चिरकाळ अलर्क करी धर्मनयें कुवलयाश्चसा राज्य,
प्राज्य विषय सेवुनिहि न तृप्त, अनळ जेंवि भक्षितां आज्य. ॥१॥
ब्रह्मज्ञ सुबाहु म्हणे, ‘ यालाहि मलाहि हें नव्हे युक्त,
संसृतिपाशापासुनि बंधु करावाचि सर्वथा मुक्त. ’ ॥२॥
ऐसें चिंतुनि योगी जाय शरण बंधुशत्रुतें आधीं,
त्यासि म्हणे, ‘ काशिपते ! यश घे, मत्कार्य तूंचि हें साधीं. ॥३॥
राया ! सुबाहुनामा मीं, जाणमला मदालसातनुज,
आतां राज्य करावें म्यां; जो करितो अलर्क, तो अनुज. ’ ॥४॥
तें कार्य यशस्कर कां अभिमानी काशिराज परिसेना ?
शरणागत राज्यपदीं स्थापाया, शीघ्र सिद्ध करि सेना. ॥५॥
‘ दे राज्य अगजातें, ’ ऐसें सांगोनि पाठवी दूत;
तो आरिशासन मानी मानी न अलर्क मनुजपुरुहूत. ॥६॥
‘ भेटोनि अग्रजानें मजला, स्वमुखेंचि राज्य मागावें;
लागावें न परमतिस, म्यांही अरिशासनीं न वागावें. ’ ॥७॥
तोहि सुबाह म्हणे, " मीं क्षत्रिय, कां ‘ दे ’ असें म्हणेन मुखें ?
सामें देत नसे तरि देयिल दंडेंचि सर्व राज्य सुखें. " ॥८॥
योगिवर सुबाहु बळें युद्धार्थ विरोध वाढवी, राज्या
जागें करावया त्या, प्राप्त अहंकार बाढ वीरा ज्या. ॥९॥
चतुरंग सैन्य पुष्कळ मिळउनि, काशीश विजय भावुनि घे;
भासे द्याया परिभव, परि भव वारावयासि, भावु निघे. ॥१०॥
सामाद्युपाय योजुनि वश करि सामंत काशिपति सर्व,
आक्रमुनि राष्ट्र, पुरही, नुरवी लेशहि अलर्कनृपगर्व. ॥११॥
प्रतिदिन वीरजनक्षय होय, धनक्ष्य, अलर्क असहाय
आंत गडबडे, बाहिरमात्र म्हणों दे न वीररस ‘ हाय. ’ ॥१२॥
त्या परमसंकटीं तो स्मरता झाला मदालसामुद्रा,
क्षुद्रा उपमा अन्या; त्या ती, गंगा जसी हिता रुद्रा. ॥१३॥
पूजी निजमातेची ती मुद्रारुपिणी दया साची,
याची अभयवरातें, रोमांचितदेह होय, तो वाची. ॥१४॥
‘ संग त्यागावा, जरि न त्यजवे, साधुसीं तरि करावा;
कीं संगाचें ओखद संत, मनीं बोध हा हित धरावा. ॥१५॥
काम त्यागावा, जरि न त्यजवे सर्वथा, तदीय जया
तरि तोचि मुमुक्षेप्रति करिजे कीं तीच होय ओखद या. ’ ॥१६॥
हा ज्यांत अर्थ, ऐसें श्लोकद्वय अंगुलीयकीं पाहे,
जाणे स्पष्ट मुमुक्षायोगेंचि श्रेय या भवीं आहे. ॥१७॥
सत्संगेंचि मुमुक्षाप्राप्ति जना होय, हें मनीं आणी;
खाणी तच्चिंताविषवल्लीतें ती मदासावाणी. ॥१७॥
‘ ज्याच्या संगें होय प्राप्त मुमुक्षा, जिणें भवा अंत,
पंत ज्ञानप्रद या समयीं मज कोण भेटतो संत ? ’ ॥१९॥
ऐसें चिंती जों, तों श्रीदत्तात्रेय संत ये ध्यानीं,
ज्ञानींद्रा त्या जाय क्षिप्र शरण तो तयाचिया स्थानीं. ॥२०॥