आतां,
“तुझ्या डोळ्याप्रमाणें, ज्याची कांति आहे, असें निळें कमळ पाण्यांत बुडून गेलें; हे प्रिये ! तुझ्या मुखाच्या कान्तीचें अनुकरण करणारा चंद्र, मेघांनीं झाकून टाकला; तुझ्या चालण्याच्या रीतीचें अनुकरण करणारे जे राजहंस ते पण निघून गेले; (हाय हाय) तुझ्याशी सद्दश अशा वस्तूंना पाहून मला (माझ्या मनाला) विरंगुळा वाटेल म्हटलें तर, तेवढें सुद्धां दैवाला सहन होत नाहीं.”
‘दर्भाच्या कोंबाकडे ढुंकून न पाहणार्या हरिणींनीं, तुझी वाट काय झाली हें न समजणार्या मला, आपले वर पापण्या केलेले डोळे दक्षिण दिशेकडे लावून, तुझी वाट (इशार्यानें) दाखवलीं.’
यांपैकीं पहिल्या श्लोकांतल्या तीन चरणांत आलेला अर्थ, अनेक वाक्यार्थरूप असून तो, चौथ्या चरणांतील अर्थाला हेतु झाला आहे. दुसर्या श्लोकांत, ‘मला वाट दाखवून देण्याकरितां डोळे दक्षिण दिशेकडे करणार्या’ ह्या हरिणीच्या विशेषणानें, ‘अनेकपदार्थरूप हेतु सांगितला आहे.’ असें जें अलंकारसर्वस्वकारानें म्हटलें आहे व ज्याला कुवलयानंदकारांनीं अनुमोदन दिलें आहे तें (त्या दोघांचेंही म्हणणें) चुकीचें आहे. अनुमान व अर्थान्तरन्यास यांच्या विषयांत, हेतु (काव्यलिंग) अलंकार नसतो, हें सर्वांना मान्य आहे. या दोन अलंकारात हेतु (काव्यलिंग) अलंकार असतो, असें म्हल्यास ह्या दोन्ही अलंकारांचा उच्छेद होण्याची वेळ येईल. तेव्हां वरील दोन्ही श्लोकांतील अर्थ, अनुमानालंकाराचाच विषय आहे. ह्यांतील पहिल्या श्लोकाच्या चौथ्या चरणांतील दैव हा पक्ष; व त्याच्या ठिकाणीं, नायिकेच्या अंगाशीं सद्दश असलेल्या वस्तूंच्या दर्शनानें उत्पन्न होणारें सुख सहन न होणें हें साध्य. (वरील पक्षावर सिद्ध करणें जरूर आहे.) व पहिल्या तीन चरणांत सांगितलेला, नायिकेच्या अंगाशीं सद्दश असलेल्या वस्तूंचा आधार तोडून टाकणें हा हेतु, तें (वर सांगितलेलें) साध्य सिद्ध करीत आहे, हें स्पष्टच आहे. (वरील अनुमान असें मांडतां येईल -) “दैव, नायिकेच्या अंगाशीं सद्दश असलेल्या पदार्थांच्या दर्शनानें मला होणारें जें सुख तें, सहन न करणारें आहे; नायिकेच्या अंगाशीं सद्दश असलेल्या वस्तूंचा मला वाटणारा जो आधार (विरंगुळा) तो तोडणारा तें (तें दैव) असल्यामुळें; माझ्या यज्ञदत्त वगैरे शत्रूंप्रमाणें - असा या अनुमानाचा प्रयोग होईल. ‘मृग्यश्व०’ या दुसर्या श्लोकांत, जरी वक्त्याच्या ठिकाणीं (म्ह० रामाच्या ठिकाणीं) असलेलें जें संबोधन (सीतेच्या वाटेचें ज्ञान) तें, त्याकरतां होणारा जो हरिणींचा नेत्रव्यापार (म्ह० द्दष्टि फेकणें) त्याचें ज्ञान झालें असतां, (ते संबोधन) उत्पन्न होतें, व या द्दष्टीनें तो नेत्रव्यापार संबोधनाचें उत्पादक कारण ठरतें, [अनुमानांतील कारण (हेतु) उत्पादक असूं शकत नाहीं; कारण अनुमितीला कारण होणारा हेतु उत्पादक नसून ज्ञापक असतो, म्हणून वरील श्लोकांत अनुमान होऊ शकत नाहीं अशी शंका येत असली] तरी, ही उत्पादकता, अनुमितीचें साधन होणारा जो हेतु त्याच्या ज्ञापकतेहून निराळी नसल्यामुळें येथें अनुमानालंकार मानणेंच योग्य आहे. फक्त या दोन्ही श्लोकांत फरक असा कीं, यांतील पहिल्या श्लोकांत अनुमिति गम्य, आणि दुसर्या श्लोकांत बुध धातूच्या प्रयोगावरून ती वाच्य झाली आहे. दुसर्या श्लोकांतील अनुमानाचा प्रयोग असा :--- हरिणी दक्षिणेकडील वार्याच्या स्पर्शानें युक्त आहेत; दक्षिणेकडे केलेया डोळ्यांच्या (विशिष्ट तर्हेच्या) विलक्षण व्यापारानें त्या युक्त असल्यामुळें (हा हेतु); नेत्रव्यापाराची विलक्षणता पापण्य वर करणें वगैरेमुळें वाटली, असें येथें समजावें.