श्रीवाणी वर देवुनि जातां, तत्काळ सुवर तो फ़ळला;
गानप्रकार निरुपम अश्वतरा कंबळासही कळला. ॥२१॥
मग जावुनि कैलासीं, सांबा, तद्भक्तिचें पद, भ्राते
यश गावुनि, आराधिति, जोडाया तत्कृपा अदभ्रा, ते. ॥२२॥
मधाह्ननिशासंध्यासमयीं सप्रेम नित्य यश गाती.
चिरकाळें भक्तांची कल्पलता त्यांसि होय वशगा ती. ॥२३॥
कुतुकें सर्वार्थास प्रभु जो वीणार वासवाद्यांस,
होय प्रसन्न, सेवुनि त्यांच्या वीणारवास वाद्यांस. ॥२४॥
दे दर्शन देव, वदे, ‘ घ्या वर, जैसा यशाचिया, गानें,
होतों प्रसन्न, अहि हो ! नच योगानें तसाचि यागानें ’. ॥२५॥
कंबलसह अश्वतर प्रभुतें वंदुनि म्हणे, ‘ जरि वरातें
देतोसि, कुवलयाश्वा द्यावें, स्त्रीरत्न जें, मृत हरा ! तें. ॥२६॥
वय, रूप, स्मरण, तिचें तेंचि असो व्यक्त; योगिनी धन्या,
हे अधिकयोगिमाता व्हावी माझी मदालसा कन्या ’. ॥२७॥
ईश्वर सांगे, ‘ भक्षीं, श्राद्ध करुनि, पिंड मध्यम, व्याळा !
होयिल तसीच ती तव मध्यमफ़णजा मदालसा बाळा ’. ॥२८॥
प्रभुतें वंदुनि गेले हर्षें पन्नग रसातळीं गेहीं,
शिवदर्शनवरलाभें ज्यांच्या रोमांच दाटले देहीं. ॥२९॥
अश्वतर श्राद्धान्तीं मध्यम पिंडासि आदरें भक्षी,
तत्काळ मध्यमफ़णश्वासप्रभवा मदालसा भक्षी, ॥३०॥
अश्वतराला झाला जो, तो आनंद काय सांगावा ?
प्रभुचा, प्रभुभक्तांचा महिमा आम्हीं सदा न कां गावा ? ॥३१॥
कोणासहि न कळों दे, ठेवी अंत:पुरांत बाळेतें,
जपति स्त्रिया बहु तितें, जेंवि स्वर्वृक्षपुष्पमाळेतें. ॥३२॥
मग तो म्हणे सुतांतें, " कां स्वगृहा कुवलयाश्व आणा ना ?
साधु, सखा, उपकारी, पूज्य; असें कां मनांत जाणा ना ? ॥३३॥
निववा याचि सुदिवसीं मित्राच्या, स्मरण धरुनि, आनयनें,
प्राशाया अतितृषितें वाट पहातात, करुनि, ‘ आ ’ नयनें ". ॥३४॥
प्राप:काळीं भेटुनि, ते आधीं सांगती कथा भव्या,
मग ‘ अस्मदाश्रमातें ये ’. ऐसी गोष्टि काढिती नव्या. ॥३५॥
नृपसुत म्हणे, ‘ सखे हो ! या वाक्यें फ़ार वाटतो खेद,
तुमचें हें सर्वस्व, प्रिय हो ! कां आज कल्पितां भेद ? ॥३६॥
सत्य सखे हो ! माझे परम हित तुम्हीं बहिश्चर प्राण,
या मज दैवहताच्या झाला हृदयांत भेद हा बाण’ . ॥३७॥
ऐसें वदतां अहिसुत ते ताताज्ञा तयास कळवीती,
तो नमुनि म्हणे ‘ झालों धन्य; कुशळ गुरुदया सकळ वीती. ॥३८॥
सत्वर चला, सखे हो ! ताताज्ञाश्रुति अतिक्रमिल कोण ?
शोण न होवूं द्यावा तिळमात्रहि तातदृष्टिचा कोण ’. ॥३९॥
बोलुनि असें तयांसह नगराबाहिर निघोनि, तो पावे
द्रुत गौतमीस, कीं नच उशिरें ते तातपाद कोपावे. ॥४०॥