समासोक्तीच्या या उदाहरणांत, म्हतार्या वेश्यांचा वृत्तांत प्रतीत ओत आहे. या ठिकाणीं अभंग श्लेष आहे, हे सर्वांना मान्य आहे. एकंच काय कीं, अशा ठिकाणीं अप्रकृत अर्थ व्यंग्य नसतो.”
ह्या कुवलयानंदकाराच्या म्हणण्याच्या आतां विचार करूं या :---- येथें असें जें म्हटलें आहे कीं “अशा स्थली (म्ह० प्रकृताप्रकृत श्लेषाच्या स्थलीं) उपमा वगैरे अलंकारच व्यंग्य असतात असा प्राचीनांच अभिप्राय आहे; अप्रकृतार्थ व्यंग्य असतो असा अभिप्राय नाहीं,” हें जर खरें असेल तर, “अनेक अर्थ सांगणार्या शब्दाचे वाचकत्व (अर्थ सांगण्याची शक्ति) संयोग विप्रयोग वगैरे प्रमाणांनीं मर्यादित झाली असतां, वाच्य नसलेल्या अर्थाचा मागाहून बोध करून देणारा जो व्यापार त्याला व्यंजनाव्यापार म्हणावें.” इत्यादिजो प्राचीनांचा (मम्मटांचा) ग्रंथ, त्याची आपण (म्ह० कुवलयानंदकार) संगति कशी लावणार ? कारण तुमच्या मताप्रमाणें, अशा ठिकाणीं व्यंग्य होणार्या उपमा वगैरेंकरतां वाचकत्वाचें नियंत्रण करण्याची कांहीं जरूरच नाहीं. अनेकार्थक शब्द, उपमा वगैरे अलंकारांचे वाचक होण्याचा तुमच्या मताप्रमाणें प्रसंगच कोठें आहे कीं, ज्यामुळें त्या वाचकत्वाचें नियंत्रण करण्याकरतां, संयोग वगैरे प्रमाणांचा स्वीकार करणें उपयोगी ठरेल ? दुसर्या अर्थाची वाचकता (म्ह० अर्थ सांगण्याची शक्ति) मर्यादित केली नसतांनाही, उपमा वगैरेंचें व्यंग्य होणें हें निर्वेधपणें होऊं शकतें. तेव्हांत, “प्राचीनांचा हा असा अभिप्राय आहे” हें तुमचें म्हणणें, त्यांचा ग्रंथ न समजल्यामुळें आहे, ही गोष्ट उघड आहे.
पुन्हां आणखी, ‘अप्रकृतार्थ सुद्धां अभिधेनें सांगितला जातो’ असें जें तुम्ही (कुवलयानंदकारांनीं) म्हटलें त्याबाबतींत आम्ही विचारतों कीं, “अप्रकृतार्थाचें शक्तीनें अप्रकृतार्थ होऊ न देणें या बाबतींत) शक्तीचे नियंत्रण झालेलें असतें, (म्ह० शक्तीनें अप्रकृतार्थ होऊ न देणें या बाबतींत) शक्तीचे नियंत्रण झालेलें असतें. (म्ह० अप्रकृतार्थ मनांत येण्यापूर्वीच शब्दाची वाचकत्व शक्ती मर्यादित झालेली असते) असें तुम्हीच (कुवलयानंदकारांनीं) म्हटलें आहे. आतां “नियंत्रण म्हणजे फक्त (पहिल्याच) अर्थाचा बोध प्रथम करून देणें; दुसर्या अर्थाचा नाहीं; व अशारीतीनें प्रकृत शब्दशक्तीनें प्रकृतार्थाचा बोध झाला असतां, त्या शब्दांतच, दुसरा अर्थ दाखविण्याची असलेली जी शक्ति तिचा उपयोग होण्याचें राहून गेल्यामुळें, (अकृतार्थया) तिनें अप्रकृतार्थाचा बोध करून देण्यांत बाधक असें कांहींच नाहीं.” असें तुमचें म्हणणें असेल तरी, तेहीं बरोबर नाहीं, कारण पहिल्यानें अप्रकृतार्थाचा बोध होत नाहीं (असें तुम्ही म्हणतां) तें काय म्हणून? “प्रकरणादिकांच्या ज्ञानानें त्या अप्रकृतार्थाच्या बोधाचा प्रतिबंध होतो, म्हणून अप्रकृतार्थाचा बोध होत नाहीं” असें म्हणत असला तर, प्रकृतार्थाचा बोध झाल्यानंतर, प्रकरण वगैरेच्या ज्ञानामुळें होणारा जो अप्रकृतार्थाचा प्रतिबंध अतो आतां (म्ह० नंतर तरी) कोणी दूर केला ? तुम्ही म्हणाल कीं, “ज्ञान त्वरित (तीन क्षणच फक्त राहून) नष्ट होत असल्यानें, त्याच वेळीं (म्ह० प्रकृतार्थाचा बोध झाल्यावर) प्रकरणज्ञानच नष्ट होऊन जातें,” पण हेंही म्हणणें बरोबर नाहीं; कारण लागलीच दुसरें ज्ञान (प्रकरणज्ञान) उत्पन्न व्हायला हरकत काय ?” आतां “तेंच विशिष्ट प्रकरणज्ञान, अप्रकृतार्थाचा बोध होण्यास, प्रतिबंधक असतें” असें म्हणाल तर, अशीं विशिष्ट प्रकरणज्ञानें हजारों ठिकाणीं प्रतिबंधक होतात, अशी भलतीच अवजड कल्पना करावी लागेल. त्यापेक्षां दुसरीकडे सिद्ध झालेला जो व्यंजना नांवाचा व्यापार, त्याचीच अशा ठिकाणीं कल्पना करणें योग्य होईल. शिवाय व्यंजनाव्यापार न मानतां, केवळ शक्तीनेंच वाक्यांत अनेक अर्थ स्फुरतात असें मानलें तर, ‘जैमिनीयमलं धत्ते रसनायां महामति: ‘(हे महाशय जैमिनीची विष्टा आपल्या जिभेवर घेतात) हा जो (ऐकणार्याकडून व सभ्य बोलणार्याकडून) बाधित असलेल्या टवाळखोर अर्थाचा बोध, तो शब्दाच्या वाचकशक्तीपासून होतो, असें म्हणणें कठीण आहे. ‘होतो’ असें कसेंतरी मानलें तरी, तो बाधितार्थ, देवदत्ताच्या विषयीं त्याच्या पुत्रानें उच्चारलेल्या वाक्यांत होत नाहीं; व त्याच्या टिंगलखोर मेव्हण्यानें उच्चारलेल्या उपहासाच्या (मस्करीच्या) वाक्यांत होतो, याची संगति लावतां येणार नाहीं; उलट प्राचीनांच्या मताप्रमाणें, “बोलणारा, ऐकणारा, वगैरे व्यक्ति, विशिष्ट प्रकारच्या असल्यास अप्रकृतार्थाचें भान केवळ व्यंजनेनेंच होऊं शकतें.” अशा स्थितींत, “अप्रकृतार्थाचें अभिधेनेंच कथन होतें.” असें जें तुम्ही म्हणतां तें काय म्हणून ?”