रूपक - कूट
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
१
एका ब्राम्हणाचें घरीं खाण पडिलें । सातां चोरीं एक मुसळ नेलें ।
बापुडें ब्राम्हण नागविलें । धाऊनि आलें वोसगांवींचें ॥१॥
वोसगांवींचा हनुमंत खोटा । त्याचा बाप जुनाट चोरटा ।
मारूनि नेतो दाहीवाटा । जन चोहटा नागविलें ॥२॥
नागविला चोहाटीचा वाणी । अणिक नेली प्रभुची गोणी ।
शेळी आली लांडगा घेउनी । गाढव बंदीखानीं बोंबलत ॥३॥
एका संन्याशानें कुतरें खादलें । गांवच्या खाटका प्रायश्चित्त दिल्हें ।
बापुडे कुंभार नागविले । डोचकें फोडिलें म्हातारीचें ॥४॥
ऐशा सिद्धांतीच्या खुणा । एक जाणे पंढरीराणा ।
नामा करी विज्ञापना । संत प्रेमळ जाणती ॥५॥
२.
मुंगी उमगा ते मुंगी उमगा । मुंगीचे मुखीं त्निवेणी गंगा ॥१॥
उदकाचें टवळें मसीची मात । अंधारी मुंगीनें तेथें लाविली ज्योती ॥२॥
अवघें आकाशा मुंगीये मागें । मुंगीये संसार सांडिला मागें ॥३॥
विष्णुदास नामा मुंगीये मागें । मुंगी उमगली खेचासंगें ॥४॥
३.
मुंगीनें आकाश कवळिलें बाहीं । तेथें एक नवल वर्तलें पाहीं ॥१॥
मुंगी उमगा मुंगी उमगा । मुंगीचे माथां त्निवेणी गंगा ॥२॥
मुंगीचे गळां तुळईचा लोढणा । विष्णुदास नामा बोलिला खुणा ॥३॥
४.
समुद्राचें पाणि मुंगी मुखांतूनी । काढाया लागोनि श्रम थोडे ॥१॥
केशवाची भक्ति कठीण त्याहनि । वांयां दंभपणीं नोहे नोहे ॥२॥
आकाश अंगुळें नामप सुयेमान । भूमीचें वजन पालडेनि ॥३॥
नामा म्हणे वारा वळूं ये कदापि । केशवाचे रूपीं नव्हे बुद्धि ॥४॥
५.
आंधळ्यानें स्वंरूप देखियलें नयनीं । मुकें बहिर्या कानीं गोष्टी सांगे ॥१॥
कांसवीचें दूध दुहितां भरणा । दुही त्याला जाणा हात नाहीं ॥२॥
वारियाच्या लोथा बांधोनियां माथां । वांझेचिया सुता बळिवंता ॥३॥
मुंगीनें त्नैलोक्य धरियलें तोंडीं । नामा म्हणे पिंडीं प्रचीत आहे ॥४॥
६.
हाटकर कुणबी वाटा मोडी । रिकामा ब्राम्हण करितो चहाडी ॥१॥
गुळेंविण शिंपी बोटें चाटी । प्रेमेंविण तेली क्षेम दे लाटी ॥२॥
जिताचि कोष्टी घातला खाचे । प्रेमेंविण कुंभार नाचे ॥३॥
लोहार हिंवाविण तापे । सोनारा लागले धापे ॥४॥
नामा म्हणे यातिचे चाळे । दुखणेंविण परीट विवळे ॥५॥
७.
अकरा लोचन त्याचे पांच मुख । आठ कान देख पुच्छ दोन ॥१॥
अरत अखंड निरत प्रचंड । उमाळ उदंड उभा फार ॥२॥
दहा पाय चहूं चालत ते जाय । नव्हेत ग माय सावज त्या ॥३॥
नामा म्हणे त्याचा अर्थ करीं चोख । पूर्वज पातक लया जाय ॥४॥
८.
बारा हात लुगडें एकचि नारी । पालऊं घातला खांदियावरी ॥१॥
जाईन त्या गोकुळा पाहीन त्या गोपाळा । तयालागीं उतावेळ मन माझें ॥२॥
एका हातीं घातला तांबियाचा वाळा । हाळदुळी वांटुनी सुद्लें मी डोळां ॥३॥
एकली जातां नोळखे मातें । विष्णुदास नाम्यास नेईन संगातें ॥४॥
९.
राईयेवढें पांखरूं त्रिभुवनीं त्याचा फेरारे । नर आणि नारी तया पांखराचा चारारे ।
पिंडामध्यें आहे त्याचा शोध तुझी करारे । मेरूच्या शिखरीं त्या पांखराचा थारारे ॥१॥
येऊनि संसारा याचा अनुभव तुम्ही करारे ॥ध्रु०॥
चौर्यांशीं लक्ष योनी चुकेल जन्माचा फेरारे ॥ध्रु०॥
अठ्ठावीस योजने तया पांखराचा फेरारे । बत्तिसा मुखांनीं तें बा घेतसे चारारे ।
अहं सभेमध्यें ताचा शोध तुम्ही करारे । अकराही लोचन तया चोंची असती फाररे ॥२॥
एकवीस स्वर्गंहुनी तया पांखराची उंचीरे । सप्तहीं पाताळाखालीं तया पांखराची नीचीरे ।
नेत्रांतील बाहुली तया पांखराची निचीरे । उडालें पांखरूं सप्तही सागर घेऊन चोंचींरे ॥३॥
ऐसें तें पांखरूं दादा आहे सृष्टीवरीरे । मेरु आणि मांदार तया पांखराचे उदरींरे ।
शिवाचें आसन दादा कवणिये परीरे । पिंडीं आणि ब्रह्मांडीं म्हणती दशवे द्वारींरे ॥४॥
ऐसें तें पांखरूं गोरक्ष्ररायें वळखिलेंरे । पिंडीं आणि ब्रह्मांडीं मछिंद्रनाथें देखियेलेंरें ।
त्याचियेनीं अंगसंगें सद्रुरुनाथें दाखविलेंरे । त्याचियाचि प्रसादें नामा शिंप्यानें गाईलोंरे ॥५॥
१०.
प्रळयाचे ळाळीं ब्रह्मांड जळालें । कोण त्यांत उरलें सांगा मज ॥१॥
प्रभा ते फांकली जाती ते गुंतली । सांग मज खोली स्वरूपाची ॥२॥
ब्रम्हांडाची जेव्हां राख जळून झाली । कोणी ती लाविली अरूपरूपीं ॥३॥
विष्णुदास म्हणे सांगा हेंचि गूढ । नाहीं तरी मूढ होऊनि राहें ॥४॥
११.
मेलें जित्यासी सांगे गोष्टी । आंधळें ओंवी सुवर्णाच्या गांठी ।
पांगुळ लागे पवनाच्या पाठीं । बाळका पोटीं माय वाढे ॥१॥
थोटयानें धवलार रचियेलें । मुकें पुराण सांगूं बैसलें ।
सवेंचि बहिरें ऐकों ठेलें । वेडें हांसलें शहाणीयासी ॥२॥
आणिक एक नवल सांगूं काई । जीत वाघ शलभानें भक्षिला पाहीं ।
मुंगीनें पर्वत उचलिला बाहीं । माशी करी साही सूर्यासी पैं ॥३॥
मृदंगें वाहिला गुरव राणा । वांझेच्या स्तनीं संचरला पान्हा ।
माथां फुलें खोऊं नाचे दवणा । जाण सुजाणा न कळेची ॥४॥
मुरकुटें सगळा सागर शोषिला । माशानें पारधी मारिला ।
सशानें सिंह भोवंडिला । वेदांपुराणां न कळेची ॥५॥
हें तुम्ही म्हणाल उमानें । हें तंव उफराटें द्दष्टी पहाणें ।
विष्णुदास नामा म्हणे । अनुभवी या खुणा जाणती ॥६॥
१२.
नीर समुद्र तो कोण । कोठें क्षीराब्धि आसन ॥१॥
दधि समुद्र कोण्याठायीं । खारा समुद्र कोण्या गृहीं ॥२॥
रत्न समुद्र तो कोण । कोठें मदनाचें आसन ॥३॥
मन समुद्र कोठें आहे । नामा म्हणे शोधून पाहे ॥४॥
१३.
नेत्र नीर समुद्र देखा । क्षीर सत्रावी ओळखा ॥१॥
दधिसमुद्र नाकीं आहे । खारा शरीरीं तो पाहें ॥२॥
नाभीं रत्नाकर देखा । माथां मदन ओळखा ॥३॥
नामा म्हणे सांगूं काय । मन समुद्र ह्रदयीं आहे ॥४॥
१४.
राधा वनींच्या पुत्रास धन बहुत झालें । तो म्हणे आतां धर्म करीन । बापाचिया श्राद्धा आवंतिले ब्राम्हण । एक जेवण सदामाचें ॥१॥
कैसी नागवण आलीरे बापा । वेंचा परतें पाप आणिक नाहीं ॥ध्रु०॥
सहाजणां ब्राह्मणां सहा सवा शेराचा भात । कढींत हिंग जिरें मिरें बहुत ।
त्यावरी घातलें मुगाचें वरण । येवोका मरण जिवित्यांसी ॥२॥
सहाजणां ब्राम्हणां घातले सहा वडे । घालितां रडे उकसाबुकसीं ।
त्यावरी घातलें तूप लोणकदॆं । जावो कां मढें या जेवित्यांचें ॥३॥
सगळ्या गव्हाची रांधिली क्षीरी । ही एक महामारी आली देखा ।
त्यावरी घातला साखर गुळ । उठोका पोटशूळ जेवित्यांसी ॥४॥
जेवण झालें दहीभात आला । तंव आत्मा लागला ब्रम्हांडासी ।
बहुतेक दिवसासी अंतर पडिला । समुळीं नागविला म्हणे नामा ॥५॥
१५.
मुंगी व्याली शिंगी झाली तिचेम दूध किती । सतरा रांजण भरून गेले पेले बारा हत्ती । ॥१॥
आम्ही लटिकें न बोलूं वर्तमान खोटें ॥ध्रु०॥
लटिकें गेलें कटके तेथें गाडग्या एवढें राळें । उडत चिमणी चरत चाले तिचे वाटीयेवढे डोळे ॥२॥
शेळी करी घुसळण तेथें मांजर काढी लोणी । उंदीर गेले देशांतरा ताकें भरल्या गोणी ॥३॥
पाण्यांत कांसव गीत गाय वनांत कोल्हा नाचे । सावज मनीं संतोषला खोकड पुस्तक वाचे ॥४॥
कांतणी घरीं लग्न लागलें सरडा कणीक कांडी । बागुल वंध्या कण्या परणी घुबड मांडे रांधी ॥५॥
बाभुळीचे खोडीं माशानें केलें कोटें । सशानें सिंह ग्रासिला बेडुक आले लोटें ॥६॥
विष्णुदास नामा म्हणे ऐका त्यांची ख्याती । लटिकें म्हणतील त्यांचे पूर्वज नरका जाती ॥७॥
१६.
त्रिभुवनाची परी मांडिली शरीरीं । गोकुळाभीतरीं उभारिलें ॥१॥
शेषाचीये द्दष्टी मूळ भूमिका चोखटी । तेथुनी मूळ सृष्टी आरंभिली ॥२॥
मन विंदानीं आणि कुंडलणी चतुर्दळांपासुनी । पवनवेगीं टाकुनी पति समया स्वाधिष्टानी ॥३॥
मणीपूर पर्यंत तळवट शोभिवंत । तेथुनी टाकितसे नीट कर्मभूमीं ॥४॥
बारा सोळा नारी श्रीपति मुरारी । ह्रदय मंदिरीं गोपीराजु ॥५॥
कनक घाटेवरी सत्नावी सुंदरी । चाले उन्मत्त भारी चंद्रकळा ॥६॥
तेथें रोवियला दारवंटा दावी त्याच्या वाटा । जावया वैकुंठा गौळियांसी ॥७॥
मृत्यूलोकींचिया सैंवरा आल्या ज्या चौबारा । देखिल्या त्या घरां चौघीजणी ॥८॥
त्या चिपोळीया वाहती मिळोनियां येती । चालती मागुती पश्चिमपंथीं ॥९॥
अनुहतावरी वाट करुनी नीट । विशुद्ध नगरा येती धीट ॥१०॥
तेथुनी वाटा असे नीट दारवंटा । तेथूनि जावें ब्रम्हरंध्र कपाटां ॥११॥
हेंचि परब्रम्हराऊळ तेथुनी । जाऊं नये उढारीं सांडुनी राया ॥१२॥
तेथें रविशशीवरी आणि ब्रम्हरश्मी स्वरूप । एकांत ओवरी आहे अमूप ॥१३॥
विष्णुदास नामा सांगे निर्वाणींच्या खुणा । अनुभवी तोचि जाणें येरा चोजवणा ॥१४॥
N/A
References : N/A
Last Updated : January 15, 2015
TOP