मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीभक्तविजय|
अध्याय १५

अध्याय १५

संतकवी महीपतीबोवा ताहराबादकर विरचित


श्रीगणेशाय नमः ॥ श्रीरुक्मिणीपांडुरंगाय नमः ॥    
ऐका श्रोते हो सादर ॥ आजि प्रसन्न जाहला रुक्मिणीवर ॥ म्हणूनि भक्तकथा सविस्तर ॥ प्रकट केल्या भूमंडळीं ॥१॥
चातकासाठीं मेघ ओळला ॥ कीं चकोरालागीं चंद्र उदेला ॥ कीं जळचरांसी उचंबळला ॥ साग्र जैसा उल्हासें ॥२॥
कीं निववावया सज्जनांचें अंग ॥ चंदन अवतरला निजांग ॥ कीं सुखी व्हावया सर्वही जग ॥ भास्कर आला उदयासी ॥३॥
कीं विष्णुपूजा व्हावया संपूर्ण ॥ अपार उठिलें तुळसीवन ॥ नातरी संतुष्ट करावया उमारमण ॥ बिल्ववृक्ष जेवीं वाढला ॥४॥
कीं संतुष्ट व्हावया घ्राण ॥ वसंतकाळीं प्रकटलीं सुमन ॥ कीं सुखी व्हावया विश्वजन ॥ वर्षला घन भूमंडळीं ॥५॥
कीं गौतमाचें हरावया दुरित ॥ गोदा आली भूतळांत ॥ कीं निर्जर करावया तृप्त ॥ प्रकटलें अमृत सागरीं ॥६॥
तेवीं तुम्हां आर्तभूतांकारण ॥ भक्तकथा जाहली निर्माण ॥ असो मागील निरूपण ॥ ऐका सादर भाविक हो ॥७॥
रुक्मिणीस म्हणे शारंगधर ॥ मज निजभक्तांची प्रीति थोर ॥ त्याहूनि विशेष नामयावर ॥ कृपा अपार सर्वदा ॥८॥
ऐसा संवाद चक्रपाणी ॥ करितां उगवला वासरमणी ॥ तों सर्व भक्त मिळूनी ॥ दर्शनासी पातले ॥९॥
नामघोषें जयजयकार ॥ करूनि घालिती नमस्कार ॥ जैसा कमळिणीवरी भ्रमर ॥ घाली गुंजार निजप्रीतीं ॥१०॥
कीं देखोनि मातेप्रती ॥ बाळकें जेवीं सन्निध येती ॥ कीं हरिणी देखोनि पाडसाप्रती ॥ आनंद चित्तीं न समाये ॥११॥
नातरी कृपणा सांपडतां धन ॥ प्रेमें आल्हादे त्याचें मन ॥ तेवीं सांवळें स्वरूप देखोन ॥ वैष्णवजन सुखावले ॥१२॥
ध्यानीं स्वरूप जें देखिलें ॥ तेंचि अंतरीं कोंदलें ॥ तेणें आनंदें लोटले ॥ अश्रुपात नेत्रांसी ॥१३॥
अनुभव बोलतां त्या सुखाचा ॥ कवीची कुंठित जाहली वाचा ॥ दृष्टांत द्यावया साचा ॥ शोधितां कैंचा भूमंडळीं ॥१४॥
शर्करेची गोडी सेविलियाविण ॥ सांगतां नयेचि खूण ॥ तेवीं विष्णुपदींचें सुख जाण ॥ वैष्णव जाणती अनुभवें ॥१५॥
मग आलिंगन देऊन वनमाळी ॥ निजभक्त धरिला हृदयकमळीं ॥ सादर होऊनि सांभाळी ॥ कृपादृष्टीं सकळांसी ॥१६॥
कमलनेत्र घनसांवळा ॥ भक्त पाहती वेळोवेळां ॥ तो अनुपम सुखसोहळा ॥ वाचेसी नये बोलतां ॥१७॥
ऐसा उदार देवाधिदेव ॥ रुक्मिणीसी सांगें जीवींचा भाव ॥ भोजनासी आणावे भूदेव ॥ प्रेमादरेंकरूनि ॥१८॥
चंद्रभागेचे तटीं जाऊनी ॥ प्रायश्चित्त घेतलें कालचे दिनीं ॥ तेव्हांचि संकल्प केला मनीं ॥ विप्र भोजनासी आणावे ॥१९॥
तरी क्षेत्रवासी धरामर ॥ जे स्वधर्मशील साचार ॥ तयांसी प्रार्थूनि वारंवार ॥ आणावे सत्वर मंदिरां ॥२०॥
जयांचे दर्शनेंकरूनी ॥ पाप ताप जाय जळोनी ॥ सकळ कामना पूर्ण होऊनी । स्वानंदघन वर्षत ॥२१॥
षड्रस भोजन त्यांस देऊनी ॥ संदेह निरसावा आजिचे दिनीं ॥ चतुर्भुज रूप दाखवूनी ॥ कौतुक अद्भुत करावें ॥२२॥
संतसंगाचा महिमा थोर ॥ जगीं कीर्ति वाढेल फार ॥ ऐसा रुक्मिणीसीं शारंगधर ॥ करी विचार निजप्रीतीं ॥२३॥
अवश्य म्हणे जगन्माता ॥ विप्रांसी द्यावी अक्षता ॥ सर्वसिद्धि अनुकूलता ॥ चिंता किमर्थ करावी ॥२४॥
मग हांसोनियां पंढरीनायक ॥ नामयासी म्हणे वचन ऐक ॥ पुढती कौतुक आणिक ॥ करणें आहे तुजलागीं ॥२५॥
ऐसें बोलतां जगज्जीवन ॥ नामा देत प्रतिवचन ॥ म्हणे तुमची अंतरींची खूण ॥ मीच जाणें केशवा ॥२६॥
नामयासी बोले चक्रपाणी ॥ आलिंगन दे मजलागूनी ॥ जिवलगा आतां जवळूनी ॥ जाऊं नको सर्वथा ॥२७॥
तुझें प्रेम पाहतां जाण ॥ आर्तें न धाये माझें मन ॥ तुज देखतां दृष्टी भरून ॥ होय पारणें नेत्रांसी ॥२८॥
तुझाचि मज लागला छंद ॥ हा बहु जन्मींचा ऋणानुबंध ॥ म्हणूनि न तुटे प्रीतिवाद ॥ वेधला गोविंद निजप्रेमें ॥२९॥
नेणों त्वां काय पुण्य केलें ॥ व्रत तप अनुष्ठान साधिलें ॥ नातरी देह कर्वतीं घातलें ॥ किंवा पाहिलें तीर्थाटन ॥३०॥
कीं सकळ माया त्यजूनी ॥ चित्त सांवरिलें कोंडूनी ॥ म्हणवूनि मज वश करूनी ॥ हृदयामाजी सांठविलें ॥३१॥
काय पदार्थ तुज देईजे ॥ कैसेनि उतराई होइजे ॥ ऐसें कांहींच न देखिजे ॥ सकळ त्रिभुवन धुंडितां ॥३२॥
शरीर प्राणांचें जाण ॥ तुवां देवूनि बळिदान ॥ केलें बहुत निर्वाण ॥ मजकारणें भक्तराया ॥३३॥
मी तुझा म्हणवितों श्रीरंगें ॥ जरी दास्य करावें निजांगें ॥ तरी तुज कांहींच नलगे ॥ देणें घेणें पदार्थ ॥३४॥
नामा म्हणे ते अवसरीं ॥ तूं अनाथनाथ भक्तकैवारी ॥ म्हणूनि देवा मजवरी ॥ करिसी लोभ निजप्रीतीं ॥३५॥
मग भक्तवत्सल हृषीकेशी ॥ निर्भय असतां निजमानसीं ॥ सवें घेऊनि निजभक्तांसी ॥ अक्षत द्यावयासी चालिले ॥३६॥
जो योगियांचें निजध्यान ॥ सकळ देवांचें देवतार्चन ॥ तो विप्रांसी द्यावया आमंत्रण ॥ कुंडलतीर्थासी पातला ॥३७॥
तंव तेथें अवघेचि लहान थोर ॥ मिळाले असती धरामर ॥ म्हणती आपला यजमान साचार ॥ न येचि सत्वर दर्शना ॥३८॥
काल प्रायश्चित्त देतां जाण ॥ घालूं केलें ब्राह्मणभोजन ॥ परी अजूनि न येचि आमंत्रण ॥ ऐसें परस्परें बोलती ॥३९॥
तों सवें घेऊनि भक्तमंडळी ॥ अकस्मात पातले वनमाळी ॥ ब्राह्मणांसी देखोनि नेत्रकमळीं ॥ नमस्कार घातला साष्टांग ॥४०॥
मग म्हणे जगज्जीवन ॥ सकळ सांडोनि देहमान ॥ निःसंदेह होऊनि जाण ॥ आलें पाहिजे भोजना ॥४१॥
तुम्हीं दिधलें अभयवचना ॥ ते पूर्ण करावी माझी वासना ॥ स्नानसंध्या सारूनि जाणा ॥ शीघ्र आलें पाहिजे ॥४२॥
ऐसें ऐकूनि मधुरोत्तर ॥ संतुष्ट जाहले द्विजवर ॥ मग काय बोलती प्रत्युत्तर ॥ ऐका सादर निजकर्णीं ॥४३॥
आम्ही तरी तुमचे आश्रित ॥ हेंस अत्यचि माना यथार्थ ॥ ये क्षेत्रीं राहूनि तुम्हांतें ॥ आशीर्वाद देतसों ॥४४॥
गोब्राह्मणांचा प्रतिपाळ ॥ करीत असा सर्वकाळ ॥ स्वामी तों दीनदयाळ ॥ विश्वलोक बोलती ॥४५॥
तुम्ही तों महाराजेश्वर ॥ आम्ही तुमचे द्विजवर ॥ कृपादृष्टीं निरंतर ॥ सांभाळीत असा कीं ॥४६॥
तुमचा आदर मुखीं सांगतां ॥ तरी निरुपमचि तत्त्वतां ॥ वेदवचनासी मान्यता ॥ अखंड देतां निजप्रीतीं ॥४७॥
तेचि भाक आपुली देवें ॥ जतन करावी सर्वभावें ॥ नामया चित्तीं प्रेम द्यावें ॥ कृपालाघवें आपुल्या ॥४८॥
ऐसें ऐकूनि अनाथबंधु ॥ जो सकाळांचा जीवनकंदु ॥ निजभक्तांचा सौख्यसिंधु ॥ जो का आनंदु योगियांचा ॥४९॥
हर्षनिर्भर होऊनि चित्तीं ॥ देउळा आले सत्वरगतीं ॥ मग रुक्मिणीपासीं अति प्रीतीं ॥ सकळ वृत्त सांगितलें ॥५०॥
म्हणे धन्य दिवस आजिचा ॥ उदया आला सोनियाचा ॥ म्हणूनि सोहळा निजभक्तांचा ॥ मांडिला साचा निरुपम ॥५१॥
रुक्मिणीस म्हणे जगज्जीवन ॥ पाचारिले सकळ ब्राह्मण ॥ स्नान संध्या करूनि जाण ॥ येती सत्वर भोजना ॥५२॥
आजिचें कौतुक अभिनव ॥ निरुपम नम्रता गौरव ॥ ऐसें बोलोनि देवाधिदेव ॥ हास्यवदन जाहले ॥५३॥
रुक्मिणी म्हणे हृषीकेशी ॥ त्यांचें पुण्य आलें फळासी ॥ म्हणोनि दर्शन द्विजवरांसी ॥ जाहलें अनायासें तूमचें ॥५४॥
तंव नित्यनेम सारून सत्वर ॥ राउळा आले द्विजवर ॥ नमस्कार करूनि शारंगधर ॥ आसनावरी बैसविले ॥५५॥
मग पूजा करावयालागूनी ॥ पुढारी जाहले चक्रपाणी ॥ निजहस्तें चरण क्षाळूनी ॥ तीर्थ मस्तकीं वंदिलें ॥५६॥
गंधाक्षता सुमनमाळा ॥ धूप दीप दाखवी सांवळा ॥ बुका तुळसी नाना परिमळा ॥ अर्पी द्विजवरां निजप्रीतीं ॥५७॥
मग पात्रें विस्तारूनि श्रीरंग ॥ लेह्य्पेय वाढी सांग ॥ उदक घेऊनि सवेग ॥ संकल्प श्रीरंग सोडीतसे ॥५८॥
आपोशन देऊन द्विजवरांसी ॥ प्रार्थना करूनि वैकुंठवासी ॥ म्हणे भोजन करितां ग्रासोग्रासीं ॥ गोविंदासी स्मरावें ॥५९॥
ग्रासोग्रासीं करे जो स्मरण ॥ तो जेविलाचि उपवासी जाण ॥ ऐसें द्विजांसी रुक्मिणीरमण ॥ आपुलें मुखें बोलिले ॥६०॥
असो आनंदभरित द्विज सगळे ॥ तृप्त जाहले ते वेळे ॥ करशुद्धि आणि विडे दिल्हे ॥ घननीळें सर्वांसी ॥६१॥
मग दिव्यरत्नें प्रकाशज्योती ॥ त्यांहीं उजळोनि आरती ॥ स्वस्थानीं बैसल्या द्विजपंक्ती ॥ ओंवाळी श्रीपति तयांसी ॥६२॥
मग जोडोनि दोनी कर ॥ विनंति करी शारंगधर ॥ आजिचा प्रसंग निरंतर ॥ नये साचार पुढती ॥६३॥
पदरीं होत्या पुण्यकोटी ॥ तुम्हां आम्हांसी झाल्या भेटी ॥ भरली परमानंदें सृष्टी ॥ ऐसें जगजेठी बोलिले ॥६४॥
आतां आम्ही आणि संतजन ॥ एके पंक्तीं करूं भोजन ॥ तुम्ही स्वस्थ करूनि अंतःकरण ॥ बैसा क्षणभरी सुखरूप ॥६५॥
ऐसें म्हणूनि ते वेळीं ॥ पाचारिली भक्तमंडळी ॥ कौतुकलाघवें ते वेळीं ॥ ब्राह्मण पाहाती कौतुक ॥६६॥
विमानीं बैसूनि सकळिक ॥ कौतुक पाहाती ब्रह्मादिक ॥ सकळ देव घेऊन देख ॥ शचीनायक पातला ॥६७॥
योगी तळमळ करिती चित्तीं ॥ भक्तिसुख नाहीं आम्हांप्रती ॥ नामयासी तुष्टोनि रुक्मिणीपती ॥ सप्रेमगती दिधली त्या ॥६८॥
मग निजपंक्तीस शारंगधर ॥ बोलावी निवृत्ति ज्ञानेश्वर ॥ सोपान सांवता भक्त थोर ॥ जगमैत्र सखा जिवलग ॥६९॥
आसंद सुदामा भक्त थोर ॥ प्रेमळ वैष्णव विसोबा खेचर ॥ सांवता नरहरि सोनार ॥ आले साचार भोजना ॥७०॥
चोखामेळा आणि वंका ॥ जनका केवळ प्राणसखा ॥ ज्याची आवडी यदुनायका ॥ असे सर्वदा निजप्रेमें ॥७१॥
सकळ वैराग्याचा मेरू ॥ तो निजभक्त गोरा कुंभारू ॥ ज्यासी आवडाता डिंगरू ॥ शारंगधरू म्हणतसे ॥७२॥
ऐसे सकळ थोर साने ॥ बोलावूनि भक्तराणे ॥ पूजा केली जगज्जीवनें ॥ निजप्रीतीनें तेधवां ॥७३॥
जो सर्वां वरिष्ठ जगज्जीवन ॥ तोही करी निजभक्तपूजन ॥ नामा विस्मित होऊन ॥ निजप्रीतीनें पूसत ॥७४॥
म्हणे देवा चोज वाटतें चित्ता ॥ आजि सागर पूजी सरिता ॥ कीं चंद्र नक्षत्रांभोंवता ॥ प्रदक्षिणा घालीत ॥७५॥
कीं वैनतेय अंडजयाती ॥ पूजिता बैसे निजप्रीतीं ॥ नातरी पार्वतीरमण कैलासपती ॥ नंदीस प्रार्थी निजप्रेमें ॥७६॥
