ते नीजला नंतर त्वां निजावें. ॥
आदासपर्यंतहि अन्न द्यावें । त्यानंतरें भोजन त्वां करावें. ॥२९॥
त्याच्या घरांतील समस्त राण्या, । रांधून वाढून महा शहाण्या. ॥
पट्टांगना राजशिरोमणीची, । होयीं बरी अग्रणि सुग्रणींची. ॥१३०॥
त्वां वागतां पल्लव नीट घ्यावा, । पाचारिल्या मंजुळ जाब द्यावा. ॥
तूं खालती पाहुनि नित्य चालें । तूं बोलवील्याविण गे, न बोलें. ॥३१॥
नेसे बरें उत्तम वस्त्र तैसें । माने पतीच्या हृदयास जैसें. ॥
माने तया भूषण तेंच ल्यावें, । सेवेसि त्याचे परि चित्त द्यावें. ॥३२॥
लावीत जा कुंकुम नित्य भाळीं. । सौभाग्य संसूचक सर्वकाळीं. ॥
घालीत जा कजळ नित्य डोळां. । सिकें बरा तेथिल सर्व मोळा. ॥३३॥
सदा शुचिष्मंत तुवां असावें । सदा सतीसन्निध, गे बसावें. ॥
जे उंबर्‍याबाहिर पाय टाकी । ते आपला लौकिक काय झांकी ? ॥३४॥
धम्मिल्ल अंधंतमरूप भासे । वक्रेंदु नक्तंदिव हा प्रकाशे ॥
म्हणोन तूझीं स्तनचक्रवाकें । कूर्पासका आड दडोन धाकें ॥३५॥
घालीं गळां रत्नजडीत गांठी । देऊं नको भ्रूयुगुळास गांठी. ॥
प्रसन्नता हे वदनीं असावी । तरीच लक्ष्मी सदनीं वसावी. ॥३६॥
सन्मान सर्वां वडिलांस द्यावा, । कुलीन हा शब्द ह्मणोन घ्यावा. ॥
ने घेसि पैशून्य कदापि कानीं, । तरीच तूझें यश लोक वानी. ॥३७॥
तूं संकटीं हा निजधर्म राखें । कदापि संसारसुखें न माखे ॥
तत्काळ घालीं अतिथीस भिक्षा । पतिव्रतांची तरि हेच दीक्षा. ॥३८॥
कधींबधीं तूं मज आठवीं, गे, । त्यासारिखे आत्मज आठवीं गे. ॥
उत्कृष्ट येकीहुन येकयेकी । तथापि तूं वीसिल लेक लेकी. ॥३९॥
त्वां सासुरां उत्तम नांदिजे ते । पतिव्रतासाधन साधिजे तें. ॥
असी तुझी येईल कीर्ति जेव्हां, । मला महा भूषण होय तेव्हां. ॥१४०॥
दुपाराची सायी समज अवघी संपति असे. ।
शहाणे हे कोणी न धरितिच यीचे भरवंसे. ।
अवो, जों जों जावें तंवरि करिजे हात वरता
पहा हा विश्वात्मा तरिच पुरवी देव पुरता. ॥४१॥
अये, ये लक्ष्मीची तिळभरीहि तृष्णा न धरिजे,
यिच्या त्वां या वेचेंकरुनच यिची वृद्धि करिजे. ।
सुते, जों जों हातें करुन विहिरा हा उपसिजे,
पहा तों तों तेणें पुनरपि यथापूर्ण भरिजे. ॥४२॥
समस्तां भूतीं त्वां निरुपम दया नित्य धरिजे,
भुकेले, तान्हेले, शशिमुखि, विशेषें समजिजे. ।
विलासें लक्ष्मीच्या स्वसुहृदय वर्गा न विसरिजे
अनाथा दीनांचा निशिदिन परामर्ष करिजे. ॥४३॥
प्रपंचीं ये देवीद्वजचरणनिष्ठा, तुज असो,
असत्याचा, बाई, तिळभरि घरीं संग्रह नसो. ।
असत्यें हें पाहें अखिलहि महापातक जडे,
जगामध्यें तैसा सहज निज विश्वासहि उडे. ॥४४॥
उपेक्षाबुद्धीनें विचर, चतुरे, संसृतिसुखीं
नको लागों देऊं किमपि, विमळे, पातक नखीं, ।
नको राहों देऊं परुषवचनोच्चारण मुखीं,
अये, या दुर्वादेंकरून तुटती सर्वहि सखी. ॥४५॥
तुला ये स्वप्नींही क्षणभरि असत्संगति नको,
सदा या सत्संगें करुनच अहोरात्र उरको ! ।
अवो, ये संसारींहुन हळुहळू चित्त विरमे,
रमेच्या भर्तारीं तरिच उगलें जाऊन रमे. ॥४६॥
स्वभावें ही बायी परसदन वार्ता करुं नये,
मनोवाचाकायें परपुरुषइच्छा धरुं नये. ।
पतीचे ये पाईं दृढतर धरीं भक्ति बरवी,
पतिप्रेमाची हे प्रकटच गुडी उंच उभवीं ॥४७॥
अवो या चौघांच्या सज अनुमतें चालसि जयीं,
प्रपंच्यामध्यें या किमपि न पडे अंतर तयीं ।
शहाणी तूं पोटांतुन शिकविलें काय तुजला
असें त्वां वर्तावें निपत न लगे बोल मजला ॥४८॥
अवो येतां जातां उठत बसतां कार्य करितां
सदा देतां घेतां वचन वदतां ग्रास गिळितां ।
घरीं दारीं शय्वेवरि रतिसुखाचे अवसरीं
समस्तांची लज्जा त्यजुन भगवच्चिंतन करीं ॥४९॥
निसर्गे स्व्र्गंगापदकमल सौरभ्य धरिते
जिवें भावें ज्याचें जलधितनया दास्य करिते ।
असा हीं हा लोकत्रयपति तुसा इच्छित असे
मला तों ये लोकीं तुजहुन सुते धन्य न दिसे ॥१५०॥
पवित्राही रामायणमय महाभारतकथा
निजस्वामीच्या या स्वजनभजनावांचुन वृथा ।
गुणोत्कर्षे जीचा प्रियतम असे वश्य जिजला
उषःकाळीं तीचें पदयुग दिसो नित्य तुजला. ॥५१॥
मदें तारुण्याच्या कुळवति अहंकार न करीं,
विनीते वैदर्भी पतिवचन हातावरि धरीं, ।
पतीची हे सेवा विरुपम महा साधन तुझें
कुळस्त्रीला बाई पतिविण नसे दैवत दुजें. ॥५२॥
पतीच्या ये पायीं व्रत नियम दानें विलसती
सदा जेथें गंगादिक सकल तीर्थें निवसती ।
धरावी ते माथां पतिचरण संक्षाळण जळें
जयाच्या संस्पर्शें तरति सकळ बांधवकुळें. ॥५३॥
तुझ्या या स्वामीचें चरित वदतां वेद शिणती
कदां ‘ नेणॊं नेणों ’ शुक सनक योगींद्र ह्मणती ।
सहस्रां तोंडाचा फणिपति धरी शेष लधिमा
अचिंत्य श्रीकृष्ण प्रणविनितदुच्छिष्ट महिमा ॥५४॥
प्रसंगें हें बाई सहज पति निंदा जरि घडे
गळत्कुष्ठें जिव्हा नियत शतधा होऊन झडे. ।
विहारीं आहारीं निज पतिस वंचीत असती
वटाग्रीं तत्कर्में प्रतिफळित सर्वांस दिसती ॥५५॥
विषदें स्वामीच्या घडि घडि उगें तोंड मुरडीं
अवो ते तों पल्ली नियत अथवा होय सरडी ।
उगी वारंवार क्षितिपतिसुते जें पुटपुटी
अपंकीं तें भेकी अयुत शतजन्में चटपटी ॥५६॥
न वर्तसी हा विधि बोलिला गे, । त्या सासुर्‍यांचा तरि बोल लागे ॥
देऊन मातेवरि त्या शिव्यांला । म्हणेत या यीस कशास व्याला ॥५७॥
तूं आजि रोडेजुन हाड होसी । चिंतातपें फार सुकोन जाशी ॥
अक्रोश अत्यंत करूं नये गे, । प्रणास अंबेस करून ये, गे. ” ॥५८॥
असें जिला जें शिकवून माता । म्हणे “ वल्ली सत्वर चाल आतां ॥
आरोपिलें बीज फळास आलें । सहाय तूझें तुज पुण्य जालें ॥५९॥
हा तूज शिक्षाविधि मात्र केला । सर्वांस बाई उपदेश जाला ॥
वर्तोत ऐशाच समस्त मूली । घरोघरीं मृण्मय जाण चूली ” ॥१६०॥
बोले तिची ते तिजसी कुमारी । “ मोठ्या बळें येय पहा मुरारी ॥
हा सर्व कारुण्य कटाक्ष तूझा । येथें नसे किंचित यत्न माझा ॥६१॥
जें जें मला तूं सिकवीस कांहीं । वर्तेन तैसी अनुमान नाहीं ॥
तूं सर्व माते समजेसि तत्वें । नसेत तूझीं वचनें कवित्वें ॥६२॥
माते चमत्कार अपूर्व पाहें । जगामध्यें वर्तत एक आहे ॥
मूर्धापुढें काढुनि ठेवियेला । तथापि नाहीं यश ये सुनेला ॥६३॥
सासू सुनेला सिकवीत आहे । वर्ते कसी आपण हें न पाहे ॥
कार्पण्य कारुण्य कटाक्ष लेशी । पांडित्य हें सर्व परोपदेशीं ॥६४॥
हे तों नसे गे मज आजि चिंता । माझी असे लाज तया अनंता ॥
माया महा - नाटक सूत्रधारी । तो आजि आहे मज अंगिकारी ॥६५॥
कल्पद्रु हा कल्पित मात्र देतो । चिंतापणी चिंतित पूरवीतो ॥
अकल्पितां चिंतित अर्थदाई । समर्थ लक्ष्मीपति शेषशायी ॥६६॥
निर्वाह कर्ता भगवंत आहे । घालूनि जो यावरि भार राहे ॥
संपन्न जो कीं सकळां पदार्थीं । तो काय धाडील तया अनर्थीं ॥६७॥
यदुपति - पदपद्मीं माय माहेर माझें,
मज निमित न व्हावें चित्त हें व्यग्र तूझें ।
सहजच बळरामासारिखा पाठिराखा
म्हणउनि कवणाचा हा असे आजि लेखा ॥६८॥
करूं नको खेद कदापि माझा, । खेदें तुझ्या होईल खिन्न राजा. ॥
घडे परामर्ष कसा क्षितीचा । तुझा विधेयी सुत ये रितीचा. ॥६९॥
असे प्रजापालन धर्म मोठा, । तुम्हांस तो याहुन अन्य खोटा; ॥
घडे प्रजापालन नित्य जेथें । हें ऐहिकामुष्मिक सर्व तेथें. ॥१७०॥
दयानिधि श्रीहरि शीघ्र आला, । म्हणोन माझा वारि बोज जाला. ॥
होणार तो होउन अर्थ जातो, । मागें पुढें हा उपहास होतो. ॥७१॥
हे सर्व बाहेरिल सिद्धि जाली, । घरामधें यावरि गोष्टि आली. ॥
म्यां, काय, माते उगऊन द्यावें ? । कळेल तें यावरि त्वां करावें. ” ॥७२॥
तेव्हां ते मातेनें सकरुणकरें क्कारि धरिली,
तयेचे ते मांडीवरुन मग खालें उतरिली. ।
भुजेष्येच्या वक्रेंकरून विनवी प्राणपतिला
करावें देवीचें झडकरि तुम्हीं दर्शन यिला. ॥७३॥
सभेमध्यें राजा प्रकट मग हें बोलत असे,
“ यिला तेथें नेणें परम मज आवश्यक दिसे. ।
न केल्या हें ऐसें नियतच कुळस्वामिनि खिजे,
अहो जाल्या आतां तुरुत नव तें विश्व उपजे. ” ॥७४॥
पित्याचें हें जालें वचन गरळप्राय तनया,
हरिद्रोहें मोठा उपजत पढे नित्य अनया ।
हरिद्वेषें ज्याला जनकजननीद्रोहच घडे
तयासाठीं कैसें विविध निरयद्वार उघडे ? ॥७५॥
कथा हे कृष्णाची सकळ जगदानंदजननी.
मनोभावें ईचें श्रवण करिजे नित्य सुजनीं. ।
प्रसंगें श्रोत्यांचे सकळहि महा दोष हरती;
यदूत्तंस प्रेमें विषयरस गोडी विसरती. ॥१७६॥
इति श्रीमद्भगवद्भक्तपदानुरक्तकविसामराजविरचिते रुक्मिणीहरणकाव्यें रुक्मिण्युपदेशो नाम सप्तमः सर्गः ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : August 31, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP