सर्ग चवथा

` सामराज ' अथवा ` साम्राज्य ' या नांवाचा एक कविवामनाचा शिष्य असून आपणास ` साम्राज्य वामन ' म्हणवितो.


सर्ग चवथा
ते भीमकी सर्व उपाय जाणे; । वैदग्ध्य तीचें तिस एक बाणे; ॥
सुदेव नामा द्विज सोमयाजी । स्वकीय दौत्यार्थ मनांत योजी. ॥१॥
जो वेदवेदागतदर्थवेत्ता, । लक्षांमधें जो द्विज येक वक्ता, ॥
कथा, पुराणें, इतिहास, जाणें, । तो काय हे लौकिकरीति नेणें ? ॥२॥
अत्यंत आराधक केशवाचा, । नामें करी नित्य पवित्र वाचा; ॥
बोलोन जो गोड बहूत आहे, । असत्य ज्याला सपनीं न साहे; ॥३॥
तो आणवीला अति गुप्त वाटे, । तथापिही साध्वस ईस वाटे. ॥
हळू हळू तीससमीप आला, । तेणें नमस्कार तयास केला. ॥४॥
बसावया आसन देववीलें, । सखी करें अर्चन त्यास केलें, ॥
मंत्राक्षता हा द्विज तीस देतां । म्हणे, “ वर स्बेच्छित पाव आतां. ” ॥५॥
अशांत आली तिजला त्रपा हे । सखीकडे किंचितमात्र पाहे. ॥
ते भाव तीचा समजोन गेली. । त्यासीं सखी वाक्य वदों निघाली. ॥६॥
विषयविषधरीं हें डंखिली आजि भारी.
कवण पुरुष येथें निश्चयें यास भारी ? ।
झडकरि बहु आणी गारुडी द्वारकेचा,
त्वरित बह्तु राखें प्राण ये दारिकेचा. ॥७॥
मुद्रामुद्रित पत्रिका करुनि ते विप्रापुढें ठेविली.
तेणें ते उचलून भीमकसुता सव्यें असे घेतली. ।
येकाकी अवघी तजून सुकृती जो द्वारके चालिला,
जेणें श्रीपतिपादपंकजयुगीं आत्मा असे वाहिला. ॥८॥
ते बोळवीत कितियेक तयास आली;
तेथेंच ते सहचरी मग राहिवेली. ।
बाला विषण्ण तितक्यांतच फार भागे,
कृष्णास ते हळुच तोंडनिरोप सांगे. ॥९॥
“ सर्वोत्तमा, उत्तम पाय तूझे । देखोन हे नेत्र निवोत माझे. ॥
पाहें तुझी वाट, अनाथनाथा. । सनाथ कैं हा परि होय माथा ? ॥१०॥
न सांपडे रूपठसा असा हा, । केले जरी तां अवतार दाहा. ॥
ते कोण तूला नवरी वरीना, । मनामधें पाय तुझे धरीना ? ॥११॥
महाभुजा, राजकुलावतंसा, । मनोरमा मानसराजहंसा, ॥
चातुर्य तूझें कवणांत आहे ? । या क्षीरनीरा निवडोन पाहें. ॥१२॥
सर्वत्र उच्चावच भेद आहे । बरें विचारून मनांत पाहें. ॥
दिसेत हें पांडुर तक्रदुग्धें । जाणोन घ्यावीं परि हें विदग्धें. ॥१३॥
मी तों नसें, रे, तुज पारखीसी. । पदोपदीं कां मज पारखीसी ? ॥
मी जाणतें केवळ जो हरीसा । तो आजि होसी मज जोहरीसा. ॥१४॥
माझा जळो हा जिव वीसराळू ! । तूं तों जगन्नाथ महाकृपाळू. ॥
वाटे तुझें चित्त सहस्र ठायीं । हा चालला प्राण तुझेच पायीं. ॥१५॥
तूझी कृपा पातळ फार झाली, । तेणें दशा हे मज आजि आली; ॥
गळेत नेत्रांतुनि वारिधारा । तूं पाव शोकार्णवकर्णधरा. ॥१६॥
स्थळांतरीं देइल तात जेव्हां, । हा प्राण मी ठेविन काय तेव्हां ? ॥
घडोन माझी तुज आजि हिंसा, । या सोदराचा जिव होय हिंसा. ॥१७॥
तथापि मी हे विनती करीतें, । तजूं नये ये निज किंकरीतें. ॥
जाईल हा केवळ जीव माझा, । जगामधें लौकिक होय तूझा. ॥१८॥
मी काय नेणें तुज मानसींही ? । नसे तुझा हा अभिमान सिंहीं. ॥
हा देह माझा, हरि, भागलाहे. । गोमायु कैसा हरिभाग लाहे ? ॥१९॥
प्रसन्न, देवा, मुखचंद्र तूझा । ध्यातो सदा चित्तचकोर माझा. ॥
मी चातकी, तूं घन नीळ, कृष्णा; । तथापि, पाहें, नवजाय तृष्णा. ॥२०॥
तूझे पदीं नित्य अनंग नाचे, । तूं भूलवीशी जन अंगनांचे, ॥
त्या गोपिकाही असती सदेवा, । तूं पावशी ज्या असतींस, देवा. ॥२१॥
मी नंदिनी राजस भीमकाची । होईन दासी घरिंची फुकाची; ॥
पावेन तूझ्या चरणारविंदा । प्रसाद ऐसा करिजे मुकुंदा. ॥२२॥
हा जीव माझा तुजला न लाहे, । करीन याची तरि आजि लाहे. ॥
कामानलीं आहुति इंद्रियांची, । देईन हें निश्चित जाण यांची. ॥२३॥
तं आजि माझी करिशी उपेक्षा, । मी जीवनाची न धरीं अपेक्षा. ॥
जसा तसा केवळ काळ कंठीं; । प्रस्थान मत्प्राण करीत कंठीं. ॥२४॥
असें नसे ग्रंथिस पुण्य कांहीं, । जेणें तुझें मी पदयुग्म पाहीं. ॥
आतां कृपा केवळ तां करावी, । स्वकीय दासी स्वकरीं धरावी. ॥२५॥
फासां पडें केवळ मी कुरंगी, । ये पंजरीं, रे, अडके विहंगी, ॥
पंकीं पडे दुर्बळ गाय जैशी, । पदोपदीं व्याकुळ होय तैशी. ॥२६॥
तूं सोडवीं जीवविहंग माझा, । होईल येणें पुरुषार्थ तूझा. ॥
त्वन्नाममुक्ताफळमात्र चारा, । तूझे पदीं केवळ यास थारा. ॥२७॥
जैसें तुला मी नवरी न मानें, । करूं नको ज्येष्ठ कदापि मानें. ॥
मी धाकटी होइन धाकटीची । दासी करीं, रे, मज शेवटींची. ॥२८॥
करीन हे केवळ पादसेवा; । घरामधें हा न करीन हेवा; ॥
स्सेवीन पादोदक नित्य तूझें; । टाकान, देवा, अभिमानवोझें; ॥२९॥
लावीन तूझा पदरेणु भाळीं; । उच्छिष्ट सेवीन यथोक्त काळीं; ॥
त्वत्पादनिर्माल्य धरीन माथां; । गाईन, देवा, भवदीय गाथा. ॥३०॥
मार्गीं तुझे लोचनयुग्म लागे, । त्वच्चिंतनीं मानस नित्य भागे, ॥
झाली असे हे वचनीय सीमा; । तूं सर्व जाणेसि, गुणाभिरामा. ॥३१॥
माझे मनीं जाण विकल्प नाहीं, । करूं नको आणिक कल्पनाही. ॥
धरूं नये संशय यावयाचा, । पुढें नये, रे, रस या वयाचा. ॥३२॥
अनर्कसंपर्क कदापि, पाहें, । शुचिव्रता हे नलिनी न साहे; ॥
वसेत नाना विपिनांत वल्ली, । अनादरीना सहकार मल्ली ’. ॥३३॥
हा प्राणनाथास निरोप सांगें. । विप्रा, तुला आणिक येक मागें. ॥
हे गोष्टि कोणास कळों न द्यावी, । गुरूपदेशाहुनि गूढ घ्यावी. ॥३४॥
म्यां वांचणें हें त्वदधीन झालें, । हाता तुझ्या हें यश थोर आलें. ॥
धर्मांमधें उत्कट धर्म, पाहें, । परोपकारासम कोण आहे ? ॥३५॥
द्विजा नको फार विलंब लावूं, । कदापि तूं रिक्त नकोच येऊं. ॥
जाणेस तूं तेथिल सर्व दीक्षा, । करून बोलें समयप्रतीक्षा. ॥३६॥
जो द्वारकेची करि पातशाही । वरील तो काय जशातशाही ? ॥
त्याचे मनीं हा मज ठाव व्हावा, । प्रसंग ऐसा बरवा पहावा. ॥३७॥
कार्यांतरीं सक्त असेल जेव्हां । करूं नको गोष्टि मदीय तेव्हां. ॥
होईल आकस्मित हे अवज्ञा, । उपाय खुंटे अवघाच विज्ञा. ॥३८॥
मार्गीं चुकवून समस्त मेढें । तूं द्वारकापत्तन पाव नेटें. ॥
ज्याचे पदीं हा दृढ भाव माझा, । तो सर्व निर्वाह करील तूझा. ॥३९॥
अपार संसारसमुद्र पाहीं; । तरावया यास उपाय नाहीं. ॥
तें द्वारकेचें घननीळ तारूं । येवोनि येथें, मज शीघ्र तारू. ॥४०॥
माझा असे परम दारुण ज्येष्ठ बंधू;
चैद्येश्वरा अभिलषी अविवेकसिंधू. ।
धाकेत हे नव, पुरातन कारभारी;
यांचे मतीस बहु होय विकार भारी. ॥४१॥
तूं मायबाप, कुळगोत समस्त माझें;
मी धाकटें निपट बाळक आजि तूझें. ।
तूं येकदा परमजीवनदान देईं,
तो देवकीतनय घेऊन शीघ्र येईं ” ॥४२॥
नरेंद्रदुहिता असें हळुहळू जर्‍ही बोलते,
प्रभातसमयप्रभा तदपि दुष्ट डोकाविते. ।
चरित्र समजोनि हें स्तिमित राहिली भीमकी.
द्विजास म्हणते, “ द्विजा, परम शीघ्र तूं जाय, ” कीं. ॥४३॥
विहंगमकुळें महाविटपिकोटरीं बाहती,
सुशीतल हळूहळू सुरभिवातही वाहती. ।
विदर्भभवनीं उठे विविधवाद्यसंघोष तो,
अनेकनुतिपाठकस्तुतिभरेंच जो पोषतो. ॥४४॥
कलकलति कपोती; पूर्व दिग्भाग हांसे,
हळुहळु मग तेणें चंद्र निःश्रीक भासे; ।
तशिच उडुगणांला तूटि येऊम निघाली;
तदुपरि तनुता हे दीपशोभेस आली. ॥४५॥
गलबल बहु जाली दासिकांची पहांटे,
म्हणवुनि परते हे, मायचा धाक वाटे. ।
सकल निजसंख्याही लागती जों उठाया,
झडकरि तंव आली भीमकी पूर्वठाया. ॥४६॥
चिरतर व्यवसायें भागली फार बाळा.
क्षणभरि तिस लागे जागृतीमाजि डोळा. ।
तदुपरि गरुडीं हे कृष्ण आरुढ देखे,
यदुतिलक जिचे हा गुंतला पूर्ण भाके. ॥४७॥
अति रुचिर विकासे कांस पीतांबराचे,
प्रकट परम झाली मूर्ति त्या श्रीधराची ।
निरुपम उमटे हे कुंडलांची झळाळी,
मणिमयमुगुटाची दीप्ति फांके निराळीं. ॥४८॥
अभिनव वनमाळा कंठदेशीं विलासे,
मुखकमल इचें जो देखतां देव हांसे. ।
यदुपति अवतारी, जो गदाचक्रधारी,
झडकरि इजसाठीं धांविलासे मुरारि. ॥४९॥
हळुच जंव पलंगीं कृष्ण येवोनि बैसे,
मुकुलित तंव होती हे इचे नेत्र तैसे. ।
क्षणभरि निजअंकीं भीमकी बैसवीली,
मुखकमलिं तियेच्या स्वीय तांबूल घाली. ॥५०॥
तदुपरि रव बाळा आयके सारिकेचा,
यदुपति मग तेणें हारपे द्वारकेचा. ।
खडबडुन उठे ते भीमकी नित्सुरीशी;
मुख्कमलसुगंधें लाजवी कस्तुरीशीं. ॥५१॥
तदुपरि निजशय्या चांचपों जों निघाली,
हरिचरणवियोगें घाबरी फार झाली. ।
उठवुन सखियांचें दीप लावोन पाहे,
नलगत निधि हातीं, ते यथावस्थ राहे. ॥५२॥
पक्षद्वारें विप्र बाहेर आला, । क्षेमाशंसी त्याजला काक गेला; ॥
जैसा देखे पूर्णकुंभद्वयाला । तैसा त्याला पूर्ण आनंद झाला. ॥५३॥
सवत्स त्या सन्मुख गाय आली; । सुवासिनीची मग भेट झाली; ॥
देखोन सालंकृत कन्यकेला, । मुहूर्त तेणें अति धन्य केला; ॥५४॥
अनुपद मग तेथें पातली होमवेळा,
म्हणवुन मग तेणें घाबरा विप्र जाला; ।
अविदित निजगेहा ये महातांतडीनें;
विधि विहित तयाचा होय येके घडीनें. ॥५५॥
उदयगिरिशिरीं हें भानुबिंब प्रकाशे,
रजनिजनित जेणें कोकशोकाग्नि नासे. ।
मुकुलित कमलांचा भार उल्हास पावे,
मधुकरपटलीला बंधनिर्मुक्ति फावे. ॥५६॥
द्विज सविनय बंदी सूर्यनारायणाला,
क्षणभरि मग ठेवी वेदपारायणाला. ।
वचन गृहपतीसीं व्यक्त बोले तपस्वी,
“ मज गुरुतर कार्यीं तां करावें यशस्वी. ॥५७॥
सकळहि निजपोष्यें रक्षि तूं आश्रयाशा;
तुजविण मज नाहीं आणखी आश्रयाशा. ।
सदय उभयकालीं हव्य घे नित्य होमीं.
यदुतिलक पहाया चालिलोंसें, अहो, मी. ” ॥५८॥
प्रवासविधि आदरें त्वरित फार केला असे,
निदेश नृपनंदिनीविहित मानसीं हा वसे. ।
कमंडलु करीं धरी, स्मरणमालिका आदरी,
घरींहुन निघे महामुदित होय जो अंतरीं. ॥५९॥
अतिसभय उलंघी हा पुरद्वार जेव्हां,
घरिंहुन सुटलोंसें वाटलें त्यास तेव्हां. ।
यदुपतिपुरमार्गा रोधिती राजसेना,
तदपि हरिकृपेनें यास कोणी पुसेना. ॥६०॥
तदुपरि मग त्याची अंगना होय जागी.
“ त्वरित उठ ” म्हणे हे कन्यकेला बजागी. ।
घडिघडि वदलें जे वल्लभासी चिरीटी,
म्हणवुन बहुधा हे होय ऐशी करंटी. ॥६१॥
न पुसत गृहिणीला द्वारके विप्र गेला,
म्हणवुन इजला हा थोर संताप आला. ।
त्वरित बहुत गेली लांसि धांवोन तेथें,
नरपतितनया हे बैसली श्रांत जेथें. ॥६२॥
बहुत मुखबळें हे फार बोलों निघाली,
तदपि नृपसुतेनें आदरें बैसवीली. ।
हळुच तिस खुणेनें हे नवारीत आहे,
पदपि परम अज्ञा बोलतां ते न राहे. ॥६३॥
“ अलगट बहु होशी ढाल; हें काय केलें ?
लटिकपण कसें या सोदरा आणियेलें ? ।
न पुसत पति माझा धाडिला हा विदेशा,
झडकरि तुझिया या आगि लागो निदेशा ! ॥६४॥
घडिघडि अशनाला मागती जें अपत्यें,
उगिच मज दिलीं हें व्यर्थ कां गाईपत्यें. ।
हळुहळु सरती या सर्वही दर्भमुष्टी;
घृतविरहित, बाई, चाअल्ती काय इष्टी ? ॥६५॥
निपट अपुरती हे बुद्धि या वल्लभाची,
उगिच विजवटी हे आणिली काल भाची. ।
क्षणभरि मज दृष्टी नावडे ज्येष्ठ धाडी,
अझुणिवरि इला हा सासुर्‍यांही न धाडी. ॥६६॥
सकलहि करिजेतें जीव देऊनि वाणी,
परि विखळ मिळाली सून मोठी निवाणी. ।
तिजहुन नवसांची नाति झाली तिवाटी,
अनिश सहचरींशीं खेळतां धान्य वाटी. ॥६७॥
अवगुण नणॅंदेच्या चोरट्या पोरट्यांचे
घडिघडि किति सोसूं ? सांग या कारट्यांचे. ।
मज तरि सपनींहीं हा देसेना अधेला,
अझुणि तरि न लागे आगि यांच्या क्षुधेला. ॥६८॥
अति मधुर न साहे कोरका कोरण्याला;
अझुणिवरि समस्तें नित्य धाकों कण्यांला. ।
रुचिर बहुत लागे भाकरी नाचण्यांची,
जिजवरि मज भाजी नावडेना चण्यांची. ॥६९॥
हळूहळू जरि सासू होय अत्यंत वृद्धा,
तदपि बहु भुकेनें होतसे नित्य क्रुद्धा. ।
निरुपम धरिंचा हा जांच कोणास सांगों !
घडिघडि उसनें मी धान्य कोणास मागों ? ॥७०॥
परम विरस वाक्यें बोलते जों असाळी,
तंव नरपतिपत्नीं येतसे तेच काळीं;।
लगबग उठतां हे राजकन्येस जाली,
परि बहु अविदग्धा बोलतां ते न भ्याली. ॥७१॥
हळूच तिस म्हणे हे, “ गागसी कां, गव्हारे ?
गृहविषयक चिंत्ता सर्व येथून वारे. ।
जडित वलय तीणें हातिंचें काढियेलें,
द्विजपतिगृहिणीला गुप्तसें अर्पियेलें. ॥७२॥
रुचिरतर तयेच्या वस्तु येतांच हातां,
हळुच ‘ पति नये कां ’ते म्हणे व्यक्त आतां. ।
परम परिजनांची दाटि होऊं निघाली,
म्हणुन निजगृहातें ते चुकावून गेली. ॥७३॥
निशि दिवस जयानें सेविजे कृष्णावर्त्मा,
द्विजतिलक न लागे तो कसा कृष्णवर्मा ? ।
अपरिमित पवाडेदेवकीनंदनाचे
विविध, रुचिर, गातां, थोर आनंद; नाचे. ॥७४॥
अनिश यदुपतीचा हा महाछंद लागे,
म्हणवुनि अतिपंथा चालतां तो न भागे, ।
अति कठिण अव्हांटा चोरटा होति वाटा,
हरिगुणकथनाचा फूटला ज्यास फांटा. ॥७५॥
सहज कठिण आहे काळ जो हा उन्हाळा,
प्रकट परम तेथें होय माध्यान्ह वेळा. ।
तदपि हरिकृपेची सावली यास आली,
सहज निजसुखाची थोर विश्रांति झाली. ॥७६॥
त्रिविध मग तयाला पाठिंचे येति वारे,
त्रिविधहि परि जींहीं क्रूर संतापेवारे. ।
अगणित सुकृतांचे सांडवी नित्य साठें,
अति तिखट तया कां मोडती द्रव्य वाटे ? ॥७७॥
द्विजवर निजमार्गीं नित्य येकांत सेवी,
सहज हरिकृपेच्या जो सिदोरीस जेवी. ।
यदुपतिभजनाचीलागली थोर गोडी,
हखूहळु विषयांची वासना यास सोडी. ॥७८॥
तदुपरि उपदेशी आपल्या वा मनाला,
क्ष्णभरि परि नेदी ठाव जें कामनांल; ।
सदयजनितचिंता सर्वदा जें न साहे,
यहुकुलमणि जेथें नित्य येवोनि राहे. ॥७९॥
परम निलज चित्ता कां पडे हे कुटुंबी,
तुजवरि विषयांची हे पडे नित्य झोंबी. ।
यदुपति तुजला हा ज्या घरांतून काढी,
सदयहृदय तो हा हातिचें काय सोडी ॥८०॥
लगबग करिसी हे, व्यर्थ हांवे भरेसी;
क्षणभरि परि माझें तूं मला नावरेसी, ।
लुडबुड करिशी तूं जी पुढें, ते पुसेना,
तदपि तुज विषादावेश कांहीं असेना. ॥८१॥
पुसत पुसत आली या शरीरा जरा हे,
परि हरिभजनाचीं वासना वांझ राहे. ।
विषयबडिशलेमें गुंतसी मोहजाळीं ।
कवण विषय आतां सोडवी अंतकाळीं . ॥८२॥
चलन वचन राहे, भोल भार्या मायी साहे;
जवळि कदि न वाहे, नित्य सक्रोध पाहे; ।
अझुणि तरि, मना, तूं सांडि येची करावी,
झडकरी उगली हे शांतिकाता वरावी. ॥८३॥
अनुभविशि शरीरीं वातना ना उदंडा,
तदपि अझुणी तूझा होत नाहीं उगंडा ।
घडिघडि युवतीच्या गुंतशी स्नेहपाशीं;
विषयविचति नाही सर्वथा तुजपाशीं. ॥८४॥
निशिदिनि परनिंदा स्वाद घेतां न राहे,
क्षणभरि हरीनामस्पार्श जीला न साहे ।
अतिमधुर रसे हे सर्वदा तृप्त केली,
तदपि मज रसज्ञा काय उतीर्थ झाली ॥८५॥
अनिश परकलत्रालोकनाभ्यास ज्यांला,
हरिचरणदिदृक्षा काय हे होय त्यांला ? ।
म्हणु घडिघडी हें लोचनें आंवरावीं,
हरिचरणरित्रें अंतरी ही स्मरावीं. ॥८६॥
क्षण परिचय झाल्या जन्मजाशीं सुटेना,
परम विषम काळीं सोयरा जो विटेना, ।
निधि निरवधि पुण्यें लाधसी जो फुकाचा,
विसरसि परि कैसा कंद तो चित्सुखाचा ? ॥८७॥
अनिश विधिनिषेधीं काल वेंचोनि गेला;
क्षणभरि हरि नाहीं ध्यानयोगास आला. ।
गृहसुतधनदारा राहती सर्व येथें,
हरिविण तुज, मूढा, सोडवी कोण तेथें ? ॥८८॥
मजलि जवळि आली, हें अहंभावओझें
झडकरि त्यजिं आतां. कोण अज्ञान तूझें ! ।
हळुहळु अवघा हा सोडिं संसारधंदा,
क्षणभरि अवकाशें चिंतिं आनंदकंदा. ॥८९॥
अझुणि तुज मना हें काय कर्तव्य आहे ?
हरिचरणसरोजीं लीन होवोनि राहें. ।
स्मरण करिं हरीचें, व्यर्थ आयुष्य वेंचे;
मरण जवळि आलें; काळ कोणास मेचे ? ॥९०॥
दृढतर भगवंतीं पूर्ण सद्भाव ज्याचा,
सहज मग तुटे हा वासनाबंध त्याचा. ।
करुनि विषयसेवा वासना वा मुराली.
त्रिभुवनपति त्याला दूर नाहीं मुरारी. ॥९१॥
हरिपदिंहुनि कैंही चित्त ज्याचें निघेना,
क्षणभरि विषयांचा वास नांवास घेना, ।
गुणगणन हरीचें नित्य जेणें जपावें,
भवसलिलनिधीचा पार तो येक पावे. ॥९२॥
अगणित फिरशी तूं, पामरा, हीन योनी.
अपर गति दिसेना, तूज जन्मा नयोनी. ।
निजगुरुचरणाब्जीं सर्वदा चित्त देईं,
हरिभजककुळीं हें जन्ममागोन घेईं. ॥९३॥
परति धरुनि आतां लाज तूं चित्स्वरूपीं.
न कळत पडशी ये व्यर्थ मोहांधकूपीं. ।
कळस जरी तुझे ये कल्पनेचा ढळावा,
त्वरित गुरुकृपेचा सोहळा आढळावा. ॥९४॥
त्यजुनि विषयधंदा सद्गुरूच्या नियोगें.
सगुणभजनमार्गीं लाग सत्संगयोगें. ।
जंव जंव तुजमध्यें चित्स्वरूप प्रकाशे,
तंव तंव अवघें हें गाढ मोहांध नासे. ॥९५॥
विषयविषममार्गीं चालतां क्लेश होती,
पदर धरुनि ओढी हे जगन्मुक्तिदूती. ।
हरिवरणसरोजीं क्षेस्त्रसन्यास घ्यावा,
तरिच मग न व्हावी हे परावृत्ति जीवा. ॥९६॥
निरुपम ममतेची लागली दाट झाडी,
त्वरित बहुत आतां पाय येथून काढीं. ।
यदुपतिपदवी हे येकल्या तों न चाले;
सहजच तुज साही आडवे शत्रु आले. ॥९७॥
अझुणि तरि विवेकें तूं विचारूनि पाहीं
गुरुविण तुजला हा सर्वथा मार्ग नाहीं. ।
सहज तुज यशोदापुत्र हा सांपडावा
कवण अपरजन्मीं योग ऐसा धडावा ? ॥९८॥
क्षणभरि परि याचे पाय आतां न सोडीं,
त्वरित गुरुपणाची लावि यासींच गोडी. ।
बहुतच तुज जें कीं वाटती, रे, अशक्यें;
सहज समजशी तें तत्वमस्यादिवाक्यें. ॥९९॥
गोकुळीं प्रकटली द्युति सांवळी,
गोधनें द्रुमतळीं सहसा वळी; ।
जे सनातन जगत्रय सावली;
तत्पदीं हृदयवृत्ति विसांवली. ॥१००॥
द्वारकापतिपदांबुजमार्गीं
लागलें मन, विटे अपवर्गी. ।
वासुदेव मज कौस्तुभधारी
आठवे नलिननाभ मुरारी. ॥१०१॥
जो श्रुतींसही अयोनिज वाचे
तो सदैव तुज यो निजवाचे. ।
xxxxxxxxxणपद्म जयाचें
जाण धाम विषयोर्मिजयाचें. ॥१०२॥
जो परात्पर अगोचर वेदां,
नातुडेच हरि जो मतभेदां, ॥
गोपवेष मुरलीधर ध्यावा,
तोच त्या मुखिं अहर्निश गावा. ॥१०३॥
जो नसोनही असे परि साचा;
जाण जो परिसही परिसाचा. ।
नाकनायक जसा कर जोडी,
मानसा, करि तयाचिच जोडी. ॥१०४॥
कृष्णमूर्ति हृदयीं जडलीसे, । तत्पदा दृढ मिठी पडलीसे, ॥
विश्व हें सकळ तन्मय जालें, । द्वैतभान अवघेंच उडालें. ॥१०५॥
माय, बाप, कुळगोत, विसांवा, । सोयरा, सजण हाच असावा. ॥
अंतरंग तुज याहुन नाहीं, । हें मना हित विचारुन पाहीं. ॥१०६॥
कृष्ण, केशव, जनार्दन, नामें । घेत जाय करितां निज कामें. ॥
वासुदेव, घननीळ फुकाचा । सांपडे, निधि अनादिसुखाचा. ॥१०७॥
हा भवाब्धि मजला न उलंघे, । धुंडितां विषय मानस लंघे. ॥
सांवळा, सगुण, जो अवतारी, । कर्णधार उतरील उतारीं. ॥१०८॥
सोयरीं सकळ, सादर, मित्रें, । व्यर्थ जाण अनुकूल कलत्रें; ॥
चित्त हें नलगतां भगवंतीं । सोडवी कवण येउन अंतीं ? ॥१०९॥
ज्ञानराज मजला गुरु भेटे, । शोकसागर समग्रहि आटे. ॥
नित्य वोहट पडे ममतेला । ठाव होय चढता समतेला. ॥११०॥
हा भरें मज भवज्वर आला, । ज्ञानराज मज वैद्य मिळाला. ॥
मी उदास विषयांवरि जालों, । सद्गुरू, शरण तूजच आलों. ॥१११॥
व्यापिलें मज मनोभवरोगें, । जांचलों विषयसंचययोगें. ॥
पादुकाभजनभेषज द्यावें; । सद्गुरु, यश अमोलिक घ्यावें. ॥११२॥
ओघ येति तुझिया स्तवनाचे, । भारती बहुत यास्तव नाचे. ॥
वेग जाय मुरडोन मनाचा, । नित्य उत्सव तुझ्या नमनाचा. ॥११३॥
मातलों धनमदें, जगदीशा, । नाठवेशि मज, गोपतिवेषा. ॥
वेदवेद्यचरिता, भगवंता । येईं मी शरण तूज, अनंता. ॥११४॥
पुत्रमितपशुबांधवमोहें । नित्य संसृतिसुखांतचि पोहें. ॥
नाठवे चरणपंकज तूझें, । सोडवी कवण बंधन माझें ? ॥११५॥
झोंबलीच मदनानल आहे, । रक्षिता कवण आणिक आहे ? ॥
मत्सरें हुरपळे मन माझें, । यास जीवन पदोदक तूझें. ॥११६॥
मोहमैंद भुरळें मज घाली, । वृत्ति हे तुज पराड्मुख झाली. ॥
घातला दृढ गुणत्रयफांसा, । लाविशी हरि किती मज झांसा ? ॥११७॥
कृष्णजी, परमदीन दयाळा, । पावना, पतितपावनशीला, ॥
सोयर्‍या, सुसखया, रण सोडीं. । येक वेळ मज येथुनि सोडीं. ॥११८॥
आयके द्विज अजमिळ नांवें, । ज्याजला पतितराज म्हणावें, ॥
उद्धरे निधि अनाचरणाचा, । हा प्रताप तुझिया चरणांचा. ॥११९॥
रूप हें सहज सुंदर तूझें । नोळखे हृदय पामर माझें. ॥
हें निरर्थक भरे बहु हांवे; । या अनित्य विषयांवरि धांवे. ॥१२०॥
कोटि जन्म जपतां तुजला, रे, । लाधसी अवचिता मजला, रे. ॥
सांपडेस निज संचित ठेवा, । कोण यावरि विसंबिल देवा ? ॥१२१॥
निद्रितास मज जागृत केलें, । हातिंचें सकल संचित नेलें. ॥
तोडिलें स्कल बंधन, बापा, । कोण हे हरि तुझी अनुकंपा ! ॥१२२॥
खेळ हा सकल मोडुन नेला, । थोर तां मज अनुग्रह केला; ॥
दावणीहुनि सुटे पशु जैसा । होय मी सहज मुक्तच तैसा. ॥१२३॥
नित्य संसृतिभयें सुखदुःखें । देखिलीं विविधरूप अनेकें. ॥
सोडवीं त्वरित, यादवराजा. । गुंतसी कवणिया निजकाजा ? ॥१२४॥
तूजवीण मन पांगुळ जालें, । आंधळेपण मातीसही आलें. ॥
ऊचलून कडिये मज घेईं, । कृष्नरूपजननी स्तन देईं. ॥१२५॥
तूं असोनि जननी कनवाळू, । मी तुझें परमबाळ भुकाळू ॥
काय होय अति वो रस तूझा, । प्राण जाय तुजवांचुन माझा. ॥१२६॥
मी विषण्ण विलपें परदेशीं, । तू कसें मज अनुत्तर देशी ? ॥
वत्सले, त्यजुनि बाळक तान्हा । काय हा पळविशी निजपान्हा ? ॥१२७॥
बाळकें रुसतसे जननीसीं, । काय माय रुसते परि त्यासीं ? ॥
वासुरां तजुन गाय खडाणी । काय जाय पशुजाति अडाणी ? ॥१२८॥
श्वापदांत भयभीत वराकी । काय हे हरिणि पाडस टाकी ? ॥
चारया जरि विहंगिणि जाते, । ते फिरोन पिलियांप्रति येते. ॥१२९॥
कोरडें मुख पडे बहु माझें । न द्रवे अझुणि मानस तूझें. ॥
म्यां किती तरि हरी विलपावें ? । कोण काळ तरि तारिल पावें. ॥१३०॥
कंठ हा गहिंवरें बहु दाटे. । लाविं सत्वर मला निज वाटे. ॥
पंथ हा जरि तुझा उमगावा, । पाश हा तरिच, रे, उगवावा. ॥१३१॥
हा हरिस्तव पढे जन जो कीं, ! तो कृतार्थ म्हणवी नर लोकीं. ॥
प्रेमपात्र हरिचें बहु व्हावा; । संसृतिश्रम तयास न व्हावा. ॥१३२॥
बहुविध महायासें ऐसें मनाप्रति बोलतां,
स्मरणहि शरीराचें ज्याला नसे पण चालतां; ।
तदपि करुणासिंधू पंथा स्वकीय न टाकवी,
जळनिधिमहासीमेमध्यें हळू हळु पाववी. ॥१३३॥
नयनकमलें विप्राचीं ते क्षणेंच न्यहाळिती
कळस कनकप्रासादांचे जडीत झळाळिती. ।
तदुपरि पहा आलीं नामें तदीय मुखांबुजा.
जय जय कृपासिंधो, बंधो मदीय, अधोक्षजा. ॥१३४॥
यदुपतिपुरी विप्रातें ते दिसों जंव लागली,
प्रणति भगवद्भक्तें तेव्हां असे मग घातली. ।
सजल नयनें झालीं, प्रेमें गळा बहु दाटला,
अतिशयित हा रोमांचांचा समूहही थातला. ॥१३५॥
कथा हे कृष्णाची सकल जगदानंदजननी.
मनोभावें ईचें श्रवण करिजे नित्य सुजनीं ।
प्रसंगें श्रोत्यांचे सकलही महादोष हरती;
यदूत्तंसप्रेमें विषयरसगोडी विसरती. ॥१३६॥
इति श्रीमद्भगवद्भक्तपदांनुरक्तकविसामराजविरचिते रुक्मिणीहरणकाव्ये द्वारकादर्शनो नाम चतुर्थः सर्गः

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-08-31T21:16:13.7530000