काव्यलिंग अलंकार - लक्षण ६
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
या अलंकाराच्या बाबतींत कांहींचें म्हणणें असें :--- काव्यलिंग हा अलंकारच नाहीं, कारण वैचित्र्य हें ज्याचें स्वरूप तो विशेषप्रकारचा चमत्कार येथें दिसत नाहीं. आतां तो चमत्कार ‘एकतर जन्यतासंबंधानें असणारी कवीची विशेष प्रकारची प्रतिभा; अथवा त्या प्रतिभेनें निर्माण केलेला एक विशेषप्रकारचा चमत्कार (दरएक अलंकारांत आढळणारा)’ असा असतो हें आम्ही पूर्वीं सांगितलेंच आहे. विशेष प्रकारची प्रतिबा अथवा विशेषप्रकारचा चमत्कार या दोहोंपैकीं एकाचाही या काव्यलिंगांत संभव नाहीं. कारण यांतील कार्यकारणभाव वस्तुस्थितीला धरून असल्यानें, त्यांत कवीच्या प्रतिभेनें निर्माण होण्याचा संबंधच येत नाहीं; आणि म्हणूनच य अलंकारांत चमत्कृति पण उत्पन्न होणें दुर्लभ आहे. कुणी म्हणतील, “श्लेषादिकांच्या मिश्रणानें होणारा विशेष प्रकारचा चमत्कार येथेंही आहे (मग याला अलंकार म्हणायला काय हरकत आहे ?); पण असेंही म्हणतां येत नाहीं; कारण तो चमत्कार, श्लेष वगैरेंच्याच अंशानें उत्पन्न होत असल्यानें, काव्यलिंग हा अलंकार येथें आहे असें कांहीं त्यामुळें सिद्ध होत नाहीं.
ज्या ठिकाणीं, उपस्कारक अलंकाराच्या वैचित्र्याहून निराळें असें उपस्कार्य अलंकाराचें वैचित्र्य असतें, तेथें उपस्कारकाहून उपस्कार्य निराळा अलंकार आहे, असें म्हणणें योग्य होईल. उदाहरणार्थ :--- अतिशयोक्ति ही हेतूत्प्रेक्षा व फलोत्प्रेक्षा यांना उपस्कारक असली तरी, त्या दोन उत्प्रेक्षांचा चमत्कार अतिशयोक्तिच्या चमत्काराहून निराळा असल्यानें, त्यांना अलंकार म्हणायला हरकत नाहीं; पण ज्या ठिकाणीं उपस्कार्य अलंकाराची उपस्कारकाच्या चमत्कारांतच विश्रांति होते, त्या ठिकाणीं उपस्कार्याला अलंकार म्हणतां येत नाहीं; प्रकृत काव्यलिंगस्थळीं ही हीच स्थिति आहे. तुम्ही म्हणाल, “तर मग, प्राचीनांनी स्वीकारलेल्या अनेक अलंकारांच्या बाबतींतही हें म्हणण्याची वेळ येईल.” पण आम्ही म्हणतों, ‘येई ना ! त्यांत आमचे काय बिघडले ?’ म्हणून (शेवटी) सारांश हा कीं, ‘हेतु नसणें’ या दोषाचा जो अभाव तोच काव्यलिंग; (तो कांहीं काव्यलिंग अलंकार नव्हे) असेंही या लोकांचें (म्ह० नव्यांचें) म्हणणें.
येथें रसगंगाधरांतील काव्यलिंग अलंकाराचें प्रकरण समाप्त झालें.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP