सर्ग पहिला

` सामराज ' अथवा ` साम्राज्य ' या नांवाचा एक कविवामनाचा शिष्य असून आपणास ` साम्राज्य वामन ' म्हणवितो.


वंदीं, मना, पाय गजाननाचे, । जे सिंधु कल्पद्रुमकाननांचे, ॥
जे वंदिल्या विघ्न पळोन जाती, । स्फुरेतही फार कवित्वजाती. ॥१॥
जे घेय हातीं बरवी विपंची, । जीच्या गुणें होय विधि प्रपंची, ॥
जे राजहंसावरती विलासे, । तीचे पदीं मस्तक ठेविलासे. ॥२॥
वात्सल्य मोठें तुजला विलासे, । जगद्गुरू, तूं मज लाविं कांसे, ॥
आणीक कांहीं तुजला न मागें, । येईल आधार धरून मागें. ॥३॥
वाचेस जे वाट कदा न फूटे, । जेथें मनाची गति नित्य खुंटे, ॥
अद्वैत ज्या आड दडोनि राहे, । त्याची किली तूज अधीन आहे. ॥४॥
जे नित्य मायापट आड लावी, । ते पूत्ति कैसी मज आडलावी ? ॥
भवार्णवीं पाय तुझे जपावे, । तरीच हें ज्ञानसरोज पावे. ॥५॥
कामानळें जीव महा अहाळे. । याला परब्रह्म कसें न्यहाळे ? ॥
त्वन्मूर्ति चित्तांतुन हे गहाळे. । नसे मला वोळखि ये रहाळे. ॥६॥
हे बुद्धि माझी मजला चुकावी, । म्हणोन म्यां वाट तुझी चुकावी. ॥
मदांध मी ये भरलों अव्हाटे. । तूं लाविं आतां मज नीट वाटे. ॥७॥
तूं आंधळ्याची अससील काटी; । हें पांगुळें वागवितोसि पोटीं; ॥
तूं द्रौपदीचा अति साहकारी; । असे तुझी दृष्टि परोपकारीं. ॥८॥
तां वाधवीला महिमा धुरूचा; । तां दीधला बाळकही गुरूचा; ॥
तां सोडवीलें व्यसनीं गजेंद्रा; । उपेक्षिसी तूं मज कां, उपेंद्रा ? ॥९॥
माझा तुला काय विषाद आला ? । किंवा कृपासागर शुष्क जाला ? ॥
प्रसन्न नाहीं मन आजि तूझें ? । कीं आड आलें दुरदृष्ट माझें ? ॥१०॥
कीं लागली हे तुज योगनिद्रा ? । न पावसी कां करुणासमुद्रा ? ॥
करूनि दीनावरती कृपा हे । तूं आजि डोळे उघडूनि पाहें. ॥११॥
तूं आपणा दीनदयाळु ऐसें । जनामध्यें या म्हणवीस कैसें ? ॥
मला प्रपंचांतुनि शीघ्र काढीं, । कीं आपुलें बीरुद आजि सोडीं. ॥१२॥
असेत माझ्या अपराधकोटी; । तथापि मागें पसरून वोंटी. ॥
मत्सारिखीं हे कितियेक वेडीं । तूझे घरीं काय असेत थोडी ? ॥१३॥
अजामिळा पावन त्वांच केलें. । पातित्य नाम स्मरतांच गेलें. ॥
तां तारिला व्याध महाभिमानी. । तां बैसवीली गणिका विमानीं. ॥१४॥
संहारिलें तां खरदूषणांला. । तां दीधलें राज्य बिभीषणाला. ॥
तूं अर्जुनाचे तरि अश्व धूसी. । तूं संकटीं पावसि तद्वधूसी. ॥१५॥
अनेक इत्यादिक उद्धरीसी, । मदर्थ कां संशय हा धरीसी ? ॥
असेच जे जे तुज अंतरेती, । कोण्या उपायें जन ते तरेती ? ॥१६॥
आयुःपयाचा अति गोड प्याला । हळूहळू काळबिडाल प्याला. ॥
त्वद्योग तो या समयांत नाहीं; । चुके कशी हे यमयातना हीं ? ॥१७॥
शरीरसंरक्षणमात्र केलें; । वेंचून वायां वय सर्व गेलें. ॥
आतां असे अंत समीप आला, । म्हणोनि तूझा अवलंब केला. ॥१८॥
तां घातलें ये मज मोहजाळीं. । कर्में मला बंधनरूप जालीं. ॥
हा वासनाबंध कदा सुटेना. । जन्मावळीचें बिरडें तुटेना. ॥१९॥
प्रपंच हा दुर्वह कोण वोढी ? । पदोपदीं यास पडेत वोढी. ॥
जेथें निधींचा समुदाय आटे, । कल्पद्रुमांचे न पुरेत सांटे, ॥२०॥
स्वधर्म येथें न घडेच कांहीं, । कधीं सुखाचा लवलेश नाहीं. ॥
महार्घ येथें परमार्थ जाला. । विवेक दारिद्र्यदशेसि आला. ॥२१॥
माया मला लागट हे न सोडी. । अहो, दुराशा मन नित्य ओढी. ॥
उभेच संकल्प, विकल्प दोघे, । विरक्ति तेथें मज काय भोगे ? ॥२२॥
तृष्णापिशाची बहु फार वाढे । त्रैलोक्यसंपत्ति धरून दाढे; ॥
क्षणेकही येथुन हे न फांके, । ब्रह्मांड जीच्या पदरांत झांके. ॥२३॥
या वासनेची सुजि वोसजेना. । पदानुसंधान तुझें सजेना. ॥
निवृत्ति कैसी मजला पचावी, । प्रपंच ईला जरि साप चावी ? ॥२४॥
हा क्रोधचांडाळ सदा विटाळी, । संपर्क याचा जन कोण टाळी ? ॥
देहीं वसे वाघिणीसी अहंता, । असेस तूं येक इचा नियंता. ॥२५॥
आधार तूं स्थावरजंगमांचा. । तूं भारही होसि भुजंगमाचा. ॥
अपार तूझा महिमा कळेना. । स्वरूप तूझें मज आंकळेना. ॥२६॥
असेत तूझीं चरितें विचित्रें । तसींच नामें सकळें पवित्रें. ॥
मदीय जिव्हेस अनेक कामें. । कदापि ईला न वसे रिकामें. ॥२७॥
परापवादें अथवा विटाळें । इला कसें नाम तुझें उटाळे ? ॥
जे काटली नित्य महानृतानें । ते क्षाळिजे कृष्णकथामृतानें. ॥२८॥
समस्त शास्त्रांस पडेत मौनें. । शुकादिकांही विपरीत भानें. ॥
वेडावती वेद समस्त जेथें, । करूं तुझें वर्णन काय तेथें ? ॥२९॥
तथापि बांधेन कथा विचित्रा, । पदोपदीं पावन जे पवित्रा. ॥
तुझे कृपेचा परि ईस पाया । पडे, तयीं हे नपवे अपाया. ॥३०॥
जे बोलिली भागवतीं पुराणीं, । विस्तारिली जे पुरुषीं पुराणीं, ॥
पवित्रकर्ती सकळा जगा या, । आधार ही थोर असे जगाया. ॥३१॥
त्वद्वर्णनीं हे रसना कवीची । प्रवेशतां, येती विवेकवीचि. ।
मिळेत ही अर्थ बरे नवेची. । तो वंचलासे जन जो न वाची. ॥३२॥
असे मर्‍हाटी निजदेशभाषा, । नयेत उक्ती बहुशा विशेषा; ॥
तथापि जे कीं निजभक्त तूझे । न पाहती ते गुणदोष माझे. ॥३३॥
अगत्य नाहीं जनरंजनाचें. । लागे तुझें ध्यान निरंजनाचें. ॥
आराधनीं अन्य उपाय नाहीं; । समर्पितों याच उपायनाही. ॥३४॥
करूं न जाणें बहुशा जपाशी, । तथापि लागे मन तूजपाशीं. ॥
नेणें(चि) बालाबगलादिसेवा. । जाणें तुजे केवळ पाय, देवा. ॥३५॥
माझा मना, तूं अससी बराडी; । कां भीमकीचा नव्हसी वराडी ? ॥
हा स्नेन नाहीं वरपंगतीचा. । तूं लाभ घेयीं वरपंगतीचा. ॥३६॥
असे हरीही निजसोयरा, हो. । याच्या पदाची तुज सोय राहो. ॥
हें ब्रह्म नाना अवतारधारी; । तथापि हा कृष्णच तूज तारी. ॥३७॥
सत्संग आवश्यक आजि पाहें, । जो ईश्वरप्राप्तिस हेतु राहे, ॥
जो सज्जनांच्या निववी मनाला, । जो लाजवी, वा वनचंदनाला, ॥३८॥
राजा असे थोर परीक्षिती, हो. । कीर्ती सुधांशूस परीक्षिती हो. ॥
पुसे कथा तो मग हे शुकासी, । जीणें असे अत्यय पातकासी. ॥३९॥
द्वैपायना, योगिवरा, द्विजेंद्रा, । पौराणिका, सर्वकथासमुद्रा, ॥
ज्या सांगसी कृष्णकथा उदारा, । त्या नाशिती नित्य मनोविकारा. ॥४०॥
कथारसें या मना हें विटेना । श्रीकृष्णपायींहुनि, हो, सुटेना. ॥
कथा पुसे आणिकही नवीना. । कां आपला संशय नाशवीना ? ॥४१॥
हे रुक्मिणी, देववरें वरोरू, । नेली कसी द्वारवतीस भीरू ? ॥
स्वयंवरीं कृष्ण कसा वरी तें ? । केलें कसें साहस सावरीते ? ॥४२॥
जिंकूनियां मागध, शाल्व राजे, । प्रताप ज्यांचा जगतींत गाजे, ॥
तेणें विवाहीं विधि राक्षसांचा । केला कसा ? सांग उदार साचा. ॥४३॥
जाला असे जो उपजोन योगी, । क्षणेकही जन्मसुखा न भोगी, ॥
न आतळे जो द्विज अंशुकासी, । कृष्णीं महा भक्ति जया शुकासी, ॥४४॥
कृष्णास तो वंदुनि विप्र भावें । प्रवर्तला तच्चरणप्रभावें. ॥
तत्वार्थ सांगेच परीक्षितीसी । असे कथा हे तुज रक्षितीसी. ॥४५॥
साहित्यस्वारस्य समस्त वेंचे । शद्बोदधीचे निवडून वेंचे. ॥
पवित्र हे कृष्णकथा रसाला, । जे नित्य आणि रस नीरसाला. ॥४६॥
गंगाप्रवाहोपम वोघ जेथें । न जाय हा काय अशेष तेथें ? ॥
करूनि चित्तें अति सावधानें । हे आयकावी हरिसन्निधानें. ॥४७॥
जो हा महाविष्णु विराटरूपी, । चराचराची रचना निरूपी, ॥
तो गर्भ राहे मग देवईला. । संरक्षिती येउन देव ईला. ॥४८॥
सदा निराकार, निरीह भासे, । जें शुद्ध चैतन्यपणें विकासे, ॥
निर्माण ज्यापासुन विश्व जालें, । तें देवकीचां उदरास आलें. ॥४९॥
अव्यक्त जें व्यक्तदशेस आलें, । कारागृहीं तें अवतीर्ण जालें. ॥
भासे अकस्मातच बाळसेंही. । तत्काळ आलें मग बाळसेंही. ॥५०॥
हा बाळ सर्वांहुनि आगळा, हो. । गळेत त्या आपण आगळा, हो ! ॥
तत्काळ जालीं उघडीं कवाडे. । तो पावला गोकुळही निवाडे. ॥५१॥
येऊन पाजी स्तन मावशी हे. । हा काय नेणे मग मावसी हे ? ॥
हा मोडिला बाळपणींच गाडा, । न भीतसे बाळक जो निगाडा. ॥५२॥
करीं करी रत्नजडीत सिंपी, । ते माय आगोदर पाय शिंपी. ॥
घालून पायांवर दूध पाजी, । ब्रह्मादि विश्वेश्वर ज्यासि राजी. ॥५३॥
उत्पन्न ज्यापासुन भूतसृष्टी, । काढी तयाच्या बहु फार दृष्टी. ।
जो पूतनास्तन्यविषास प्याला, । ते माय देते गरळा तयाला. ॥५४॥
करी जो विश्रांती श्वशुरसदनीं शेषशयनीं,
कदा योगींद्रांचे क्षणभरि पडेनाच नयनीं; ।
पयःपानीं त्याचें मुखकमळ दुग्धें करिं भिजे.
सुखें ये मातेच्या करयुगुलतल्पावरि निजे. ॥५५॥
न जाणें प्राग्जन्मीं कवण तप मातेस घडलें ?
यदीय प्रारब्ध प्रगटच असें हें उघडलें. ।
जयाचे हे ब्रह्मादिक विबुध लागेत चरणीं,
तया बाळा घेते उचलुन कडे नंदगृहिणी. ॥५६॥
अलिंदीं नंदाचे घन, रुचिर चैतन्य मिरवे,
जयाच्या माथांचे नव कुरळ शोभेत बरवे. ।
निजच्छंदें रांगे, विमल तलहातद्वय मळे,
पदस्पर्शें ज्याच्या तरुयुगुल तत्काल उमळे. ॥५७॥
अनंत ब्रह्मांडें यदुदरदरीमाजि दडती,
जया चैतन्याचें स्तवन करितां वेद अडती, ।
जगत्कर्ता धाता सहज उपजे नाभिकमळीं,
विकासे त्याचा हा रुचिर रहिवास व्रजकुळीं. ॥५८॥
धरूनि हे अर्भकदेहलीला, । जे शोभवी प्रत्यह देहलीला, ॥
हे लोक ज्याच्या उदरांत माती । तें ब्रह्म टाकी वदनांत माती. ॥५९॥
जें अंगणीं येउनि नित्य खेळे, । मनोदयें जें चिखलांत लोळे, ॥
नंदालयीं बाळक घोंग त्याचें, । ब्रह्मादिकां दुर्लभ सोंग त्याचें. ॥६०॥
घरामधें अर्भकरूप रांगे, । पदोपदीं जो नवनीत मागे, ॥
ज्याच्या पदीं होती पवित्र गोठे, । ज्याच्या भयें गोरस नित्य गोठे. ॥६१॥
हा आंगणीं घे अगणीत धांवा, । तथापि याच्या न पुरेत हावा. ॥
अग्रण्य भूमीरुह हा चडाया, । निष्णात गोपीगृह ऊघडाया. ॥६२॥
जो गोंविला बाळकवांसुरांनीं, । करीतसे नित्य निवास रानीं, ॥
मुखांबुजीं मंजुळ वेणु वाहे, । गोपांगनांची हरि वात पाहे. ॥६३॥
वेणुस्वनें गोपसमूह मोहे; । टाकून धेनू वृषभास दोहे ! ॥
त्या गोपिका होति समस्त मुग्धा, । प्रत्यक्ष ज्या कीं घुसळीत दुग्धा. ॥६४॥
घरोघरीं चौर्य करी मुरारी. । कुलांगनांच्या भुलवी कुमारी. ॥
असे जरी आपण आलकाहीं, । न देय येऊं पण आळ कांहीं. ॥६५॥
मिळोन तेथें मग गोपिकांहीं, । वदेत येऊन विरुद्ध कांहीं. ॥
आम्ही तुसीं काय वदों, यशोदे ? । हा लाडका लेंक घरीं वसों दे. ॥६६॥
कर्में करी नित्य महा अचाटें. । केलीं मुलें हीं अवघीं अचाटें. ॥
दारापुढें खेळतसे लगोर्‍य़ा. । लेंकी, सुनाही भुलवील गोर्‍या. ॥६७॥
हा खेळ खेळे यमुनाकदंबीं. । हा दृष्टि लावी ललनानितंबीं. ॥
असेत बाला सकला निरीहा; । तथापि वोढी उगली निरी हा. ॥६८॥
पतिव्रता ज्या अति आगळाल्या, । निजव्रतापासुनि त्या गळाल्या. ॥
चौढाळिलें गोकुळ सर्व येणें, । हें लोक बोलों न सकेत भेणें. ॥६९॥
उन्मूळिलीं काय म्हणोन झाडें ? । हा नासला बाळ तुझांच लाडें. ॥
कसे असे काय तर्‍हीं अरिष्टें । या गोकुळा आणिल हीं अरिष्टें. ॥७०॥
राम, कृष्ण, सखि, सोदर दोघे. । वाढवीस सुत नित्य अमोघे. ॥
त्यांत हा वडिल फार गुणांचा. । धाकटा चपळ हा अगुणांचा. ॥७१॥
सौंगड्यांस उठवून पहांटे, । नंदसूत सकळांत रहाटे. ॥
पाहतां हृदयतस्कर मोठा, । नेतसे सकळ गोरसमोटा. ॥७२॥
देवडे पद, उभारूनि बाहे, । गोधनें सकळ हे हरि बाहे. ॥
उठोन त्याची जननी यशोदा । तत्काळ त्याच्या मग जाय शोधा. ॥७३॥
देखोन ईला हरि वावहावा । धरी यशोदा मग पाव डावा. ॥
बांधे तयाच्या उदरास दावें. । सौभाग्य ईचें कवणें वदावें ? ॥७४॥
समर्थ मायार्गल ऊखळाया, । तो गोंविला बाळक ऊखळा या. ॥
मातेस अन्याय समस्त मागें । त्या गोपिकांचे अपराध सांगे. ॥७५॥
सस्नेह माता मग त्यास सोडी; । तथापि तो नित्य करीच खोडी. ॥
अधासुरा मारुनियां, बकाला, । तसेंच वत्सासुरधेनुकांला, ॥७६॥
तृणापरी त्या तृणनामकाला, । भंगूनियां सौख्यसुकाळ केला. ॥
सर्व प्रकारें व्रज रक्षियेला. । प्रत्यक्ष हा पावक भक्षियेला ! ॥७७॥
जो नांदवी उत्कट गोपवाडे, । गाती तयाचे बरवे पंवाडे. ॥
पीतांबर, श्यामलरूपधारी, । सवेत्रवंशीकर जो मुरारी. ॥७८॥
कृत्यस्त्य पादांबुज, माळ कंठीं, । गोवृंद चारी यमुनोपकंठीं. ॥
माथां धरी रम्य मयूरबर्हें. । कर्में करी नित्य महा अनर्हें. ॥७९॥
वाहे सिदोरीस उदास अंसीं, । उत्पन्न त्याचें भय होय कंसीं. ॥
अक्रूर तेणें मग धाडियेला. । घेऊन दोघां मथुरेस गेला. ॥८०॥
कंसांबरें लूटुन आणियेलीं. । त्रिवक्र कुब्जा अति नीट केली. ॥
दारीं उभा उन्नत मत्त हस्ती । मारुन, ते दंत धरीत हस्तीं. ॥८१॥
चाणूर हा, मुष्टिक दुष्ट जेठी । धाडीत मर्दूनि कृतांतभेटी. ॥
त्यानंतरें मातुळ देखियेला. । उडोनि कंसावरि कृष्ण गेला. ॥८२॥
धरून केशीं, मग खालता हा । पाडूनि त्यासीं मग होय ‘ हाहा; ’ ॥
कारागृहें सर्वहि फोडवीलीं; । ते मायबापें मग सोडवीलीं. ॥८३॥
व्यापार हा कंसवधान्त केला. । ते द्वारके श्रीहरि शीघ्र गेला. ॥
असे रिती हा हरि जन्मलासा । जाणोनि इच्छी कमळा विलासा. ॥
ज्याकारणें होय जळांत मच्छी । ते मानवी देह कसा न इच्छी ? ॥८४॥
कथा हे कृष्णाची सकलजगदानंदजननी.
मनोभावें ईचें श्रवण करिजे नित्य सुजनीं. ।
प्रसंगें श्रोत्यांचे सकलहि महादोष हरती.
यदूत्तंसप्रेमें विषयरसगोडी विरसती. ॥८५॥
इति श्रीमद्भगवद्भक्तपदानुरक्तकविसामराजविरचिते रुक्मिणीहरणकाव्ये कृष्णजन्मो नाम प्रथमः सर्गः ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : August 30, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP