अशा रीतीनें ज्या अर्थाचें उपपादन करायचें असेल त्याच्याशीं, हेतु अव्यभिचारानें संबद्ध आहे (म्हणजे व्याप्तिनियमानें संबद्ध आहे) असें ज्ञान झालें तरच, हेतूच्या उपपादकत्वाची संगति लावतां येतें, नाहींतर, (म्ह० तो हेतु व्यभिचारी असेल तर) त्याच्या योगानें प्रतिपादित होणारा अर्थ (म्ह० साध्य) ‘हा असा असेल का असा नसेल’ असा संदेहयुक्तच राहणार, म्हणूनच “उपपत्ति, समर्थन इत्यादि लोकविलक्षण शब्दांचे प्रयोग, आलंकारिकांच्या मतें, अनुमितीच्या मार्गांत शिरतात. (म्ह० अशा विलक्षण शब्दप्रयोगानें, काव्यांत, अनुमिति अलंकार होऊ शकतो.)” कुणी म्हणतील, “समर्थन म्ह० अनुमिति नव्हे. समर्थन म्हणजे द्दढप्रत्यय;” पण हें म्हणणें बरोबर नाहीं; कारण (द्दढप्रत्यय म्हणजे तरी काय ?) द्दढप्रत्यय (म्ह० निश्चित ज्ञान) हा, इंद्रियांच्या सन्निकर्षाचा (संबंधाचा) त्यांत अभाव असल्यामुळें, प्रत्यक्ष ज्ञानस्वरूप होऊ शकत नाहीं. वरें, या द्दढप्रत्ययांत, अनुमितीची सामग्री प्रबल असल्यानें, त्याला शाब्दज्ञानस्वरूप म्हणतां येत नाहीं; आणि म्हणूनच त्याला (आंतरिक सामग्री नसल्याने) मानस प्रत्ययही म्हणतां येत नाहीं, (तेव्हां समर्थन, द्दढप्रत्यय वगैरेंनाही अनुमितिज्ञानस्वरूप मानणें योग्य आहे.)” यावर आमचें (जगन्नाथाचें) उत्तर :--- कबूल. काव्यलिंग हा प्रकृत अर्थाचा उपपादक असतो (ही गोष्ट खरी); आणि उपपत्ति म्हणजे अनुमितीच. पण उपपत्ति करणारा हेतु कदाचित् व्यभिचारी असला तरी त्या वेळीं (वाचकांना) त्याचा व्यभिचार कळून येत नाहीं. पण इतकें असूनही (म्ह० अनुमितिप्रमाणें काव्यलिंगांत अव्यभिचारी हेतु असूनही), (ह्या ठिकाणीं) तो हेतु अनुमानाल्काराचा विषय होत नाहीं; याचें कारण असें कीं, श्रोत्याला ज्या लिंगाच्या म्ह० हेतूच्या जोरावर अनुमितीचा बोध करून देण्याच्या इच्छेनें कवि काव्य करतो, ते लिंग (अथवा तो हेतु) च अनुमानालंकाराचा विषय होतें; कारन, अशा ठिकाणीं काव्यव्यापाराला विषय होणारी जी अनुमिती, तिला हा हेतु (करण) म्हणून सांगितलेला असतो, हा आमच्या म्हणण्याचा निष्कर्ष. याचें उलट, काव्यलिंगाच्या ज्ञानाच्या योगानें होणारी अनुमिति, कवीला अनुमिति म्हणून श्रोत्यांच्या मनांत, ठसवण्याची इच्छा नसते. म्हणून अशा (काव्यलिंगरूपी) हेतूनें होणारी अनुमिति (अनुमानालंकाराच्या) काव्यव्यापाराचा विषय होऊ शकत नाहीं. ती अनुमिति श्रोत्यांना केवळ कांहीं तरी निमित्तामुळें (सहजासहजीं) होते; म्हणून ती अनुमिति उत्पन्न झाली तरी, ती अनुमानालंकाराचा विषय होत नाहीं. पुढें, आम्ही अनुमानाचें उदाहरण म्हणून, ‘तस्मिन् मणिव्रातमहान्धकारे०’ हें पद्य देणार आहों, त्यांत मात्र, अनुमितीचा बोध करून देण्याची इच्छा कवीच्या मनांत असल्यामुळें, ती अनुमिति, अनुमान अलंकाराचा (अवश्य) विषय होते. याशिवाय कवीनें निर्माण केलेल्या (काव्यांतील) प्रमात्याच्या ठिकाणीं राहणारी जी अनुमिति (म्ह० ती कवीच्या काव्यांतील एखादे पात्र करते, स्वत: कवि करीत नाहीं.) ती अनुमानालंकाराला कारण होतें; पण श्रोत्याच्या ठिकाणीं होणारी काव्यलिंगांतली अनुमिति, केवळ काव्यांतील महावाक्याचा अर्थ निश्चित करण्यालाच अनुकूल असते, म्हणून तिला अनुमानालंकार म्हणतां येत नाहीं; (काव्यलिंगांतील अनुमिति श्रोत्याच्या ठिकाणीं असते व अनुमानालंकरांतील अनुमिति ही कवीनें निर्मिलेल्या पात्राचे ठिकाणीं असते व अनुमानालंकारांतील अनुमिति ही कवीनें निर्मिलेल्या पात्राचे ठिकाणीं असते हा या दोन अलंकारांतल्या अनुमितींत फरक.) अशा अनुमितीनें युक्त काव्यांत काव्यलिंग अलंकार होतो, हा या दोहोंत मोठाच फरक आहे. अशारीतीनें, अनुमानाच्या लक्षणांत सांगितलेली जी अनुमिति, तिचा काव्यलिंगाच्या लक्षणांत होणारा अतिप्रसंग टाळण्याकरतां, तिला, (म्ह० अनुमानालंकारांतील अनुमितीला) “काव्यव्यापाराला विषय होणारी” असें विशेषण द्यावें (म्हणजे झालें).
आतां ‘समर्थनीयस्यार्थस्य काव्यलिंगं समर्थकम्’ (समर्थन करण्याला योग्य अशा अर्थाचें समर्थन करणारें तें काव्यलिंग) हे कुवलयानंदकारांनीं काव्यलिंगाचें जें लक्षण केलें आहे त्याचीही, ‘सामान्यविशेषभावानें युक्त नसणें’, हें विशेषण त्यांत दिलें नसल्यामुलें, अर्थान्तरन्यास अलंकारांत अतिव्याप्ति जरूर होतें.