स्वामी ! भवत्प्रसादज्वलनें आज्ञान सर्वही जळलें,
कळलें स्वहित, नुमजतें, कीं मन बहु विषयसेवनें मळलें. ॥४१॥
आतां बा ! निजराज्य प्राज्यभ्रमतापकारण त्यजिन;
अजि न व्यसनप्रद, तें ह्ति सेविन वन्य धरिन मीं अजिन. ’ ॥४२॥
दत्त म्हणे, ‘ भव्य तुझें नित्य असो, योजिलें बरें बा ! हें,
जा, राजा ! हो निर्मम, निरहंकार, प्रसन्न मीं आहे. ’ ॥४३॥
झालें ज्ञान घडींतचि, लावुनि चरणांबुजा शिरा ज्याच्या,
त्या गुरुसि नमुनि, गेला सत्वर शिबिरासि काशिराज्याच्या. ॥४४॥
भेटुनि बंधुसमक्षचि काशिपतिस विहितसंगकुत्स वदे,
‘ घे राज्य नृपा ! हें, कीं अर्पुनि मम अग्रजासि उत्सव दे. ’ ॥४५॥
काशिपति म्हणे, ‘ सहसा त्वां निजराज्य न उगेंचि सोडावें,
मोडावें न क्षत्रियवृत्त, सुयश रण करूनि जोडावें. ’ ॥४६॥
स्मित करुनि अलर्क म्हणे ‘ पूर्वी माझें असेंचि मन होतें,
सांप्रत विरक्त झालें, भरलें तें जेंवि रिचवलें पोतें. ॥४७॥
कारण काशिपते ! मीं कथितों, तें श्रवण तूं करीं साचें,
जो प्राणिग्राम असे, एक गुणत्रयचि मूळ हें याचें. ॥४८॥
स्वामी, मित्र, द्वेषी, भृत्य, असें तेधवां पहायाचें
कारण काहींच नसे, केवळ अज्ञींच हें रहायाचें. ॥४९॥
तुजपासुनि मज झालें भय काशीशा ! महोग्र भेदानें,
शरण श्रीदत्तातें गेलों, होवूनि विकळ खेदानें. ॥५०।
त्याच्या पदप्रसादें गेलें अज्ञान सकळ विलयातें,
आत्मस्वरूप कैसा तो ज्ञानादर्श न कळविल यातें ? ॥५१॥
राजा ! त्वछत्रु न मीं, मछत्रु न तूं, क्षय भ्रमा झाला ;
एक व्यापक आत्मा सर्वत्र प्रत्यया असा आला. ’ ॥५२॥
ऐसें अलर्क वदतां, बहुतचि हर्षे सुबाहु तो आर्य;
उठुनि म्हणे, ‘ काशिपते ! माझें सिद्धीस पावलें कार्य. ॥५३॥
झालों कृतार्थ, आतां जातों, हो तूं सदा सुखी, राया !
जाया आज्ञा दे; बहु हर्ष दिला, कार्य करुनियां, बा ! या. ’ ॥५४॥
काशिपति म्हणे, ‘ बापा ! सांग, मजकडे कशास आलास ?
निष्पन्न अर्थ कोण ? स्पष्ट वद, कसा कृतार्थ झालास ? ॥५५॥
वदलासि, ‘ मला साधुनि दे भोगितसे अलर्क मद्राज्या. ’
तें जिंकूनि दिलें, घे, वांछित होतासि नित्य भद्रा ज्या. " ॥५६॥
ब्रह्मज्ञ सुबाहु म्हणे, ‘ राजा ! माझा अलर्क हा भ्राता,
ख्याता ज्ञानसुधेची तटिनी देवी मदालसा माता. ॥५७॥
या ग्राम्यभोगसक्ता ब्रह्मज्ञानें घडावया मुक्ति,
वैराग्यार्थ करविली, तुज योजुनि, हे पराभवा युक्ति. ॥५८॥
मातेनें कर्णांत ज्ञान दिलें, आननीं जसें स्तन्य;
धन्य तिघे सुत झालों, हा अज्ञचि राहिला जसा अन्य. ॥५९॥
राहुनि मदालसेच्या गर्भीं, प्राशूनिही तिचें दुग्ध,
न रहावा संसारीं साक्षात् भ्राता अलर्क हा मुग्ध. ॥६०॥