नामें बरवीं केलीं विक्रांत, सुबाहुम शत्रुमर्दन, हीं
राजसुतातें, उचितें कुशळें घालावया जनास महीं. ’ ॥२१॥
ती साध्वी पतिस म्हणे, ‘ आख्या आली मनास माज्या जी,
ती तुमच्या आज्ञेनें ठेवितसें या सुतासि, राज्याजी ! ॥२२॥
हा सुत अलर्कनामा या वंशीं, जेंवि दीप ओकांत ;
धर्मज्ञ, साधु, सद्गुण होयिल विख्यात सर्व लोकांत ’. ॥२३॥
हास्य करुनि भूप म्हणे, ‘ सुज्ञे ! दयिते ! ‘ अलर्क ’ हें नाम
गमतें अबद्ध, याचा वद अर्थ; सुगंध धार्य तें दाम ’. ॥२४॥
राज्ञी म्हणे " अहो जी ! हे व्यवहारार्थ कल्पना जाणा;
युष्मत्कृतनामांची कथितें चित्तीं निरर्थता आणा. ॥२५॥
जे प्राज्ञ, ते जन म्हणति ‘ पुरुष व्यापक, तया घडे न गती; ’
केली ‘विक्रांत ’ असी आख्या जी, सार्थाका कसी मग ती ? ॥२६॥
पुरुष अमूर्त, तयातें काय म्हणावें ‘ सुबाहु ’ ? पंडित हो !
या सुविचारें दुसरें नाम सुताचें कसें न खंडित हो ? ॥२७॥
तिसरेंहि ‘ शत्रुमर्दन ’ हें नाम व्यर्थ, सर्व देहांत
एकचि पुरुष बहु दिसे, जैसा आदर्शजडित गेहांत. ॥२८॥
अरि कोण ? मित्र कोण ? स्वामी ! सुविचार करुनि, सांगावें;
सुतनाम शत्रुमर्दन हें मग ‘ सार्थक ’ म्हणोनि कां गावें ? ॥२९॥
भूताहीं भूतांचें मर्दन तत्वज्ञ जाणतात असें,
पुरुष अमूर्त तयाचें मर्दन, बोला, बरें घडेल कसें ? ॥३०॥
संव्यवहार घडावा, म्हणुनि असन्नाम कल्पिलें जातें;
ऐसें असतां, म्हणतां कां ‘ व्यर्थ, ’ अलर्क नाम जें या, तें ? " ॥३१॥
त्या तथ्यवादिनीचें श्रवण करुनि वचन मानवेश तदा,
वाक्या सरस्वतीच्या चतुरानन, तेंवि मानवे शतदा. ॥३२॥
जेंवि तिघे सुत धाले; चवथाहि असा अलर्क तो धाया,
बोधाया ती लागे, तदविद्यामलिनहृदय शोधाया. ॥३३॥
क्रुद्ध कुवलयाश्च म्हणे, जीतें स्तविती समस्त संत, तितें;
‘ मूढे ! हें काय करिसि, माझ्या बुड्वावयासि संततितें ? ॥३४॥
मत्प्रिय करणें हें जरि तुझिया चित्तीं असेल, हा तनय
योजीं प्रवृत्तिमार्गीं, नच होवू हातधर्म, हातनय. ॥३५॥
परिपालन प्रजांचें, सिकिव अनुष्ठान सर्व धर्मांचे;
हें कारण देवांच्या, पितरांच्या, होय तृप्तिशर्मांचें. ’ ॥३६॥
ती पतिच्या आज्ञेनें तैसाचि करी सुतासि उपदेश,
‘ वत्सा ! पितृमन शीळें रंजिव, हो साधुभक्त सुपदेश. ॥३७॥
मित्रांवरि उपकार, द्वेषिजनांचा करीं विनाश रणीं,
भूतहित प्रेमभरें, विप्रार्चन सर्वदा स्वयें शरणीं. ॥३८॥
स्वप्नींहि परस्त्रीतें न सिवे ऐसें करी अधीन मन;
गोविप्राश्वत्थांचें न चुकों द्यावें तुवां कधीं नमन. ॥३९॥
श्रीविष्णुध्यान करीं, नित्य श्रीशंकरा सदारा ध्या;
तरसिल भवीं, अभेदें भजतां श्रीशा, शिवा सदाराध्या. ॥४०॥