कीं नृपवर करी प्रजाचें पूजन ॥ कीं देवांसी प्रार्थी शचीरमण ॥ तेवीं तूं वरिष्ठ जगज्जीवन ॥ देशी सन्मान निजदासां ॥७७॥
हांसोनि बोले रुक्मिणीरमण ॥ मज तुम्हींच दिधलें थोरपण ॥ सरिता नसत्या जरी निर्माण ॥ तरी समुद्र कैसा वाढता ॥७८॥
नक्षत्रें नसतीं सभोंवतीं ॥ तरी चंद्रासी शोभा न येती ॥ निर्माण नसती अंडजयाती ॥ तरी गरूडासी न म्हणते वरिष्ठ ॥७९॥
नंदी नसता जरी निर्माण ॥ तरी धूर्जटीस वागवितें कोण ॥ नातरी तेहतीस कोटी नसते गुण ॥ तरी इंद्रासी सन्मान कोठोनि ॥८०॥
प्रजांनीं राजासी थोर केलें ॥ तेवीं तुमचेनि नांवरूप मज आलें ॥ ऐकूनि भक्त विस्मित जाहले ॥ निजमानसीं तेधवां ॥८१॥
तंव सत्यभामा राही रुक्मिणी ॥ विस्तारूनि आणिती विविध बोणीं ॥ भक्तमंडळींत शारंगपाणी ॥ कैशापरी शोभला ॥८२॥
सप्तसागरांत क्षीरसागर ॥ कीं नक्षत्रांमाजी रोहिणीवर ॥ अलंकारांत कौस्तुभ थोर ॥ झळके साकार सतेज ॥८३॥
अष्टधातूंत जैसें कांचन ॥ कीं चुणियांमाजी जैसें रत्न ॥ तैसा भक्तमंडळींत जगज्जीवन ॥ षड्गुणैश्वर्य दिसतसे ॥८४॥
सकळां मुखीं रुक्मिणीवर ॥ कवळ देतसे वारंवार ॥ उच्छिष्ट पडतां सत्वर ॥ पीतांबरें सांवरीत ॥८५॥
तें सुख देखोनि दिठीं ॥ विरिंची तेव्हां लाळ घोंटी ॥ म्हणती नामयासी तुष्टला जगजेठी ॥ पाहे दिठीं आम्हांतें ॥८६॥
ऐशा रीतीं करूनि सोहळे ॥ भोजन जाहलें खेळेंमेळें ॥ ब्रह्मरसेंकरूनि धाले ॥ सकळ संत तेधवां ॥८७॥
तेवीं विमानीं बैसोनि सुरवर ॥ आनंदें करिती जयजयकार ॥ पुष्पवृष्टि अपार ॥ करिते जाहले ते समयीं ॥८८॥
तो सुवास न सांठे गगनीं ॥ विप्र आश्चर्य करिती मनीं ॥ म्हणती जीवित्वाची हानी ॥ आली होऊनि दिसताहे ॥८९॥
अद्भुत उसळला प्रेमरंग ॥ हा नव्हेचि जाणा ज्ञानमार्ग ॥ नव्हेचि तामस वैराग्य ॥ आलें भक्तिभाग्य रूपासी ॥१०॥
तंव एक म्हणती यथर्थ वाचे ॥ हा पांडुरंगचि आहे साचें ॥ मानवांसी असेल कैंचें ॥ एवढें भाग्य अघटित ॥९१॥
हा गुणवंत नव्हेचि सर्वथा ॥ क्रियाकर्मांसी अकर्ता ॥ यासी देतां प्रायश्चित्ता ॥ कैशा रीतीं घडेल ॥९२॥
अंत्यज ब्राह्मण दोघे जण ॥ गंगेमाजी करितां स्नान ॥ परी तिसी विटाळ जाहला म्हणून ॥ वदोंनयेचि सर्वथा ॥९३॥
कीं नाना याती पृथ्वीवर ॥ स्वइच्छा करिती व्यवहार ॥ तिसीं नाहीं लहानथोर ॥ शारंगधर तैसा असे ॥९४॥
नातरी उदयासी येतां भानु ॥ प्रकाश सर्वांसी समानु ॥ तैसाचि हा जगज्जीवनु ॥ भूतमात्रीं सारिखा ॥९५॥
कां पर्जन्य वर्षतां पृथ्वीवर ॥ त्यासी सारिखे भूमिडोंगर ॥ तैसाचि हा यदुवीर ॥ भूतमात्रीं सारिखा ॥९६॥
हा निर्गुणरूपी शारंगधर ॥ यासी नाहींच आपपर ॥ यातिकुळाचा विचार ॥ नाहीं साचार यालागीं ॥९७॥
षड्वर्गसंबंध लावितां पाहीं ॥ कदा न लागती याचे ठायीं ॥ विकल्पाचें नांवचि नाहीं ॥ याजपासी सर्वथा ॥९८॥
काया मनें आणि वाचा ॥ सोयरा जिवलग दीनांचा ॥ तैसाच उदार मनाचा ॥ लोभ अपार भक्तांसी ॥९९॥
यासी अनुसरले सर्व काळ ॥ तयांचें तोडी मायाजाळ ॥ संसारजाळीं भक्त प्रेमळ ॥ गुंतों नेदीच सर्वथा ॥१००॥
पाहा या नामयाची माता ॥ तुमचे आमचे दृष्टीं देखतां ॥ नानापरींचे वाद घालितां ॥ शिणली बहु मनांत ॥१॥
हा नाटकलाघवी ऋषीकेशी ॥ नामा घातला पाठीसीं ॥ माझा म्हणूनि पोटासीं ॥ आलिंगोनि धरियेला ॥२॥
याचें रूप पाहतां सुंदर ॥ निजदेहाचा पडे विसर ॥ चरण आठवितां साचार ॥ चित्त भुलोन जातसे ॥३॥
यासी जातां अनन्य शरण ॥ त्याचें निवारी जन्ममरण ॥ ऐसें द्विजवरांचें वचन ॥ ऐकोनि जगज्जीवन हांसत ॥४॥
मग गृहस्थवेष पालटोन ॥ दाविता झाला रूप सगुण ॥ नामयासी देऊनि आलिंगन ॥ हृदयीं धरिला निजप्रीतीं ॥५॥
मग अभय देऊनि ब्राह्मणांसी ॥ निजरूप दावी ऋषीकेशी ॥ तें ध्यान वर्णावयासी ॥ शारदा कुंठित होतसे ॥६॥
तंव मस्तकीं दिव्यरत्न किरीटी ॥ कस्तूरीमळवट ललाटीं ॥ सांवळा सुकुमार जगजेठी ॥ पाहती दृष्टीं द्विजवर ॥७॥
मयूरपिच्छाचिया वेंटी ॥ मकराकार कुंडलें गोमटीं ॥ सकळ संतां कृपादृष्टीं ॥ रुक्मिणीपति पाहतसे ॥८॥
जें पुंडलीकाच्या पुण्यराशी ॥ पाहूनि आलें आकारासी ॥ जो का क्षीरसागरविलासी ॥ वैकुंठवासी आदिदेव ॥९॥
मंदस्मित वदन निर्मळ ॥ दशनीं फांकती रत्नकीळ ॥ ऐसें रूप घनसांवळ ॥ निवती डोळे पाहतांचि ॥११०॥
त्या सुखाचे अधिकारी देख ॥ प्रेमळ भक्तचि असती एक ॥ ध्यानीं आणोनि यदुनायक ॥ घेती अनेक प्रेमसुख ॥११॥
कौस्तुभ वैजयंतीमाळ ॥ हृदयीं पदक अति सोज्ज्वळ ॥ तुळसीमंजुर्‍या अति कोमळ ॥ दीनदयाळ ल्याला असे ॥१२॥
हृदयीं श्रीवत्सलांछन ॥ तेचि प्रीतीचें निजभूषण ॥ श्यामतनूसी चर्चिला चंदन ॥ राजीवनयन शोभतसे ॥१३॥
शंख चंक्र घेऊनि करीं । कर ठेविले कटावरी ॥ श्यामतनु पीतांबरधारी ॥ जें ध्यान अंतरीं भक्तांच्या ॥१४॥
लक्ष्मीसहित श्रीहरी ॥ समपद ठाकले विटेवरी ॥ महादैत्यदानव भारी ॥ रुळती तोडरीं असंख्य ॥१५॥
ऐसें दिव्य तेज प्रकटलें ॥ तेणें ब्रह्मांड उजळिलें ॥ दिनकरमंडळही लोपलें ॥ निजतेज देखोनि तेधवां ॥१६॥
संत आणि सकळ ब्राह्मण ॥ देखती चतुर्भुज रूप सगुण ॥ द्विजवर आश्चर्य करून ॥ तटस्थ राहिले निवांत ॥१७॥
पक्षी कीटक पशु नर ॥ पाषाण आणि तरुवर ॥ दृष्टीस पाहती धरामर ॥ तों विठ्ठलरूप दिसतसे ॥१८॥
आप तेज आणि गगन ॥ मही मारुत पांचही जाण ॥ दृष्टीस पाहाती ब्राह्मण ॥ तों विठ्ठलरूप दिसतसे ॥१९॥
नानायाती पशुजीव ॥ रवि चंद्र नक्षत्रें सर्व ॥ नाना दैवतें अभिनव ॥ विठ्ठलरूप दिसतसे ॥१२०॥
सभामंडप रंगशीळ ॥ जय विजय द्वारपाळ ॥ गरुडखांब महाद्वार ॥ विठ्ठलरूप दिसतसे ॥२१॥
गरुडटके पताका कळस ॥ टाळ मृदंग नामघोष ॥ पायर्‍या ओवर्‍या द्विजवरांस ॥ विठ्ठरूप दिसती पैं ॥२२॥
रजतमसत्त्वगुण ॥ जीव चैतन्य आणि मन ॥ ध्यानांत पाहातां विचारून ॥ तों विठ्ठलरूप दिसताहे ॥२३॥
वटबीज एक पेरिलें ॥ तें अनंतरूपें विस्तारलें ॥ कां वासरमणीचें तेज एकलें ॥ जैसें व्यापलें पृथ्वीवरी ॥२४॥
कीं सकळ रसांत एक जीवन ॥ नातरी ब्रह्मांडव्यापक एक पवन ॥ कीं अनेक देहीं एक जठराग्न ॥ व्यापक असे ज्या रीतीं ॥२५॥
कीं अनंत नेत्र दृष्टी एक ॥ एक अवधान स्वर अनेक ॥ कीं दश इंद्रियांत व्यापक ॥ आभासे जैसें पाहतां ॥२६॥
तैसा एक रुक्मिणीवर ॥ रूपें नटला चराचर ॥ दृष्टीस पाहतां द्विजवर ॥ तटस्थ जाहले मानसीं ॥२७॥
विश्वरूप नटला जगज्जीवन ॥ दृष्टांत द्यावया पाहावा कोण ॥ कृष्णावतारीं मनमोहन ॥ व्रजांगनांनीं धरियेला ॥२८॥
यशोदेपासीं येतां जाण ॥ देखत्या जाहला अनंत कृष्ण ॥ तैशा रीतीनें ब्राह्मण ॥ विश्वरूप पाहती ॥२९॥
एकचि व्यापिलें केशवराजें ॥ दृष्टीस पाहतां न दिसे दुजें ॥ देहबुद्धि राहिली सहजें ॥ विराली लाज अंतरीं ॥१३०॥
प्रकटला परमानंदबोध ॥ वाटला सकळांसी आनंद ॥ राहिला अवघा द्वंद्वभेद ॥ अंतरीं स्वानंद सकळांच्या ॥३१॥
सबाह्यव्यापक त्रिजगतीं ॥ अंतरीं कोंदली श्रीकृष्णमूर्ती ॥ जे योगियांची सुखविश्रांती ॥ विप्र पाहती निजप्रेमें ॥३२॥
प्रेमभवें संतसज्जन ॥ एकमेकांसी देती आलिंगन ॥ हर्षें निर्भर होऊन ॥ जयजयकारें गर्जती ॥३३॥
अपार देखोनि सुखविश्रांती ॥ सकळ तन्मय जाहले चित्तीं ॥ ब्रह्मानंदसोहळा श्रीपती ॥ भोगवी प्रीतीं निजदासां ॥३४॥
द्विजांनीं टाकिलें देहभान ॥ त्यांसी सावध करी जगज्जीवन ॥ नामयासी उचलोन ॥ चरणांवरी घातलें ॥३५॥
जो भक्तवत्सल जगजेठी ॥ सकळांसी पाहे कृपादृष्टीं ॥ ब्राह्मणांसी गुजगोष्टी ॥ सांगे निकटीं बैसोनि ॥३६॥
द्विजांसी म्हणे केशवराज ॥ ऐका जीवींचें निजगुज ॥ निजभक्त अनुसरले मज ॥ प्रपंचलाज टाकूनि ॥३७॥
मी यांचेनि सेवाऋणें ॥ बांधलों असें संपूर्ण ॥ भक्ताधीन असें जाण ॥ नाहीं स्वाधीन आपुल्या ॥३८॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान ॥ सर्वां भूतीं भजती मजकारण ॥ अल्पता करूनि देहभान ॥ केलें स्वाधीन मज त्यांनीं ॥३९॥
हा जगमित्र टाकूनि संसारा ॥ जाहला आमुचा परम सोयरा ॥ मज कोंडोनि हृदयमंदिरा ॥ न ये माघारा देहबुद्धी ॥१४०॥
हा सांवता माळी माझा दास ॥ भजनीं धरूनि विश्वास ॥ भूतमात्रीं पाहातसे ॥ मजचि एका निजप्रेमें ॥४१॥
बारा दिवसांचा होता बिदीं ॥ मायेनें टाकिला वेणुनादीं ॥ तो हा वासरा अद्वैतबोधी ॥ होऊनि मज भजतसे ॥४२॥
निजभक्त विसोबा खेचर ॥ आणि हा नरहरी सोनार ॥ माझे भजनीं निरंतर ॥ गोरा कुंभार असे कीं ॥४३॥
घरदार त्यजोनि सकळ ॥ तोडिले याणें मायाजाळ ॥ तो हा सुदामा भक्त प्रेमळ ॥ वाटे कळवळ मज याची ॥४४॥
चोखामेळा आणि वंका ॥ प्रेमळ भक्त माझा जनका ॥ मजवांचूनि अन्य सखा नसेच कोणी तयांसी ॥४५॥
सर्व संग टाकूनि जीवें ॥ मज अनुसरले ऐक्यभावें ॥ मजवांचूनि आणिका भावें ॥ कोणे ठायीं न धरिती ॥४६॥
ऐसे एकेकाचे उपकार ॥ वर्णावे ते कोठवर ॥ ऐसे विप्रासी शारंगधर ॥ प्रेमआल्हादें सांगती ॥४७॥
सकळ भक्तांचा चरणरज ॥ प्रेमळ नामा भक्त राज ॥ ऐसे ऐकूनियां द्विज ॥ आश्चर्य करिती निजमनीं ॥४८॥
ते भाग्याचे पूर्ण सागर ॥ काय बोलती मधुरोत्तर ॥ म्हणती आम्हांसी माहेर ॥ जोडलासी विठ्ठला ॥४९॥
आतां मागणें हेंच पंढरीनाथा ॥ तोडी आमची प्रपंचममता ॥ चरणांचा वियोग सर्वथा ॥ न होय ऐसें करावें ॥१५०॥
न लागती भुक्ति आणि मुक्ति ॥ नलगे कांही धनसंपत्ति ॥ जन्मोजन्मीं संतसंगति ॥ आम्हां श्रीपती असों दे ॥५१॥
वेद शास्त्र करितां पठन ॥ बहिर्मुख जाहलें मन ॥ बुद्धीचें चलन अभिमान ॥ केले असे आमुच्या ॥५२॥
तुझी न कळतां प्रेमखूण ॥ धिक् धिक् तें जाणपण ॥ तुझी कृपा नसतां जाण ॥ कासया सन्मान जाळावा ॥५३॥
आम्ही ब्राह्मण उंचवर्ण ॥ याच भ्रांतीनें ग्रासलों जाण ॥ प्रेमस्वादा अंतरलों तेण ॥ थोर बंधन अहंतेचें ॥५४॥
हे अवघी तुझी सकळ माया ॥ आम्हां भुलवी पंढरीराया ॥ वाहूनि गेलों होतों वायां ॥ परी त्वां देवराया रक्षिलें ॥५५॥
अपराधांचिया कोटी बहुत ॥ आम्हां घडल्या अति अद्भुत ॥ तूं कृपाळू पंढरीनाथ ॥ केलें सनाथ पतितांसी ॥५६॥
दीननाथ नाम ठेविलें ॥ तें बिरुद आजि साच केलें ॥ आम्हां पतितांसी उद्धरिलें ॥ दर्शन दिधलें निजकृपें ॥५७॥
काय संचित होतें आमचें ॥ पुण्य अनंत जन्मींचें ॥ म्हणोनि दर्शन देऊन साचें ॥ बोलसी वाचे निजप्रीतीं ॥५८॥
संचित बीज पेरिलें जाण ॥ संतसंगाचें वरी जीवन ॥ अनंत फळें त्यालागून ॥ आलीं पूर्ण देवराया ॥५९॥
दुर्धर तोडोनि मोहपाश ॥ निजरूपीं केला सौरस ॥ तुझी लीला वर्णितां वाचेस ॥ श्रुतिशास्त्रांस अगम्य ॥१६०॥
तापत्रय वणवा होता जळत ॥ तो विझवूनियां अवचित ॥ आम्हां आर्तांसीं प्रेमामृत ॥ बळेंचि पाजिलें स्वामिया ॥६१॥
आतां मागणें हेंचि जगजेठी ॥ ऐसेंचि रूप असावें दिठी ॥ आणि निरंतर संतांची भेटी ॥ कामना पोटीं हेचि धरियेली ॥६२॥
अखंड प्रेम असावें चित्तीं ॥ तुझें भजनी लागावी प्रीती ॥ मग गर्भावास होता आम्हांप्रती ॥ नयेचि कधीं कंटाळा ॥६३॥
तूं अनंतब्रह्मांडनायक ॥ कर्ता करविता होसी एक ॥ तुझे गुणांचा करितां लेख ॥ श्रुतिशास्त्रें कष्टलीं ॥६४॥
आमचे अवगुण मानसीं ॥ आतां न धरीं हृषीकेषी ॥ माझे म्हणोनि संतांसी ॥ निरवावें दयाळा ॥६५॥
तुझे दासांचे व्हावें दास ॥ आणिक चित्तीं नाहीं आस ॥ त्यांचे चरणरज अंगास ॥ लागती आमच्या ऐसें करीं ॥६६॥
हेंचि आमुचें तप व्रत ॥ क्रिया कर्म जाण निश्चित ॥ तुझें भजनीं असावी प्रीत ॥ प्रेमयुक्त निजनामीं ॥६७॥
ऐकोनि द्विजवरांचें उत्तर ॥ संतोषले शारंगधर ॥ कृपा करूनि अपार ॥ मग भेटले सकलांसी ॥६८॥
आलिंगन देऊनि ब्राह्मणांसी ॥ काय बोलती वैकुंठवासी ॥ ज्ञानदेव जें सांगेल तुम्हांसी ॥ ते खूण मानसीं असों द्या ॥६९॥
सकळ सर्वज्ञांचा राव ॥ तो आत्मा माझा ज्ञानदेव ॥ तो सांगेल जीवींचा अनुभव ॥ तेथें सद्भाव असों द्या ॥१७०॥
ते खूण अंतरीं स्वभावें ॥ सुलभ होईल सर्वभावें ॥ मग दृढ धरूनियां जीवें ॥ करावी जतन सर्वांनीं ॥७१॥
ते निजकळा हातासी येतां जाण ॥ मग नलगेचि तीर्थाटन ॥ वेदशास्त्रअभ्यसन ॥ कांहीं नलगेचि सर्वथा ॥७२॥
मग कासया पाहिजे तपसायास ॥ करणें नलगेचि कायाक्लेश ॥ संतसंगीं धरितां विश्वास ॥ नासती दोष क्षणमात्रें ॥७३॥
वज्रासनीं बैसावें नेहटीं ॥ कांहींच नलगे खटपटी ॥ वास करणें गिरिकवाटीं ॥ वृथा चावटी कासया ॥७४॥
कासया करावें उग्र तप ॥ नलगेचि कांहीं मंत्रजप ॥ संतसंगें त्रिविध ताप ॥ निवतील सर्व क्षणमात्रें ॥७५॥
न लगे भस्मोद्धूलन फार ॥ न लगे वाढविणें जटाभार ॥ लोकाचारीं दांभिक पसर ॥ करणें न लगेचि सर्वथा ॥७६॥
सर्वां भूतीं करुणाभरित ॥ जिव्हेसी असावें नामामृत ॥ तेव्हांचि मन होईल निवृत्त ॥ क्षणमात्र न लागतां ॥७७॥
क्रिया कर्म करितां खटपट ॥ परी प्रेमेंविण येतो वीट ॥ हे आत्मज्ञानासी नव्हे वाट ॥ वृथा कटकट कर्मठा ॥७८॥
साधनांवांचूनियां जाण ॥ हाचि मार्ग बहु सोपान ॥ प्रेम करावें हरिकीर्तन ॥ राम कृष्ण गोविंद ॥७९॥
तीर्थ व्रतें तपें चोखडीं ॥ कीर्तनापुढें तीं बापुडीं ॥ सांडोनि थोरपणाची प्रौढी ॥ लाजोनि गेलीं सकळिक ॥१८०॥
तो हा प्रसिद्ध राजयोग ॥ सर्वां वरिष्ठ असे चांग ॥ अखंड धरूनि संतसंग ॥ वाचेसी नाम असावें ॥८१॥
संकल्प विकल्प चित्तासी ॥ येऊं न द्यावा मानसीं ॥ मनोभावें संतांसी ॥ शरण जावें सद्भावें ॥८२॥
ऐशा रीतीं जगज्जीवन ॥ विप्रांसी सांगे गुह्यज्ञान ॥ अवश्य म्हणोनि ब्राह्मण ॥ वंदिती चरण देवाचे ॥८३॥
ज्ञानदेवासी म्हणे रुक्मिणीवर ॥ तुम्हांसी निरविले हे द्विजवर ॥ यांचें मस्तकीं ठेवूनि कर ॥ अक्षय वर असों दे ॥८४॥
अवश्य म्हणोनि ज्ञानेश्वर ॥ भावें नमिला रुक्मिणीवर ॥ अनुभव पावती ऋषीश्वर ॥ तैसेंचि निर्धारें सांगें मी ॥८५॥
हें वेदांचें गुह्यज्ञान ॥ कीं वैराग्याचें जीवन ॥ की चिदाकाशींची खूण ॥ परम गुह्य जाणावें ॥८६॥
कीं शुद्ध ज्ञानाचेंही गुज ॥ नातरी मोक्ष मुक्तीचें बीज ॥ कीं हा सकळ मंत्रराज ॥ मंगळनिधि प्रकटला ॥८७॥
नामयाचें प्रेम अद्भुत ॥ हृदयामाजी होतें गुप्त ॥ तें भूमंडळी जगविख्यात ॥ कथा प्रकट जाहली कीं ॥८८॥
हें श्रवणाचेंही निजश्रवण ॥ कीं मनाचेंही निजमनन ॥ नातरी आवडीचें निदिध्यासन ॥ अनुसंधान नामयाचें ॥८९॥
हेंचि विचाराचें निवडिलें सार ॥ के धृतीचाही निजनिर्धार ॥ नातरी स्वरूपसाक्षात्कार ॥ उघड केला भूमंडळीं ॥१९०॥
कीं हें भक्तिरसाचें लाघव ॥ नातरी भावाचें निजवैभव ॥ कीं सन्मानाचें निजगौरव ॥ प्रकट जाहलें लोकांत ॥९१॥
कीं यशाचा प्रकाश थोर ॥ कीं परत्रींचाही पार ॥ नातरी कीर्तीचा विस्तार ॥ येऊन समोर ठाकला ॥९२॥
हें सकळ धर्मांचें जीवन ॥ कीं पवित्राचेंही पावन ॥ नातरी हें अधिष्ठान ॥ आनंदाचें जाणावें ॥९३॥
हें योगसिद्धीचें पीयूष ॥ कीं भक्तजनांचें सौरस ॥ नातरी पूर्ण आयुष्य ॥ निष्कामतेचें जाणावें ॥९४॥
हे देवभक्तांचे निजसोहळे ॥ कीं हें अमृत शिगे आलें ॥ आवडीकरून जिहीं सेविलें ॥ ते अक्षय जाहले अनायासें ॥९५॥
हे तीर्थावळी करितां श्रवण ॥ गर्भवासा नलगे येण ॥ म्हणोनि यांचें कीर्तन ॥ आवडीकरून ऐकावें ॥९६॥
यासी न म्हणावें प्राकृत ॥ नव्हे पाठांतर कवित्व ॥ हा केवळ उपनिषदर्थ ॥ ब्रह्मरसचि प्रकटला ॥९७॥
येथें जाणीव शाहाणीवता ॥ कोणीं न करावी तत्त्वतां ॥ सांडोनि व्युत्पत्तीची ममता ॥ सादर श्रवणार्था असावें ॥९८॥
हें सात्विकाचें निजसाधन ॥ यासी भोक्ते संतजन ॥ ऐसें ज्ञानदेव वचन ॥ तीर्थावळींत बोलिले ॥९९॥
त्यांचीं पद्यें आणूनि ध्यानीं ॥ म्यां लिहिली आर्षवाणी ॥ म्हणोनि शब्द विचक्षणीं ॥ न ठेवावा सर्वथा ॥२००॥
पुढें कूर्मदासचरित्र जाण ॥ सुरस कथा अति गहन ॥ श्रोतीं स्वस्थ करूनि मन ॥ चित्त देऊनि ऐकावें ॥१॥
जो विश्वव्यापक रक्मिणीरमन ॥ वक्ता वदविता जगज्जीवन ॥ भक्तविजय ग्रंथ पावन ॥ त्याचे इच्छेनें होतसे ॥२॥
स्नेहसूत्र घालितां सहज ॥ दीपक दिसतो तेजःपुंज ॥ तेवीं बुद्धि प्रकाशूनि गरुडध्वज ॥ ग्रंथ वदवी निजप्रेमें ॥३॥
जो पतितपावन अनाथनाथ ॥ जड मूढ तारिले असंख्यात ॥ महीपति त्याचा मुद्रांकित ॥ भजन करितो निजप्रेमें ॥४॥
स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविकभक्त ॥ पंचदशाध्याय रसाळ हा ॥२०५॥
॥ अध्याय ॥१५॥ ओंव्या ॥२०५॥     ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥    ॥
॥ श्रीभक्तविजय पंचदशाध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP