मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीभक्तविजय| अध्याय ४४ श्रीभक्तविजय ॥ मंगलाचरणम् ॥ आरती श्रीविठ्ठलाची युगें ... अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय ४४ संतकवी महीपतीबोवा ताहराबादकर विरचित Tags : bhakta vijaymahipatipuranपुराणभक्त विजयमराठीमहिपती अध्याय ४४ Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः ॥ श्रीकालियमर्दनाय नमः ॥ अजि ज्ञानेंद्रियांत सभाग्य पूर्ण ॥ वैखरी दिसते पुण्यपावन ॥ कीं विष्णुभक्तांचे वर्णितां गुण ॥ दुरितें संपूर्ण पळालीं ॥१॥ध्यानीं आणितां संतमूर्ती ॥ तेणेंचि पावन नेत्रपातीं ॥ श्रवणेंचि कर्ण पुनीत होती ॥ सायास निगुतीं न करितां ॥२॥भक्तकथेसी करितां गमन ॥ तेणें चरणासी आलें पवित्रपण ॥ आळस त्यागोनि बैसतां जाण ॥ सर्वांग पावन होतसे ॥३॥या पुस्तकासी करितां नमस्कार ॥ तेणेंचि पवित्र होती कर ॥ मस्तक लववितां साचार ॥ अहंता सत्वर जातसे ॥४॥भक्तकथेसी करितां नमन ॥ तेणेंच होतसे उन्मन ॥ मग निश्चलतेसी येऊनि जाण ॥ समाधान भोगवी ॥५॥म्हणोनियां सभाग्य श्रोतीं ॥ येथें धरावी पूर्ण आर्ती ॥ मागील अध्यायाचे अंतीं ॥ कथा निगुतीं परिसिली ॥६॥कीं विद्यानगरासी सप्रेमस्थिती ॥ भानुदास जाऊनि सत्वरगती ॥ प्रार्थूनि आणिली पांडुरंगमूर्ती ॥ पंढरीस श्रीपति स्थापिले ॥७॥आणिक कथा ऐका उद्भट ॥ प्रतिष्ठानक्षेत्रीं बहिरंभट ॥ जो षड्शास्त्रीं निपुण पंडित ॥ वेदांतज्ञानीं प्रवीण ॥८॥आणिक ब्राह्मण पढले श्रुती ॥ परी तयाचे विद्यार्थी म्हणविती ॥ कितीएक विप्र लागोनि संगतीं ॥ ते पुराणव्युत्पत्ति शिकले ॥९॥इतुकें सामर्थ्य असतां जाणा ॥ कदापि न जाय राजदर्शना ॥ गृहीं अग्निहोत्रादि सकर्त्में नाना ॥ परी उद्विग्न मना नव्हेचि ॥१०॥अयाचितवृत्तीकरूनि जाण ॥ चालवी वेदोनारायण ॥ गंगातीरीं करूनि स्नान ॥ जप अनुष्ठान करीतसे ॥११॥मध्याह्नसमयीं उठोनि सत्वरा ॥ बहिरंभट येती निजमंदिरा ॥ नैवेद्य वैश्वदेव सारोनि बरा ॥ पंक्तीस द्विजवरां घेतसे ॥१२॥यापरी भोजन सारूनि जाण ॥ मग तृतीय प्रहरीं सांगती पुराण ॥ तेथें श्रवणासी येती सज्ञान ॥ जे अध्यात्मीं निपुण असती ॥१३॥एके दिवसीं भोजनीं बैसला ॥ तों आपुले स्त्रियेसीं विनोद केला ॥ अलवणी शाक वाढिली मजला ॥ हा शब्द ऐकिला कांतेनें ॥१४॥मग उत्तर काय देतसे त्यासी ॥ साठ वर्षें जाहलीं तुम्हांसी ॥ आतां रसनेस चवी आपणासी ॥ वृथा कासया पाहिजे ॥१५॥कांतेचें वचन ऐकोनि त्वरित ॥ अनुताप जाहला हृदयांत ॥ म्हणे आतां जिणें कासया व्यर्थ ॥ करावें सार्थक आपुलें ॥१६॥बहिरंभट उठोनि त्वरेसीं ॥ नमस्कार केला कांतेसी ॥ म्हणे माते यथार्थ मजसी ॥ उपदेश देसी निजलोभें ॥१७॥मागील सुकृत होतें बहुत ॥ तें फळासी आलें सुनिश्चित ॥ म्हणूनि शब्दाचें होऊनि निमित्त ॥ वैराग्य अद्भुत जाहलें कीं ॥१८॥बहिरंभट विचारी अंतरीं ॥ आतां ऐसाच गेलों वनांतरीं ॥ तरी भीड घालोनि लोकाचारीं ॥ मागुती घरीं आणितील ॥१९॥तरी स्वजातिसंबंध तुटे झडकरी ॥ आणि आपणासी कोणी उत्तर न करी ॥ ऐसी युक्ति करावी बरी ॥ विचार अंतरीं करीतसे ॥२०॥आतां जरी करावें संन्यासग्रहण ॥ तरी पूजा करितील सकळ ब्राह्मण ॥ परमहंसदीक्षा घेतां जाण ॥ तरी ब्रह्मरूपपण मानिती ॥२१॥तरी वरिष्ठ निंदा करितील जाण ॥ देखोनि थुंका टाकितील अवघे जण ॥ पिशुन करितील अपमान ॥ तैसेंचि होणें ये समयीं ॥२२॥ऐसें घडेल मजकारण ॥ तरीच देह होईल पावन ॥ ऐसा अनुताप मनीं धरून ॥ मंदिराहून चालिला ॥२३॥मग अविंधपुरोहिताचें घरीं ॥ बहिरंभट गेले ते अवसरीं ॥ काजीसी बोले मधुरोत्तरीं ॥ स्वयातींत सारीं आम्हांतें ॥२४॥हिंदूचा अविंध करितां जाण ॥ तुमचें शास्त्रीं बोलिलें पुण्य ॥ तरी कांहीं संकोच न धरून ॥ आपुल्यासमान करावें ॥२५॥यावरी उत्तर देत काजी ॥ आजि कां उदास झालेत भटजी ॥ कां वासना पालटली तुझी ॥ तरी कार्य आजी साधीन ॥२६॥तुम्हीं ज्ञानी पंडित असतां ॥ तरी आमुचे यातींत कासया येतां ॥ कांहीं कामना असेल चित्ता ॥ ते सर्वथा पुरवीन मी ॥२७॥यावरी बहिरंभट उत्तर देत ॥ मी नाहीं झालों सकाम विरक्त ॥ एकविध मार्ग तुमचा दिसत ॥ भगवंत प्राप्त व्हावया ॥२८॥ऐसी निष्ठा देखोनी ॥ बहिरंभटासी भ्रष्टविलें त्यांनी ॥ ब्राह्मण वृत्तांत ऐकूनि श्रवणीं ॥ उद्विग्न मनीं सर्वत्र ॥२९॥कांहींच उपाय न चले म्हणोनी ॥ मग निवांत राहिले आपुलें मनीं ॥ कोणी विकल्पी होते पैठणीं ॥ ते दृष्टी देखोंनि निंदिती ॥३०॥एक म्हणती वैराग्य तामस ॥ एक म्हणती तो पिशाचाभास ॥ एक म्हणती नाम घेतां त्यास ॥ सुकृत आमुचें जाईल ॥३१॥एक म्हणती निजकांतेनें ॥ ऐसें सर्वथा न वदावें वचन ॥ एक म्हणती तिचें प्राक्तन ॥ आलें दिसोन विपरीत ॥३२॥एक म्हणती तो निर्दय चित्तीं ॥ आमुच्या कांता उदंड बोलती ॥ परी वैराग्य आणोनि चित्तीं ॥ प्रपंचभ्रांति न सोडों ॥३३॥एक म्हणती द्रव्यसंपत्ती ॥ कुटुंबाची देखिली निश्चिती ॥ मग सहज वैराग्य आठवलें चित्तीं ॥ ऐसें बोलती परस्परें ॥३४॥एक म्हणती शास्त्रीं होता निपुण ॥ त्यानें घ्यावें होतें संन्यासग्रहण ॥ नीच यातींत शिरून ॥ अविंध होऊन बैसला ॥३५॥एक बोलती अनुष्ठान करितां ॥ मंत्रचळ झाला असेल अवचितां ॥ एक बोलती विवेक न करितां ॥ व्यर्थचि निंदितां तयासी ॥३६॥विद्या वय कुल उत्तम जाण ॥ सर्व संपत्ति आणि धन ॥ पुत्र कलत्र सर्व असून ॥ वैराग्य होणें अघटित ॥३७॥पैठणींचें जन ऐशा रीती ॥ कोणी निंदिती कोणी स्तविती ॥ परी बहिरंभट अनुतापयुक्ती ॥ निर्भय चित्तीं सर्वदा ॥३८॥तंव कोणे एके अवसरीं ॥ विप्र बैसले गंगातीरीं ॥ त्यांपासीं जाऊनि सत्वरीं ॥ रुदन करी अनुतापें ॥३९॥कंठ जाहला सद्गदित ॥ आनंदाश्रु नेत्रीं वाहात ॥ ऐसें दृष्टीं देखोनि त्वरित ॥ ब्राह्मण पुसती तयासी ॥४०॥बहिरंभटासी बोलती वचन ॥ तुम्ही किमर्थ झालेत यवन ॥ तेथें कोणता सद्गुरु देखोन ॥ दिधलें टाकून आम्हांतें ॥४१॥ऐसें बोलतांचि द्विजवर ॥ तयांसी देत प्रत्युत्तर ॥ माझें कर्म बलवत्तर ॥ म्हणोनि अविचार घडला कीं ॥४२॥ईश्वरप्राप्तीस्तव जाण ॥ मी स्वइच्छेनें झालों यवन ॥ परी येथेंही आत्मप्राप्ती चिन्ह ॥ न ये दिसोन सर्वथा ॥४३॥यावरी विप्र उत्तर देती ॥ आपुल्या सत्कर्मींचि आहे सद्गती ॥ ऐसें बोलोनि तयाप्रती ॥ विचार करिती एकमेक ॥४४॥म्हणती हा होता सर्वज्ञ गुणी ॥ निजकर्में भ्रष्टला आपुलें मनीं ॥ तरी आतां विधियुक्त प्रायश्चित्त देऊनी ॥ ब्राम्हणपणीं आणावा ॥४५॥इतर ग्रामींचे शास्त्ररीती ॥ सकळ पुसावया आपणांस येती ॥ आणि यास शुद्ध करावया निश्चितीं ॥ संशय चित्तीं कासया ॥४६॥जैसे इतर गांवींचें लेंडवोहळ ॥ गंगेसी मिळतां पवित्र केवल ॥ आणि तिचें बाहेर पागळलें जळ ॥ तें काय अमंगळ म्हणावें ॥४७॥तेवीं इतर ग्रामींचे भ्रष्टले कोणी ॥ ते शुद्ध होताती प्रतिष्ठानीं ॥ आणि येथील दवडावा सर्वज्ञ गुणी ॥ तरी आपणां शब्द येईल ॥४८॥मग शास्त्र पाहोनियां त्वरित ॥ तयासी दिधलें प्रायश्चित्त ॥ द्रव्य वेंचोनि अपरिमित ॥ ब्राह्मणीं पवित्र त्या केलें ॥४९॥सकळ द्विजवर मिळोन ॥ बहिरंभटासी बोलती वचन ॥ आपुल्या सत्कर्मीं तुम्हां कारण ॥ होईल दर्शन श्रीहरीचें ॥५०॥तेव्हां समस्त अविंध होऊनि गोळा ॥ द्विजांसी म्हणती तये वेळां ॥ तुम्हीं यवनाचा ब्राह्मण कैसा केला ॥ सांगा चला राजद्वारीं ॥५१॥बहिरंभट म्हणे तयांप्रती ॥ मज अविंध केलें कैशा रीती ॥ कर्णाचीं छिद्रें अद्यापि दिसती ॥ संशय मजप्रति वाटतो ॥५२॥नेत्रासी दृष्टी असोनियां ॥ मग अंध म्हणावें कैसें तया ॥ गमनशक्ति आहे जया ॥ पांगुळ तया न म्हणावें ॥५३॥जीवासी असतां अहंता ॥ तयासी मुक्त म्हणणें वृथा ॥ कर्णद्वारें शब्द ऐकतां ॥ तरी बधिर सर्वथा न म्हणावें ॥५४॥शर्करा मद्यांत मेळवितां जाण ॥ तिचें न जाय गुळचटपण ॥ तेवीं तुम्हीं भ्रष्टविलें मजलागून ॥ परी कर्णीं विंधन तैसेंचि ॥५५॥विंधनें असतां अविंध म्हणतां ॥ लज्जा न वाटे तुमच्या चित्ता ॥ यापरी यवनांसीं वाद घालितां ॥ भागले बोलतां सकळिक ॥५६॥विप्रांसी म्हणे ऐका वचन ॥ मज प्रायश्चित्त दैऊनि केला ब्राह्मण ॥ ऐसें तुमचें धर्मशास्त्र कोण मजकारण कळेन ॥५७॥चर्म कापिलें लिंगावरुतें ॥ तें आलेंच नाहीं प्रायश्चित्तें ॥ भस्म गोमय लागूनि वरतें ॥ कैसा पवित्र मी जाहलों ॥५८॥नासिक कापून घेतल्या पाहीं ॥ सन्मान राहिला कवणे ठायीं ॥ तेवीं मज भ्रष्टविलें यवनांहीं ॥ तेथें ब्राह्मणत्व नाहीं राहिलें ॥५९॥पौर्णिमेनें चंद्र सोज्ज्वळ केला ॥ परी त्याचें अंगीं कलंक राहिला ॥ तेवीं प्रायश्चित्तें शुद्ध केलें मजला ॥ परी डाग राहिला शिश्नासी ॥६०॥शिखा राखविली नापिताहातीं ॥ परी चर्म तैसें न ये पुढती ॥ हाचि संशय माझें चित्तीं ॥ अक्षय निश्चितीं जडलासे ॥६१॥तरी मी ब्राह्मण सर्वथा नव्हेचि जाण ॥ आणि यवनही न म्हणावें मजलागून ॥ एकही वर्ण नामाभिधान ॥ मजकारण असेना ॥६२॥जैसा कुलालें चक्रावरी ॥ मृत्तिकापिंड ठेविला त्याचें शिरीं ॥ तो घट नव्हे ना मृत्तिका बरी ॥ तैसीच परी मज असे ॥६३॥ऐसी ऐकूनियां वचनोक्ती ॥ विप्र निवांत उगेच राहती ॥ म्हणती याची संशयनिवृत्ती ॥ कैशा रीतीं होईल ॥६४॥कोणी भेटती सज्ञान ॥ तयांसी पुसे मी आहे कोण ॥ ऐसें द्यावें जी सांगोन ॥ मग पुढें गमन करावें ॥६५॥तूं यवन ऐसें म्हणतां त्यासी ॥ क्रोधयुक्त होय मानसीं ॥ म्हणे यथार्थ कळेना तुम्हांसी ॥ व्यर्थचि मजसी चाळवितां ॥६६॥म्हणे मी जरी यथार्थ असतों यवन ॥ तरी कर्णासी कासया असतें विंधन ॥ तुम्ही नेणतां चाळवोन ॥ मूर्खपणेंचि म्हणतां ॥६७॥एक म्हणती ब्राह्मण थोर ॥ बहिरंभट प्रतिष्ठानकर ॥ ऐसें ऐकूनियां उत्तर ॥ तयांसी सत्वर निर्भर्त्सीं ॥६८॥म्हणे तुम्ही आम्हांसी विप्र म्हणतां ॥ तरी कां केली आहे सुनता ॥ लिंग सोडोनि त्यांसी दाखवितां ॥ आश्चर्य चित्ता करिताती ॥६९॥जयातयांसी पुसतां ऐसा ॥ नांव पडलें बहिरापिसा ॥ म्हणे कधीं भेटेल सद्गुरु ऐसा ॥ संशयठसा निवारी ॥७०॥ऐसें असतां बहुत दिवसीं ॥ हिंडत आला वडवाळेसी ॥ तंव नागनाथ सिद्ध त्या ठायासी ॥ सद्गुरुमठासी राहिला ॥७१॥तो स्वामीची समाधि बांधीत कोड ॥ त्यासी शरकांड्याचे लाविले गाडे ॥ पर्वतप्राय वरी ठेवूनि दगड ॥ जुंपिलीं माकडें ओढावया ॥७२॥हें बहिरापिसा देखोनि नयनीं ॥ आश्चर्य करी आपुलें मनीं ॥ म्हणे हा संशय निवारूनि ॥ निश्चलत्व आणील दिसताहे ॥७३॥मग नागनाथासी म्हणे बहिरंभट ॥ मी हिंदु कीं अविंध सांग स्पष्ट ॥ ऐसी वाणी ऐकोनि उद्धट ॥ सद्गुरुश्रेष्ठ कोपले ॥७४॥दंडकाठी होती हातीं ॥ ते तत्काळ मारिली ताळूवरती ॥ मूर्चा येऊनि सत्वरगती ॥ पडिला क्षितीं तेधवां ॥७५॥चित्तवृत्ति नाठवेचि कांहीं ॥ जीवपण आटलें ठायींचे ठायीं ॥ मी कोण ऐसें स्फुरणचि नाहीं ॥ चैतन्य देहें असेना ॥७६॥नागनाथें करूनि ऐशा रीतीं ॥ म्हणे याची समूळ उडवावी भ्रांती ॥ करूनियां संशयनिवृत्ती ॥ आत्मस्थितीं लावावा ॥७७॥मुसळ आणवोनि सत्वरगती ॥ पिंड कांडविला शिष्यांहातीं ॥ अस्थि मांस कुटोनि निश्चितीं ॥ गोळा करिती निजहस्तें ॥७८॥पुढती त्याची मूर्ति निर्मूनी ॥ मग स्वहस्तें दिधला भडाग्नी ॥ हें कौतुक सकळ देखोनी ॥ आश्चर्य मनीं करिताती ॥७९॥अग्नि शांत होतांचि त्वरित ॥ अघटित करी नागनाथ ॥ त्यातें कृपादृष्टीं अवलोकीत ॥ तों चैतन्य आंत संचरलें ॥८०॥ब्रह्मरूप तनु ओतिली सद्गुणी ॥ जैसा योगी सेवूनि बैसला उन्मनी ॥ नागनाथ दृष्टिसी देखोनी ॥ संतोष मनीं वाटला ॥८१॥मग सद्गुरु पुसती तयासी खूण ॥ म्हणती बहिर्यापिशा ऐक वचन ॥ तूं कोण आहेसी हें मजकारण ॥ सत्वर सांगणे लवलाहें ॥८२॥ऐसा ऐकोनियां प्रश्न ॥ विचार करीत आपुलें मन ॥ म्हणे जाहलें संशयनिरसन ॥ म्हणोनि मौनें राहिला ॥८३॥यवन म्हणावें आपणांस ॥ तरी शिश्नावरी चर्म असे ॥ ब्राह्मण म्हणावें तरी कर्णास ॥ विंधन न दिसे सर्वथा ॥८४॥सद्गुरु सांगती सिद्धांतज्ञान ॥ परी देहाचा पालट करी कवण ॥ तें नागनाथें दाविलें अघटित करून ॥ विकल्प दारुण निरसिला ॥८५॥मग नागनाथें मस्तकीं हस्त ठेवूनी । उपदेश दिधला त्यालागूनी ॥ तत्काळ होऊनि आत्मज्ञानी ॥ श्रीहरीभजनीं लागला ॥८६॥बहिरंभट चित्तीं हर्षयुक्त ॥ धन्य धन्य तो सद्गुरु नागनाथ ॥ दुसरा जन्म दिधला साक्षात ॥ काळ क्षणमात्र न लोटतां ॥८७॥उदंड गुरु आत्मज्ञानी असती ॥ जन्ममरणही निवारिती ॥ परी देहाचा पालट नव्हे निश्चितीं ॥ कर्माची गति अनिवार ॥८८॥ध्यानांत आणोनि पांडुरंगमूर्ती ॥ उदंड भक्त उपासिती ॥ नामदेवें जेवविली पाषाणमूर्ती ॥ परे हे करणी दिसती विचित्र ॥८९॥मिथ्या माया सर्वत्र म्हणती ॥ संकटीं धैर्य उदंड धरिती ॥ परी कबीरानें वधिलें पुत्राप्रती ॥ हे करणी दिसती विचित्र ॥९०॥नरासी ज्ञान पढविती वृद्ध ॥ श्रुति शास्त्रादि नानाविध ॥ परी रेडियामुखें बोलविला वेद ॥ ज्ञानदेवें अगाध केलें ॥९१॥धन्य सांवता वरिष्ठ भक्त ॥ लपावया आले पंढरीनाथ ॥ मग स्वकरें पोट चिरूनि त्वरित ॥ हृदयाआंत सांठविले ॥९२॥ऐसें वैष्णवभक्त प्रेमळ ॥ एकाहूनि एक दिसती आगळ ॥ यांचा महिमा कोणासी नकळ ॥ जिहीं घननीळ वश केला ॥९३॥असो मागील अनुसंधान ॥ नागनाथाची कृपा होतांचि जाण ॥ बहिर्या पिशासी झालें ज्ञान ॥ निजात्मखूण पावला ॥९४॥मग पंढरीसी जाऊनि तये क्षणीं ॥ सगुणस्वरूप देखिलें नयनीं ॥ तेव्हां प्रेमभरित होऊनी ॥ नाचे कीर्तनीं स्वानंदें ॥९५॥श्रीभागवतदशमस्कंध देखा ॥ त्यावरी केली महाराष्ट्र टीका ॥ त्या सप्रेम ओंव्या अमोलिका ॥ ऐका भाविकां निजसुख ॥९६॥आणिक पदपदांतरें शेवटीं ॥ काव्य रचिलेण बहिरंभटीं ॥ दुरितें पळती उठाउठी ॥ कर्णसंपुटीं ऐकतां ॥९७॥या निजभक्तांची ऐकतां कीर्ती ॥ जडजीव सकळ पुनीत होती ॥ श्रोतयां विनवी महीपती ॥ अवधान प्रीतीं असों द्या ॥९८॥स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ चतुश्चत्वारिंशाध्याय रसाळ हा ॥९९॥॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ अध्याय ॥४४॥ ॥ ओंव्या ॥९९॥ ॥श्रीभक्तविजय चतुश्चत्वारिंशाध्याय समाप्त N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP