मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीभक्तविजय| अध्याय २९ श्रीभक्तविजय ॥ मंगलाचरणम् ॥ आरती श्रीविठ्ठलाची युगें ... अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ अध्याय १९ अध्याय २० अध्याय २१ अध्याय २२ अध्याय २३ अध्याय २४ अध्याय २५ अध्याय २६ अध्याय २७ अध्याय २८ अध्याय २९ अध्याय ३० अध्याय ३१ अध्याय ३२ अध्याय ३३ अध्याय ३४ अध्याय ३५ अध्याय ३६ अध्याय ३७ अध्याय ३८ अध्याय ३९ अध्याय ४० अध्याय ४१ अध्याय ४२ अध्याय ४३ अध्याय ४४ अध्याय ४५ अध्याय ४६ अध्याय ४७ अध्याय ४८ अध्याय ४९ अध्याय ५० अध्याय ५१ अध्याय ५२ अध्याय ५३ अध्याय ५४ अध्याय ५५ अध्याय ५६ अध्याय ५७ अध्याय २९ संतकवी महीपतीबोवा ताहराबादकर विरचित Tags : bhakta vijaymahipatipuranपुराणभक्त विजयमराठीमहिपती अध्याय २९ Translation - भाषांतर श्रीगणेशाय नमः ॥ श्रीपंढरीनाथाय नमः ॥ जय मंगलवदना मंगलाधीशा ॥ त्रिगुणातीता हृषीकेशा ॥ विश्वव्यापका सर्वेशा ॥ पंढरीशा श्रीविठ्ठला ॥१॥जय पुराणपुरुषा अनंतनामा ॥ भक्तकामकल्पद्रुमा ॥ सगुणस्वरूपा मेघश्यामा ॥ निजभक्तप्रेमा तूं एक ॥२॥जय द्रौपदीलज्जानिवारणा ॥ गजेंद्रमोचका शेषशयना ॥ पयोब्धिवासा कमलनयना ॥ भक्तभूषणा पांडुरंगा ॥३॥तूं सकळ देवां वरिष्ठ देव ॥ नाम जपतां निवाला शिव ॥ इंद्रादिक सकळ देव ॥ तुझा स्तव करिताती ॥४॥तूं अंतरसाक्ष चैतन्यघन ॥ योगियांचें निजध्यान ॥ वैरियां देसी सायुज्यसदन ॥ आनंदघन तूं दयाळ ॥५॥तूं विधात्याचा निजजनिता ॥ सर्व करून होसी अकर्ता ॥ भक्तवत्सला रुक्मिणीकांता ॥ पार निगमार्था न कळे तुझा ॥६॥चौदा विद्या चौसष्टि कळा ॥ तुज वर्णिती भक्तवतसला ॥ तेथूनि जासी गोपाळा ॥ भक्तप्रेमळाजवळी तूं ॥७॥सांडोनियां वैकुंठभुवन ॥ सांडोनि क्षीरसागर शेषशयन ॥ सांडोनियां अमृतपान ॥ निजभक्तप्रेम धुंडिसी ॥८॥सांडोनियां द्वारकापुरी ॥ आलासी पुंडलिकाचें द्वारीं ॥ कर ठेवूनियां कटीवरी ॥ उभा श्रीहरि तिष्ठसी ॥९॥ऐसा निजभक्तांचा प्रेमा ॥ तुज आवडे पुरुषोत्तमा ॥ प्रेमळभक्तहृदयधामा ॥ आत्माराम वससी तूं ॥१०॥म्हणोनियां पुढतपुढतीं ॥ नमन करीं मी तुजप्रती ॥ ग्रंथ वदावया देऊनि स्फूर्ती ॥ साह्य श्रीपति असावें ॥११॥आतां ऐका श्रोतेजन ॥ मागें कथिलें निरूपण ॥ लग्नसिद्धि करूनि जाण ॥ जगज्जीवन पैं गेले ॥१२॥नरसी मेहेता नित्यकाळ ॥ हृदयीं आठवूनि घननीळ ॥ कीर्तनीं नाचे सर्वकाळ ॥ भक्त प्रेमळ विदेही ॥१३॥सांडोनियां ज्ञानाभिमान ॥ सांडोनि आशापाशबंधन ॥ सांडोनियां लौकिक मान ॥ श्रीकृष्णचिंतन करीतसे ॥१४॥सांडोनियां विषयगोडी ॥ तोडोनि ममतेची बेडी ॥ सांडोनि विकल्पबुद्धि कुडी ॥ शांति चोखडी तो ल्याला ॥१५॥सांडोनियां समविषमभाव ॥ सारिखे मानी रंक राव ॥ अनंत ब्रह्मांडींचे जीव ॥ इंद्रादिदेव सारिखे ॥१६॥व्याघ्र वृश्चिक सिंह श्वान ॥ यांचे न लेखी अवगुण ॥ अजापालक आणि ब्राह्मण ॥ देखे समान निजदृष्टीं ॥१७॥कल्पतरु आणि बाभूळ ॥ हिंगण आणि मलयागर ॥ अपशब्द आणि रसाळ बोल ॥ लेखी सकळ समदृष्टीं ॥१८॥पुढें पडलिया द्रव्यराशी ॥ दृष्टीस मानी मृत्तिका जैसी ॥ अमूल्य रत्नें पाषाणाऐसीं ॥ निजदृष्टीसी लेखित ॥१९॥तंव कोणे एके दिवसीं ॥ यात्रा चालिली द्वारकेसी ॥ जुन्यागडीं एके दिवसीं ॥ येऊनियां राहिली ॥२०॥केशवभट्ट नामाभिधान ॥ परम भाविक होता ब्राह्मण ॥ ग्रामांत येऊन वर्तमान ॥ लोकांप्रति पुसतसे ॥२१॥चोहटां बैसले निंदक खळ ॥ त्यांजवळी आला तत्काळ ॥ उभा राहूनि ते वेळ ॥ काय बोलिला तें ऐका ॥२२॥लोकांसी बोले मधुरोत्तरीं ॥ आम्हीं ब्राह्मण यात्रेकरी ॥ आतां जातों द्वारकापुरीं ॥ श्रीहरिचरण पाहावया ॥२३॥तुमचें नगरीं सावकार ॥ कोण आहे हुंडी करणार ॥ सांगोनि द्यावा सत्वर ॥ सत्य विचार करूनि ॥२४॥वचन ऐकोनि ते वेळ ॥ हांसों लागले निंदक खळ ॥ म्हणती नरसी मेहेता भक्त प्रेमळ ॥ नांदे सकळ वैभवेंसीं ॥२५॥ तो सभाग्य एक धनवंत ॥ विरक्तपणें असे नांदत ॥ तुम्ही सत्वर जावें तेथ ॥ कार्य निश्चित होईल ॥२६॥पताका आणि वृंदावन ॥ गरुडटके हरिकीर्तन ॥ नरसी मेहेत्याचें भवन ॥ तेंचि जाण द्विजवरा ॥२७॥वचनें ऐकूनियां ऐसीं ॥ विश्वास वाटला ब्राह्मणासी ॥ नरसी मेहेत्याचें गृहासी ॥ अति वेगेंसी चालला ॥२८॥तंव श्रोते म्हणती नवलपरी ॥ सर्वांतरीं असतां श्रीहरी ॥ निजभक्तांची छळणा करी ॥ हें निर्धारीं मज सांगा ॥२९॥तरी भक्त अभक्त दोघे जण ॥ स्वयें निर्मीत नारायण ॥ अभक्तांच्या योगें जाण ॥ पावती सन्मान निजदास ॥३०॥नक्र न धरितां गजेंद्रासी ॥ तरी कां धांवता वैकुंठवासी ॥ दुःशासन न छळिता द्रौपदीसी ॥ तरी वस्त्रें कैसीं हरि देता ॥३१॥हिरण्यकशिपु पहा दैत्य ॥ गांजिता नसता प्रल्हाद भक्त ॥ तरी खांबांतूनि जगन्नाथ ॥ कैशा रीतीं प्रकटता ॥३२॥लोह नसतें जरी निर्माण ॥ तरी परिसालागीं पुसतें कोण ॥ तेवीं अभक्तांच्या योगें जाण ॥ पावती सन्मान निजदास ॥३३॥कल्पना नसती याचकासी ॥ तरी कोण पुसतें कल्पतरूसी ॥ अंधकार न पडता जरी निशीं ॥ तरी कोण दीपकासी पुसता पैं ॥३४॥जरी नसतें असत्य भाषण ॥ तरी सत्यसुकृता जाणते कोण ॥ प्रजा नसती जरी निर्माण ॥ तरी भूपतीसी कोण सन्मानी ॥३५॥सूक्ष्म नसती तारागण ॥ तरी चंद्रासी वरिष्ठ म्हणे कोण ॥ हिरियासी नसता लोहघण ॥ तरी परीक्षक कोण तयाचा ॥३६॥जरी निर्मिली नसती यमपुरी ॥ तरी स्वर्गींची आशा कोण धरी ॥ हिंडणें नसतां चौर्यायशीं फेरी ॥ तरी मोक्षसरी कोण वाहे ॥३७॥असो मागील निरूपण ॥ केशवभट्ट भाविक ब्राह्मण ॥ नरसी मेहेत्याचें गृहा जाण ॥ त्वरेंकरून पातला ॥३९॥तुलसीवृंदावन शुचिर्भूत ॥ तेथें बैसलाएस विष्णुभक्त ॥ ध्यानांत आणोनि वैकुंठनाथ ॥ स्मरण करीत सप्रेम ॥४०॥ सांडोनियां देहबुद्धी ॥ उघडी लागलीसे समाधी ॥ निरसोनि सकळ भवव्याधी ॥ अद्वैतबोधीं निवाला ॥४१॥तों पुढें ब्राह्मण अकस्मात ॥ येतां देखिला मंदिरांत ॥ नरसी मेहेता देखोनि त्वरित ॥ नमन करीत निजप्रीतीं ॥४२॥पुढे टाकूनि आसन ॥ विप्रासी बैसवी सन्मानेंकरून ॥ म्हणे येणें कोणीकडून ॥ कोठें गमन मज सांगा ॥४३॥ब्राह्मण बोलिला ते अवसरीं ॥ आम्ही जातसों द्वारकापुरीं ॥ पुढें मार्ग अवघड भारी ॥ होतसे चोरी निजवाटे ॥४४॥वाटखर्ची सातशतें ॥ द्रव्य आणिलें आहे येथें ॥ हुंडी लिहूनियां निश्चितें ॥ द्यावीं त्वरित मजलागीं ॥४५॥रात्रीं येऊनि नगरांत ॥ ग्रामींचे लोकांसी पुसिली मात ॥ कोण सावकार आहे येथ ॥ हुंडी करून देईल ॥४६॥नाम सांगितलें तुमचें त्यांनीं ॥ ऐसी ऐकतां विप्रवाणी ॥ नरसी मेहेता विस्मित मनीं ॥ म्हणे सत्य जनीं हेळिलें ॥४७॥परी अनाथनाथ भक्त कैवारीं ॥ तो आहे आमुचे शिरावरी ॥ भक्त कार्यासी नानापरी ॥ अवतार धरी निजलीलें ॥४८॥ऐसा निश्चय धरूनि मनीं ॥ ब्राह्मणासी म्हणे ते क्षणीं ॥ द्रव्य आणिलें मंदिराहूनी ॥ ठेवा आणोनि या ठाया ॥४९॥ऐकोनि ब्राह्मण बोले वचन ॥ द्वारकेंत तुमचा गुमास्ता कोण ॥ त्याचें सांगा नामाभिधान ॥ ऐसें वचन बोलिला ॥५०॥ऐकोनि बोले भक्त वैष्णव ॥ सांवळसा हें त्याचें नांव ॥ इंद्रादिक सकळ देव ॥ वंदिती सर्व तयासी ॥५१॥चारी वेद होऊनि भाट ॥ अखंड जयाची कीर्ति गात ॥ कैलासपति उमाकांत ॥ नाम जपत जयाचें ॥५२॥मुख्य दुकान क्षीरसागरीं ॥ दुजें घातलें वैकुंठपुरीं ॥ गोकुळ वृंदावन मथुरानगरीं ॥ वैष्णवमंदिरीं राहिला ॥५३॥मानदेशीं भीमातट ॥ वसविली पंढरी महापेठ ॥ शेट्या पुंडलीक भक्त निकट ॥ उभा तिष्ठत त्यापासीं ॥५४॥तोचि द्वारकेमाझारी ॥ बैसोनि करीतसे सावकारी ॥ व्यास वाल्मीकि व्यापारी ॥ कीर्तनकेणें उमानिती ॥५५॥नामा कबीर भक्त भाविक ॥ तयासी पातले गिर्हाइक ॥ केण घेऊन जड जीवलोक ॥ तारिले देख निजनिष्ठें ॥५६॥ऐसें ऐकोनियां वचन ॥ ब्राह्मण पावला समाधान ॥ सातशतें द्रव्य जाण ॥ वृंदावनीं ठेविलें ॥५७॥नरसी मेहेत्यानें तेच क्षणीं ॥ पत्र लिहिलें करुणावचनीं ॥ म्हणे द्वारकावासी चक्रपाणी ॥ ऐका विनवणी दासाची ॥५८॥तूं उदार धीर करुणासागर ॥ उपमन्यु बाळ मागतां क्षीर ॥ ऐकोनि त्याचें करुणाउत्तर ॥ क्षीरसागर दिधला ॥५९॥तुझे गुण रुक्मिणीकांता ॥ वर्णितां शिणला विधाता ॥ ब्राह्मण सुदामा भेटीस येतां ॥ हेमपुरी तया दिधली ॥६०॥आढळपदीं ध्रुव बाळक ॥ त्वां स्थापिलें करूनि कौतुक ॥ ऐसा तूं रमानायक ॥ भक्तरक्षक सर्वदा ॥६१॥तूं उदारधीरशिरोमणी ॥ माझें पत्र परिसोनि कानीं ॥ ब्राह्मणासी द्रव्य देऊनी ॥ चक्रपाणि तोषवावा ॥६२॥तुमचा भरंवसा जाणूनी ॥ द्रव्य घेतलें यापासूनी ॥ करुणावचन ऐकोनि कानीं ॥ आनंदघनीं वर्षावें ॥६३॥म्हणसी मी अव्यक्त अजित ॥मजवरी पाठविली वरात ॥ हांसे होईल जनांत ॥ ऐसी मात न करावी ॥६४॥सांवळसा द्वारकावासी ॥ सातशतें द्रव्य देणें यासी ॥ हुंडी लिहूनियां ऐसी ॥ विप्रांपासीं दिधली ॥६५॥संत साधु वैष्णव जन ॥ बोलावूनि गांवींचे ब्राह्मण ॥ तत्काळ द्रव्य त्यांलागून ॥ वांटोनियां दिधलें ॥६६॥निरुपाधिक होऊन ॥ करीत बैसला नामस्मरण ॥ नरसी मेहेत्यासी करूनि नमन ॥ विप्र तेथून चालिला ॥६७॥मार्गीं चालतां निजमनीं ॥ विस्मय करी अंतःकरणीं ॥ ऐसा सावकार उदार कोणी ॥ नाहीं नयनीं देखिला ॥६८॥उदार विरक्त सर्वांपरी ॥ अन्नवस्त्र संकीर्ण घरीं ॥ क्षमा शांति धरून अंतरीं ॥ कीर्तन करी सप्रेम ॥६९॥ऐसियासीं म्यां व्यवहार केला ॥ कैसी भ्रांति पडली मला ॥ म्हणूनि चिंताक्रांत जाहला ॥ काय बोलिला ऐका तें ॥७०॥सागरीं घातलें लवण ॥ तें नये जैसें परतोन ॥ तेवीं माझें द्रव्य जाण ॥ कृष्णार्पण जाहलें कीं ॥७१॥कीं साद घालितां आकाशा ॥ प्रतिशब्द फिरोनि नयेचि जैसा ॥ नरसी मेहेत्यासीं व्यवहार तैसा ॥ यथारीतीं म्यां केला ॥७२॥कीं अग्नींत घृत टाकिलें ॥ मागुती न ये कांहीं केलें ॥ तेवीं वैष्णवासी जें दिधलें ॥ तें ब्रह्मार्पण जाहलें कीं ॥७३॥कीं तुळसीस घालितां पाणी ॥ फळइच्छा न धरावी मनीं ॥ तेवीं हुंडी येईल परतोनी ॥ हें मजलागोनि दिसेना ॥७४॥कीं जीवन मिळालें सागरीं ॥ तें फिरूनि न येचि माघारीं ॥ तेवीं हें द्रव्य निर्धारीं ॥ कुबेरभांडारीं पैं गेलें ॥७५॥कीं आकाशांत ठेविलीं सुमनें ॥ समीरासी मकरंद दिधला तयानें ॥ तेवीं द्रव्य निजभक्तानें ॥ विप्रांकारणें वांटिले ॥७६॥सवेंचि म्हणे आतां ॥ याचा शोक कासया वृथा ॥ विश्वंभरा त्या श्रीकृष्णनाथा ॥ असे चिंता सर्वांची ॥७७॥यापरी करूनि समाधान ॥ विप्र आला द्वारकेलागून ॥ करूनि गोमतीचें स्नान ॥ श्रीकृष्णदर्शन घेतलें ॥७८॥वंदोनियां श्रीकृष्णचरण ॥ उभा ठाकला कर जोडून ॥ अनन्यभावें प्रेमेंकरून ॥ करी स्तवन हरीचें ॥७९॥म्हणे जयजयाजी रुक्मिणीकांता ॥ दीनबंधो रणछोडनाथा ॥ अनाथनाथा कृपावंता ॥ माझी चिंता निरसावी ॥८०॥ऐसें बोलोनि करुणावचन ॥ मागुती घातलें लोटांगण ॥ पुजार्यासी वर्तमान ॥ पुसे ब्राह्मण ते वेळीं ॥८१॥म्हणे सांवळसा सावकार ॥ मज दाखवा तयाचें मंदिर ॥ आमुची हुंडी तयावर ॥ असे साचार जाण पां ॥८२॥म्हणे ऐकूनि सकळ जन ॥ म्हणती सांवळसा सावकार कोण ॥ देखिला ऐकिला नाहींच जाण ॥ द्वारकापट्टण धुंडितां ॥८३॥नरसी मेहेत्यानें तुम्हांकारण ॥ वार्य़ावर वरात दिधली जाण ॥ द्रव्य देतां त्यालागून ॥ विचार मग न केला ॥८४॥ऐवज देखोनि व्यवहार करणें ॥ पात्र पाहूनि दान देणें ॥ श्रीगुरूसी रिघोनि शरण ॥ जीवींची खूण पुसावी ॥८५॥वैष्णव देखोनि दंडवत ॥ सद्भावें घालावें त्वरित ॥ परी प्रपंचव्यवहार विपरित ॥ तयांसी निश्चित न करावा ॥८६॥ अन्न वस्त्र निजभक्तांसी ॥ अखंड द्यावें सद्भावेंसीं ॥ परी देणेंघेणें व्यवहारासी ॥ सर्वथा त्यांसीं न करावें ॥८७॥त्यांचे संगतीं जे लागले ॥ ते आपुल्याऐसें त्यांहीं केले ॥ सरिताओघ समुद्रीं मीनले ॥ ते सागर जाहले अनायासे ॥८८॥परिसाचा होतां समागम ॥ लोहाचा उडोनि जाय काळिम ॥ तेवीं धरितां संतसमागम ॥ प्रपंचविराम तत्काळ ॥८९॥कीं गंगेसी ओहळ मिळतां जाण ॥ नामरूप पालटे न लागतां क्षण ॥ तेवीं साधूंचे संगतीकरून ॥ प्रपंचभान उरेना ॥९०॥ऐसा असतां वृद्धाचार ॥ वैष्णवासीं केला व्यवहार ॥ आतां सांवळसा सावकार ॥ पाहासी कोठे द्विजवरा ॥९१॥ऐकतां पुजार्याचें वचन ॥ चिंताक्राम्त जाहला ब्राह्मण ॥ मागुती देवासी करूनि नमन ॥ विप्र तेथोन निघाला ॥९२॥बिर्हाडासी जातां जाण ॥ विप्राचें विस्मित जाहलें मन ॥ म्हणे द्रव्य तो नरसी मेहेत्यान ॥ तेचि क्षणीं वांटिलें ॥९३॥आतां सांडोनि द्रव्यमाया ॥ शरण जावें वैकुंठराया ॥ ऐसें म्हणूनि तया ठाया ॥ विप्र बैसला चोहटां ॥९४॥तो देवाधिदेव रुक्मिणीवर ॥ आपण जाहला सावकार ॥ सवे घेऊनि उद्धव अक्रूर ॥ आणिला रहंवर बैसावया ॥९५॥रथीं बैसोनि जगज्जीवन ॥ दारुकासी बोले निजवचन ॥ आम्हांवरी नरसी मेहेत्यान ॥ हुंडी लिहून पाठविली ॥९६॥