भक्तवत्सलता - अभंग १ ते ५

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


१.
झाडलोट करी जनी । केर भरी चक्रपाणी ॥१॥
पाटी घेऊनियां शिरीं । नेऊनियां टाकी दुरी ॥२॥
ऐसा भक्तिसी भुलला । नीच कामें करुं लागला ॥३॥
जनी म्हणे विठोबाला । काय उतराई होऊं तुला ॥४॥
२.
पूर्वीं काय तप नेणें पैं हो केलें । निधान जोडिलें पंढरीचें ॥१॥
येऊनियां देव दळूं लागे अंगें । रखुमाईचा संग दूर केला ॥२॥
तैसाचि पै संगें येऊनि बाहेरी । वेंचोनियां भरी शेणी अंगें ॥३॥
ओझें झालें म्हणूनि पाठी पितांबरी । घेऊनियां घरीं आणितसे ॥४॥
ऐसें जेथें काम करी चक्रपाणी । तेथें कैंची जनी नामयाची ॥५॥
३.
एकटी तूं गाणें गासी । दुजा शब्द उमटे पाशी ॥१॥
कोण गे तुझ्या बरोबरी । गाणें गाती निरंतरीं ॥२॥
पांडुरंग माझा पिता । रखुमाई झाली माता ॥३॥
ऐशियाच्या घरीं आलें । जनी म्हणे धन्य झालें ॥४॥
४.
जनी डोईनें गांजली । विठाबाई धाविन्नली ॥१॥
देव हातें बुचडा सोडी । उवा मारीतसे तांतडी ॥२॥
केश विंचरुनी मोकले केले । जनी म्हणे निर्मळ झालें ॥३॥
५.
जनी बैसली न्यायाला । पाणी नाहीं विसणाला ॥१॥
घागर घेउनी पाण्या गेली । मागें मागें धांव घाली ॥२॥
घागर घेऊनियां हातीं । पाणी रांजणांत ओती ॥३॥
ऐशा येरझारा केल्या । रांजण घागरी भरिल्या ॥४॥
पाणी पुरे पांडुरंगा । दासी जनीच्या अंतरंगा ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 31, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP