मीं या मदिराक्षीची आली, मत्तात विंध्यवान् जाण,
मत्पति पुषकरमाली, शुंभें केला रणीं गतप्राण. ॥२१॥
गत्यर्थ तीर्थयात्रा करितां, फ़िरतां मनुष्यलोकांत,
कळलें, हे ज्या दुष्टें केली मग्ना हरूनि शोकांत, ॥२२॥
पाताळकेतु दानव मानवलोकीं वराहतनुधारी,
मुनिरक्षणार्थ कोणीं केला खरबाणविद्ध अविचारी. ॥२३॥
तछोध करुनि सत्वर आलें तें वृत्त ईस कळवाया,
पळवाया चिंतेतें, दुर्जनवदनें समस्त मळवाया. ॥२४॥
पुससि इच्या मूर्छेचें कारण जें, तेंहि सांगत्यें, परिस;
परि सत्य गमो ईस त्वद्दर्शन बहु, न अमृत यापरिस. ॥२५॥
हे प्रीतिमती झाली, दर्शन होतांचि, या तुझ्या रूपीं;
कीं मानसींच हंसी रमती, न रमे कदापि ती कूपीं. ॥२६॥
जेणें दानव वधिला, त्याची व्हावी मदालसा भार्या;
कार्याकार्य न जाणे, यास्तव मूर्छेसि पावली आर्या ! ॥२७॥
आलें, आमरण इणें भोगावें दु:ख, हें इच्या भागा,
कीं चित्त तुझा ठायीं, भर्ता तो अन्य गा ! महाभागा ! ॥२८॥
सुरभीचें वचन मृषा होवूंचि नये कधीं असें आहे,
या हे रूपा भुलली, चित्तीं चिंता सुदु:सहा वाहे. ॥२९॥
ईच्या प्रीतिस्तव मीं आल्यें धांवोनि, पावल्यें खेद,
कीं आपल्या सखीच्या देहांत स्वल्पही नसे भेद. ॥३०॥
जरि हे अभिमत - पतितें शुभदैवेंकरुनि पावती धीरा !
वीरा ! तरि मीं करित्यें तप, पावाया भवाब्धिच्या तीरा. ॥३१॥
निजवृत्त सांग सुमते ! येथें आलासि कोणत्या कार्या ?
तूं कोण ? देव किंवा दानव, गंधर्व, नाग कीं, आर्या ! ॥३२॥
मानुषगति पाताळीं नाहीं, रूपहि असें मनुष्याचें,
मदनचि गमसी, धारण जरि पुष्पांच्या नसे धनुष्याचें. ॥३३॥
म्यां कथिलें तत्व जसें साधो ! तूंही यथार्थ सांग मला,
पाताळीं शून्य पुरीं चतुरा ! कार्य प्रवेश कां गमला ? " ॥३४॥
तो तीस म्हणे, " अमळप्रज्ञे ! करुनि स्थिर स्वचित्तातें,
श्रवण करा, पाठविलों मीं मुन्यवनार्थ शत्रुजित्तातें, ॥३५॥
मुनिरक्षणार्थ कवची, कोदंडी गालवाश्रमीं होतों,
जों त्यासि म्हणें, ‘ बापा ! तूं न मनीं गालवा ! श्रमी हो; ’ तों ॥३६॥
आला सहसा दैत्य स्वीकारुनि उग्र रूप कोलाचें,
म्यां हृदय भेदिलें निज बाणें त्या तापसार्तिलोलाचें. ॥३७॥
होतां विद्ध पळाला, त्यामागें धांवलों हयारूढ,
शिरला गर्ती प्राणत्राणार्थी विप्रशत्रु तो मूढ. ॥३८॥
माझा वाजीश्वरही शिरला गर्तीं तया खळामागें,
ज्यातें न मन म्हणे ‘ श्रम झाला बहु धांवतां, जळा मागें ’. ॥३९॥
भ्रमलों तमांत बहु मीं, मग झालों पाहता प्रकाशातें,
तुज पाहुनि, पुसिलें, परि न वदुनि आलिस इच्या सकाशातें. ॥४०॥