योगसंग्राम - प्रास्‍ताविक ४

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


पंथीय पारतंत्र्य म्‍हणजे पंथांतील उत्तम तत्त्वांसाठी व सवलतींसाठीं दूरान्वयानें व केवळ घटकाचा वेगळेपणा स्‍थापित किंवा व्यक्त करण्याकरितां अथवा घटकाभिमानानें पंथ चिरायु राखण्याकरितां आचारवेषादि घेतलेली बंधनें. विशेषतः ही बंधनें म्‍हणजेच पंथ ही समजूत किंवा श्रद्धा म्‍हणजेच एक प्रकारची गुलामी वृत्ति होती, आणि पंथांतील तात्त्विक वैशिष्‍ट्यापेक्षां या वृत्तीचीच जोपासना करण्याकडे पंथियांची प्रवृत्ति उत्तरोत्तर बळावत होती. या वृत्तीचेच निखंदन शेख महंमदांनीं केले आहे. तें दुकाळे साधु, काजी, मुलाणा, फकीर, संन्यासी, जोगी, जंगम, अय्या, महात्‍मा, ब्राह्मण, बैरागी, शेवडा, घरबारी, आचार्य, मुल्‍ला, वेदांती, पंडित, वैदिक, साधु, बद्धमुक्त, मुक्तबद्ध, दंभधारी यांचेवरील टीकेंत आले आहे. सांप्रतच्या काळांत या पंथभेदांचें तितकेसें प्रस्‍त भासत नसले तरी ही टीका पक्ष मठ फड यांत सार्थ पटत आहे. विशेषतः ही टीका सांप्रतच्या तत्त्वज्ञानपद्धती (School of Philosophy) यांनाहि त्‍यांच्या पुरकर्त्यांच्या विशिष्‍ठ लेखनपद्धतीमुळें लागू पडते. परंपरेचे व पंथीय पारतंत्र्य विसाव्या शतकांत बरेच शिथिल झाले आहे. कारण चालू युगाची परंपरा म्‍हणजे संशोधन व पंथ म्‍हणजे प्रकाशन हाच बुद्धिवाद. अधिकाधिक दृढ होऊं लागला आहे. या नूतन पंथ परंपरेत जरी पूर्वीची आकुंचित दृष्‍टि नसली तरी प्रादेशिक व धार्मिक संस्‍कारांची पकड त्‍यांत दृग्‍गोचर झाल्‍याविना राहात नाही. सारांश, शेख महंमदांच्या निखंदनामागील बोधतत्त्व अद्यापीहि विचारणीय आहे.

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP