प्रस्तावना आणि चरित्र
` सामराज ' अथवा ` साम्राज्य ' या नांवाचा एक कविवामनाचा शिष्य असून आपणास ` साम्राज्य वामन ' म्हणवितो.
या ` रुक्मिणीहरण ' काव्याच्या आम्हांस दोन प्रती मिळाल्या. दोन्ही प्रती रा. रा. जगन्नाथ रघुनाथ अजगांवकर यांजकडून आल्या. यांपैकीं पहिली प्रत सुमारें दीड वर्षापूर्वीं मिळाली. हिची लांबी ८ १/४ इंच व रुंदी ४ इंच असून पानें १३९ आहेत व दरएक पानावर ८ ओळी असून त्या स्पष्ट व सुट्या अक्षरांनीं लिहिल्या आहेत. या प्रतींतला पहिला सर्ग - पहिलीं आठ पानें - गहाळ झाला आहे, व दुसर्या सर्गापासून पुढें शेवटपर्यंत पोथी शाबुत आहे. प्रतीचे शेवटीं ` शके १६६६ ॥ रक्ताक्षीनामसंवत्सरे पौष शुद्ध प्रतिपदा तद्दिनी समाप्तं ॥ ' असा प्रतीच्या काळाचा उल्लेख केला आहे. याच प्रतीवरून आम्हीं हा ग्रंथ छापण्यास सुरुवात केली व दोन ते आठ सर्ग छापून पुरे केले. आठव्या सर्गाचे शेवटीं सर्गसंख्या १७९ असे शब्द आहेत. ते तसे नसून १७९ हा या आठव्या सर्गाच्या पद्यांचा वाचक असा आंकडा आहे. १८० वा श्लोक केवळ उपसंहारात्मक आहे.
या प्रतीवरून ग्रंथ छापल्यावर रा. अजगांवकर यांस दुसर्या प्रतीचा शोध लागला, व ही थोड्याच दिवसांत आमचे हातीं आली. ही प्रत ८ १/२ इंच लांब व ४ इंच रुंद असून हींत १४३ पानें आहेत व हीवर दर पृष्ठास ८, क्वचित्त ९, या प्रमाणें ओळी लिहिल्या आहेत. हीही प्रत पहिल्या प्रतीप्रमाणेंच स्पष्ट आहे. दोन्ही पूर्तकाली खर्ची कागदावर पोथीवजा लिहिल्या आहेत. दुसरींत शेवटीं ` शके १७२४ दुंदुभीनामसंवत्सरे श्रावणकृष्णत्रयोदश्यां तद्दिनी समाप्तं हस्ताक(?)क्षर स्मार्तोंपनामक धोंडभट्टेन लि(खि)तं शुभं भवतु ' असा उल्लेख आहे. या दोन्हीही तिसर्या एकाच प्रतीवरून केलेल्या नकला असाव्या असें दिसतें.
या येवढ्या मोठ्या काव्यांत कवीनें आपल्या स्वतःबद्दलची माहिती किंवा ग्रंथरचनेचा कालही कोठेंच दिला नाहीं. इतकेंच नव्हे, तर आपल्या नांवाचाही तो उल्लेख करीत नाहीं.
` सामराज ' अथवा ` साम्राज्य ' या नांवाचा एक कवि महाराष्ट्रकाव्यवाचकांच्या परिचयाचा आहे. हा वामनाचा शिष्य असून आपणास ` साम्राज्य वामन ' म्हणवितो. ` बापु, ', विश्वनाथ,' ` साम्राज्य ' हे सर्व वामनाचे शिष्य, आपल्या गुरूचा उल्लेख काव्यांत स्पष्टपणें करतात. परंतु ` रुक्मिणीहरणा ' चा कर्ता जो ` सामराज ' यानें आपल्या सबंध ग्रंथांत वामनाचा उल्लेख कोठेंही केलेला नाहीं. यावरून हा ` सामराज ' वामनशिष्य जो ` साम्राज्य ' याहून भिन्न पुरुष असावा असें वाटतें.
काव्याच्या भाषेवरून व दुसर्या अंतःप्रमाणांवरून हा वामनाचा समकालीन असून याचा वामनाच्या काव्यांशीं चांगला परिचय असावा असें दिसतें. कोल्हापूर प्रांतीं पुढें मागें याचे आणखी कांहीं ग्रंथ व माहिती मिळण्याचा संभव आहे.
N/A
References : N/A
Last Updated : August 30, 2016
TOP