रूपक - खेळिया

संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.


नव्हे तेंचि कैसें झालेंरे खेळिया । नाहीं तंचि दिसूं लागलेंरे । अरूप होतें तें रूपासि आलें । जीव शिव नाम पावलेंरे ॥१॥
आपलिच आवडी धरून खेळिया । आपआपणातें व्यालेंरे । जोपनाकारणें केली बायको । तिणें येवढें वाढीवलेंरे ॥२॥
ऐक खेळिया तुज सांगितलें ऐसें जाणुनि खेळ खेळेरे ॥धृ०॥
ब्राम्हणाचें पोर एक खेळासि भ्यालें । तें बारा वर्षें लपालेंरे । कांपत कांपत बाहेर आलें । तें नागवेंचि पळून गेलेंरे ॥३॥
साहा तोंडया एक संभूचें बाळ त्यानें । बहूतचि बळ आथियेलेंरे । खेळ खेळतां दगदगी व्यालें । तें कपाट फोडुनि गेलेंरे ॥४॥
चहूं तोंडयाचा पोर एक नारयाहि जाण । तो खेळिया माजी आगळारे । कुचालि करुनी पोरें भांडवी । आपण राहे वेगळारे ॥५॥
गंगा गौरी दोघी भांडवी । संभ्यासी धाडिलें रानारे । खेळ खेळे परि डायीं न सांपडे । तो एक खेळिया शाहाणारे ॥६॥
खेळिया माजी हनुम्या शहाणा न पडे कामव्यसनींरे । कामचि नाहीं तेथें क्रोधचि कैचा तेथें कैचें भांडणरे ।
रामा गडयाची आवडी मोठी । म्हणूनि लंके पेणरे ॥७॥
यादवांचा पोर एक गोप्या भला । तो बहूतचि खेळलारे । लहान थोर अवघे मारिलीं । खेळचि मोडूनि गेलारे ॥८॥
ऐसे खेळिये कोठयानकोटी गणित नाहीं त्यालारे । विष्णुदास नामा म्हणे वडीलहो पहा देहीं शोधुनीरे ॥९॥


References : N/A
Last Updated : January 15, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP