काव्यलिंग अलंकार - लक्षण १
रसगंगाधर ग्रंथाचे लेखक पंडितराज जगन्नाथ होत. व्याकरण हा भाषेचा पाया आहे.
‘अनुमितीला कारण न होणारा, व सामान्यविशेषभावानें युक्त नसलेला, पण प्रस्तुत अर्थाचा उपपादक म्हणून सांगायला इष्ट असलेला जो अर्थ, तो काव्यलिंग अलंकार.’
उपपादकत्व म्ह० पदार्थाच्या निश्चयाला उत्पन्न करणारें जें ज्ञान त्या ज्ञानाला विषय होणें. (म्ह० एखादा पदार्थ अमुक एक निश्चित प्रकारचा आहे असें ज्ञान उत्पन्न करणें) अनुमान व अर्थांतरन्यास या दोन अलंकारांचें निवारण करण्याकरतां मूळ लक्षणांत, अनालिंगित ह्या पदापर्यंतचा भग घातला आहे. उपमा वगैरे अलंकारांच्या निवारणाकरतां, ‘उपपादकत्वेन’ येथपर्यंतचा (विशेषणरूप) भाग लक्षणांत घातला आहे (उपम वगैरे अलंकार प्रस्तुत अर्थाचें समर्थन करीत नसून शब्दानें ज्याचें कारणत्व सांगितलें जातें अशा अनुमानांतील हेतुचें निवारण करण्याकरतां, (लक्षणांत) ‘उपपादकत्वेन विवक्षित:’ असें (मुळांत) म्हटलें आहे. समर्थन करणारा पदार्थ समर्थक अथवा हेतु आहें असें, प्रत्यक्ष पंचमी वगैरे विभक्तियुक्त शब्दांच्या द्वारा न सांगणें, हा याचा तात्पयार्था, असें हें लक्षण असल्यानें, ‘भयानकत्वात् परिवर्जनीयो दयाश्रयत्वादसि देव सेव्य: । [हे राजा ! तूं भयंकर (दिसत) असल्यानें, तूं दूर ठेवण्यास योग्य आहेस; व तूं दयेचा आश्रय असल्यानें तुझी सेवा करण्यास तूं योग्य आहेस].’ ह्या ठिकाणीं, काव्यलिंग अलंकार होत नाहीं. (कारण ह्या ठिकाणीं कारणाचा निर्दॆश स्पष्ट पंचमी विभक्तीनें केलेला आहे.) कारण स्पष्ट न सांगतां तें सूचित केलें गेलें असेल, तरच त्यांत सुंदरता उत्पन्न होते: म्हणून कारण सूचित असेल त्या ठिकाणींच काव्यलिंग अलंकार मानावा, ही गोष्ट सर्व आलंकारिकांनी मान्य केली आहे.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP