योगसंग्राम - प्रास्ताविक ५
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
शेख महंमदांनीं गुरुशिष्यांच्या संबंधाचा बराच उहापोह केला आहे. एकोणिसाव्या शतकाचे पूर्व कालांत,
‘‘ऐकणार असंख्य लक्ष कोटि। परी सांगणाराची तुटार मोठी।’’
असल्यानें गुरुशिष्याची सांगड जुळणें कठीण पडे. त्यांतूनहि गुरू मिळालाच तर त्याच्या कुवतेप्रमाणें शिष्याची ज्ञानपिपासा भागणार. उलट शिष्याला जो कांही थोडाफार सहवास लाभे तेवढ्याच अवधींत सांपडतील ते ज्ञानकण मिळवून आपली तयारी करणें भाग होते. अशा परिस्थितींत,
‘‘जें जें पाप शिष्य करिती अभागी। तें तें दूषण घडे सद्गुरुलागी॥’’
अशी सामान्य मनोभूमिका असल्यामुळे शिष्याशिष्य परीक्षेची गुरूस आवश्यकता भासे. उलट सद्गुरूंच्या अभावीं दुकाळे गुरूंच्यापासून दूर राहण्याची काळजी मुमुक्षूला बाळगावी लागे. त्यांतूनहि
‘‘मेदिनीसारिखा सद्गुरुदाता। कुदळीसारिखा सवें शिष्य खोदिता। तेथें निजनीराची पूर्णता। उचंबळे हृदयीं॥’’
असा योग आलाच तर तो क्वचितच असावयाचा. ही परिस्थिति शेख महंमदांच्या या विषयावरील विवेचनावरून स्पष्ट दिसून येते. सांप्रतकालीं ग्रंथ हे गुरु व वाचक हे शिष्य अशी परिस्थिति निर्माण झाल्यामुळें गुरूच्या पूर्णत्वाला शिष्यांच्या गुणदोषांची प्रत्यक्ष झळ लागण्याचा संभव कमी. तरीहि,
‘‘पवित्र सच्छिष्यांचा दुष्काळ भारी। स्वामी तुम्ही उत्तम केली हरी। शीघ्र स्वहिताचा होय अधिकारी। तैशाची तुटार मोठी॥’’
ही शेख महंमदांची उक्ती आजहि सवंग ग्रंथगुरूंच्या कालांत जशी लागू पडते तशीच त्यांची दुकाळे गुरूविषयींची वचनें ग्रंथगुरुजींना साक्षेपानें लागू पडतात. अर्थात शिष्यांना ग्रंथगुरुजींची व त्यांच्या ज्ञानदानांतील भागाची हंसक्षीरन्यायानें निवड करावी लागतेच. सारांश, शेख महंमदांची गुरुशिष्य संबंधांवरील टीका जशी उद्बोधक आहे तशीच त्या टीकेमागील तत्त्वेंहि अबाधित आहेत. जो चांगले मार्गदर्शन करील तो गुरु श्रेष्ठ, तसाच जो चिंतन मनन करून गुरूच्या मार्गदर्शनाचा अधिकाधिक लाभ घेईल तो शिष्य श्रेष्ठ हें तत्त्व जुन्यानव्या गुरुशिष्यांना सारखेंच लागू पउते यांत शंका नाही.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP