हें (उद्भटपक्षीयांचें) म्हणणें दुसर्या कित्येकांना पटन नाहीं. त्यांचे म्हणणे असें कीं, “तुम्ही जो ‘येन नाप्राप्ते.’ हा न्याय सागितला त्यावर आमचें म्हणणें असें कीं, श्लेषाला निराळी अशा जागाच नाहीं, असें तुम्ही म्हणतां तरी कसें ? कारण पूर्वी दिलेल्या उदाहरणांत म्हणजे ‘पद्माख्यं तत् किमपि ललितम्’ ह्या आमच्या (म्ह० जगन्नाथाच्या) पद्यांतील चरणांत व ‘सर्वदो माधव: पातु यो गंगां समदीधरत्’ । [पहिला अर्थ :--- सर्व देणारा व पर्वत व पृथ्वी धारण करणारा विष्णु (तुमचें) रक्षण करो.] ह्या दुसर्या कुणाच्या तरी पद्यांत (श्लोकार्धांत) श्लेषावांचून दुसरा कोणता अलंकार आहे बरें ? तुम्ही (म्ह० उद्भतपक्षीय) म्हणाल, ह्या ठिकाणीं तुल्ययोगिता अलंकार आहे. पण साद्दश्याचा जिच्यांत निश्चयानें प्रत्यय येतो, ती तुल्ययोगिता, या वरील दोन श्लोकांत (म्ह० संभूत्यर्थ ० इ ० व सर्वदो माधव: इ० श्लोकांत) लक्ष्मी आणि कमल (पहिल्यांत) व हरि आणि हर (दुसर्यांत) या जोडयांमधील साद्दश्य सांगणें, हें कांहीं प्रस्तुत अस्थलीं इष्ट नाहीं, तसेंच एका शब्दानें दोन अर्थांचें कथन करणें याखेरीत या ठिकाणीं असा दुसरा कोणताही चमत्कार उत्पन्न करणारा प्रकार नाहीं, कीं ज्यामुळें आम्ही दुसरा अलंकार मानावा. एका शब्दानें दोन अर्थांचें कथन करणें म्हणजेच श्लेष. या द्दष्टीनें श्लेषाला दुसरी जागा मिळत असल्याकारणानें, त्यानें दुसर्या अलंकारांचा बाध करणें हें योग्य नव्हे. म्हणूनच वरील ‘नदीनां संपदम्०’ अथवा ‘देव त्वमेव०’ इत्यादि श्लोकंत, उपमादिकांचें मात्र किंचित् भान होतें, असें जें तुम्ही म्हटलें तेंही कांहींतरीच बोलणें झालें, गुण आणि क्रिया ही समानधर्म असतांना ज्याप्रमाणें उपमा होते, त्याप्रमाणें, केवळ शब्दा हा समानधर्म असूनही उपमा होणास कांहींएक हरकत नाहीं. अशारीतीनें श्लेषाच्या विषयांत दुसर्या अलंकारांची खरोखरीचीच सत्ता (अस्तित्व) असते, ती केवळ आभासात्मक नसते; उलट अशा ठिकाणीं श्लेषाचेंच किंचित् भान होतें, असेंच म्हणणें योग्य आहे. आतां “श्लेष सावकाश नसल्यामुळें (म्हणजे त्याला निराळी दुसरीकडे जागा नसल्यामुळें) म्हणणें, त्यावर आमचें म्हणणें असें कीं, पूर्णोपमेचा विषय सगळीकडेच तीन प्रकारच्य श्लेषांणीं व्यापून टाकला जात असल्यानें, तीच खरोखरी निरवकाश (म्हणचे दुसरीकडे कुठेंही जागा न मिळालेली) अशी होते; आणि मग तुमच्याच ‘येन नाप्राप्ते०’ या न्यायानें, ती स्वत:च्या विषयांत सावकाशा अशा श्लेषाचा बाध करते, असें म्हणणेंच योग्य आहे. त्याचप्रमाणें, ‘समरार्चितोऽप्यमरार्चित:’ [हा (राजा) युद्धामध्यें पूज्य असा असून देवांनींही सत्कार करण्यास योग्य आहे] या वाक्यांत श्लेषाचें मात्र ओझरतें भान झालें आहे. ज्याप्रमाणें, तिमिर या नांवाच्या नेत्ररोगाच्या योगानें आकाशांत दोन चंद्र दिसतात, पण पण ते खरे नसतात त्याप्रमाणें, हें ( येथील श्लेषाचें) भानही खोटेंच आहे. तेव्हां ह्या ठिकाणीं श्लेषाला अलंकार म्हणतां येणार नाहीं; कारण श्लेषाला प्राणभूत जो दुसरा (ग्राह्य) अर्थ अमरार्चित: ह्याच्या विरुद्ध समरार्चित: असा अर्थ करण्यास मरार्चित: याचा कांहींतरी अर्थ व्हायला पाहिजे, पण तो तर येथें मुळींच होत नाहीं; आणि झाला तरी तो येथें शेवटपर्यत मुळींच स्थिर रहात नाहीं. आतां विरोधाभासालंकारांत मात्र दुसरा अर्थ केवळ आभासरूप असला तरीसुद्धां, त्यानें अलंकार होऊं शकतो; पण श्लेषामध्ये मात्र तसें होत नाहीं; [म्ह० श्लेष अलंकार होण्याला त्याचें दोन (स्वतंत्र) अर्थ शेवटपर्यंत स्पष्ट निराळे टिकले पाहिजेत] म्हणून अशारीतीच्या वाक्यांमध्यें (उदा० समरार्चितोपि इ० मध्यें) श्लेषाच्या किंचित् भानानें उत्पन्न होणारा विरोधन अलंकार मानावा; पण विरोधाच्या किंचित् भानानें श्लेष उत्पन्न होतो असें मानूं नये. हें उघडच आहे. शिवाय, प्रत्येक अलंकार आपापल्या विशिष्ट रूपानें अस्तित्वांत येत असल्यानें, त्याला श्लेषानें उभे केले आहे (उत्थापित केलें आहे) असें म्हणतां येणार नाहीं. (म्हणजेच ‘येन नाप्राप्ते’ हा न्याय त्याला लावून, श्लेषानें त्यांचा बाध कराव असें म्हणतां येणार नाहीं). यावर कुणी म्हणती, ‘(अशा स्वतंत्र अलंकाराच्या बाबतींतही) श्लेषानें, त्या त्या स्वतंत्र अलंकारांतून दुसरे विशिष अलंकार (पोटविभाग गणले जाणारे श्लेषोत्थापित अलंकार) उभे केले असतीत तर, त्यांना, ‘येन नाप्राप्ते’ हा न्याय लागू करतां येईल.’ पण (यावर आमचें म्हणणें असें कीं) असें मानल्यास, ‘बाध्यसामान्यचिन्ता’ या न्यायानें स्वत: श्लेषाच्य विषयांत हे सर्व विशिष्ट अलंकार येत असल्यानें, त्यांचा शेवटीं बाधच होण्याचा प्रसंग येईल, आणि श्लिष्टपरम्परितरूपक व श्लिष्टसमासोक्ति इत्यादि (केवळ श्लेषानेंच अस्तित्वांत येणारे) विशिष्ट अलंकार अजिबात नष्ट होतील. म्हणून शेवटीं श्लेषानें उभ्या केलेल्या अलंकारांचा श्लेष बाध करतो, असें म्हणूं नये, पण (फार तर) अशा अलंकारांचा, श्लेषाशीं संकर मानावा. (म्हणजे त्याना श्लेषमिश्रित अलंकार म्हणावें.)