“असा हा श्लेष सभंग आणि अभंग असा द्विविध असून अर्थालंकारच असतो.” असे उद्भटानुयायी लोकांचें म्हणणें. “हे दोन्हीही शब्दालंकारच; कारण यांच्यांत शब्द बदलतां येत नसल्यानें अन्वय व व्यतिरेक या प्रमाणांनीं येथील अर्थ शब्दावरच अवलंबून आहे, हें सिद्ध होतें. आतां श्लेषाचा तिसरा प्रकार मात्र अर्थालंकार मानला पाहिजे, करण तो केवळ अर्थावरच अवलंबून आहे” असें मम्मटभट्टांचें म्हणणें, “अन्वयव्यतिरेकाच्य अयोगानें हेतूचें (म्हणजे कारणाचें) ज्ञान होणें हें, घटाला दंड हेतु आहे, ह्या म्हणण्याप्रमाणें मानावें, पण विशिष्ट अलंकाराचा आश्रय शब्द आहे किंवा अर्थ आहे आहे असे आश्रयाचें ज्ञान अन्वयव्यतिरेकानें होतें, असें मानूं नये; कारण आश्रयाचें ज्ञान हें त्याच्या वृत्तित्वाच्या ज्ञानावर अवलंबून असतें. ह्या ठिकाणीं, सभंग श्लेष, शब्दावर (म्ह० दोन शब्दावर, एका पदांतून निघणार्यादोन शब्दांवर) अवलंबून असणें हें म्हणणें जतुकाष्ठन्यायानें जुळतें. (म्हणजे ज्याप्रमाणें एकाच काटकींत लाखही सांपडते व तें काष्ठही असते त्याप्रमाणें एकाच पदांत दोन अर्थ सांगणारे दोन निरनिराळे शब्द असतात); व अभंग श्लेष हा दोन अर्थांवर अवलंबून असतो हें म्हणणें ‘एका देठावर दोन फळें असतात या न्यायानें स्पष्टच होतें, (म्ह० एकाच शब्दापासून दोन निराळे अर्थ प्रतीत होणें, हें अभंग श्लेषाचें स्वरूप.) म्हणून वरील ठिकाणीं सभंग श्लेषाला शब्दालंकार मानावें, व अभंग श्लेषाला अर्थालंकार मानावें. “प्रतिप्रवृत्तिनिमित्तं शब्दभेद:” या मतें (म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ निराळा होतांना अहवा करतांना त्या अर्थाचें प्रवृत्तिनिमित्त निराळें असल्यानें, शाब्दही निराळा आहे, अशी कल्पना केली पाहिजे.” या (नैय्यायिकांच्या) मतें, हा अभंगश्लेष दोन अर्थाकरतां दोन शब्दांवर अवलंबून असल्यानें, त्याला शब्दालंकारच म्हणणें योग्य आहे, हें खरें असलें तरी, अशा शब्दांत, पदत्त्वाचा विशिष्टधर्म जो वर्णानुक्रम (म्ह० वर्णांची आनुपूर्वी) तो शब्दाचे निरनिराळे अर्थ होत असतांही एका राहात असल्यामुळें, व त्यामुळें एकच शब्दांतून निघणार्या दोन्ही अर्थांचा अभेद मानला जात असल्यामुळें, (अभंगश्लेष) दोन शब्दांवर अवलंबून आहे, असें मानणें कठिण आहे, नाहींतर प्रत्येक अर्थाला नवीन शब्द घ्यावा, या मतीं दुसर्याना (म्ह० मम्मटाचार्यांना) इष्ट वाटणार्या अर्थश्लेषांतही, शब्दालंकारच होऊ लागेल” असें अलंकारसर्व्स्वकार वगैरें म्हणणें आहे.
हा श्लेष उपमेप्रमाणें स्वतंत्र असला तरी तो त्या त्या स्थलीं, सर्व अलंकारांना मदत करणारा म्हणून येतो; व वाणीचे नवे नवे सौभाग्य (म्हणजे सौंदर्य) खुलवितो. ह्याची नानाप्रकारच्या उदाहरणांमध्यें सह्रदयांनीं (म्हणजे रसिकांनीं) प्रतीती पहावी.
येथें रसगंगाधरांतील श्लेष प्रकरण संपलें.