त्याचें करावया निजकाज ॥ सांवळसा सावकार जाहलों आज ॥ रूप पालटोनि चतुर्भुज ॥ जातसें सहज नररूपें ॥९७॥तंव उद्धव म्हणे जगज्जीवना ॥ तुझा पार निगमांसी कळेना ॥ भक्तकाजासी नारायणा ॥ अनंत रूपें धरिसी तूं ॥९८॥नारद म्हणे तूं नाटकी पूर्ण ॥ आधीं भक्तांसी करूनि विघ्न ॥ मग रूप धरूनियां सगुण ॥ करिसी धांवणें श्रीहरे ॥९९॥जैसी बाळकासी माता ॥ नसता बागूल दाखवी वृथा ॥ भयें बाळक आक्रंदतां ॥ संबोखी तत्त्वतां निजमोहें ॥१००॥यापरी भक्तांसी संवाद ॥ करीत चालिले गोविंद ॥ तो भक्तकैवारी जगद्वंद्य ॥ न कळे अगाध लीला त्याची ॥१॥दिव्य अलंकार वस्त्रें भूषण ॥ रूप सांवळें दिसे सगुण ॥ राजबिंदींतून जगज्जीवन ॥ जात संभ्रमें निजसुखें ॥२॥संभ्रमें स्थिर चाले रथ ॥ दारुकासी म्हणे वैकुंठनाथ ॥ ब्राह्मण बैसला चिंताक्रांत ॥ न्यावें त्वरित त्या ठाया ॥३॥ऐसें सांगोनि रुक्मिणीपती ॥ रथ चालवी सत्वरगती ॥ सगुण स्वरूप देखोनि प्रीतीं ॥ आश्चर्य करिती अखिल लोक ॥४॥पुढें पाहतां जगन्नाथ ॥ तों ब्राह्मण देखिला अकस्मात ॥ तयासी पुसे रुक्मिणीकांत ॥ चिंताक्रांत कां जाहलां ॥५॥ऐसें बोलतां वैकुंठवासी ॥ आश्चर्य वाटलें ब्राह्मणासी ॥ नमस्कार करून सद्भावेंसी ॥ वर्तमान तयासी सांगतसे ॥६॥जुन्यागडीं भक्त वैष्णव ॥ त्याचें नरसी मेहेता नांव ॥ त्याचा गुमास्ता सांवळसाव ॥ द्वारकेमाजी वसतसे ॥७॥त्याचें दर्शन नाहीं होत ॥ म्हणूनि जाहलों चिंताक्रांत ॥ ऐसें ऐकोनियां जगन्नाथ ॥ काय बोलती विप्रासी ॥८॥हांसोनि बोले रुक्मिणीपती ॥ सांवळा आम्हांसी म्हणती ॥ नरसी मेहेत्यानें मजप्रती ॥ काय आज्ञा पैं केली ॥९॥ऐसें बोलतां जगज्जीवन ॥ द्विजासी वाटलें समाधान ॥ जेवीं अवर्षणीं वर्षतां घन ॥ पर्वतीं तृण संतोषे ॥११०॥कीं प्रेमळ्भक्त हरिकीर्तन ॥ ऐकोनि पावती समाधान ॥ कीं अनुतापी तीर्थ देखोन ॥ संतोष निजमनीं पावती ॥११॥कीं श्रवण करितां भागवत ॥ स्वानंदभरित वैष्णव भक्त ॥ कीं जीवन देखोनि तृषाक्रांत ॥ संतोषे चित्त तयांचें ॥१२॥कीं साधकांसी सत्समागम ॥ जोडतां पावती समाधान ॥ उदार दाता देखोन ॥ याचक मनीं संतोषती ॥१३॥त्याचपरी तो ब्राह्मण ॥ संतोष पावला ऐकून ॥ तत्काळचि पत्र काढून ॥ तयाहातीं दिधलें ॥१४॥पत्र देखोनि रुक्मिणीपती ॥ मस्तकीं वंदिलें निजप्रीतीं ॥ श्रुतिशास्त्रें जयासी वर्णिती ॥ अद्भुत गति न वर्णवे ॥१५॥तो देवाधिदेव रुक्मिणीरमण ॥ जाहला असे भक्ताधीन ॥ पत्र वाचितां जगज्जीवन ॥ हास्यवदन बोलत ॥१६॥उद्धवासी म्हणे वैकुंठनाथ ॥ नरसी मेहेता प्रेमळ भक्त ॥ संसारीं असोनि विरक्त ॥ परी किंचित वरात पाठविली ॥१७॥ऐसें बोलूनियां त्वरित ॥ द्रव्य काढिलें शतें सात ॥ विप्रापासीं रुक्मिणीकांत ॥ दिधलें निश्चित ते वेळीं ॥१८॥द्रव्य देखतांचि जाण ॥ विप्र पावला समाधान ॥ विस्मित होऊनि निजमन ॥ मधुरोत्तरें बोलत ॥१९॥तुम्ही तंव सावकार श्रीमंत ॥ नरसी मेहेता दुर्बळ दिसत ॥ सेवक थोर स्वामी अनाथ ॥ वाटे विपरीत देखोनी ॥१२०॥सूर्यापरीस तेजागळा ॥ अरुण नाही कधी देखिला ॥ गंगेपरीस गांवनाला ॥ पुराणीं वर्णिला नाहीं कीं ॥२१॥रायापरीस प्रधान थोर ॥ देखिला नाहीं पृथ्वीवर ॥ श्रीरामापरीस वानर ॥ प्रतापी थोर नायकिला ॥२२॥कीं कैलासपती पार्वतीरमण ॥ त्याहूनि प्रतापी कोण गण ॥ कीं सरितां थोर समुद्राहून ॥ देखिली ऐकिली नाहीं कीं ॥२३॥लक्ष्मीहूनि अधिक सिद्धी ॥ ऐकिली नाहीं त्रिशुद्धी ॥ चंद्राहूनि नक्षत्र कधीं ॥ तेजासी अधिक न देखों ॥२४॥तेजासी आगळी हिर्याहूनी ॥ नाहीं देखिली हिरकणी ॥ सिद्धांतज्ञानावरिष्ठ कोणी ॥ वेदांतज्ञानी नाहीं ऐकिले ॥२५॥हें विपरीत देखिलें आजि नयनीं ॥ म्हणोनि पुसतों तुम्हांलागूनी ॥ ऐसी ऐकोनि विप्रवाणी ॥ चक्रपाणी बोलत ॥२६॥ब्राह्मणासी म्हणे रुक्मिणीकांत ॥ अखंड उदास वैष्णव भक्त ॥ संसारीं असोनि मायातीत ॥ आशारहित वर्तती ॥२७॥मेघ वर्षावा अहर्निशीं ॥ हे इच्छा नसे समुद्रासी ॥ तेवीं वैष्णव निजमानसीं ॥ आशापाशीं न गुंतती ॥२८॥कीं दीपक उजळावे मंदिरासी ॥ हे भानूसी इच्छा नव्हे जैसी ॥ तेवीं वैष्णव निजमानसीं ॥ आशापाशीं न गुंतती ॥२९॥जे सुधारसपान सेविती ॥ ते औषधीचा प्रयत्न न करिती ॥ तेवी विष्णुभक्त धनसंपत्ती ॥ तुच्छ मानिती निजमनें ॥१३०॥कीं तुलसीपत्राहूनि बकुल सेवंती ॥ प्रीतीनें न घेचि लक्ष्मीपती ॥ तेवीं भजनावरिष्ठ धनसंपत्ती ॥ वैष्णव न गणिती निजमनीं ॥३१॥जयासी जाहलें सिद्धांतज्ञान ॥ तो कोकशास्त्रीं न दे कान ॥ तेवीं हरिभजनीं भक्तजन ॥ निमग्न होऊन राहिले ॥३२॥नरसी मेहेता परम उदासी ॥ धनसंपत्ति नावडे त्यासी ॥ आम्हीं त्याचिया स्वभावासी ॥ गति कैसी करावी ॥३३॥मातेचा स्वभाव साचार ॥ बाळकासी लेववावे अलंकार ॥ तेवीं नरसी मेहेता अपार ॥ कृपा आम्हांवर करीतसे ॥३४॥कीं निजपुत्रासी संपत्ति धन ॥ पिता न वंची निजमनेंकरून ॥ तेवीं आम्हांवरी नरसी मेहेत्यान ॥ आभार पूर्ण टाकिली ॥३५॥ऐसें बोलतां दीनदयाळ ॥ आश्चर्य करिती वैष्णव सकळ ॥ म्हणती नरसी मेहेता भक्त प्रेमळ ॥ वश घननीळ केला कीं ॥३६॥इतुकें लाघव करूनि हरी ॥ अदृश्य जाहले ते अवसरीं ॥ विप्रासी वाटाली नवलपरी ॥ आश्चर्य करी निजमनीं ॥३७॥द्रव्य मोजूनियां पाहात ॥ तंव तें भरलें अगणित ॥ मनीं म्हणे द्वारकानाथ ॥ भेटले त्वरित मजलागीं ॥३८॥यापरी करूनि समाधान ॥ केलें ब्राह्मणसंतर्पण ॥ भक्त भाविक वैष्णव जन ॥ घातलें भोजन तयांसी ॥३९॥राहोनि द्वारकासुक्षेत्रीं ॥ द्रघ्य वेंचिलें सत्पात्रीं ॥ शास्त्रज्ञ ब्राह्मण अग्निहोत्री ॥ शुद्धसत्पात्रीं अर्पिलें ॥१४०॥महाद्वारीं जाऊनि तेथ ॥ भावें नमिला द्वारकानाथ ॥ देवासी पुसोनिया त्वरित ॥ विप्र तेथूनि चालिला ॥४१॥जुन्यागडीं परतोनि त्वरित ॥ नरसी मेहेत्यासी येऊन भेटत ॥ सांगितला सकळ वृत्तांत ॥ वर्तलें चरित्र ज्या रीतीं ॥४२॥म्हणे तूं वैष्णव प्रेमळभक्त ॥ ऋणी केला द्वारकानाथ ॥ सांवळसा येउनि त्वरित ॥ भेटले निश्चित मजलागीं ॥४३॥तुमचें पत्र दिधलें हातीं ॥ तें मस्तकीं वंदिलें निजप्रीतीं ॥ वाचोनि पाहतां सत्वरगती ॥ सप्रेम चित्तीं जाहले ॥४४॥द्रव्य काढोनि सातशत ॥ माझे हातीं दिधलें त्वरित ॥ मोजूनि पाहतां अगणित ॥ संख्येरहित भरलें तें ॥४५॥मागें पाहातां परतोनी ॥ तंव अदृश्य जाहले तेच क्षणीं ॥ ऐसी ऐकोनि विप्रवाणी ॥ अश्रु नयनीं लोटले ॥४६॥म्हणे द्वारकावासी रुक्मिणीरमणा ॥ अनाथबंधो मनमोहना ॥ विश्वंभर करुणाघना ॥ मजकारणें शिणलासी ॥४७॥तूं दीनबंधु कृपासागर ॥ श्रुतिशास्त्रां न कळे तुझा पार ॥ चहूं वाचांसी अगोचर ॥ जगदुद्धार तूं एक ॥४८॥अनाथनाथा भक्तवत्सला ॥ पाळिसी दासांचा लळा ॥ ऐसें म्हणोनि ते वेळां ॥ अश्रु डोळां लोटले ॥४९॥सवेंचि स्थिर करूनि मन ॥ करिता जाहला नामस्मरण ॥ पुढिले अध्यायीं फळशोभन ॥ अवधान द्यावें मज संतीं ॥१५०॥अहो संतचरित्र ग्रंथ साचार ॥ हाचि जाणा क्षीरसागर ॥ शेषशायी लक्ष्मीवर ॥ वसे निरंतर तये ठायीं ॥५१॥तेथें मी दीन अनाथ ॥ सेवूं पावलों परमामृत ॥ सप्रेमजीवन वैकुंठनाथ ॥ देत निश्चित निजप्रीतीं ॥५२॥भक्तवैष्णवांचिये पंक्तीं ॥ भाविक भक्त बैसले सत्वरगतीं ॥ त्यांचें उच्छिष्ट महीपती ॥ सेवीत प्रीतीं निजछंदें ॥५३॥स्वस्ति श्रीभक्तविजय ग्रंथ ॥ ऐकतां तुष्टेल जगन्नाथ ॥ प्रेमळ ऐका भाविक भक्त ॥ एकोनत्रिंशाध्याय रसाळ हा ॥१५४॥॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ श्रीमज्जगदीश्वरार्पणमस्तु ॥ ॥ अध्याय ॥२९॥ ॥ ओंव्या ॥१५४॥ ॥ ॥ ॥॥ श्रीभक्तविजय एकोनत्रिंशाध्याय समाप्त ॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP