योगसंग्राम - प्रास्ताविक २
श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.
शेख महंमदांचा कवितासंग्रह मोठा आहे. त्यांत ‘योगसंग्रामा’ बरोबर ‘पवनविजय’, ‘निष्कलंकप्रबोध’ यांसारखे योगमार्गास उपयुक्त असे ग्रंथ आहेत; ‘गायका’, ‘हिंदोळा’ आदि रूपकें ‘आत्मबोधा’ची साक्ष पटविणारी महत्त्वाची प्रकरणें आहेत. या सर्व कवितासंग्रहावरून निष्काम भक्तीलाहि जाणतनेणतपणें योगाभ्यासाची जोड दिल्याशिवाय पराविद्येंत पुढें पाऊल पडत नाही असे मानण्याची त्यांच्या मनाची ठेव होती यांत शंका नाही. मात्र येथे योग हा शब्द विविक्षित शारीरिक आणि मानसिक तयारीच्या अभ्यासापुरताच मर्यादित आहे. शेख महंमद काय किंवा तुकाराम रामदासादि सतराव्या शतकांतील संत काय या सर्वांनीच त्यांच्या भक्तियोगांत, सांप्रतच्या पंढरीच्या वारकरी पंथियांप्रमाणें, या योगाभ्यासाची व भक्तीची कधींच फारकत केलेली नव्हती हे त्यांच्या चारित्र्यावरून व शिकवणुकीवरून स्पष्ट आहे. त्याचप्रमाणें निर्गुण परमात्याच्या निष्काम भक्तींतील आनंद व पराप्राप्तीच्या ध्येवावरील आवश्यक असणारा दृढ विश्र्वास हाहि त्या सर्वांच्या शिकवणुकींत तितक्याच स्पष्ट शब्दांत सांगितलेला महत्त्वाचा भाग आहे. सारांश, कामिक आचारविचारांच्या निखंदनांत पराविद्येस इष्ट अशा मनाची निष्काम प्रवृत्ति जागृत ठेवण्याची आवश्यकता पटवणें हाच मुख्य उद्देश असतो; विडंबनाचा किंवा उपहासाचा नसतो. त्यांच्या लेखनांतील हा मुख्य आशय ध्यानांत ठेवून संतांच्या शिकवणुकीकडे पहाणें आवश्यक आहे. त्याचप्रमाणें बाह्य वेष आचारादींच्या पकडींत न सापडतां जन्मप्राप्त अशा परिस्थितीतच क्रमप्राप्त आचारविचारांची घडण आपल्या निष्काम पराविद्येच्या साधनचौकटींत ठीक बसवणें व त्यायोगें शारीरिक व मानसिक प्रवृत्ति प्रगल्भ राखणें व तिचे बळावर पराप्राप्तीचा मार्ग सुकर करून घेऊन आक्रमित राहाणें यावरच संतांचा अधिक कटाक्ष आहे. सांप्रत भक्तिमार्गातील हा महत्त्वाचा गाभाच काढून भक्तीच्या पोकळ नगार्याचा नाद दुमदुमविला जात आहे. हा नाद भक्तांना ‘नादब्रह्मा’ पासून दूर नेतो हे शेख महंमदांच्या ‘योगसंग्रामा’ वरून स्पष्ट होत आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP